Categories
काही आठवणीतले

माऊली

वारीला जायचं तर ठरलं होतं. पण कसे.. कधी? आळंदी -पुणे करायची कि पुणे -सासवड. माझं मन सांगत होतं पुणे ते सासवड कर. पण सर्व ज्येष्ठांनी मला ओरडून पुणे- सासवडचा नाद सोडायला सांगितला. मग मी परत आळंदी ते पुणे अशी वारी करायची ठरवलं. गीतांजली होतीच बरोबर. आम्ही ह्यावेळी आपण आळंदीला भेटू असे ठरवले.

राहुल तर मला विचारत होता,” तुला वारी का करायची आहे”? त्याला म्हणाले,” मला माहित नाही. पण मला तीव्र इच्छा होतेय वारीला जायची. जणू काही माऊली सांगत आहेत ये वारीला”. प्रश्न होता आळंदी पर्यंत कसे पोचायचा? ह्याचा. राहुल सोडायला तयार होता. पण मुलींची शाळा असल्याने ते रद्द केले. शेवटी सोमनाथ म्हणजे १८ travels ला सांगून त्याने गाडीची सोय केली. त्याला म्हणाले, “मला आळंदी रोड पर्यंत कुठेही सोड. मी पुढे बघेन काय करायचे ते”. खरं तर मला आळंदी पुणे चालणे खूप hectic होईल असे वाटतं होते, पण बरोबर हि खात्री होती कि आपण करू शकू. आधीचे १० दिवस अतिशय धावपळीत गेले होते. ट्रेनिंग, ऑफिस, घरकाम, २ प्रोजेक्ट संपवायचं काम खूप जास्ती होते. पण तरीही मन सांगत होते तू जा.

सकाळी सर्व आवरून डब्बा बनवून निघाले. निघायला जरा उशीर झाला होता. गाडी वेळेत होती. पण पालखी निघाली होती. आळंदी रोड पर्यंत पोचले. खरे तर आळंदी फाटा खूप लांब होता. पण पुढे गाडी जावू शकत नव्हती. आता ह्यापुढे आपल्या पायी जायचं असा मनाचा हिय्या करून निघाले. GPS च्या मदतीमुळे खुप सोयीचं झालं. गीतांजली आणि माझी भेट अजून झाली नाही. आम्ही whatsapp live location चा फायदा घेतला. ती २ चौक मागे होती. मग मी थांबले. नशीब मात्र जोरात होते. मी थांबले तर…. “समोर पालखी. काय छान वाटले. शांतपणे पालखीकडे बघत होते. आजूबाजूला माणसांचा समुद्र होता. चक्क समुद्र. किती माणसे होती. लहान… मोठी, तरुण… वयस्कर. सर्व जण पालखीसाठी, पालखीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्या मागून दिंडी चालत होत्या. दिंडीची शिस्त खूप असते”.

दिंडी मध्ये एक म्होरक्या{दिंडी प्रमुख }असतो. त्याच्या मागेच सगळ्यांनी चालायचं. काहींच्या हातात झेंडे होते, तर काहींच्या हातात टाळ. काही बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तर काहींच्या डोक्यावर चक्क विठूमाऊलींची मूर्ती. सर्वांनी एका रांगेत चालायचं. पुढे सर्व पुरुष, मागे सर्व बायका. त्या बायकांच्या मागे दिंडी मधील काही मुख्य पुरुष. शाळेतले marching आठवते का? एका रांगेत चालायचे तर किती आटापिटा करायला लागायचा. बर, रांगेत पुढच्या माणसाच्या बरोबर मागे चालायचे, आणि डाव्या उजव्या बाजूच्या माणसांच्या रेषेत पण बरोबरीने चालायचे. त्यासाठी, सगळ्यांचा एकचं वेग हवा. सगळ्यांच्या बरोबर जाता यायला हवे. आपल्याला वाटते तेवढे सोप्पे नाही. आपल्याला दिंडी बरोबर जायचं तर आधीपासून खूप तयारी करायला लागेल. त्यांच्या वेगाने, त्यांच्या बरोबरीने, एवढे अंतर रोज पार करणे. आपल्यासाठी नक्कीच ते एक आव्हान. त्यासाठी शारीरिक दृष्ट्या किती तंदुरुस्त पाहिजे माणूस. पण फक्त शारीरिक तंदुरुस्ती हवी का? का मानसिक पण हवी? कारण जरी शरीर थकले, आणि मनाने सांगितले कि तू हे करायचं कि शरीर करतेच. त्यामुळे मन, मनाची ताकद पण समजून येते. तर एकूण काय शारीरिक तंदुरुस्ती, आणि मानसिक तंदुरुस्ती, दोन्ही महत्वाचं.

