लोकांना फक्त उद्धट, जिद्दी, कोणाचंही न ऐकणारी ती दिसली, त्याच्या मागचं सत्य उलगडण्याचा कधीच कोणी प्रयत्न देखील केला नाही… लोकांना फक्त ती निखळ हसणारी, फक्त आणि फक्त करिअर बघणारीच वाटली. त्यांना कसं कळेल की तिथवर जाण्यासाठी देखील तिने खूप खस्ता खाल्ल्या होत्या… नशिबाने खूप वेळा हरवलं होतं, आणि जिद्दीनं जिंकवलं होतं. का कुणास ठाऊक लोकांना फक्त एकच बाजू दिसली, का बरं दुसरी बाजू नेहमीच हरपली? आणि साहजिकच मुखवटा घालून फिरणारे आपण, कधी समजू शकलो असतो का दुःख तिचं आपण… पण ती देखील तितकीच जिद्दी, तितकीच हट्टी ती कुठे सांगणार होती तिचं स्वतःचं दुःख, ती तर लढणार होती पुन्हा आणि… आणि दरवाजा बंद करून रडणार देखील पुन्हा वेड्यासारखी एकटीच तक्रार करणार पुन्हा… सरतेशेवटी निर्णय घेणार पुर्ण संपवण्याचा आणि सरतेशेवटी पुन्हा सगळं नव्याने पुर्ण करण्याचा देखील…. काय वाटलं तुम्हाला… संपवण्याचा शब्दशः अर्थ घेतलात ना तुम्ही साहजिकच आहे, त्यात तुमचा दोष नाही एखाद्या स्वतंत्रपणे उडणाऱ्या, समुद्राला स्पर्श करणाऱ्या पक्ष्याला कशी समजेल एका कुंपणात बांधून ठेवलेल्या प्राण्याची कथा… शेवटी तिच्या जिद्दीने तिला पुन्हा जिंकलवलचं, आणि बळ दिलं तिच्या पंखांना नव्याने उडण्याचं….!!!
आली आली उन्हाळ्याची सुट्टी आली! आई -बाबांची गडबड सुरु झाली. कशी काय बुआ? अहो आता उन्हाळ्याचे शिबीर शोधा, मग मुलांना तिथे सोडा आणि आणा, एखाद्या खेळाचे कोचिंग क्लास शोधा, जमल्यास मुलांना सायकल, किंवा स्विमिंग असे काहीतरी शिकवा … एक ना दोन!
मीही त्यातलीच. शाळा संपायच्या मार्गावर होती आणि मी चौकशी सुरु केली. असाच विचार करत, हातात चहा चा कप घेऊन मी बाल्कनीत बसले होते, तोच माझा धाकटा मुलगा झोक्यात येऊन बसला. त्याला सहज विचारला तुला कुठल्या क्लासला जायच आहे? तोच त्याने मला साफ नकार दिला . मी काही करणार नाही असा म्हणाला आणि निघून गेला.
त्याच्या अश्या उत्तराने मी थोडी चकित झाले पण त्याच बरोबर तिथे चहा पिता पिता मी माझ्या उन्हाळयाच्या सुट्ट्यांच्या आठवणीत रमले.
आम्ही लहान होतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट बघायचो. सुट्टी खऱ्या अर्थाने निवांत आणि अनियोजित होती. सुट्टी लागली कि निवांत उठायचं, घरात काय थोडी कामं असतील ती करायची आणि खेळायला जायचं. तेव्हा काही ऊन लागायच नाही आणि मित्र मैत्रिणी एकत्र असले की तहान भूक ही लागायची नाही.
मग सूर्य डोक्यावर आला की प्रत्येकाच्या घरून हाक यायला सुरु व्ह्यायची. “अरे जेवायला येताय ना का डबा ऐसपैस खेळून पोट भरणार आहात?” अशी टिप्पणी आली की मात्र सगळे पसार व्हायचे! सुट्टीत आईचा ओरडा कशाला खा!
