लहाणपणी आजीफक्त ‘आजी’ होती पण आज ती गेल्यावर तिच्याबद्दल लिहिताना अधिक आदर वाटतो कारण मी आता तिला एक स्त्री म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून आणि अश्या अनेक नात्यांमधून समजू शकते. तिच्याबद्दल लिहिताना एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून ती मला कशी उमगली हे मला सांगायचे आहे. आता जेव्हा स्वतः कमवायला लागल्यावर ‘दाल-आटे का भाव’ समजतोय तेव्हा कळतं आजी-आजोबांनी त्याकाळी कसा संसार केला असेल!
आजीचा जन्म मूर्तीजापूरला झाला. तिच्या वडिलांची सारखी बदली होत असायची. त्यामुळे आजी बऱ्याच शहरांमधून राहिली होती. तिची आई ती दोन वर्षांची असतानाच गेली. वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांच्यापासून आजीला अजून भावंडं झाली…म्हणजे एकूण १२! आणि म्हणून आम्ही आजीला “thedozensiblings’ असे चिडवायचो. अर्थात सावत्र आईने खूप चांगला सांभाळ केला असं ती नेहमी सांगायची.पण आम्हाला मात्र 12 भाऊ-बहिणी असणे म्हणजे मजा वाटायची .”येवढे!!!!” ,“तुम्ही राखी आणि भाऊबीज कसे करायचे?” आम्ही आजीला विचारायचो. ती म्हणायची “आम्हाला कधीच काही वाटलं नाही.मज्जेत घालवले दिवस!“
आजी सुरुवातीपासूनच कविता लिहिणे, सार्वजनिक ठिकाणी बोलणे, नाटक बसवणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हुशार होती. ती शीघ्रकवी पण होती. मुंज, लग्न, साठीशांत, बारसे, इ.सगळ्याच सणांवर आणि प्रसंगांसाठी तिचे काव्य तयार असे. तिचे उखाणे प्रसिद्ध होते आणि आम्हाला कौतुक वाटायचं कारण ती इंग्रजीतसुद्धा उखाणे करायची. तिचे उखाणे पत्रिकां[a1] मधून छापून सुद्धा आलेले आहेत. स्वरचित ती चाल पण लावीत असे. तिचं वाचन भरपूर होतं. लेखनही खूप करायची. तिला खरंतर लेखिका व्हायचं होतं पण ती पूर्ण वेळ लेखिका होऊ शकली नाही. दिवसभर नोकरी आणि घरातली कामं करून रात्री लेखन करत बसायची. शाळेत असल्यापासून एका डायरीमध्ये ती कार्यक्रमांना आलेल्या पाहुण्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठेवायची. यात त्यावेळचे प्रसिद्ध कवी-लेखक असत. नंतर तिने बऱ्याच मोठ्या लेखकांना आणि नेत्यांना वेळोवेळी पत्रं लिहिली होती. यातील काही महत्वाची नावे म्हणजे कुसुमाग्रज,व्ही.व्ही.वी.वी. गिरी, नीलम संजीव रेड्डी. त्यांची आलेली उत्तरेसुद्धा ती जपून ठेवायची.
तिचं पाठांतर जबरदस्त होतं नुसते श्लोकच नव्हे, तर तिला अख्खे ग्रंथ पाठ होते असं म्हंटलं तरी चालेल. शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमधे झोपलेली असताना सुद्धा तिलाअस्खलित श्लोक आठवत होते अस्खलित! औषधाच्या गुंगीत ती माणसं ओळखत नव्हती, पण नामस्मरणासाठी पाठ केलेले श्लोक खणखणीत आवाजात म्हणून हॉस्पिटल मधला पूर्ण स्टाफ तिच्या शुद्ध संस्कृत उच्चारामुळे आणि अस्खलित इंग्रजीमुळे तिचा चाहता झाला होता. तिने “फैन” बनवून सोडले होते.
आजी लवकर नोकरीला लागली. वयाच्या 18व्या वर्षीच रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी आधी आणि मग लग्न. तिला मिळालेल्या पहिल्या पासाच्या आनंदाचे वर्णन तिच्या तोंडून ऐकावे. किती आनंद झाला होता तिला. ती पहिला पास घेऊन दक्षिण भारताच्या टूर वर गेली होती. तिला अजून शिकायचे होते पण घरातल्या परिस्थितीमुळे तिला उच्च शिक्षण घेता आले नाही. आजी-आजोबांची भेट पुढे तिथे ऑफिस मध्येच झाली. एकाच टेबलावर बसायचे दोघे. आजीच्या कवितांमध्ये आजोबांबद्दलचे प्रेम, त्यांच्या विषयीचा आदर आणि जोडीदाराबद्दलच्या तिच्या कल्पना एका कवितेत स्पष्ट दिसून येतात
मौक्तिक माले मधली मोत्येँ
सांग सख्या रे काय म्हणाली ?