दिंडीमधील सर्व लोक कष्टकरी. शेतकरी. कुठून कुठून वारीला आलेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येतात. काय उद्देश, काय साधता येते ह्याने, देवदर्शन. देवाच्या चरणी आपले १५-२० दिवस अर्पण करायचे. काही तर १ महिन्यासाठी येतात. ह्याबाजूचे सर्व देवदर्शन करून वारीला येतात. मग पंढरपूर वरून घरी परत. दिंडी मध्ये त्यांची व्यवस्था पण चांगली करतात. नाश्ता, जेवणखाण, नेमाने सगळ्यांना मिळते. अर्थात त्यासाठी त्यांनी आधी पैसे पण घेतलेले असतात. खरेतर वारीला येताना त्यांच्या तश्या अपेक्षा पण खूप जास्त नसतात. आपल्याला २ वेळचे जेवण मिळावे, आणि आपण नामस्मरणात वेळ घालवावा. अमुक प्रकारचा जेवणं पाहिजे आणि तमुक प्रकार पाहिजे. असे काही नाही. जे मिळेल ते खावे. आणि हरी हरी करावे. अर्थात सगळी लोकं अशी नसतात.

असे म्हणतात वारीला तीन प्रकारची लोक येतात. हौशी, गवशी , नवशी. आधी वर्णन केलेले लोक नवशी. आमच्या सारखे हौस म्हणून येणारे हौशी. तर तिसरा प्रकार गवशी. थोडक्यात जे गवसेल ते घ्या आणि पिशवीत भरा. चोर वगैरे पण असतील. पण दोन्हीही वारीत आम्हाला चोरांचा अनुभव नाही आला. वारीच्या पूर्ण रस्त्यावर खूप दान देत असतात. काहीजण केळी देतात, काही बिस्कीट पुडे, पाणी, चहा, जेवण. सगळे काही वारीत मिळते. आपल्याला जेव्हा जे हवे ते आपण घेवू शकतो लोकांकडून. आम्ही प्रसाद म्हणून एकेक केळे घेतले एका माणसाकडून. पण बाकी गरजूंना मिळो असे म्हणत सगळे नाकारले. काही लोक गरज नसताना पण घेत होती, पिशव्या भरून भरून घेत होती. ते बघून मात्र वाईट वाटत होते. सगळ्यात चीड येत होती, ती म्हणजे जो माणूस देतोय त्याच्याकडून हिसकावून घेणाऱ्या लोकांची. एवढी गरज आहे का?असे वागायची गरज आहे का? हा प्रश्न त्यांना विचारावासा वाटत होता. पुढे एका दिंडीबरोबर आम्ही पण विश्रांती घेत होतो. त्यातील एक बाई म्हणत होती,”काय मी मी म्हणून घेतात. दिंडी मालकाने सगळी सोय केलेली असते. काही गरज नसते”, पण म्हणतात न,” व्यक्ती तितक्या प्रकृती”! वारीमधील चांगले अनुभव लक्षात ठेवावे आणि काही नको असलेले अनुभव विसरून जावे.

दिंडी मध्ये पांढरा वेषात असतात पुरुष मंडळी. डोक्यावर गांधी टोपी. किती मोहक हे दृश्य दिंडीचे. सगळे विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या नामस्मरणात मग्न. एकामागून एक चालत आहेत. वेगवेगळे अभंग म्हणणे चालूआहे. झांजा वाजत आहेत. काही तर एवढ्या अप्रतिम आवाजात अभंग गातात कि, ऐकत राहावे.