जेवण झालं की कलाकुसर किंवा वाचनाला ऊत यायचा. घरातले जुने पेपर, चिंध्या, गेल्या वर्षीची पुस्तके, जुनी मासिके, तुटलेले आभूषण, काचा, कवड्या हे सगळं आमचा खजिनाचं असायचा. ह्यातून काहीतरी नवीन बनवायचे एखादा किंवा नवीन खेळ तयार करायचा. ह्यात कुठेही घरातील मोठ्यांचा सहभाग होत नसे. एखादी शोभेची वस्तू किंवा उपयोगी वस्तू तयार झाली की केवढा तो आनंद व्हायचा!
गोष्टीचे पुस्तक, कादंबरी वाचायची वेगळीच गंमत होती. माझ्या बाबांना वाचनाची खूप आवड होती. ते माझ्यासाठी जवळच्या लायब्ररीमध्ये खाते उघडून द्यायचे. मला कुठल्या कादंबऱ्या आवडतील हे हि त्यांना माहित असायचं. ते लेखकांची नावे सुचवत. ते सोडून फूटपाथ वर सेकंड हॅन्ड पुस्तक मिळत, तिथे आम्ही तासंतास हिंडत राहायचो आणि एखादे चांगले पुस्तक मिळाले की भरून पावल्यासारख वाटायचं.
अजून एक उन्हाळ्याची गंमत म्हणजे, उन्हाळ्यात करण्यात येणारे पापड, कुर्डया. माझी आई ह्याचा फार काही घाट घालत नसे. ती आम्हाला घेऊन बटाट्याचा कीस आणि थोड्या कुर्डया करायची, पण त्यात सुद्धा अख्ख कुटुंब कामाला लागायचं. सकाळी उठून गच्चीत चादर, प्लास्टिक घालणे, बटाटे सोलणे, किस करणे, मग त्या सगळ्यावर नजर ठेवणे आणि संध्याकाळी खाली आणणे ह्या सगळ्यात आम्हा मुलांचा हातभार असायचा.
रात्र झाली कि रस्त्यावरची वाहने कमी व्हायची आणी मग तोच रास्ता आमच बॅडमिंटन कोर्ट व्हायचं. रात्री उशिरापर्यंत कधी बॅडमिंटन तर कधी पत्ते असा डाव रंगायचा. सोसायटी मध्ये सगळे एकाच आर्थिक आणि सांस्कृतिक श्रेणी मधले, म्हणून सगळ्यांच्या घरी एकसारख वातावरण. मग कोणाला चांगले मार्क मिळाले किंवा कोणाचा वाढदिवस असला कि आमची वडापाव आणि आइसक्रीमची पार्टी रंगायची.
ह्या सगळ्यात मग कट्ट्यावर बसून कधी सहलीचे बेत आखले जायचे, तर कधी चांदणी भोजनाचे, कधी सोसायटी फन फेअर ठरवायचो तर कधी चित्रकला स्पर्धा.
उन्हाळ्याच्या सुट्टीतच आजोळीही जाणं व्हायचं. तिथे सगळे आत्ते मामे भावंडं जमली कि गप्पा आणि मस्तीला ऊत यायचा. झाडवरील बोरा, चिंचा आणि कैऱ्या तोडायला, पोटभर आंबे आणि फणस खाण्याची वेगळीच मजा असायची. ह्या सगळ्या मध्ये २ महिने कसे निघून जायचे कळायचं हि नाही.
“आई दूध दे, खेळायला जायचंय, “अशी हाक कानावर आली आणि मी वास्तव्यात आले. मी मनात हसले आणि लक्षात आलं अशी मुक्त आणि स्वछंदी उन्हाळ्याची सुट्टी घालवणार असेल तर नाही केला कुठला क्लास ह्या वर्षी तरी चालेल नाही का ?
सर्व प्रथम, मराठी नवं वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. !!!
