Categories
माझा कट्टा

तपकीरी सोनं!

‘तपकीरी सोनं’ हे ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल कि माझं काहीतरी चुकतंय….  हो ना ? सोन्यामध्ये तर, तसे बरेच प्रकार असतात White gold, Yellow gold, Rose gold, Green Gold, Black gold हे सगळे सोन्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतीलच. कधी तपकीरी सोनं(Brown  gold) ऐकलं आहे का? काय म्हणता …. नाही ऐकलं? “अहो हे सोनं तर, अगदी निशुल्क रित्या भरपूर प्रमाणात तुमच्याकडेच उपलब्ध आहे. अगदी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मातीवर किंवा अगदी तुमच्या घराच्या गॅलरी मध्ये झाडाखाली सापडेल तुम्हाला….लगेच बघा”.

काय म्हणता “पाला-पाचोळा आहे झाडाचा”? “अहो हो, मग तेच तर…‘तपकीरी सोनं’. आता तुम्हाला सगळ्या वाचकांना प्रश्न पडला असेल कि हे काय नवीनच”?

आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरी झाडं असतातचं. मग झाड म्हणलं कि त्याची सावली, चविष्ट फळं, सुगंधी फुलं याचा आपण अगदी मन मुराद आस्वाद घेतो. झाडाची पानगळ जेव्हा सुरु होते तेव्हा मात्र अगदी बरेच जणांना तो पाला पाचोळा  झाडून ठेवायचा वैताग येतो. किती कचरा तो असं पटकन मनात येतं. मग कधी कधी तो कचरा वाऱ्याबरोबर रस्त्यावर उडतो देखील मग आजू बाजूची लोकं तक्रारीच्या सुरात टोमणे मारतात, “फारच पानं पडतात नाही झाडाची?” आपल्याला ‘हो’ म्हणण्या वाचून काही इलाज नसतो. मग शेवटी बरेच जण ह्या पानगळीच्या कचऱ्याला कंटाळून तो कचरा सरळ जाळून टाकतात. 

झाडांची पानगळ का होते? याचा कुणीच विचार करत नाही. आपल्याकडे साधारण नोव्हेंबर ते मार्च किंवा जून पर्यंत पानगळ होते. कारण झाड येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तयारी करत असते. पानांमधून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात  होते. पाणी टिकवून ठेवण्यासाठी झाडे पानं गाळून बाष्पीभवन कमी करतात. अश्या वाळलेल्या पानांचे आच्छादन जमिनीवर पसरल्याने सूर्याचे अति तीव्र सूर्य किरण थेट जमिनीवर पोहचत नाही. माती मधील ओलावा पर्यायाने टिकून राहतो. तसेच माती साठी उपयुक्त किडे आणि कृमी यांना देखील वाळलेल्या पानांचा आश्रय मिळतो. झाडं जमिनीतील ५०% ते ८०% पोषक द्रव्ये शोषून घेतात तीच पानांमध्ये असतात. वाळलेल्या पानं पुढे पावसानी कुजुन पोषक द्रव्ये, त्याचं रूपात परत जमिनी मध्ये जातात. निसर्गा मध्ये जी संकल्पना आहे ती अशी चक्राकार आहे. हे निसर्ग चक्र काम करत राहते. जगंलामध्ये हे सहज शक्य होतं. 

शहरामध्ये मात्र आपल्याला हा कचराचं. कारण आपल्याकडे जमीन थोडी आणि सिमेंटची जंगलंच फार. मग याचं करायचं काय? तर जाळायचं? जाळून काय होतं? तेही माहित करून घेऊया.

१)पाला पाचोळा जळाल्याने त्यातून अनेक घातक वायू आणि कण  बाहेर पडतात. हेच धुरा वाटे हवेत प्रदूषण वाढवतात.

२) धूरावाटे बाहेर पसरलेले कण श्वसनावाटे फुफ्फुसात जातात. खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे आणि श्वसनाचे इतर आजार वाढीस लागतात. 

३) पाला पाचोळा अर्धवट जाळला तर कार्बन मोनोकसाईड(CO) हवेत पसरतो जो हानिकारक आहे. हा वायू रक्तामध्ये शोषला गेल्यास, रक्तपेशींची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. तसेच जागतिक तापमान वाढीला कारणीभूत होतो. संपूर्ण पणे जरी तुम्ही पाने जाळली तरी कार्बन डायॉक्साईड (CO2) तयार होतो.

आता अश्या वाळलेल्या पानांचं करायचं काय? तर याचही उत्तर आता आदिती देवधर यांच्या ‘ब्राऊन लीफ’ या उपक्रमामुळे  तुम्हाला मिळेल. त्यांच्या या उपक्रमाबद्दल थोडं जाणून घेऊया.  

