नोव्हेंबर २०१९ मध्ये फिरायला मैसूर ला गेलो होतो. फिरायला जाणं आणि तिथे मिळणार काहीतरी खास घेऊन येणे हे तर आलंच. त्यामुळे आपोआपच पावलं मिठाईच्या दुकानात कडे वळली, ती म्हैसूर पाक घ्यायला. त्यासाठी ड्रायव्हर काकांनी प्रसिद्ध गुरु स्वीट्स कडे गाडी घेतली व हे पण संगीतले की मैसूर पाक पहिल्यांदा बनवणारे आचारी दुसरे तिसरे कोणी नसून ह्या गुरू स्वीटस च्या मालकाचे पणजोबा होते. त्यानंतर मैसुरपाक पहिल्यांदा कसा बनला त्याची गोष्ट सुद्धा सांगितली. त्याचं झालं असं की वडियार राजा ४ यांनी त्यांच्या आचाऱ्यास काका सुरा मडप्पा हे त्याचं नाव. त्यांना नवीन वेगळा गोड पदार्थ बनवण्यास सांगितला. मग काका सुरा ह्यांनी सहज म्हणून डाळीचे पीठ घेतले. त्याच्यात भरपूर तूप व साखर घालून एक पदार्थ बनवला. राजा वडियार यांना तो पदार्थ फारच आवडला. पदार्थ गोड म्हणून पाक व मैसूर मध्ये बनला म्हणून मैसूर पाक. ही गोष्ट ऐकून आम्हालाही राजा सारखीच लहर आली काहीतरी authentic खायची. त्यामुळे वृंदावन मधल्या रॉयल ऑर्किड ह्या हॉटेल मधल्या शेफ मंजुनाथ ह्यांची लगेच भेट घेतली आणि त्यांना विचारलं की मैसूर मधील special असं काही खायला मिळेल का?

त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर गरमागरम वाफाळलेली इडली व सांबार अहं.. इडली व त्याच्या बरोबर आगळीवेगळी उसळ समोर आली. त्याच उसळ इडलीची रेसिपी सांगत आहे.
या पाककृती तील इडली तर सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच त्याची कृती न सांगता सरळ त्यातील उसळ कशी बनवायची ते बघू.
मैसूर इडली साठी लागणारे समान :-
- तेल- ३ चमचे
- चिरलेला कांदा- १
- टोमॅटो – १
- आलं,लसून पेस्ट – १चमचा
- श्रावण घेवढ्याच्या ओल्या बिया – १५०ग्राम
- उकडलेला बटाटा – छोटे २
- मोहरी – १चमचा
- कडीपत्ता – ५ ते ६ पानं
- हळद – १/२ चमचा
वाटणं करण्यासाठी लागणारे साहित्य :-
खोवलेला नारळ – १ वाटी
जिरं – १चमचा
कांदा, टोमॅटो – प्रत्येकी १
वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे व बाजूला ठेवावे.
मैसूर इडली कृती :-
- गरम तेलात मोहरी, कढीपत्ता व आलं-लसणाची पेस्ट घालावी.
- नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घाला व छान परतून घ्या. नंतर लगेचच घेवड्याच्या बिया व एक कप पाणी घालून 20 मिनिटे शिजवून घ्यावे.
- त्यानंतर वरील तयार वाटणं, मीठ (चवीनुसार) व उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून झाकण ठेवून एकदा वाफ काढावी.
- पातळ हवे असल्यास लागेल तसे पाणी घालावे.
तर अशी ह्याची शेफ मंजुनाथ ह्यांनी लिहून दिलेली कृती. म्हैसूर मधील स्पेशल गोष्टींमध्ये मैसुरपाक, म्हैसूर डोसा हे जसं आपण ऐकलं आहे. त्याचप्रमाणे या इडलीला आता आपण म्हैसूर इडली असं म्हणूयात का?

Food for thought :-
वरील बनवायचा कृती नंतर या पदार्थाची शरीरावर होणारी कृती बघुयात.
- उसळ खा आणि कृती थेट हाडांवर बघा. म्हणजेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम व फॉस्फरस घेवड्याच्या बियांमधून मिळतं.
- इडलीची महती तर सर्वांना माहीतच आहे. उडीद डाळ व तांदूळ मसल्स वाढवण्याचा हा योग्य उपाय. शिवाय कार्बोहाइड्रेट, मिनरल्स, विटामिन हे तर आलंच. शिवाय oil free.
एवढं सगळं ह्याच्यातून मिळतंय म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? हे तर असं झालं की एक डिश बनवा व संपूर्ण पोषक मूल्य मिळवा.
जाता जाता एक भन्नाट डायट टीप तुम्हाला देऊन जाते.
- इडली साठी तांदूळ व उडीद डाळ भिजत घालताना त्याच्यामध्ये सात ते आठ मेथीचे दाणे घालावेत. त्यामुळे चव सुद्धा चांगली येते शिवाय फायदे तर इतके की आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असे होते. तर मेथ्यानं चे फायदे असे की यामुळे पचनाला मदत होते, भरपूर प्रमाणात फायबर, शरीरातील वात कमी करतो, अतिसार (diarrhoea) कमी होतो, खोकल्यासाठी गुणकारी, रक्तातील साखर कायम ठेवण्यास मदत होते, शिवाय रक्तातील cholesterol level कमी करण्यास सुद्धा मेथ्या मदत करतात.