Categories
काही आठवणीतले

सय- बुचाच्या फुलांची!!!

पांढरा रंग तर खूपच सुंदर आणि त्यातून पांढरी सुवासिक फुले तर निसर्गाची देणगीच आपल्याला!!! सुवासिक जाई, जुई, मोगरा, चमेली, कुंद, निशिगंध, प्राजक्त…आणि किती तरी! वास न येणारी चांदणी, तगर, बटमोगरा, काटेकोरांटी….असंख्य नावे आहेत…. पण या सगळ्यात एक वेगळे आणि सहज उपलब्ध असूनही तसे दुर्लक्षिले गेलेले एक फुल म्हणजे बुचाचे!! रस्त्यावर पावसाळ्यात पडलेला खच कायमच आपले लक्ष वेधून घेतो. लहानपणी शाळेत जात येताना वाटेवर बुचाची झाडे होती. मस्त सुगंधित वाटायचे. आम्ही मैत्रिणी गोळा करायचो फुले आणि एका मैत्रिणीला वेणी करता यायची त्याची…रोज एक एक वेणी करून बाईंना द्यायचो डोक्यात माळायला… देताना आमचे हात आणि घेताना बाईंचे मन, त्या सुंदर परीमळाने आनंदित, सुगंधित व्हायचे…अजूनही शाळेजवळ ते झाड आहेच….आणि मनात आठवणी !!!

फोटो क्रेडिट- सुज्ञा.


बुचाचे झाड तसे सर्वत्र आढळते..सरळ सरळ उंच २५-३० फूट उंचीची झाडे असतात. सहा महिने तरी बहर असतोच…माझ्या घराजवळ असलेल्या बस स्टॉप पाशी एक मोठे जुने झाड आहे. तिथून जात येताना मन प्रफुल्लित होते. खाली पडलेल्या फुलातून एक तरी उचलल्याशिवाय पाय निघतचं नाही तिथून!
बुचाची फुले पांढरीच, पण क्वचित गुलाबी, पिवळी छटा पण दिसते. फुलांचा देठ हा बारीक नळीसारखा आणि साधारण दोन ते अडीच इंच लांब असतो. फुलाला पाच पाकळ्या असल्या तरी त्यापैकी दोन पाकळ्यांची.. एकच पाकळी वाटावी अश्या एकमेकांना जोडलेल्या असतात. झाडावर फुलांचे घोस लटकलेले असतात, पण झाडावर न राहता ती खालीच पडतात. पूर्ण बहरात झाडाखाली फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. सुगंध आजूबाजूच्या परिसरात दरवळतो… खूपच मस्त वाटते.
आज मात्र पु. ल.देशपांडे उद्यानात त्याचा खच पडलेला पाहून थोडे वाईट वाटले…एकतर खूप पाऊस त्यामुळे फुलांचा अगदी चिखल झाला होता….चालणारी लोक त्यांना पायदळी तुडवून जात होती….साहजिक आहे म्हणा.. इतकी फुले ताजी -शिळी फुलं एकत्र. कोण किती काळजी घेणार ना!!! पण तरी वाकून मी ताजी नुकतीच पडलेली फुले उचलली आणि एक गुच्छ केला आणि घरी घेऊन आले…माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या….
जी गोष्ट मुबलक प्रमाणात असते त्या गोष्टीचे आपल्याला महत्त्व नसते हेच खरे.. नवरात्रात गजरे महाग मिळाले तरी आपण घेतो पण निसर्गाचीच देणगी असलेली ही फुले मात्र दुर्लक्षित करतो….कदाचित गाडी वरून जा ये होत असल्याने पायी जाताना दिसणारी हि फुले आपल्या नजरेत येतचं नसावीत. ३-४ तास झाले तरी ती फुले ताजीच आहेत…का त्याची वेणी करून आपण देवाला किंवा डोक्यात घालत नाही?असा प्रश्न मला पडला.

ते काहीही असो आज या फुलांच्या स्पर्शाने आणि सुवासाने मन भूतकाळात गेले आणि प्रसन्न झाले…

निसर्गाची किमया आणि बालपण!!!!

सुज्ञा

Categories
खाऊगिरी पाककृती

खस खस खीर – उडूपी कर्नाटक येथील पारंपरिक पदार्थ

सण वार आले कि नवनवीन पदार्थ करण्याचा उत्साह येतो. आत्ताच दसरा झाला. नेहमीचे श्रीखंड- पुरी खाऊन मुलांना कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळे पदार्थ करायचे ठरवले. माझी आजी कर्नाटकची आहे, खरं तर दक्षिण कर्नाटक. त्यामुळे तिथले काही पारंपरिक पदार्थ आजी नेहमी करत असे. त्यातलाच एक पदार्थ जो मला खूप आवडतो तो म्हणजे खस-खस खीर. 

