चला भक्तीला देऊ पर्यावरण संरक्षणाची झालर

आत्ताच विठु माऊलींची पालखी पुण्याहून निघाली. तो भक्ती मध्ये आकंठ बुडालेला जन समुदाय बघून मन भरून येते. आपसूक ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असे नामस्मरण होते. ह्या वर्षीची वारी मात्र अजून एका कारणामुळे सुंदर आणि अविस्मरणीय होती, ती म्हणजे ‘हरित वारी’ किंवा ग्रीन वारी ह्या संकल्पाने मुळे.

ह्या वर्षी वारकऱ्यांनी माउलीच्या चरणी आपली भक्ती आणि भूमातेच्या चरणी आपले श्रम दान करायचे ठरवले आहे. मंगळवेढा ते पंढरपूर ह्या २३ किलोमीटर मार्गावर त्यांनी ९,२०० रोप लावण्याचा चंग बांधला आहे. ह्या हरित वारी मध्ये भाग घेण्यासाठी बऱ्याच दिंड्या पुढे आल्या आहेत.  ह्यांना सोलापूर प्रशासन आणि वन विभाग देखील मदत करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अख्या वारीच्या मार्गावर ही हरित दिंडी पुढच्या वर्षी काम करेल.

हरित दिंडी ची संकल्पना बऱ्याच खाजगी शाळा आणि शिक्षण संस्थांनी सुद्धा राबवायचे ठरविले आहे. ह्याच प्रकारे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ने देखील त्यांच्या (NSS) विभागाच्या मदतीने वारी च्या मार्गावर असलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटी च्या खाली असलेल्या कॉलेज भोवती वृक्षारोपण चे काम हाती घेतले आहे. 

फोटो क्रेडिट – सकाळ टाइम्स

किती सुंदर संकल्पना आहे ना ही? ज्या भक्ती भावाने आपण मूर्ती पूजन करतो त्याच भक्ती नी  पृथ्वी सृजन करण्यात हातभार लावला तर त्या परमात्म्याला किती आनंद होईल? एका सुंदर कल्पनेला हजारो लोकांनी उचलून धरल्यानंतर ती यशस्वी का नाही होणार ?

एके काळी वारीच्या मार्गावर दोन्ही बाजूला डेरेदार सुंदर वृक्ष होते. ही झाडे दमलेल्या वारकऱ्यांना विसावा देत, सायंकाळी त्यांच्या सावलीत अभंग आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतं. एखाद्याचा क्षीण हरपून जायचा त्या विशाल वृक्षांच्या सावलीत, पण आता प्रगतीच्या नावाखाली ह्या वृक्षांचा बळी गेला आहे. पण जर आताच काही केला नाही तर चेन्नई सारखी भीषण परिस्थिती फार लांब नाही . 

एका वारी यात्रे मध्ये जर हजारो वृक्ष लावली जाऊ शकतात तर विचार करा अशी भक्ती ची साथ पर्यावरणाला देश भरात मिळाली तर खरी हरित क्रांती लांब नाही. 

१. आपल्या देशात प्रत्येक गावात एखादी तरी पालखी किंवा मिरवणूक असते. जर प्रत्येक आयोजकांनी ठरवले कि ते त्या पालखीच्या मार्गावर वृक्षा रोपण करतील तर किती झाडे लावली जातील!

२. आपल्या गावात जत्रा असेल तर जत्रेच्या परिसरात वृक्षारोपण करा. 

३. देव दर्शनाला जात असाल तर वाटेत दिसतील त्या झाडांना थोडे बाटलीतलं पाणी घाला. 

४. घाटात पैसे आणि नाणी टाकण्याऐवजी बीज टाका. 

५. प्रवासाला जाताना आपल्या परिसरात सहज येणारी फळं बरोबर घ्या, व खाऊन झाली कि बिया रस्त्या किनारी मऊ मातीत पेरा. 

६. ट्री गणेशा सारखे बाकी देवांचे हि मातीचे व बीज असलेले मुर्त्या विकत घ्या

७. आपल्या व परिवारातील इतर जणांच्या वाढदिवसाला एखादे झाड लावा आणि ते जगवा. 

८. पावसाळ्यात पाणी आडवा आणि जिरवा. 

जर असे उपक्रम धार्मिक संस्थांनीं हाती घेतले आणि लोकांना त्यात दडलेली देव भक्ती पटवून दिली तर भारत एक पर्यावरण स्वरक्षणाचे उदाहरण म्हणून जगासमोर उभे राहील असे मला वाटते.