आज गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिना लागला कि जाणवु लागतं ते रणरणतं ऊन. पण असं असलं तरी पानगळती होऊन झाडांना छान चैत्र पालवी फुटते. नुकत्याच झाडाला कैऱ्या लगडलेल्या असतात, त्यामुळे घरोघरी थंडाव्यासाठी पन्हं तयार केलं जातं . निसर्गाने सर्व गोष्टींचा किती सुरेख समतोल साधलाय नाही? अशातच, घरी माहेरवाशीण ‘चैत्रगौर’ महिनाभर रहायला येते.चैत्र तृतीया ते वैशाख तृतीया म्हणजेच ‘अक्षय्य तृतीया’. याच वेळेस चैत्रगौरीचे हळदी-कुंकू करतात. घरच्याच अन्नपूर्णेला छान अलंकार आणि वस्त्रांनी नटवतात. तिच्यासमोर विविध प्रकारचे फराळ करून मांडतात. ह्या ऋतूतील फळं म्हणजे कैरी, खरबूज आणि कलिंगडाचे छान कोरीव काम करून वेगवेगळे आकार देऊन त्याचीही आरास करतात. सर्व वातावरण कसं मंगलमय होतं. तिचं कौतुक करण्यासाठी कैरीची डाळ आणि पन्हं करायची परंपरा तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. हळदी कुंकू साठी आलेल्या सवाष्णींना कैरीची डाळ आणि पन्हं देण्याची प्रथा आहे.
खूप ठिकाणी चैत्रात तुळशी समोर ‘चैत्रांगण’ काढायची पण परंपरा आहे बरं का.आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? माहेरी आलेली ‘चैत्रगौर’ म्हणजे साक्षात पार्वती. तिच्या स्वागतासाठी काढली जाणारी ही एक रांगोळीच आहे. रांगोळी हा सर्व महिला वर्गाचा एक आवडता प्रकार. आपली एक पारंपरिक कला आहे. संपूर्ण भारतात रांगोळी काढण्याचा प्रघात आहेच. दक्षिण भारतात काही ठिकाणी तांदुळाच्या पेस्टने रांगोळी काढतात. पूर्वी बायकांना चित्रकलेचं आवड जपायचे हे एक साधन होते. त्यामुळे अंगण सुशोभित होते. आपल्याकडे आजकाल विविध प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतात….. ठिपक्यांची, फ्री हॅन्ड, पानं, फुलं- वेली, काही चक्क सामाजिक जागरूकता निर्माण करणारी रांगोळी. तशीच ‘चैत्रांगण’ ही आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारी एक पारंपरिक रांगोळी आहे. यामध्ये ५१ प्रकारची शुभं चिन्हे आहेत. पार्वतीचा लाडका पुत्र गणपती आहे. दिनमान ठरवणारी सूर्य चंद्राची जोडी आहे. साक्षात पाळण्यात बसलेली चैत्रगौर आहे. तिचे सौभाग्य अलंकार, जसे मंगळसूत्र, करंडा, फणी,आरसा, ओटी. काही पवित्र वृक्ष आणि फळे, तुळस, आंबा, नारळ, केळी आहेत. गाय, हत्ती, कासव आणि नागोबा आहे. पार्वती देवीला साजेशी अशी तिची आयुधं …… शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशुळ,धनुष्य-बाण आहेत. कलश, शिवलिंग, पणती, पाळणा, मोरपीस, धान्याची ओंबी, ध्वज आणि तोरणही आहे. विद्येची देवता सरस्वती आहे. विजयाची प्रतिक असलेली गुढी आहे. देवीला हलकेचं वारं घालता यावं म्हणून छान दोन हातपंखे देखील आहेत. ह्या सर्व बोधचिन्हांचं आपलं असं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणालं एवढी मोठी रांगोळी काढायला वेळ आहे कुणाला? आणि आपल्याकडे सहज रुजत चाललेल्या फ्लॅट संस्कृती मध्ये तर रांगोळी काढायला जागा तरी असते का हो……… मी काय म्हणते अगदी आपल्या आजी किंवा पणजी सारखं नाही तरी निदान रोज २-३ वेगवेगळी बोधचिन्हं काढली तर काय हरकत आहे? आणि सध्या बाजारात चैत्रांगणाच्या स्टेनसिल्स सहज उपलब्ध आहेत. त्यांनी अगदी पाच मिनिटांमध्ये होते रांगोळी काढून. आपली संस्कृती टिकवायला आणि आपल्या पुढच्या पिढी पर्यंत न्यायला थोडी मेहनत घ्यायला काय हरकत आहे ?
