नमस्कार मैत्रिणींनो, काय निघालात ना गावाला? मागील भटकंतीच्या भागात आपण लहान बाळांना (सहा महिने ते दोन वर्ष) चालतील असे काही पदार्थ पाहिले. या भागात आपण तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना चालतील असे पदार्थ बघणार आहोत.
बरेचदा असं होतं की, आपण साईट सीन बघायला जातो पण तिथे उशीर होतो आणि आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळेस मुलांना मध्येच भूक लागते. कित्येकदा बाहेर मुलांच्या आवडीचे पदार्थ मिळतच नाही किंवा शोधायला वेळ लागतो. तेव्हा तहान लाडू भूक लाडू बरोबर असलेले बरे.
(अ ) नाचणीचे लाडू :-
नाचणी :-२० ग्रॅम | भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त. |
काजू :- ५ ग्रॅम | प्रथिनांचा साठा असतो. |
बदाम :- ५ ग्रॅम | प्रथिनांन बरोबर तंतू सुद्धा असतात त्यामुळे भूक भागते. |
वेलदोडा :- २ ग्रॅम | थंडावा देतो आणि चवही उत्तम. |
खारीक :- २ ग्रॅम | रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. |
साखर :- गरजे नुसार | तातडीची ऊर्जा मिळते. |
तूप :- १० ग्रॅम | स्निग्धता आणि त्याच बरोबर oil soluble vitamin मिळतात. |
(*) कृती :-
- प्रथम नाचणीचे पीठ तुपावर छान भाजून घ्या.
- त्यानंतर काजू, बदाम, खारीक (त्यातील बी काढून छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे मिक्सर मधून काढण्यास सोपे जाईल.) यांची मिक्सर मधून पूड करून घ्या.
- वरील केलेली सर्व पूड तुपावर भाजून घ्या.
- आता वरील सर्व पदार्थ एकत्र करून घ्या.
- गरजेनुसार (प्रत्येकाचे साखरेचे प्रमाण वेगवेगळे असते कोणाला गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं त्यानुसार ज्याचे त्याने ठरवावे.) त्यात पिठीसाखर घालून सगळं मिश्रण एकत्रित हलवून लाडू वळा.
Thought for food :-
- नाचणीचे पीठ वापरण्याच्या ऐवजी त्याएवजी तुम्ही मुगाचे पीठ वापरून बाकी सर्व साहित्य तेच घालून मुगाचे लाडू सुद्धा बनवू शकता.
(ब) राजाराणी :-
शेंगदाणे :- २० ग्रॅम | स्निग्धता मिळवून देतात. त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू सुद्धा असतात. |
फुटाण्याची डाळ:- २ ग्रॅम | उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो. |
कढीपत्ता :- ५ ग्रॅम | फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे व दात बळकट होण्यास मदत होते. |
हिंग :- ३ ग्रॅम | उत्तम मिनरल्सचा साठा व लोहाचे प्रमाण जास्त असते. |
तेल :- ५ ग्रॅम | ठराविक विटामिन्स तेलातून मिळतात. |
मीठ:- गरजे नुसार | इलेक्ट्रोलाइट्स संतुलन नीट ठेवण्यास मदत. |
साखर :- गरजे नुसार | Instant energy मिळते. |
तिखट :- गरजे नुसार |
(*)कृती :-
- प्रथम दाणे व फुटाणे भाजून घ्यावेत भाजल्यानंतर त्याची सालं काढून घ्यावीत.
- तेल गरम करून त्यात हिंग व कढीपत्ता घाला. (कडीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर तळावा.)
- वरील मिश्रणात भाजलेले फुटाणे आणि दाणे घालून ते छान खुसखुशीत होईपर्यंत परता.
- गरजेप्रमाणे त्यात मीठ, तिखट व साखर घाला.
Thought for food :-
- साधारणपणे आमटी किंवा पोह्यात घातलेला कडीपत्ता आपण बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याऐवजी तो आपण बारीक चिरून घातल्यास बाहेर काढता येत नाही व त्यातले गुणधर्म आपल्याला मिळतात.
- राजाराणी या पदार्थात आपल्या आवडीनुसार त्यात जिरे / धने किंवा चाट मसाला घालू शकता.

(क ) इंस्टंट उपमा :-
जाड रवा :- ३० ग्रॅम | पचायला सोपे आणि पोटभरीचे. |
कांदा :- १० ग्रॅम | तंतू व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. उन्हाळ्यात फायदेशीर आहे. |
गाजर :- १० ग्रॅम | विटामिन ए भरपूर प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांसाठी उपयुक्त. |
कोथिंबीर :- ५ ग्रॅम | औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. |
फोडणीचे साहित्य:-गरजे नुसार |
(*) कृती :-
- रवा चांगला भाजून घ्या व बाजूला काढून ठेवा.
- नंतर तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा तपकिरी रंगावर येईस्तोवर परतून घ्या. म्हणजे त्यातील सगळा पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल व टिकण्यासाठी सोपे होईल.
- गाजर किसून उन्हात ठेवल्यास त्यातील पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल. कोथिंबीर सुद्धा अशीच वाळवून घ्या.
- आता तेल गरम करून त्यात फोडणी करून घ्या. फोडणीमध्ये वाळलेला कडीपत्ता घालावा.
- फोडणी गार झाल्यानंतर त्यात परतलेला कांदा, वाळलेलं गाजर आणि भाजलेला रवा घालावा. शेवटी साखर मीठ घालून नीट हलवून ठेवावं.
- हा इन्स्टंट उपमा नंतर लागेल तेव्हा गरम पाणी घालून पटकन शिजवता येतो.
Thought for food :-
- ह्या झटपटीत उपम्यामध्ये तुम्हाला लागेल तसे शेंगदाणे, काजू आणि यासारख्या इतर गोष्टी घालून त्याची पौष्टिक मूल्ये वाढवू शकता.