बनवायला एकदम सोपी आणि नावीन्य पूर्ण आणि हो healthy सुद्धा! अजून काय हवं नाही का ?

ह्या खीरीमध्ये अगदी जुजबी सामान लागतं जसं कि, खस – खस, ओला नारळ, तांदूळ, गूळ आणि सजावटीसाठी काजू बेदाणे. मी ही रेसिपी अजून थोडी healthy करावी म्हणून त्यात dry – fruits ( काजू , बदाम,अक्रोड, पिस्ता ) ची भरड घातली होती, पण ते तुमच्या मनावर आहे.

ह्या खीरीला उडूपी, कर्नाटक मध्ये गसगसे पायसा असे म्हणतात. ह्या खिरीची अगदी पहिली आठवण म्हणजे आजी कडे सुट्टीत गेलो कि सगळ्यांसाठी म्हणून ती गरमा गरम खीर करत असे. गप्पा मारता मारता कधी दोन वाट्या संपायच्या ते कळायचंच नाही. मग ती हसत म्हणायची “आता काय तुम्ही तुमच्या आईला त्रास देणार नाही थोडा वेळ! द्या ताणून खुशाल” (आईची आई ती-त्यामुळे तिला आपल्या मुलीची काळजी!)

आपल्या इथे मैला- मैलावर भाषा आणि खाद्यसंस्कृती बदलते. त्यामुळे ह्याच खिरीच्या अजून बऱ्याच पद्धती असतील, पण ह्या पारंपरिक रेसिपीची मला येत असलेली कृती खालील प्रमाणे आहे. 

खस-खस –  2 टेबलस्पून

तांदूळ – 4 टेबलस्पून

ओला नारळ- ½ वाटी

गूळ – ¾ वाटी

वेलचीपूड – चिमूट भर

पाणी – एक कप

दूध – एक कप

Dry fruits ची भरड- दोन चमचे

खस -खस खीरीची कृती

प्रथम एका कढईत खस – खस आणि तांदूळ घेऊन ते गुलाबी होई पर्यंत भाजून घ्यावे.  जरा त्याला मंद सुवास येऊ लागला कि गॅस लगेच बंद करावा, नाहीतर खस खस जळण्याची शक्यता असते. 

थंड  झाल्यावर मिक्सर मध्ये खस-खस, तांदूळ आणि ओला नारळ घालून वाटून घ्यावे. गरजे प्रमाणे  थोडे पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. 

एका कढईत पाणी आणि गूळ घालून, गूळ वितळून घ्यावा. गूळ -पाणी तयार झाले की त्यात खस -खस, नारळाची पेस्ट घालून शिजवून घ्यावे 

ह्या मिश्रणात वेलची पूड, dry-fruits ची भरड घालून एक उकळी काढावी.

आता हे मिश्रण जरा घट्टसर होऊ लागले कि त्यात थोडे पाणी आणि दूध घालावे. नंतर गरमा -गरम खायला द्यावे. हि खीर गार सुद्धा उत्तम लागते. 

टीप – दूध घातल्या नंतर खीर फार वेळ तापवू नका, दूध फुटण्याची शक्यता असते .  

आवडली का रेसिपी ? जरूर करून बघा आणि आपले अभिप्राय कळवा 🙂

Categories
काही आठवणीतले माझा कट्टा

वाढदिवस कि सोहळा?

काल एका वाढदिवसाला गेले होते. माझ्या मुलीची मैत्रीण तिचा १०वा वाढदिवस अगदी जोरदार साजरा करायचा असं त्या आई -वडिलांनी ठरवले होते . एका बड्या हॉटेल मध्ये हॉल बुक केला होता. तिथे कितीतरी फुगे लाऊन सजावट केली होती. अर्थात प्रिन्सेसची थिम होती! 

वाढदिवसाची तयारी सजावट आणि सगळा चकचकाट पाहता माझी मुलगी मला म्हणाली.

“माझा पुढचा वाढदिवस असाच आणि इथेच करायचा हं !” मी नुसतीच मान डोलावली आणि “उद्या बोलू त्यावर” असे म्हणाले. 

