लोकमान्य टिळक शताब्दी पुण्यस्मरण.

१ ऑगस्ट, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी . १ ऑगस्ट १९२० रोजी  त्यांचे देहावसान झाले. नुकतीच त्यांची ९९वी पुण्यतिथी झाली. त्याच बरोबर लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी पुण्यस्मरण वर्ष सुरु झाले आहे. 

Photo credit- Navbharattimes.indiatimes.com

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्हातील दापोली येथील चिखली या  गावी झाला. त्यांचे पाळण्यातले नाव केशव. बाळ हे त्यांचे टोपण नाव परंतु पुढे त्यांना बाळ गंगाधर टिळक असेच ओळखले जाऊ लागले. 

लोकमान्यांचे वडील गंगाधर टिळक हे संस्कृत विद्वान होते. त्यांच्या वडिलांची बदली पुण्यास झाल्याने १० वर्षाचे असताना लोकमान्य टिळक पुण्यात आले. आपल्याला सगळ्यांनाच त्यांची शेंगाच्या टरफलाची गोष्ट माहित आहे. अन्यायाविरुद्ध लढणे हा त्यांचा स्वभावच होता. त्याच बरोबरीने निर्भीडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा हा देखील त्यांचा स्वभाव होता. टिळकांना लहानपणापासूनच गणित आणि संस्कृत हे विषय आवडीचे होते. टिळकांनी शरीरास बळकटी मिळावी म्हणून शास्त्रशुद्ध आहात आणि व्यायाम या गोष्टीला देखील प्राधान्य दिले होते.  कॉलेज मधून पदवी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. मुंबईच्या law college मधून त्यांनी L. L. B चा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. येणाऱ्या नवीन पिढीला राष्ट्रीय शिक्षण देता यावे या हेतूने टिळक,आगरकर, नामजोशी, करंदीकर आणि चिपळूणकर या सर्व मित्रांनी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना केली. खरतर पुण्यामध्ये याच शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती त्या वर्षी मिळवली होती. कारण होते उत्तम शिक्षक… जे पुढील पिढीला योग्य ते ज्ञानदानाचे पुण्य करत होते. काही वर्षानी फर्ग्युसन कॉलेज पण सुरु करण्यात आले. काही नवीनच आलेल्या सभासदांमुळे आणि नवीनच सुरु झालेल्या वादामुळे टिळकांना शाळा सोडावी लागली. 

टिळक आणि आगरकर हे दोघे खूप चांगले मित्र अगदी त्यांच्या कॉलेजपासूनचे. संपूर्णवेळ  राजकारण करावयास मिळेल आणि त्यांचे विचार निर्भीडपणे मांडता येतील शिवाय प्रत्येक माणसापर्यंत आपले विचार पोहोचवता येतील या उद्दात हेतूने टिळक आणि आगरकर यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र  सुरु केली. 

केसरी हे मराठी भाषेमध्ये ,मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होत असे. केसरी  या वृत्तपत्राचे काम आगरकर पाहत असत आणि मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचे काम लोकमान्य टिळक बघत असत. केसरी मधील अग्रलेख वाचून जनतेचे डोळे उघडले. इकडे ब्रिटिश सरकारला धास्ती भरली. त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचे खटले भरण्यात आले. टिळक आणि आगरकर यांचे वैचारिक वाद वाढू लागले. वाद कश्याबद्दल होते तर समाजातील काही सुधारणा याबद्दल. लग्नासाठी योग्य वय,किंवा विधवा पुनर्विवाह याबद्दल. टिळकांचा सुधारणेला विरोध नव्हता परंतु आमच्या सामाजिक सुधारणेसाठी इंग्रजांनी नियम तयार करणे टिळकांना कधीच पटले नाही. त्यांचे म्हणणे एकच होते सुधारणा होणे गरजेचे आहे परंतु त्या आधी स्वराज्य मिळणे हे जास्त गरजेचे आहे. टिळक आणि आगरकर हे दोघेही जहालमतवादीच होते. त्यांच्यातील वाद हा सामाजिक सुधारणेच्या अग्रक्रमाने निर्माण झाला होता. परंतु सामाजिक सुधारणेची आता गरज नाही असे टिळकांच्या म्हणण्यामुळे इतरांना ते सनातनी वाटले. आधी स्वराज्य आणि मग सुधारणा  की आधी सुधारणा आणि मग स्वराज्य याच्या अग्रक्रमामुळे टिळक आणि आगरकर वाद उदयास आले. 

लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव आणि शिव जयंती हे दोन सार्वजनिक उत्सव टिळकांनी सुरु केले. 

लोक एकत्र आले. विचारांचे आदान प्रदान होऊ लागले. न्यायालयीन खटले हे चालूच होते. त्यातून टिळक शिक्षा भोगून परत येत आणि पुन्हा नवीन जोमाने कामाला सुरुवात करत. शेवटी टिळकांच्या लेखणीला कसा आवर घालता येईल या बुचकळ्यात ब्रिटिश सरकरदेखील पडलं. टिळकांना अडकवण्यासाठी ब्रिटिश नवनवीन नियम तयार करू लागले. परंतु त्यांना फारसे यश आले नाही.  

बंगाल फाळणीच्या वेळेस लाल – बाल – पाल हे त्रिमूर्ती लोकांच्या मनात घर करून गेली .  त्यानंतर सुरत विभाजन १९०७ या प्रकरणानंतर लोकमान्य टिळकांना मंडालेच्या कारागृहात पाठविण्यात आले. तिथे त्यांना तब्बल सहा वर्ष ठेवण्यात आले. टिळकांनी तिथेच फ्रेंच, पाली आणि इतर भाषांचा अभ्यास केला . गीतारहस्य हे त्यांचे पुस्तक त्यांनी तिथेच लिहिले.त्याचबरोबर The Orion आणि The Arctic Home in the Vedas. या विषयावर देखील त्यांनी पुस्तक लिहिले. ते स्वतः एक उत्कृष्ठ वकील, लेखक, संपादक, गणितज्ञ होतेच. राजकारणी देखील होते. धोरणी वृत्तीचे होते. त्यांनी सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आपलेसे केले होते. त्यांचे विचार हे सर्व लोकांना मान्य होते म्हणूनच ते लोकमान्य होते. मंडाले येथून परत आल्यावर पुण्यात बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि  लोकं त्यांना भेटण्यासाठी आली. मंडालेच्या तुरुंग वास भोगत असताना त्यांच्या पत्नी सत्यभामा बाई यांचे निधन झाले होते. परंतु काही इलाज नव्हता. लोकमान्य टिळकांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच” हे त्यांचे उद्गार त्यावेळीही लोकांच्या मनावर कोरले गेले, आजही कोरलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते वर्षानुवर्ष ते तसेच राहतील.

फक्त शेवटी एक सांगावस वाटतं ज्या हेतूने लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण स्वतः समजाभिमुख काही सत्कर्म करू शकलो तर किती चांगले होईल. येणाऱ्या पुढील पिढीतील मुलांना लोकमान्य टिळकांची पुस्तक वाचावयास सांगून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल हे खात्रीने सांगू शकतो. लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्त्व एवढं मोठं आहे की ते इतिहासाच्या एका पुस्तकात एका धड्यामध्ये शिकवण आणि शिकणं हे केवळ अशक्य आहे. 

मी स्वतः एवढी मोठी नाही की मी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल खूप लिहावं. लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी पुण्यस्मरण वर्ष सुरु झाले आहे म्हणून ही माझी त्यांच्यासाठी शब्दांजली. 

अमृता गाडगीळ-गोखले
अमृता गाडगीळ-गोखले

नमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.