Categories
माझा कट्टा

पुनर्जीवन जुन्या कपड्यांना आणि इको रिगेन, एक स्वप्नवत प्रवास!

प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने नातेवाईक, मित्रमंडळ यांच्याशी संबंध जोडतो. कोणी एकाच शाळेत, तर कुणी एका कॉलेज मधले, हल्ली त्यातच एक नवीन प्रकारपण आलाय  तो म्हणजे सोशल मीडिया वरील फ्रेंड्स. असचं काहीस आपण आपलं फ्रेंड सर्कल वाढवतो नाही का? पण एक माणूस असा आहे जो तुम्ही दिलेल्या कपड्यांनी आणि त्या कपड्याच्या धाग्या धाग्यांनी माणसं  जोडतो. काय? खोटं वाटतंय? मग हे तुम्ही नक्कीच वाचा. खरंतर कापड तयार करताना काय? किंवा कापडापासून नवीन कलाकुसर तयार करताना काय? त्या व्यक्तीचं कळतं नकळत त्या कापडाच्या धाग्याशी एक वेगळचं नातं निर्माण होत. असंच नातं आहे, स्वप्निल जोशी, त्यांचे सहकारी आणि इको रिगेन या त्यांच्या ब्रॅण्डचं. त्यांचा ब्रँड किंवा इको रिगेन हि कंपनी नक्की काय काम करते त्याबद्दल थोडंसं सांगते. इको रिगेन हि कुठलीही स्वयंसेवी संस्था नसून एक कंपनी आहे.

इको रिगेनचे प्रोडकशन सेन्टर
छायाचित्र सौजन्य – इको रिगेन.

इको रिगेन नक्की आहे तरी काय?

आपल्याकडे असे बरेच कपडे असतात जे वापरात नसतात मग अश्या कपड्यांचं काय करायचं? हा मोठा प्रश्नं आपल्याला पडतो. काहीजण ते गरजू लोकांना दान करतात. काहीजण ते कपडे तसेच ठेवतात, वेळ मिळाला कि देऊ असा विचार करून. तर काहीजण चक्क कचऱ्यामध्ये टाकून देतातं. गरजुंना दान देणे कधीही चांगलेच पण नंतर त्या कपड्यांचं काय होतं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? बरेच जणांना याच्याशी काही घेणं देणंही नसतं. माझ्या घरातले मला नको असलेले कपडे(एव्हाना त्याला दहादा कचऱ्याची उपमा किंवा गाठोडं असं म्हणलं गेलेलं असतं.) बाहेर गेले ना? मग बाकी मला काय करायचंय? विचार केलात तर असे दिसून येईल कि ते कपडे पुरेसे वापरून झाले कि या ना त्या प्रकारे कचऱ्यामध्येच जातात. असे होऊ न देता जर, तुमचे कपडे कुणीतरी घेतले त्याचे योग्य ते मूल्यांकन केले आणि त्याबदल्यात तुम्हाला, त्यांनी तयार केलेले काही नवीन प्रॉडक्ट विकत घेता आले  तर! बरं हे प्रॉडक्ट देखील कापडाचं रिसायकल करून तयार केलेले आहेत. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इको रिगेन हा ब्रँड मेड इन इंडिया आहे. शिवाय हा पहिलाच असा ब्रँड आहे जो फक्त जुन्या कपड्यांपासून नवीन प्रॉडक्ट तयार करतो. ज्याचं जगातलं पहिलं शोरूम पुण्यामध्ये आहे. आहे ना अभिमानाची गोष्ट. जेव्हा इंग्लंड मधील रहिवासी भारतामध्ये येऊन इको रिगेन ब्रँडच्या बॅग्स घेतात तेव्हा ती प्रत्येक भारतीयाला अभिमानाचीच गोष्ट आहे नाही का?

इको रिगेन कश्याप्रकारे काम करते?

आता तरी कपड्यांसाठी ठराविक असा काही निष्कर्ष नाही. इथे सर्व प्रकारचे जुने कपडे स्वीकारले जातात. तुम्ही दिलेले कपडे, वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागले जातात. कपडे व्यवस्थित निर्जंतुक करण्यासाठी देण्यात येतात. कपडे निर्जंतुक झाले कि त्यापासून कुठले प्रॉडक्ट बनवता  येईल याचा विचार केला जातो. त्यानुसार त्यावर DESIGNING केले जाते, मग त्याचे पॅटर्न करून, कापड कापून शिलाई काम करून नवीन प्रॉडक्ट तयार होतं. ज्या कपड्यांची बॅग, सॅक तयार होते त्यापासून तेच बनविण्यात येतं. काही कपडे असे असतात ज्यापासून खरतर कुठलच नवीन प्रॉडक्ट तयार करता येत नाही, असे कपडे मग पानिपत या ठिकाणी पाठवून त्यापासून सुंदर, मऊ गालिचे आणि पायपुसणी करून घेतली जातात. इथे आवर्जून सांगावसं वाटतं कि पानिपतमध्ये दोनशे वर्षांपासून कापडाचे रिसायकल करण्याची प्रथा आहे. तूर्तास तरी इको रिगेनचे हे काम फक्त पुण्यापुरतंच मर्यादित असून भविष्यात पुण्याबाहेरही काम करण्याचा त्यांचा विचार आहे.