तिथले विविध खेळ, (tattoo, nail art, extensions – इत्यादी कॉउंटर्स वर माझी मुलगी मनसोक्त खेळली आणि निघताना एक रिटर्न गिफ्टचा पॅकेट घेऊन परत आलो . 

दुसरा दिवस 

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मुलगी निवांत उठली पण तो आदल्या दिवशीचा वाढदिवस तिच्या डोक्यात घोळत होता . 

मुलगी – “ तुम्ही कसे करायचा वाढदिवस ?” असा प्रश्ण तिने विचारला.

मी- “आमचा अगदी साधा घरच्या घरी व्हायचा वाढदिवस” मी म्हणाले 

मुलगी – “ मग तुला वाईट वाटायचं का ?”

मी- छे ग ! तेव्हा सगळ्यांचा तसाच व्हायचा . १ वर्ष  आणि ५ व वर्ष वाढदिवस त्यातल्या त्यात जोरात. बाकी सगळे घरीच!

मुलगी – म्हणजे आजी तुझ्या मैत्रिणींना पार्टीला बोलवत नव्हती,  special थिम ठरवत नव्हती? आणि cake चं काय? मुलीनी आश्चर्याने विचारले. 

मी- ( हसत ) अगं तेव्हा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी महत्वाचा दिवस होता, पण तो असा commercialize झाला नव्हता. 

मुलगी – तुला तुझे बर्थडे आठवतात ?

मी – हो ! तेव्हाच्या वाढदिवसात महागडे गिफ्ट नव्हते पण मनापासून दिलेले “ यशस्वी हो ! औक्षवंत हो!” अशी आपुलकीचे आशीर्वाद होते . तेव्हा cake कापला जायचा आणि सगळ्यांमध्ये वाटला हि जायचा पण जिभेवर चव रेंगाळायची ती म्हणजे आईने केलेल्या माझ्या आवडीच्या गोडाची !

मुलगी – मग आजी सगळ्यांना काय द्यायची खायला? Chineseकि चाट ?

मी – अगं तेव्हा पार्टी म्हणलं कि सगळ्यांच्या घरी ठरलेला मेनू असायचा – वेफर्स , cake आणि सामोसा किंवा ढोकळा. 

मुलगी  -( जोरजोरात हसत ) हा काही मेनू आहे! तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर का ठेवत नव्हता!

मी – कारण तो तेव्हा इतक्या सर्रास मिळतच न्हवते!

आता मात्र मुलगी चाट पडली 

मुलगी – तुम्ही नक्की वाढदिवसाला करायचा तरी काय ?

फार काही नाही . आमचा वाढदिवस आमच्या घरच्यांसाठी एक आनंददायी दिवस होता, पण त्याचा सोहोळा झाला नव्हता. दिवाळीत आई दोन ड्रेस घेत असे . त्यातला एक वाढदिवसाचा आणि एक दिवाळीचा. जर वाढदिवसाच्या दिवशी शाळा असेल तर शाळेत चांगला ड्रेस घालून जायचो. 

आई माझ्या आवडीचा स्वयंपाक करायची आणि मला आवडतो म्हणून खास हलवा ! मग संध्याकाळी आजू बाजूचे मित्र मैत्रीण बोलवायचे. मोजून ७-८ मुलं असत . तेव्हा हे रिटर्न गिफ्ट च काही फॅड नव्हतं. काही गिफ्ट मिळायची, नाहीतर सगळे मिळून एक काहीतरी उपयोगी वस्तू देत. 

मग संध्याकाळी cake कापला जायचा . तेव्हा आमचे cake हि साधे! कधी आई घरी करायची , कधी कोपऱ्यावरच्या बेकरी मधून मागवायची . Cake चे आकारही ठरलेले! चौकोनी, गोल किंवा फार फार तर बदाम आकाराचा . त्यावर गुलाब आणि काही फुलं पानं सोडली तर वेगळे काही फारसे नसत. 

सगळे आले, कि आई आधी औक्षण करायची . मग सगळ्यांच्या पाया पडायचे , देवाच्या पाया पडायचे आणि शेवटी cake कापायचा. तेव्हा आईला मदतीला म्हणून आपणहुन शेजारच्या काकू यायच्या. तेव्हा  स्मार्ट फोन नव्हते मग कोणीतरी त्या रीळवाल्या कॅमेरा तुन २-४ फोटो काढायचे कि झाला आमचा वाढदिवस. सुट्टीच्या दिवशी वाढदिवस असेल तर सकाळी देवळात जाऊन यायचो इतकंच.

