कोण जातंय स्टेशनला? असं काहीसं वहिनी स्वयंपाक घरातून विचारत असतानाच.. मी घरात प्रवेश केला. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी गेले होते. सहज जवळच राहत असलेल्या चुलत दादा वहिनी कडे डोकावून, मुलांना आणलेले खेळ आणि खाऊ देऊन जावे असा विचार करून मी त्यांच्या घरी शिरले होते.
कोण येतयं ग वहिनी? असं मी विचारल तेव्हा वहिनी म्हणाली “अग ताई आत्या येणार आहे. खूप दिवसांनी येत आहेत त्या. वय झालं ना आता, म्हणून विचारत होते, तुझे दादा जाणार का? नाहीतर मीच जाऊन घेऊन आले असते त्यांना.”
आता ह्या ताई आत्या बरेचं वर्ष आमच्या घरी यायच्या. इतर नातेवाईकांकडे त्यांचं येणं जाणं होतं. आल्या की १५ दिवस वेगैरे राहायच्या, पण गंमत म्हणजे त्यांचं आणि आमचं नक्की नातं काय, हे कोणालाच नीटस माहीत नव्हतं.
एकदा आईला मी विचारलं होत की ह्या आपल्या नक्की कोण? तेव्हा आई म्हणाली मला नातं फारसं नीट माहीत नाही, पण आजीला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे.
आजच्या युगात जिथे रक्ताच्या नात्यानंमध्ये सुद्धा एवढे सख्य आणि एवढा ओलावा नसतो, तिथे ज्यांच नातंच माहीत नाही, अश्या बाईसाठी एवढी लगबग! तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना! तसंच मलाही वाटलं आणि वहिनीला ते मी म्हणून दाखवले. त्यावर ती म्हणाली. “अगं ताई आत्या आल्या ना की कोणी मैत्रीण आल्यासारखचं वाटतं.”
त्या माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. वय वर्षे ८० तर सहज पार केलेल्या अश्या ह्या ताई आत्या. माझी आजी आता ह्या जगात नाही, पण तरीही ताई आत्याला नेहमी आग्रहाचं निमंत्रण असतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ताई आत्यांनी सगळ्यांबरोबर आपलसं अस वेगळं नातं निर्माण केलं होतं.

ताई आत्या अतिशय कष्टाळू पण खूप हौशी. त्यांची परिस्थिती तशी बेताची. नवरा लवकर गेला. गावी त्यांची थोडी जमीन होती आणि एक छोटेसे घर होते. एकुलता एक मुलगा होता. ताई आत्यानी कष्ट करून मुलाला शिकवलं, शेती केली आणि आपलं जीवन चालवले. ह्या सगळ्या मधून तिला जमेल तशी ती कोणाची तरी मदत करत असे. अश्याच एका शिबिरात तिची आणि माझ्या आजीची ओळख झाली.
कुठले तरी नाते लागते हे कळल्यावर आजीने तिला घरी ४ दिवस राहायला बोलावले. ह्या नंतर ताई आत्या इतक्या घरातल्या झाल्या की तिची वर्षातून एक तरी चक्कर आमच्याकडे व्हायची. ताई आत्या कमालीची स्वाभिमानी सुद्धा; तिच्या कडे तिकिटाचे पैसे असतील तरच ती यायची. येताना सगळ्यांसाठी काहीतरी बनवून आणायची.
आल्यानंतर सुद्धा ती स्वस्थ बसणाऱ्यातील नव्हती. गप्पा मारत ती काकूला देव घरात लागणारे वाती, वस्त्र वगैरे ची मदत करायची. बाबांना पापड आवडतात म्हणून ती आईला वेगवेगळ्या प्रकारचे पापड करून द्यायची. लहान मुलांना खूप रंगवून गोष्टी सांगायची. लहान बाळांसाठी उबदार sweater हातांनी विणून द्यायची. आजीला बागेची आवड होती, महणून ती आजीसाठी, एखादं नवीन रोप आणायची, किंवा खत आणायची. काहीही करून ह्या घरच्यांना आपली मदत कशी होईल हे ती बघायची.
तिच्या तोंडून मी कोणाबद्दल कधी काही वाईट ऐकलं नाही. सर्वांशी मिळून मिसळून राहायची आणि सगळ्यांकडे तिच्याबद्दलची अशीच आठवण होती.
माझी आठवण म्हणजे, एकदा ती आली तेव्हा तिने सगळ्यांसाठी घवल्यांची खीर केली होती. ते घवले इतके बारीक आणि सुबक होते की मला ते खूप आवडले. मी तिला म्हणाले मला शिकावशील का? तिने लगेचच दुसऱ्या दिवशी मला शिकवायला घेतले आणि जाताना एक डब्बा भर घवले माझ्यासाठी बनवून गेली. दर वर्षी माझ्यासाठी ती घवले करुन आणायची.
अशी ही ताई आत्या, जिने आयुष्यात खूप पैसे कमावले नाहीत पण खूप नाती जोडली. आज वयाच्या ८० वर्षाला सुद्धा तिला अगत्याने घरी बोलवणारी आमच्यासारखी अजून बरीच घरे होती.