इको रिगेनचा उद्देश काय आहे?

ज्या प्रमाणात कपड्यांचा वापर वाढला आहे,त्याच प्रमाणात नको असणाऱ्या कपड्यांची योग्य ती विल्लेवाट न लावल्याने, साठून राहणाऱ्या घन कचऱ्यामध्ये वाढ होत आहे. असे फेकून दिलेले कपडे उकिरडयांवर साठून राहतात, ते पूर्णतः नष्ट होण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो. पाऊस आणि बाकी कचऱ्यामुळे ते कुजतात आणि पर्यायांनी प्रदूषणात वाढ होते. जुने कपडे म्हणजे कचरा नसून त्यातून नवीन वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते हा विचार जास्तीत जास्त लोकांच्या मनात रुजावा. जुने कपडे हि एक खूप मोठी समस्या असली तरी त्यासाठी योग्य तो पर्याय  शोधण्याचे काम इको रिगेन करते.

छायाचित्र सौजन्य – इको रिगेन

इको रिगेनचे आधार

कुठलीही कंपनी यशस्वी होण्यासाठी त्या कंपनीबरोबर काम करणारी माणसं यांचा खूप मोठा वाट असतो. स्वप्निला या कामात सहकार्य करणारे त्याचे सहकारी सागर देव, सोनम चव्हाण आणि अप्पा जाधव हे त्यांना ऑपरेशन, मार्केटिंग आणि प्रोडक्शन मध्ये मदत करतात.सागर, स्वप्निल आणि सोनम हे महाविद्यालयीन मित्र-मैत्रीण, तर अप्पा हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर काम करीत आहेत. “इको रिगेन हा ब्रँड जरी माझा असला तरीही माझ्यापेक्षा जास्त काम माझे सहकारी या इको रिगेन साठी करतात”. असं स्वप्निल सांगतो. त्यांच्यासह शिलाई काम कारणाऱ्या महिलांसाठी काही महिन्याचा ट्रैनिंग प्रोग्रॅमसुद्धा तयार केला आहे. यामुळे गरजू महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होतेचं. त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीला एक व्यासपीठ देखील मिळतं. जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. याशिवाय काही घरगुती महिलांना देखील घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे.

आता जाणून घेऊया थोडंसं स्वप्निल बद्दल

स्वप्निलने B.E, M.B.A असे शिक्षण घेतले असून. २०१३ मध्ये  IIT मुंबईचा युवा उद्योजक( Young Entrepreneur) हा पुरस्कारदेखील  त्यांना मिळाला आहे. तसेच NCL तर्फे त्यांचं एक पेटंट सुद्धा फाइल झाले आहे. २०१५ मध्ये त्यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्यानंतर समाजाच्या हितासाठी काम करावे असे वाटल्याने, शोध सुरु केला आणि त्यांच्या असे लक्षात आले कि, वापरात नसलेल्या कपड्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. तो कसा सोडवता येईल याचा विचार करत असताना इको रिगेन या कंपनीची स्थापना करावी असे त्यांना वाटले. त्यासाठी ते स्वतः पानिपत याठिकाणी २ महिने राहून आले.

तुमचे वापरात नसलेले कपडे काही महिन्यांनी एका प्रकारचे दूषित वायू सोडू लागतात आणि हवा प्रदूषित करतात. तेव्हा प्रत्येकाने कपड्यांचा वापर कमी करावा. ते शक्य नसेल तर वापरलेले कपडे Recycle and Reuse केले तरी बऱ्याच प्रमाणात वापरात नसलेल्या कपड्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल. तुम्ही देऊ केलेल्या कपड्यातून  नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो याचाही विचार करा. तुमच्या मदतीला इको रिगेन आहेच. तेव्हा पुढच्या वेळेस वापरात नसलेल्या कपड्यांचं काय करायचं असा प्रश्न पडला तर इको रिगेन हे नाव नक्की लक्षात ठेवा.

माहितीचा स्रोत- इको रिगेन, स्वप्निल जोशी.