वाढदिवस म्हणून आई-बाबा सुट्ट्या टाकून घरी बसत नव्हते किंवा वाढदिवस पुढे ढकलणे वगैरे प्रकार नव्हते. भल्या मोठ्या पार्ट्या नव्हत्या, त्यातून निर्माण होणार कचरा आणी अन्नाची नासाडीही नव्हती, कोणाला नको असलेले खेळांचे ढीग नव्हते कि अव्वाच्या सव्वा खर्च नव्हते. सगळं कसं सुटसुटीत .. short and simple but still sweet असं असायचं. आमचे वाढदिवस असे भव्य दिव्य नव्हते पण इतक्या वर्षांनंतर देखील त्या वाढदिवसाची आठवण मनाला सुखावा देते. 

इतका देखावा आणि ग्रँड सेलेब्रेशनची खरंच गरज आहे का? हा प्रश्ण आज आपण पालकांनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे, नाही का?

Categories
कविता

ती

आठ मार्च चे कौतुक संपले

पदर खोचून ‘ती ‘ कामाला लागली.

वर्षभराच्या धावपळीची चित्रमालिका

डोळ्यासमोरून सरकू लागली.

संसार, मुले बाळे, नाती गोती, मैत्रिणी

आणि सगळ्यात महत्वाचा नवरा

यांच्या वर्तुळात मन पुन्हा पुन्हा फिरू लागले.

फिरता फिरता मन थबकले

उत्कट संवेदनांनी थोडेसे थरथरले

तिने स्वतःलाच थोडेसे समजावले

सूर्याच्या आसाभोवती पृथ्वी सकट

सारेच ग्रह फिरत असतात नाही का?

तसे हे सारेच माझ्या जीवनातील

उच्चीचे ग्रह आहेत,

माझ्या भोवती फिरणाऱ्या या सर्वांना मीच तर देते ऊर्जा

माझ्या संस्काराच्या आसा भोवती फिरता फिरता सारेच

माझ्या भोवती फिरत राहतात 

इतकी ऊर्जा …इतकी शक्ती मीच तर निर्माण करते कारण…

मीच ब्रम्हाचा उदगार

सृष्टीच्या सृजनतेचा आकार

वंदनेचा स्वीकार

हर्षाचा चित्कार

मीच धरा वसुंधरेचा रूपाकार

Categories
महत्वाचे दिवस

मिसाइल मॅन!

१५ ऑक्टोबर १९३१ मध्ये त्याकाळच्या मद्रास प्रेसिडेंसि आणि आताच्या तामिळनाडू मध्ये असलेल्या रामेश्वरम या ठिकाणी एका कुटुंबामध्ये डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. भारताचे अंतराळ शास्त्रज्ञ … मिसाइल मॅन आणि सगळ्यात लोकप्रिय माजी राष्ट्रपती अशी त्यांची ओळख.  त्यांचा वाढदिवस “ जागतिक विद्यार्थी दिन ” म्हणून साजरा केला जातो आणि हाच दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणूनही साजरा केला जातो. कलाम म्हणलं तर डोळ्यासमोर उभं राहतं ते त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांची ओघवती वाणी. आज देखील त्यांची भाषणं ऐकली कि ती ऐकत  रहावी असंच वाटतं. 

डॉ.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस “ जागतिक विद्यार्थी दिन ” म्हणून साजरा केला जातो
Photo Credit – NDTV

आयुष्य कसं जगावं … स्वप्नं कशी पाहावीत.. आणि ती पूर्ण करताना अपयश आलेच तर त्याला कसे सामोरे जावे हे सगळं शिकवणारं त्यांचं आयुष्य. विद्यार्थ्याना मागदर्शन करण्यात रमणारे असे आपले सर्वांचे लाडके डॉ.अब्दुल कलाम. जगविख्यात असून देखील आणि खूप पुरस्कार मान सन्मान मिळून देखील त्यांच्या वर्तना मध्ये कायम साधेपणा असायचा  हे आपण सगळ्यांनीच बघितलं. त्यांचे बालपण खूप कष्टामध्ये गेलं. समुद्रावर जाऊन बसलं कि त्यांचे लक्ष समुद्रावर उडणाऱ्या पक्ष्यांकडे जात असे..आणि त्यातूनच त्यांनाही त्यांच्या स्वप्नांची दिशा सापडली. 

