गुरु पौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा!

आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाला म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. राणी सत्यवती आणि पराशर ऋषी हे त्यांचे माता आणि पिता. व्यास ऋषींनी वेदांतील ज्ञानाचे विभाजन करून ते चार प्रकारात समाविष्ट केले.साम वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्व वेद . त्यांनी वेदाचे विभाजन केले आणि प्रत्येक व्यक्तीला ते अध्ययन करण्यास सोपे होईल याची काळजी घेतली. म्हणूनच त्यांना वेद व्यास असेही म्हणले जाते. तसेच व्यास ऋषींनी १८ पुराण आणि महा-ग्रंथ महाभारताची निर्मिती केली. श्री गणेश यांना त्यांनी महाभारत लिहिण्यास मदत करावी अशी विनंती केली. त्यानुसार वेद व्यास ऋषींनी महाभारताचे वर्णन केले आणि श्री गणेशांनी महाभारताचे लिखाण केले. महाभारतातील घटनांना त्यांनी खूप जवळून अनुभवले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास हे त्रिकालदर्शी आहेत असेही मानले जाते. किंबहुना ते श्री विष्णूंचा अवतार आहेत असेही मानले जाते. महर्षी व्यासांनी प्रत्येक शिष्यास सखोल ज्ञान मिळेल आणि ज्ञान ग्रहण करण्यास सुलभ सोयीचे होईल, याचा किती सखोल अभ्यास आणि विचार तेव्हा केला हेच दिसून येते. भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार महर्षी वेद व्यास हेच आहेत. महाभारतातील धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्र  हे आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतं. महर्षी वेद व्यास यांना आद्य गुरु मानलं जातं म्हणूनच गुरु पौर्णिमा हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो.

आजच्या  काळात पूर्वीसारखे गुरुकुल नाहीत. आता शिक्षण घेणं खूपच सोयीचं झालं आहे. तरीदेखील आपल्या आयुष्यातील गुरु आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतातच. आपला आजूबाजूलाच इतकी माणसं  अविरतपणे वावरत असतात कि, त्यातले किती लोक खरे आणि किती लोक खोटे हेच आपल्या लवकर लक्षात येत नाही. मग अश्यावेळी काय करायचं? आपले गुरु कोण? हे कसे बरे आपल्या लक्षात येईल. आपले गुरु आपल्याला कायमच  योग्य ते मार्ग दर्शन करतात, चूक झाली तर शिक्षाही करतात. पण कुठलेही गुरु आपल्याला आपले सत्कर्म करण्यापासून अडवत नाहीत. जशी आपली आई आपल्याला अगदी बालपणापासून सांभाळते, योग्य ती काळजी घेते. मार्गदर्शन करते आणि वेळ आल्यास फटकेही देते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील गुरु आपल्याला दिशा दर्शन करत असतात. म्हणूनच आपल्या आयुष्यातील पहिला गुरु हि आपली आईच असते. 
महाभारताच्या युद्ध प्रसंगी जेव्हा अर्जुनासमोर शत्रूपक्षामध्ये जेव्हा त्याचेच आप्त, स्वकीय ,गुरुजन उभे राहतात आणि अर्जुन विवंचनेत पडतो “मी हे युद्ध कसे करू”? तेव्हा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे श्रीकृष्ण त्याचे मार्गदर्शन करतात.
“तू तुझे कर्तव्य कर. त्याचे परिणाम काय होतील? मला माझ्या कृतीचे काय फळ मिळेल याची चिंता करू नकोस”, तू तुझे कर्तव्य कर. व्यक्तिगत विचार न करता प्रजेसाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी तू हे धर्मयुद्ध कर. असा संदेश स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला.
काही गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल बोलावे आणि लिहावे तेवढे कमीच आहे. मग ते श्रीकृष्ण आणि सांदिपनी ऋषी असो, नाहीतर अगदी एकलव्य आणि द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे एकालव्यांचे मानस गुरु होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु. 

आज काल सगळंच online झाल्याने बरेच जण  online चं शुभेच्छा पण देतात. पावसामध्ये भिजल्याशिवाय पावसाचा आनंद मिळेल का? चिखलात पाय रुतला तरच, रुतलेला पाय कसा काढावा? हे ज्ञान आपल्याला मिळेल नाही का? सगळ्याच गोष्ष्टींचे ज्ञान घरी बसून मिळतेच असे नाही. ज्ञान घेण्यासाठी शिष्याची तळमळ किती आहे? याची परीक्षा देखील गुरु घेतात, म्हणून तर आपल्या आयुष्यात सुख दुःख येतात. तुम्ही आलेल्या संकटाना कसे सामोरे जाता. त्यामध्ये तुमची तुमच्या गुरुप्रती असणारी श्रद्धा हीच तुम्हाला तारून नेत असते. आजूबाजूला रोज लाखो अनुभव घेत आपण जगत असतो, म्हणून बरेच जण अनुभव घेत घेत शहाणे होत असतात. पण खरा शिष्य तोच असतो जो लाखो संकट आली तरी आपल्या गुरुप्रती असणारी श्रद्धा आणि विश्वास तसाच कायम ठेवतो. 
म्हणून तर साई बाबांच्या देवळात गेलात तर “श्रद्धा” आणि “सबुरी” हे दोन्ही शब्द तुमच्या दृष्टीस पडतात.
श्री स्वामी समर्थ कायमच सांगतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.

अमृता गाडगीळ-गोखले
अमृता गाडगीळ-गोखले

नमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.