कविता आणि कथेमध्ये एकदा चांगलेच जुंपले
रागेभरल्या शब्दांचे पडसाद वाचनालयात घुमले. II१ II
कविता म्हणाली :
मोठ्या वाक्यात अनेक पानात उगाच पसरलीस तु,
शब्दांच्या फापटपसाऱ्यात स्वतः हरावलीस तु.
सुबक नेटकी, ताल लयीत, आखीव मी रेखीव मी,
थोडक्या नीटस शब्दात, अर्थपूर्ण परिपूर्ण मी II२II
कथा म्हणाली :
यमक मात्रांच्या कुंपणात एकाकी बंदिस्त तु,
कडव्यांच्या बेड्यात अडकुनही समाधानी संतुष्ट तु?
स्वच्छंद मुक्त मी, अमर्याद विश्व माझे,
उंचच उंच झेप घेती, उत्स्फूर्त उत्सुक पंख माझे II ३II
बहिणीत जुंपलेली खडाजंगी पहायला,
इतर भाऊबंद ही आले.
ललित आत्मकथा नाटक यांनीही
आत्मस्तुतीचे पोवाडे गायले II ४II
शब्दांच्या कोलहलाने साहित्य मात्र व्यथित झाले
शब्दांच्या चकमकीत मनोमन विव्हळले.
कथा कविता नाटक ललित शर्मिंदे खजील झाले
साहित्याची माफी मागुन आपल्या पुस्तकी परत गेले. II ५II
प्रिया सामंत