आजकाल शाळांमध्ये  जे ज्ञान दिले जाते त्यापेक्षाही जास्त गरजेचे आहे ते म्हणजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या अनेक व्यक्तिमत्वाची माहिती आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांचा खडतर प्रवास हा मुलांना समजावून सांगण्याची.. आयुष्य जगावं कसं ? या प्रश्नाचं उत्तर या कीर्तिमान व्यक्तिमत्वांकडे बघितलं कि मिळतं. एक शास्त्रज्ञ असले तरी त्यांचा ईश्वरी निष्ठेवर पूर्ण विश्वास होता. त्यांना आपल्या देशाचा अभिमान होता भारत देशाला सर्वोच्च स्थानावर बघण्याची त्यांची आस होती त्याचाच ध्यास घेऊन त्यांनी भारताला अनेक क्षेपणास्त्र दिली. कलाम यांचे लिखाण वाचले तर  एक वेगळीच प्रेरणा मिळते. त्यांची जास्तीत जास्त पुस्तकं आपण वाचू आणि आपल्या मुलांना वाचावयास देऊ ,यापेक्षा अजून कुठली चांगली गोष्ट असू शकते?  

एक शिक्षक म्हणूनच त्यांना ओळखलं  जावं हीच अब्दुल कलामांची इच्छा होती. विद्यार्थ्याना प्रेरणा देणाऱ्या, नाविन्याचा ध्यास देणाऱ्या आणि भविष्यात स्वप्नं  बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत शिकत रहा, संघर्ष करा अशी चेतना निर्माण करणाऱ्या या थोर व्यक्तीचा अंत २७ जुलै २०१५ मध्ये  शिलॉंगला चालू असणाऱ्या एका व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच झाला. आपल्यातला तो एक तारा निघून गेला ज्याची जागा परत कधी कुणीच घेऊ शकत नाही. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून माझी शब्दांजली त्यांना समर्पित.

Categories
कविता

आनंदवन

सूर्यकुलाच्या सदस्यांना तेजाची कवच कुंडल लाभतात!

त्यांच्या जीवनाला सूर्याचा कांचन स्पर्श झळाळून टाकतो!

बाबा, आपण सूर्यकुलाचे सदस्य होता.

आणि म्हणूनच, पृथ्वीच्या निबिड अंध:कारात

आपल्या तेजाची पावलं उमटली,

आणि हां हां म्हणता त्या तेजस्पर्शाने

पृथ्वीचं अंत:करण गलबलून गेलं!

आपल्या हृदयातून कुष्ठरोग्या विषयीची

ममता पाझरू लागली!

त्यांना जगण्यासाठी लागणारी 

स्वाभिमानाची कवच कुंडलं प्रदान करत असताना,

आनंदवनाच्या वाटेवरचे कातळं फुटत होते!

ते फोडणारे आपले दोन हात 

त्यांना कळत- नकळत हजारो हातांचं बळ लाभलं!

आनंदवनात एकच नाद घुमला,

स्वावलंबन! स्वाभिमान!! आत्मसन्मान!!!

तीन शब्दांचा मंत्र जागर करणारे 

समाजाने बहिष्कृत केलेले 

माया- ममतेला वंचित झालेले 

आमचेच बांधव होते!

त्यांच्या तना-मनात आपण 

ज्वाला निर्माण केली आणि या ज्वालांचीच 

आनंदवनात फुले झाली!

बाबा, आपण माडिया- गोंड यांच्या 

भेगाळलेल्या तनमनावर फुंकर घातलीत!

आनंदवन हेमलकसा सोमनाथ येथे 

माणुसकीचे झरे फुटले!

माणसांना तुम्ही जिंकलात 

माणुसकीची पेरणी केलीत, 

त्यामुळेच आनंदवन माणुसकीचं नंदनवन बनलं!

आपण आनंदवन, सोमनाथ, हेमलंकसाच्या वाटेवर 

प्रदीर्घ वाटचाल करीत राहिलात!

यामागे, साधना ताईंची तपश्चर्या, 

प्रकाश आणि विकास या पुत्रांचे योगदान 

आपल्या सामर्थ्याला उत्तुंग उंचीवर नेत राहिलं!

नव्हे, तर आमटे कुटुंबीयांनी 

माणुसकीचं गौरीशंकर गाठलं!

माणुसकीच गौरीशंकर गाठल!!