तर GPS मुळे आणि फोन मुळे गीतांजली आणि माझी भेट झाली. मागील वर्षी आमच्या बरोबर बरीच लोक असली तरी खूप वेळ आम्ही दोघीच दोघी होतो. ह्यावेळी आमची दिंडी जरा मोठी होती.  गीतांजलीचे बाबा, आत्या, प्रीती नावाची मैत्रीण आणि तिच्याकडे काम करणाऱ्या एक आजी आणि एक आमच्या वयाची मुलगी. हो आम्ही सगळ्या मुलीच. आमची दिंडी जरा वेगळी होती. पंजाबी ड्रेस मध्ये ४ बायका, एक नऊवारीतील आज्जी, एक साडी नेसलेली बाई. तर एक shirt pant मधील बाबा. सगळ्यांच्या पाठीला छोट्या sack आणि डोक्याला टोप्या. वयाप्रमाणे बघायला गेलो तर ७० च्या पुढील ३ आणि ४० च्या गटातील ४ असे होतो सगळे. सगळ्यांनी ठरवले होते पूर्ण चालायचं. आज्जीबाईंचा पाय जरा दुखत होता. तरी चालत होत्या आमच्या बरोबरीने. मधेच गर्दीत आत्या हरवल्या. आम्हाला वाटले त्या पुढे गेल्या. म्हणून आम्ही पुढे चालत आलो. गीतांजली चा फोन आत्याच्या कडे. कसेतरी संपर्क होवून परत भेटलो. फोन हा ,आपल्यासाठी केवढं मोठ उपयोगी असं साधन आहे. ह्यावर बोलत पुढे वारी चालू केली. ह्या वेळी आमच्या नशिबाने, निम्म्या अंतरापर्यंत पालखी आमच्या पुढे मागे होती. कधी आम्ही पुढे असायचो कधी पालखी. ह्याला कारण म्हणजे कधी आमची दिंडी थांबायची, कधी पालखी. गीतांजलीच्या बाबा आणि आत्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आमच्या बरोबरीने नाही, तर आमच्या पुढे ते चालत होते. दमले का? विचारले तर अजिबात कबूल करत नव्हते, “आम्ही दमलो म्हणून”. सगळ्यांबरोबर मजा येत होती. गप्पा, कधी दिंडीतील भजन ऐकत कधी थांबून पाणी पी, काहीतरी तोंडात टाक असे करत आम्ही पुढे पुढे चालत होतो. एकदा जेवणासाठी थांबलो. कुठे, कसे, काही विचारायचे नाही. जिथे जागा मिळेल तिथे बसलो आणि खावून पुढे निघालो. ह्यावेळी आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही. नुसतं ऊन, घामाच्या धारा. ढग आले कि बरे वाटत होते, पण आम्हाला ह्यावेळी पाऊस काही लागला नाही. जो खरा तर हवा होता. सगळीकडे खूप उकडत होते. पण आमच्या नशिबात पाऊस नव्हता वारी मध्ये. काकांनी तर खरेदी केली होती, पावसापासून वाचायची. पण खरेदी नंतर कधीतरी उपयोगी पडेल त्यांना. Raincoat काही त्या दिवशी लागला नाही. माझ्या दृष्टीने bombay sapper पर्यंत मी आरामात चालू शकले. त्यानंतर मला जरा पायाने त्रास दिला. वारीचं ठरलेलं अंतर पूर्ण करायचे होते. त्या नंतर मात्र आम्ही जरा जास्त वेळा थांबलो. सगळ्यांनाच हवा असलेल्या विश्रांतीनंतर आम्ही संचेती पूल वर आलो. संचेती हॉस्पिटलच्या पाटीने अतिशय आनंद झाला. सगळ्यांना आपण ठरवलेले अंतर पूर्ण केल्याचा आनंद झाला. अंदाजे २२ km चाललो. प्रीतीच्या म्हणण्याप्रमाणे वारी पूर्ण चालणारी लोक पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघून खुश का होत असतील ते जाणवले.

वारीत जावून काय मिळते असा विचार केला तर खरचं काय मिळाले. आपण एवढे चालू शकलो ह्याचा अभिमान! नाही. तो तर कधीच गळून पडला. खरचं! वारीमध्ये एवढी गर्दी असते आणि त्यात आपण ह्या पूर्ण जगात एक शुल्लक व्यक्ती. आपल्यामुळे काहीही होत नसते. सगळ्याचा कर्ता करविता धनी कोणी वेगळाच असतो. माऊलींची इच्छा होती म्हणून एवढे मी करू शकले. लोकांची भक्ती बघून आपल्याला आनंद मिळतो. त्यासर्व भक्तिभावात आपण कुठेतरी काहीतरी केले ह्याचं समाधान. त्यांच्यामुळे आपल्या तोंडात चार वेळा माऊलींचे नाव आले. चार वेगळ्या लोकांना भेटलो. अनंत लोकांना बघितले. अनंत लोकांमध्ये चाललो ह्याचा समाधान. वारी तुम्हाला जगाची जाणीव करून देते. कधीतरी हवेत चालत असाल तर जमिनीवर आणायला मदत करते. स्वतःशी बोलायला खूप जास्त संधी देते. जी रोजच्या पळापळीमध्ये तुम्हाला नाही मिळत. अशी संधी तुम्हाला बाकी ठिकाणी पण मिळतेच. पण हा अनुभव खूप वेगळा. मी काही खूप धार्मिक नाही ना खूप देवाचे करणारी आहे. रोज देवाला नमस्कार पण करत नाही. तरीही वारी मला अनंत कारणांनी आकर्षित करते. शिवाजीनगर वरून निघताना आता पुढील वर्षी वारीतील एक टप्पा वाढवू असा विचार करत सर्वांना टाटा करत मी घरच्या मार्गाला लागले.