आली आली होळी आली…
होळी रे होळी..पुरणाची पोळी!
अस म्हणायची वेळ आली, पण ह्या वेळी होळीचा रंग थोडा बेरंग झाला आहे ‘कोरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्गामुळे. भारतात तब्बल 40 केसेस आढळल्यामुळे सगळे सावधगिरी बाळगत आहेत आणि ह्यात काहीच गैर नाही पण घरातले चिमुकले मात्र ह्याने हिरमुसले असतील नाही का? आमच्या घरी सुद्धा तेच झालं.
“पण आम्ही थोडासा रंग खेळलो तर काय बिघडलं?” अश्या प्रश्नांची उत्तरे देऊन नाकी नऊ आले माझ्या! अश्या परिस्थितीत काय करावे हा प्रश्न होता माझ्या समोर. आमची काळजी योग्यच होती, पण त्यांचा हिरमुसलेला चेहेरा ही बघवत नव्हता.
कॊरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्ग हवेतून आणि एखाद्याच्या सहवासात आल्यामुळे होत असल्याने आम्हाला गर्दीचे ठिकाण टाळायचे होते. अगदी सोसायटी मध्येच खेळायचे ठरवले तरी 50-60 लोक सहज जमतील. बाहेर कुठे जाऊन खेळायचा तर प्रश्नच नाही!
पण म्हणून ह्या वेळी मी एक युक्ती केली आहे.
मुलीच्या मैत्रिणींना एकत्र करून त्यांना रंगीत खाऊ आणायला सांगितला आहे. प्रत्येकानी रंगीत खाऊ घेऊन यायचा आणि सगळ्यांनी एकत्र बसून तोच खायचा! होळी themed प्रीतिभोजन !
मुली एकदम खुश झाल्या! त्यांना म्हंटलं “ प्रीतिभोजनच्या आधी फुलांच्या पाकळ्यांनीं थोड घरीच खेळा आणि मग जेवूया”
आता ह्या आहेत चौघी जणी, म्हणून प्रत्येकाला 1 पदार्थ सांगितले आहेत! सगळ्यांच्या आया एकदम जोशात आहेत आणि फार मस्त प्रकार करणार आहेत. एकीची आई पुरणपोळी तर दुसरीची आई पालक पुरी करत आहे. तिसरी मैत्रीण गाजर हलवा आणत आहे! आमच्या घरी म्हणाल तर बीट आणि नारळ चे सूप मी केले आहे. नवल वाटलं ना?
मी पण हे सूप पहिल्यांदाच केले आणि ते सगळ्यांना खूप आवडले सुद्धा! विशेष म्हणजे हे सूप तुम्ही गरम किंवा गार सुद्धा सर्व करू शकता!
मी त्याची विधी खाली विस्तृत पणे दिलेली आहे, मग जरूर करून पहा, होळी साठी गार बीटचे सूप

नारळाचे दूध घालून बीटचे सूप
१ बीट – उकडलेला
१ वाटी नारळाचे दूध
१/२ इंच आले
१/२ हिरवी मिरची
१/२ कांदा चिरलेला
२ टी -स्पून तेल
कृती
प्रथम एका पॅन मध्ये तेलावर कांदा, आले, मिरची चांगले परतून घ्यावे
हे मिश्रण गार झाले की बीटाचे बारीक काप करून ह्या वरील मिश्रणा बरोबर मिक्सर वर पाणी घालून बारीक करून घ्यावे.
बीटचे हा रस गाळून घ्यावा.
ह्यात नारळाचे दूध, चवी पुरते मीठ आणि मिरपूड घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी
हे सूप तुम्ही असेच गरम सर्व्ह करू शकता किंवा ह्या मुलींसाठी जस मी केला आहे तसं फ्रिज मध्ये ठेवून गार पण सर्व्ह करू शकता .
आवडत असल्यास ह्यात सर्व्ह करताना थोडा लिंबू पिळावा.
तुमचे नारळाचे दूध घालून केलेले healthy बीटचे सूप तयार आहे !
कसा वाटला बेत?
तुम्हचे ह्या वर्षी काय प्लॅन्स आहेत? तुमचीपण अशी आगळी वेगळी होळी असणार आहे का ? तस असेल तर नक्की कळवा 🙂
तो पर्यंत स्वस्थ राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या!