रंगीत-गंधित पुष्पे बागेमधली
सांग साजणा कशी लाजली?
लग्नाबद्दल, किंवा जोडीदाराबद्दल एका कवितेत ती लिहिते :
मनी नसे तरी स्वप्नी दिसे
सत्य असे कि भास असे?
कसे दिसावे?‘तू’ मज स्वप्नी
अनपेक्षित हे यावे घडूनी ॥
परी एक दिवस तो असा उगवला
जणू भासले ‘स्वप्नच’ मजला
क्षणात स्मरले “पूर्वस्वप्न’ ते
ज्यास पाहिले त्यांना वरीले॥
मंगल दिनही तोच तोच तो
तेच तेच मज ‘पति’ लाभले
‘पूर्वस्वप्न’ हे कसे रंगले?
जीवन माझे कसे बदलले? ॥
त्यांचा प्रेम विवाह झाला. (अर्थात हा अगदी रसाळ चर्चांचा विषय) आजोबांच्या घरून खूप विरोध होता म्हणे. एकाच जातीतले असून आजोबांची आई आजी बद्दल ‘साशंक’ होती. तिला घरात ‘करणारी’ सून हवी होती. आजोबांचे मूळ गाव साताऱ्याजवळ पाचवड इथे होते. ते घरात सगळ्यात मोठे होते. घरी थोडीफार शेती होती. त्यांचे वडील लवकर गेले आणि आजोबांपेक्षा खूप लहान पाच-सहा भावंडंही होती. अशा परिस्थितीमुळे पणजी आजीला घरातल्या कामात मदत करणारी सून हवी होती. नोकरी करणारी मुंबईतली “मॉडर्न’ पोरगी नको होती पण झालं लग्न. हळू-हळू आजीने सर्व घर सांभाळलं. अर्थात ती गावात राहत नव्हती. सणासुदीला सगळे एकत्र यायचे. भावंडं कधी सातारा, कधी गोवंडीला असायची. गोवंडीला छोट्याशा भाड्याच्या घरात सगळी जणं राहत होती. जागा खूप कमी पण माणसांमध्ये प्रेम खूप. आणि इथेच मला आजीचं खूप कौतुक वाटतं.
आजीच्या पिढीने खरंच खूप कष्ट घेतले असं मला वाटतं. आजच्या पिढीला तंत्र-ज्ञानाची मदत उपलब्ध आहे. सोयी आहेत, सुविधा आहेत. आजीच्या पिढीला तसं नव्हतं. आज आमची पिढी नोकरी करत असली आणि घरही सांभाळत असली तरी त्याचे काही विशेष कौतुक मला वाटत नाही. पुणे–मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सगळं विकत मिळतं. सण असला की पुरणपोळी मिळते, मोदक मिळतात. कामाला बाया मिळतात. पैसे खर्च केले की छान-छान वस्तु मिळतात. पण त्या काळी म्हणजे 1960च्या दशकामध्ये असं नव्हतं. आजी घरातलं सगळं करून सकाळी 8 ची लोकल धरून ऑफिस ला पोचायची. वरून एक सण असा नाही जो तिने केला नाही, . आणि पूर्ण निगुतीने नाही केला.गोवंडी-सीएसटी ( तेव्हा चे व्ही टी) दीड तासाचा प्रवास होता. एक लोकल चुकली तर दूसरी खूप नंतर असे. टॅक्सी करणे तेव्हा परवडण्यासारखे नव्हते. तिला लेट मार्क मिळाला तर रडायला यायचं. कामातही मिसेस काळे चोख. काम वेळेवर पूर्ण करणार. इंग्रजी अस्खलित लिहिता-वाचता-बोलता येत होतच. नोकरीमुळे ती खूप काही नवीन पण शिकली. पण राहणीमान अत्यंत साधे. कमावती म्हणून स्वतःसाठी खूप साड्या घेतल्या आहेत किंवा नट्टा-पट्टा केला आहे किंवा हिंडली आहे असे नाही. गुडघ्या पर्यंत लांब जाड काळे केस नेहमी अंबाड्यात बांधलेले असायचे.शेवटपर्यंत तिचे केस फार पांढरे झाले नव्हते ही खूप आश्चर्याची गोष्ट. नेहमी साडीच नेसायची. शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये गाउन आणि घरी माझे जुनेकुर्ते घालायला दिले होते. केस कापले होते गुंता खूप झाला होता म्हणून. डिसेंबर मध्ये जबलपूरला खूपच थंडी असल्यामुळे कुर्त्याखाली तिला स्लॅक्स घालायचो. तर आईला म्हणायची मी आज ‘मुमताज़’ दिसत आहे का! तू रोज मला एखाद्या नटीसारखी तयार करतेस.