चैत्र पाडवा, म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष, नवीन संकल्प. चैत्र महिना लागला म्हणल्यावर, डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी. गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया. दारावरती लागलेलं झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचे तोरणं, नवीन खरेदी; घरोघरी उभी केलेली गुढी. वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता असते.
त्याचबरोबर आठवण येते ती लहान असताना आईने अगदी हट्टाने खायला लावलेल्या कडुलिंबाचा नैवेद्याची, “वर्षभर आजारी पडायचं नसेल तर हे खायलाच हवं!” असं दटावून सांगणारी आई; आणि नाक मुरुडून तो कडू कडुलिंब खाणारे आम्ही! घरोघरी केले जाणारे खास मिष्टन्नाचे भोजन. श्रीखंड-पुरी, खीर,कोशिंबीर असे एक ना अनेक पदार्थ.
आता मी आईच्या भूमिकेत असते आणि माझी मुलगी कडुलिंब खाताना नाक मुरडते. हा मात्र एवढा फरक झाला. नवीन वर्षात येणारे सगळे सणवार आणि उत्सव आपण वर्षानुवर्षे साजरा करतो. काळानुरूप साजरा करण्यात थोडा फार बदल झाला पण आजदेखील उत्साह मात्र तेवढाच असतो.
गुढीपाडवा का साजरा करतात?
शालिवाहन राजाने या दिवसापासून शालिवाहन शके गणनेला सुरुवात केली म्हणून हिंदू कालगणनेनुसार गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस आपण साजरा करतो.
इतर राज्यातही गुढीपाडवा वेगळ्या नावानी साजरा करण्यात येतो. श्रीराम वालीशी युद्ध करून आणि नंतर चौदा वर्षांचा वनवास संपवून याचदिवशी अयोध्येत परत आले. वातावरणात होणारा बदल हे सुद्धा एक कारण आहे.
गुढीपाडवा च्या दिवशी दारासमोर उभी करतात ती गुढी
गुढीपाडवा कसा साजरा करतात?
गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करून, देवांची नित्यपूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात येते. सडा-रांगोळी करून अंगण सजवण्यात येते. वेळूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर गुढीला नवीन खण बांधण्यात येतो. त्यावर मग कडुलिंबाची फुलांसह असलेली पाने, आंब्याचा डहाळा, साखरेच्या गाठी आणि छानसा सुगंधित फुलांचा हार असं सर्व एकत्र बांधण्यात येते. सगळ्यात शेवटी तांब्याचा कलश त्यावर उपडा घालण्यात येतो. त्याला चंदन आणि हळदी-कुंकू, फुले वाहून प्रासादित केले जाते.
गुढी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या दिशेला, रांगोळीने सुशोभित केलेल्या जागेवर, एका पाटावर उभी करण्यात येते. तिची हळदी-कुंकू, अक्षता, फुलं, धूप आणि दिप अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर फुलांसहित कडुलिंब, गूळ, हिंग, ओवा, मिरे आणि साखर हे चिंचेत कालवून एक आरोग्य दाई चटणी बनवून ते ग्रहण केले जाते. या गुढीला “ब्रह्मध्वज” अथवा “विजय पताका” असे म्हणतात. नवीन पंचांगाची पूजा करून, त्यातील संवत्सर फल याचे वाचन केले जाते. संध्याकाळी हळद-कुंकू आणि अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.
गुढीपाडव्याचे महत्व
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. गुढीपाडवा, दसरा, अक्षय्य तृतीया हे संपुर्ण तीन दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा हा अर्धा दिवस असे साडेतीन मुहूर्त मानले जातात. म्हणजेच जर नवीन खरेदी, व्यवसाय सुरु करायचा असेल तर या दिवशी तुम्ही ते करू शकता त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते.
असा हा गुढीपाडवा तुमच्या घरी सुख समृद्धी घेऊन यावा ही शुभेच्छा!