फार क्वचित असं होतं कि आपण एका व्यक्तीवर आधारित चित्रपट बघायला जातो आणि त्या व्यक्तीबद्दलचं नव्हे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं बद्दलही आपल्याला बरीचं माहिती कळते .
मी आनंदी गोपाळ ह्या चित्रपटाची अगदी आतुरतेने वाट बघत होते. मला नऊ वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या बरोबर हा चित्रपट मला बघायचा होता. आजकालच्या मुलांना एका चांगल्या रोल मॉडेलची कमी आहे असं मला सतत वाटतं. ह्याचं कारण असे रोल मॉडेल नाहीत असं अजिबात नाही पण इंटरनेटच्या युगात त्यांच्या मनात येईल ते, तिथल्या तिथे बघायची सोय असताना अश्या गोष्टी मुलांच्या समोर फारश्या येत नाही. यासाठी थोड्या फार प्रमाणात पालकही जबाबदार आहेत हे मी मान्य करते, पण तो विषय परत कधी तरी हाताळुया .

तर, मला माझ्या मुलीला हा चित्रपट दाखवायचा होता आणि तिला जाणीव करून द्यायची होती कि हे जे वैचारिक स्वातंत्र्य ती गृहीत धरत आहे, त्या मागे आनंदी जोशी यांच्यासारख्या बऱ्याच महिला आहेत. पण मनात धाग धुगही होती, हा चित्रपट त्या व्यक्तीच्या कीर्तीला साजेसा असेल ना? कि स्वप्नदृश्य अश्या नावाखाली त्यांना वेस्टर्न गाउन मध्ये मिरवतील? आणि रस्त्यामध्ये आनंदीबाई नृत्य करताना दाखवतील पण …समीर विद्वांस, चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी मात्र माझी भीती खोटी ठरवली.
मला का आवडला आनंदी गोपाळ?
ह्या चित्रपटासाठी भरपूर अभ्यास केला आहे आणि तोच चित्रपटात दिसून येतो. आनंदी गोपाळ हा चित्रपट बराचसा आनंदीबाईंनी लिहिलेल्या पत्रांवर आधारित आहे. त्यांनी खूप सविस्तर पत्र त्यांचे पती श्री गोपाळराव जोशी आणि ms. कार्पेन्टर ह्यांनां लिहिली होती.
आनंदी गोपाळ साकारणारे गोपाळराव म्हणजेच ललित प्रभाकर आणि आनंदीबाईची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री मिलिंद ह्यांनी खूप सुंदर अभिनय करून एकमेकांना खूप चांगली साथ दिली आहे.
त्यांच्या अभिनयातून त्यांनी, वयात अंतर असताना देखील नवरा बायको मधील नाते कसे हळुवार उमलू शकते हे त्यांच्या अभिनयातून अगदी उत्तम पद्धतीने दाखवले आहे.
गीत आणि संगीत चित्रपटाच्या काळाला आणि प्रसंगाला धरून असले तरी कंटाळवाण किंवा विसंगत वाटत नाही. ते आपल्याला त्या काळात घेऊन जाते.तो काळ डोळ्यासमोर उभा करायचा चांगला प्रयत्न आहे.
कहाणी
एका अल्लड मुलीची ध्येय वेड्या स्त्री मध्ये रूपांतरीत होण्याची हि कहाणी म्हणजे चित्रपट आनंदी गोपाळ. एका ९ वर्षाच्या मुलीचे एका विधुराशी लग्न लावून दिले जाते. गोपाळराव तिच्या पेक्षा २० वर्षांनी मोठे आणि विक्षिप्त. फक्त सरकारी नौकरी आहे आणि हुंडा किंवा मानपान मानत नाही म्हणून त्यांच्याबरोबर तिचं लग्न लावून दिलं जाते.
गोपाळराव ह्यांचा हट्ट असतो कि त्यांच्या पत्नीने शिकावे . त्यासाठी ते तिला लागेल ती मदत करायला तयार असतात आणि वेळ पडली तर तिला ओरडायला किंवा मारायलाही! आनंदीबाई आणि गोपाळराव एकमेकांना समजून घेत हळू हळू संसाराची घडी बसवत असतात तेव्हाच त्यांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडते ज्यामुळे आनंदीबाईंच्या जीवनाला कलाटणी मिळते.
त्या डॉक्टर व्हायचं ठरवतात आणि मग सुरु होतो त्या दोघांचा समाजाविरूध लढून स्वप्न साकारण्याचा खडतर प्रवास. ह्या स्वप्न पूर्तीच्या मार्गावर त्यांना अनेक कष्टांना सामोरे जावे लागते. पण ते हार मानत नाहीत.
त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना ms कार्पेन्टरच्या रूपाने साथ देणारे काही लोक भेटतात तर काही वाळीत टाकणारे सुद्धा. पण हे सगळे दर्शविताना कुठेही आपल्याला आनंदीबाई आणि गोपाळराव हताश वाटतं नाहीत, जाणवतो तो फक्त ध्येयप्राप्तीचा ध्यास.