Categories
आरोग्य

मधु गोलक :- मोदक

झाला ना! श्रावण संपत आला. आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. नुसतं बाप्पांचे आगमन एवढं जरी म्हटलं, तरी अंगात उत्साह संचारतो. बरचं काहीतरी आठवतं जे करायचं असतं. बाप्पांची मूर्ती, सजावटीचे सामान, पूजेचे सामान, बाकीच्या सामानाची जमवाजमव हो ना! सगळ्यात महत्त्वाचं तर राहुनच गेलं. काय? गणपती बाप्पांचा प्रसाद. तो तर राहिलाच ना. आपण सगळे जण आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्या लंबोदर गजाननाच्या प्रसादाची म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मधु गोलक नाही समजलं. अहो! मोदक.

आता सरळ विषयालाच हात घालते. आपल्याकडे तळलेला मोदक, खव्याचा मोदक, आजकाल तर चॉकलेटचे मोदक, पेढ्याचे मोदक सुद्धा मिळतात. पण आज मी तुम्हाला काही गमतीशीर गोष्टी सांगणार आहे. ते आपल्या पारंपारिक उकडीच्या मोदकांची.

उकडीचे मोदक व त्याच्या गमतीशीर गोष्टी :-

उकडीच्या मोदकांसाठी लागणारे सगळे जिन्नस तर तुम्हाला माहित आहेतच. ओला नारळ, खसखस, गुळ, तांदळाची पिठी, वेलदोडा इत्यादी. ह्या सगळ्या लागणाऱ्या सामानाच्या काही interesting fact.

  • ओला नारळ :- पावसाळा ऋतु आणि बाप्पांचं आगमन हे अगदी ठरलेले समीकरण. आता पावसाळा म्हटलं की सर्दी सारखे आजार आलेच. तर त्यावर उपाय म्हणून ओला नारळ. त्याचं कामच  आहे ते. म्हणजे ओला नारळ आपली प्रतिकारशक्ती वाढवतो व सर्दी पासून रक्षण करतो शिवाय तो iron शोषून घेऊन Hb वाढवण्यास मदत करतो.
  • खस-खस :- ही तर दिसायला खूप छोटी छोटी. पण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं असतं. अजून एक महत्त्वाचं कार्य खसखस करते. ते म्हणजे bad cholesterol कमी करून good cholesterol वाढवण्यास मदत करते.
  • गुळ :- गुळ म्हणजे गोडवा. आपल्या मधु गोलक मधील येणारी मधुरता ती या गुळा मुळेच. शिवाय त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह असते.
  • तांदळाची पिठी :- तांदळाच्या पिठाचे मऊ व लुसलुशीत मोदकांच्या वरचे आवरण. पचायला अगदी सोप्पे. तांदळाच्या पिठामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे blood clotting होण्यास मदत होते.
  • वेलदोडा :- हा तर नैसर्गिक mouth freshener. पावसाळ्यात सततच्या दमट हवेमुळे होणारा nausea दूर करणारा हाच तो वेलदोडा. हा motion sickness घालवायला सुध्दा मदत करतो.
  • जायफळ :- आपल्या मधु गोलकात घातले जाणारे जायफळ तर एकदम गुणकारी. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे होणारे त्रासाची कल्पना सर्वांना आहे. त्या सगळ्या त्रासाची सुटका करणारे जायफळ. Help to reduce diarrhoea.
  • केळीचे पान :- ते तुम्ही म्हणताना ‘last but not the least’.  उकड काढताना लागणारे केळीचे पान. आपल्याकडे मोदकाची उकड काढताना मोदकांच्या खाली केळीचे पान वापरण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीचे पान आपण कुठे खातो. ते तर फक्त उकड काढताना वापरतो. त्याचा काय उपयोग? पण त्या पद्धती मागचे कारण विचार करायला लावणारे आहे. केळीच्या पानांमध्ये polyphenols (पॉलिफिनॉल)नावाचा घटक असतो जो पदार्थ गरम करताना त्यात शोषला जातो आणि त्याच्या मुळे बऱ्याच lifestyle diseases  ना प्रतिबंध (prevent) होतो. उदाहरणार्थ- डायबिटीस.

तर अशा आहेत आपल्या सगळ्या उकडीच्या मोदकांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या गमतीशीर गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की वाचून कळवा.

Categories
पाककृती

एळनीर पायसम

सगळ्यांना सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!!

