memories from magalvedha, a village in maharashtra

बालपणीचा काळ सुखाचा

काय सांगू तुम्हाला मंगळवेढ्याची पोर मी. सिरसीशी नातं जोडलं आणि पार बदलून गेले.
सिरसीत येऊन २७ वर्ष उलटली भाषा बदलली, राहणीमान बदलले पण अजूनही मंगळवेढ्याची ओढ कमी झाली नाही.

काय आहे त्या खेडेगावात? असं बाहेरच्या लोकांना नेहमी वाटतं पण माझ्या गावाची शानच न्यारी. इथला मऊ शार हुरडा, दर्जेदार ज्वारी आणि जोरदार उन्हाळा, थंडगार हिवाळा तसेच इथली संतांची परंपरा. ह्या गोष्टी जगामध्ये कुठेही मिळणार नाहीत. मंगळवेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सामाजिक ऐक्यता. कधीही दंगा, मारामारी, इथे पहायला मिळत नाही. राजकीय मैदानात एक बाजूला टाकलेले गाव. पण तरीही कुणाबद्दल कशाचीही तक्रार न करता गुण्या गोविंदाने एकत्र नांदणारी माझ्या गावची साधीसुधी माणसं.
ह्या टुमदार गावामध्ये मी लहानाची मोठी झाले.

किल्ला भागात नेने वाडा हे माझ आजोळ. तिथे आजी, आजोबा, मामा, मामी ह्यांच्या सोबत आई आणि आम्ही तिघे भावंडं रहायचो. बाबा माझ्या लहानपणीच गेल्यामुळे आजी आजोबांच्या मायेच्या पंखाखाली आम्ही वाढलो.
आता मागे वळुन पाहताना ते बालपण पुन्हा जगावेसे वाटते. ते स्वच्छंदी दिवस पुन्हा अवतरावेसे वाटतात. ना तेव्हा  TV होता, ना AC, ना fridge होता, ना खूप सुविधा होत्या पण कशाची कमतरता वाटायची नाही खूप तृप्त आणि सुखी आयुष्य होत ते. तेव्हा शाळा, मग संध्याकाळी पाढे, परवचा, मग आईने नाहीतर आजोबांनी सांगितलेली गोष्ट. त्यात मन रंगून जायचे आणि मस्त झोप यायची. 

लहानपणी खेळलेले खेळ अजून आठवतात. दोरीच्या उड्या, फुगडी, लंगडी, लपाछपी ,गजगे, विष अमृताचा खेळ, झाडावर चढून गोळा केलेली कच्ची बोर, विलायती चिंचा ,गाभुळलेल्या चिंचा, जांभळं आणि उंबर. विटी दांडू, पळापळी, सायकल शिकणे ,झोका खेळणे आणि संध्याकाळी बुचाची फुलं वेचून घरी आणायची. आजी त्याची छान माळ करायची. 

आजी श्रीकृष्ण भक्त. ताक करताना ती कृष्णाची गाणी गायची. तिचा आवाज खूप गोड होता. खूप मायाळू, हसरी, आनंदी अशी होती ती. आजोबा फार शिस्तीचे. प्रत्येक कामात त्यांना नीट नेटकेपणा लागायचा. मामा मिश्किल. नेहमी विनोद करून सगळ्यांना हसवणारा. मामी कामसू , पण तब्येत कशी नाजूक.
आई नेहमी कामात व्यस्त असायची. ती शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे गृहपाठ, पेपर तपासणे ही कामं ती घरी फावल्या वेळात करायची.

Free spirited childhood is a thing of nostalgia today as children face tremendous pressure.

तेव्हा शाळेमध्ये एव्हढी जीवघेणी स्पर्धा नव्हती. सतत शिकवणी, जादाचे क्लास ह्यामध्ये आम्ही भरडले गेलो नाही. शाळेचा घरी दिलेला अभ्यास केला की आम्ही मोकळे खेळायला.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पोरांची मोठी गँग असायची. आजीच्या घरातून काकांच्या घरी तिथून मावशीच्या घरी असे हिंडून संध्याकाळी घरी यायचे. लवकर झोपून लवकर उठायचे. दादा मामा मुलांना पोहायला शिकवायला महादेव विहिरीवर घेवून जायचा. उन्हाळ्यात आई वाळवण म्हणून बटाट्याचा, रताळ्याचा खीस, सांडगे, पापड करायची. तेव्हा आम्ही मुली मदतीला. 

अशा कितीतरी गोड आठवणींनी भरलेलं बालपण खूप आनंददायी होतं. परत मंगळवेढ्याला जातो तेव्हा त्या आठवणी ताज्या होतात. आता त्यावेळची बरीच जुनी माणसं नाहीत. जी आहेत त्यांना भेटून खूप बरे वाटते.
गावाची आठवण येते तेव्हा तेथील प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे गाणे गुणगुणते, मंगळवेढे भूमी संतांची.