सध्या सुट्टी मध्ये मुलांना कस व्यस्त ठेवायचं हा प्रश्नच आहे नाही का? सारखं ‘ आई मी आता काय करू?’ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता मी हैराण झाले. बर दोघांना मी सांगितलेली कामे सोडून वेगळंच करायच असतं! सर्वात जास्त उत्साह स्वयंपाक करण्यात असतो, पण आता ह्यांना काय स्वयंपाक करायला लावणार!
मग मी काही no gas, healthy रेसिपीस शोधायला लागले ज्या मुलांना आवडतील आणि करायला हि सोपे. ह्याच शोधात असताना एक विशेष रेसिपी सापडली जी सोपी होती आणि healthy सुद्धा.
चला तर मग ती रेसिपी बघूया
ड्राय फ्रुट रोल
ड्राय फ्रुटस खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तुम्ही जाणताच पण हे मुलांना रोज खायला घालणे मोठे कर्मकठीण काम! माझ्या घरी एकाला काजू आवडतात तर दुसऱ्याला बदाम. अक्रोड एकाला आवडत नाहीत तर दुसऱ्याला खजूर आवडत नाहीत. कसं खायला घालावं हे कळत नव्हतं. तेव्हाच ड्रायफ्रुट रोल ची रेसिपी मिळाली. खरं तर ही खजूर रोल ची रेसिपी होती पण मी त्यात थोडे बदल केले जेणे करून सगळे ड्राय फ्रुटस समाविष्ट करता येतील.
ही रेसिपी पूर्ण पणे मुलांनी करण्यासारखी नसली तरी मुलांचा भरपूर सहभाग होऊ शकतो. आता ह्याची तयारी म्हणून मी मुलांना खजुरातील बिया काढायला आणि अंजिर चे हाताने तुकडे करायला बसवले.
त्यांचं ते काम चालू असताना मी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता भाजून घेतले.
मग एकीकडे खजूर आणि अंजीर तुपावर भाजून थोडे पाणी घालून शिजत ठेवले आणि दुसरीकडे भाजलेले ड्रायफ्रुटस ची भरड करुन घेतली.
आता सगळं गार झाल्यानंतर मुलांना मळून गोळे करायला दिले. छान मळून झाले की गोळे बनवा अथवा एकच मोठा गोळा बनवून cling film मध्ये घट्ट पॅक करून फ्रिज मध्ये ठेवून द्या.
अर्ध्या तासानी बाहेर काढून त्याच्या चकत्या पाडून घ्या.

सफशेल कृती
१०-१२खजूर
१०-१२ अंजीर
काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता- प्रत्येकी १० ते १५
दोन चमचे तूप
बेदाणे इच्छे नुसार.
कृती
प्रथम खजुरातील बिया काढून त्याचे आणि अंजिराचे ओबढ धोबड काप करून घ्यावे.
एक चमचा तूप घेऊन त्यावर हे काप भाजून घ्यावे. जरा मऊसर झाले की त्यात तीन मोठे चमचे पाणी घालून शिजवून घ्यावे.
शिजून हे मिश्रण एकजीव व्हायला हवं. बेदाणे घालत असाल तर ते आता ह्या मिश्रणात घालावे.आवश्यकते नुसार पाणी घालू शकता; पण ते मिश्रण फार सैल होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
दुसरीकडे एका पॅन मध्ये इतर सगळे ड्राय फ्रुटस ( बेदाणे वगळून) एक एक करून चांगले भाजून घ्यावे.
ह्या भाजलेल्या ड्रायफ्रुटस ची भरड करून घ्यावी.
शिजवलेले खजूर – अंजीर मिश्रण गार झाल्यानंतर त्यात ही ड्रायफ्रुटस ची भरड घालावी आणि एकजीव करून घ्यावे
आता एक नरम गोळा तयार झाला असेल. हाताला तूप लावून तुम्ही त्याचा एक मोठा लांबुळका असा गोळा तयार करा.
हा गोळा cling film मध्ये wrap करून अर्ध्या तासासाठी फ्रिज मध्ये ठेवून द्या.
बाहेर काढल्या नंतर काप करून सर्व्ह करा.
माझ्या मुलांना हा ड्रायफ्रूट रोल खूप आवडला. साखर न घालता केलेला हा गोड़ पदार्थ टिकतो ही छान आणि चवीला उत्तम.