राखी हा भाऊ बहिणींचा सण….. त्यास आपण नारळी पौर्णिमा म्हणून पण साजरा करतो. मुख्यतः सागरी किनारपट्टी वरील लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. खवळलेल्या सागराला नारळ वाहून, राजा, सागरा आता शांत हो बाबा, आम्हाला आमची नाव आत समुद्रात घेऊन जायची आहे. त्यावरच आमचा पोटपाणी आहे. अशी विनवणी करतात. आपण मात्र नारळाचे तिखट-गोड पदार्थ बनवून सणाचा आनंद घेतो.
मराठी घरात मुख्यत्वे नारळाची वडी, नारळी भात, नारळाची खीर असे प्रकार बनतात. खूप वर्ष बंगलोरला राहिल्याने तिथले काही पदार्थ हे आता आमच्या जेवणाचा भाग बनला आहे.

आज मी तुम्हाला तिथला एक खिरीचा प्रकार दाखवणार आहे. त्या खिरीचे नाव आहे एळनीर पायसम, म्हणजेच शहाळ्याची खीर. खूप छान चव आणि करायला अगदी सोप्पी.

साहित्य
नारळाचे घट्ट दूध – १ कप
शहाळ्याचे पाणी – १/२ कप
शहळ्याची मलई -१ कप
कंडेन्सड मिल्क – ६ टेबले स्पूनस

कृती
नारळाचे दूध मी घरीच काढून घेतले. तुम्हाला अगदी वेळ नसल्यास किंवा जमत नसल्यास तयार कोकोनट मिल्क बाजारातून आणले तरी चालेल. नारळाचे दूध काढताना मी साधे पाणी न वापरता शहाळ्याचे पाणी वापरले तर त्याची चव अगदीच खास लागते. आता शहळ्याची मलई घेऊन त्याची मिक्सर मध्ये अगदी बारीक पेस्ट करावी. आता पेस्ट, नारळाचे दूध आणि कंडेन्सड मिल्क सर्व एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. म्हणजे छान मिसळले जातील. तुम्हाला हवे तसे कॅडेन्सड मिल्क आणि शाहळ्याच्या पाण्याचे प्रमाण adjust करू शकता. पण ही खीर जर घट्टच छान लागते. हवे असल्यास फ्रिजमध्ये ठेवून गार खीर सर्व्ह करा.
आम्ही जिथे सर्व प्रथम ही खीर खाल्ली त्यांनी ती short Glasses मध्ये सर्व्ह केली होती. नक्की करून बघा आणि आपल्या भावाला खुश करा.

Categories
कविता

भांडण (बालकविता)

कविता आणि कथेमध्ये एकदा चांगलेच जुंपले

रागेभरल्या शब्दांचे पडसाद वाचनालयात घुमले. II१ II

कविता म्हणाली :

मोठ्या वाक्यात अनेक पानात उगाच पसरलीस तु,

शब्दांच्या फापटपसाऱ्यात स्वतः हरावलीस तु.

सुबक नेटकी, ताल लयीत, आखीव मी रेखीव मी,

थोडक्या नीटस शब्दात, अर्थपूर्ण परिपूर्ण मी II२II

कथा म्हणाली :

यमक मात्रांच्या कुंपणात एकाकी बंदिस्त तु,

कडव्यांच्या बेड्यात अडकुनही समाधानी संतुष्ट तु?

स्वच्छंद मुक्त मी, अमर्याद विश्व माझे,

उंचच उंच झेप घेती, उत्स्फूर्त उत्सुक पंख माझे II ३II

बहिणीत जुंपलेली खडाजंगी पहायला,

इतर भाऊबंद ही आले.

ललित आत्मकथा नाटक यांनीही

आत्मस्तुतीचे पोवाडे गायले II ४II

शब्दांच्या कोलहलाने साहित्य मात्र व्यथित झाले

शब्दांच्या चकमकीत मनोमन विव्हळले.

कथा कविता नाटक ललित शर्मिंदे खजील झाले

साहित्याची माफी मागुन आपल्या पुस्तकी परत गेले. II ५II

प्रिया सामंत

Categories
कथा-लघु कथा भावसंग्रह

मनात घर करणारी पाहुणी

कोण जातंय स्टेशनला? असं काहीसं वहिनी स्वयंपाक घरातून विचारत असतानाच.. मी घरात प्रवेश केला. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी गेले होते. सहज जवळच राहत असलेल्या चुलत दादा वहिनी कडे डोकावून, मुलांना आणलेले खेळ आणि खाऊ देऊन जावे असा विचार करून मी त्यांच्या घरी शिरले होते.

कोण येतयं ग वहिनी? असं मी विचारल तेव्हा वहिनी म्हणाली “अग ताई आत्या येणार आहे. खूप दिवसांनी येत आहेत त्या. वय झालं ना आता, म्हणून विचारत होते, तुझे दादा जाणार का? नाहीतर मीच जाऊन घेऊन आले असते त्यांना.”