Aditi Deodhar
Photo Credit – The Brown Leaf

“गरज ही शोधाची जननी असते” असं म्हणतात, तसंच काही इथेही झालं. अदिती यांच्या घराजवळ वावळाचे एक झाड आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान झाडाची पानगळ होते. या पानगळीमुळे त्यांच्या घराचा परिसर आणि आजूबाजूचा काही भाग हा या पानगळीमुळं आच्छादून गेला. इमारती मधील रहिवाश्यानी  ठरवलं पानं जाळायची नाहीत. मग त्या पानांचं करायचं काय? हा प्रश्न उभा राहिला. अदिती यांनी whatsapp वर वेगवेगळ्या ग्रुप्सवर विचारणा केली तेव्हा त्यांना कळले कि त्यांची एक मैत्रीण जमिनीवर ३ कुटुंबाना पुरेल इतका भाजीपाला पिकवणार आहे त्यांना वाळलेल्या पानांची गरज होतीच. दुसऱ्या दिवशी त्यांची मैत्रीण सुजाता नाफडे पोत्यामध्ये भरलेली पाने घेऊन देखील गेल्या. तेव्हा अदिती यांच्या असं लक्षात आलं कि हा  पाला पाचोळा किती उपयोगी होतो. म्हणजे बरेच लोकांना हा पाला पाचोळा कचरा वाटतो तर दुसरीकडे काही लोक या पाला पाचोळ्याच्या शोधात देखील असतात. यातूनच ब्राऊन लीफ ही संकल्पना सुरु झाली. ब्राऊन लीफ हे लोकांना सोशल मीडिया च्या माध्यमातून पानांचे आच्छादन करणे, त्याचे खत तयार करणे आणि ज्यांना पाने -पाला पाचोळा हवा आहे त्यांना तो देणे किंवा कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करत आहे

१) आच्छादन करणे – वाळलेली पाने तुम्ही घरातल्या घरात एखाद्या कुंडी मध्ये  किंवा मातीवर छान पसरून ठेवली तर उन्हाळ्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो.निसर्गा तून निर्मित झाली ती गोष्ट पुन्हा निसर्गात समाविष्ट होते. निसर्गाचे चक्र या रीतीने कार्यरत राहते. 

२) खत तयार करणे – वाळलेल्या पानांचे खत तयार करणे ही त्यातल्या त्यात फार सोपी पद्धत आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत लागली तर नक्की घ्यावी. 

३) गच्चीवरील बागेसाठी- आता बरेच लोक हे अपार्टमेंट मध्ये राहतात. मग काही जण तिथल्या गच्चीवर किंवा अगदी बाल्कनीमध्ये झाडं लावतात. त्यासाठी माती आणा, कुंड्या आणा हे ओघाने आलेच कि मग. तर आता अश्या प्रकारच्या बागेसाठी माती ऐवजी हे पानांचे खत किंवा पाने तुम्ही वापरू शकता. शिवाय वजनाला हलकी असल्याने उचलण्यास सोपी पडते जागा बदलायची असल्यास सोपे जाते. वाळलेली पाने माती प्रमाणे पाणी  धरून ठेवत नाहीत त्यामुळे इमारतीला काही धोका नसतो. 

आता वरील उपलब्ध तिन्ही प्रकार करण्यास तुम्हाला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर आता तुम्ही ती वाळलेली पाने चक्क दान करू शकता. आता ते शक्य झालं आहे अदिती देवधर यांच्या ‘ब्राऊन लीफ’ या उपक्रमामुळे. या अभिनव उपक्रमामुळे सध्या पुणे शहरात, सगळ्या ‘पाने हवी’ असणाऱ्या लोकांशी, त्यांच्या जवळपास, ‘पाने असणारे’ लोक ब्राऊन  लिफ मार्फत जोडले गेले आहेत. तरी देखील ‘पाने असणारी’ लोक 

जास्त आहेत तरी कुणी टेरेस गार्डनिंग किंवा शेतकरी असतील ज्यांना वाळलेल्या पानांची गरज आहे. अथवा कुठल्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी पुढील लिंक वर संपर्क करावा.  

https://brownleaf.org/contact

माहितीचा स्रोत- अदिती देवधर. 

अश्या रीतीने किमान तुमच्या घराजवळील एकही वाळलेले पानं जाळले जाणार याची खबरदारी जर प्रत्येकानी घेतली तर किती सहज शक्य आहे. आता वाळलेल्या पानांचा एवढा उपयोग होतो हे समजल्यावर त्याला ब्राऊन गोल्ड म्हणजे तपकीरी सोनं का म्हणू नये? झाडांचे किती उपयोग अगदी वाळलेलं पानदेखील  झाडा तील ५०% पोषक मूल्य जमिनीत परत घेऊन जातं. आपली जबाबदारी ती काय? झाडांना रोज पाणी घालणे इतकीच!

यावरून मला एक संस्कृत भाषेतील सुभाषित आठवलं . 

छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।  

फलान्यापी परार्थाय वृक्षा: सत्पुरुषा इव ।। 

अर्थात ,वृक्ष हे स्वतः तळपत्या उन्हात उभे राहून ,स्वतःची शीतल छाया इतरांना देतात. त्यांची सुमधुर फळे ती देखील दुसऱ्या साठीच आहेत. असे हे वृक्ष खरोखर सत्पुरुषाप्रमाणे आहेत. 

मग पुढच्यावेळेस पडलेला ‘पाला-पाचोळा’  कचरा समजून जाळू नका. लक्षात ठेवा तो ‘कचरा’ नाहीये. 

 ते ‘तपकीरी सोनं’ आहे. तर ते सत्पात्री दान करा.