आता ह्या ताई आत्या बरेचं वर्ष आमच्या घरी यायच्या. इतर नातेवाईकांकडे त्यांचं येणं जाणं होतं. आल्या की १५ दिवस वेगैरे राहायच्या, पण गंमत म्हणजे त्यांचं आणि आमचं नक्की नातं काय, हे कोणालाच नीटस माहीत नव्हतं.

एकदा आईला मी विचारलं होत की ह्या आपल्या नक्की कोण? तेव्हा आई म्हणाली मला नातं फारसं नीट माहीत नाही, पण आजीला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे. 

आजच्या युगात जिथे रक्ताच्या नात्यानंमध्ये सुद्धा एवढे सख्य आणि एवढा ओलावा नसतो, तिथे ज्यांच नातंच माहीत नाही, अश्या बाईसाठी एवढी लगबग! तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना! तसंच मलाही वाटलं आणि वहिनीला ते मी म्हणून दाखवले. त्यावर ती म्हणाली. “अगं ताई आत्या आल्या ना की कोणी मैत्रीण आल्यासारखचं वाटतं.” 

त्या माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. वय वर्षे ८० तर सहज पार केलेल्या अश्या ह्या ताई आत्या. माझी आजी आता ह्या जगात नाही, पण तरीही ताई आत्याला नेहमी आग्रहाचं निमंत्रण असतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ताई आत्यांनी सगळ्यांबरोबर आपलसं अस वेगळं नातं निर्माण केलं होतं.

Someones behavior can make them closer than blood relations.

ताई आत्या अतिशय कष्टाळू पण खूप हौशी. त्यांची परिस्थिती तशी बेताची. नवरा लवकर गेला. गावी त्यांची थोडी जमीन होती आणि एक छोटेसे घर होते. एकुलता एक मुलगा होता. ताई आत्यानी कष्ट करून मुलाला शिकवलं, शेती केली आणि आपलं जीवन चालवले. ह्या सगळ्या मधून तिला जमेल तशी ती कोणाची तरी मदत करत असे. अश्याच एका शिबिरात तिची आणि माझ्या आजीची ओळख झाली. 

कुठले तरी नाते लागते हे कळल्यावर आजीने तिला घरी ४ दिवस राहायला बोलावले. ह्या नंतर ताई आत्या इतक्या घरातल्या झाल्या की तिची वर्षातून एक तरी चक्कर आमच्याकडे व्हायची. ताई आत्या कमालीची स्वाभिमानी सुद्धा; तिच्या कडे तिकिटाचे पैसे असतील तरच ती यायची. येताना सगळ्यांसाठी काहीतरी बनवून आणायची. 

आल्यानंतर सुद्धा ती स्वस्थ बसणाऱ्यातील नव्हती. गप्पा मारत ती काकूला देव घरात लागणारे वाती, वस्त्र वगैरे ची मदत करायची. बाबांना पापड आवडतात म्हणून ती आईला वेगवेगळ्या प्रकारचे पापड करून द्यायची. लहान मुलांना खूप रंगवून गोष्टी सांगायची. लहान बाळांसाठी उबदार sweater हातांनी विणून द्यायची. आजीला बागेची आवड होती, महणून ती आजीसाठी, एखादं नवीन रोप आणायची, किंवा खत आणायची. काहीही  करून ह्या घरच्यांना आपली मदत कशी होईल हे ती बघायची.

तिच्या तोंडून मी कोणाबद्दल कधी काही वाईट ऐकलं नाही. सर्वांशी मिळून मिसळून राहायची आणि सगळ्यांकडे तिच्याबद्दलची अशीच आठवण होती.

माझी आठवण म्हणजे, एकदा ती आली तेव्हा तिने सगळ्यांसाठी घवल्यांची खीर केली होती. ते घवले इतके बारीक आणि सुबक होते की मला ते खूप आवडले. मी तिला म्हणाले मला शिकावशील का? तिने लगेचच दुसऱ्या दिवशी मला शिकवायला घेतले आणि जाताना एक डब्बा भर घवले माझ्यासाठी बनवून गेली. दर वर्षी माझ्यासाठी ती घवले करुन आणायची.

अशी ही ताई आत्या, जिने आयुष्यात खूप पैसे कमावले नाहीत पण खूप नाती जोडली. आज वयाच्या ८० वर्षाला सुद्धा तिला अगत्याने घरी बोलवणारी आमच्यासारखी अजून बरीच घरे होती.