जवाबदारीची सतत जाणीव ती ठेवून होती. सामानाला किंवा फूल-पुडीला बांधून आलेल्या दोऱ्याचे सुद्धा तिने वीणकाम करून घरात काही वस्तु बनवल्या होत्या. पै-पै जोडून तिने खूप काही जमवलं. थोडं थोडं सोनं घेऊन ठेवायची सवय होती तिला. मला खरंच आश्चर्य वाटतं की तिला हे सर्व कसं काय जमायचं. नोकरी करते म्हणून घरकामाकडे दुर्लक्ष झालं नाही. तिच्या हातची लोणची, पापड, चटण्या एकदम ‘फेमस’. तिला ही तिखट पदार्थ खायला आवडायचं. गोड फार आवडत नव्हतं. त्यामुळे तोंडी लावण्याचे प्रकार ती खूप करायची. मला स्वतःला तिच्या हातची करडईची भाजी खूप आवडायची. मी सुट्ट्यांमध्ये पुण्याला आल्यावर ती माझ्यासाठी हमखास करायची.
माहेर असो वा सासर तिने सगळ्यांची खूप मदत केली. सगळ्यांकडे येणं-जाणं होतं. तसं तिला माहेरपण असं खूप काही मिळालं नाही. कधीतरी मध्ये एखाद्या दिवशी जायची माहेरी. एका कवितेतून माहेर-सासर तुलना तिने खूप छान केली आहे :
ललना मी सबला मी
माहेर किती प्रिय मला
सासर परि गृह माझे
भूषविते मी सकला ॥
नावडते कोणाही
दीन हीन जीवन जरि
स्वाभिमान जगण्याचे
‘सासर’ हे स्थान खरे ॥
स्वातंत्र्या ना तोटा
‘स्वच्छंदी ‘ जीवन हे
बंधनात सुख येथे
स्वातंत्र्ये स्त्री जगते ॥
एकीचे ‘माहेर’ ते दूसरीचे ‘सासर’जरी
एकीने दुसरीला
सावरणे प्रीत खरी ॥
लोकल मध्ये येता–जाता तिचा एक वेगळा ग्रुप झाला होता. वेळोवेळी सगळ्यांचे वाढदिवस, सगळे सण, विशेष प्रसंग साजरे करायची. नेहमी पुढाकार घेऊन करण्याचा तिचा स्वभाव होता. सगळ्यांशी संबंध ठेवून सगळ्यांसाठी करणे तिला आवडायचे.
तिला मैत्रिणी पण खूप होत्या. कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या मैत्रिणीस ती लिहिते , “
प्रेम असू द्या, सुहृद जनांचे
स्नेहभाव ही जपा तयांचे
निवृत्तिची परंपरी ही
पुढती नेईल पिढी उद्याची ॥
निरोप देतो सुखी असावे
तन, मन प्रसन्न रहावे
सत्कार्याला वाहूनी घ्यावे
जीवनास सामोरे जावे ॥
आजोबा तसे खूप समंजस असले तरी त्या दोघांचे खटके पण खूप उडायचे. आजीच्या दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे तिचे कधी-कधी घराकडे दुर्लक्ष( असे त्यांचे मत, हिचे नाही!) होत असे. ती रात्री जागून लिहिते, ते त्यांना मुळीच आवडत नसे. पण तिला रात्रीच्या शांततेतच लिखाण सुचायचे, त्याचं काय! तिच्याच शब्दात ,
“ झरझर यावे काव्यपंक्तींनी
एका मागूनी एक फिरूनी।
सुंदरशी मग माझी कविता
रसिक रंजन दावी जगता॥
आजी कामगार यूनियन मध्ये सक्रिय असल्यामुळे कामगारांची सभा भरवणे, भाषणं देणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे, इत्यादी व्याप तिने करू नये असे आजोबांना वाटायचे. पण ती मात्र मनापासून कुठली ही अपेक्षा न ठेवता ही कामं करायची . दुसऱ्याचं दुःख तिला पाहवत नव्हतं . जेवढं शक्य होईल मदत करावी असे तिला वाटे. आजोबांना पण हेच वाटायचं पण दोघांच्या कार्यपद्धतीत फरक होता . आणि आजी घराचा विचार नव्हती करत असे त्यांना वाटे. ऑफिस मध्ये पण ती बऱ्याच लोकांची मदत करायची . कोणाला कँटीन मध्ये काम लावून दे, स्वयंपाकाचे काम मिळवून दे, इत्यादी कामे बिना कुठल्या लोभ-लाभाच्या अपेक्षेने तिने केली आहेत. किल्लारीला झालेल्या भूकंपात ती प्रत्यक्ष मदतीला गेली होती. कवितेतून तिने पाहिलेली परिस्थिती तिने वर्णवली आहे :
मराठवाडयाच्या कुशीत वाढलेले
गाव किल्लारी नष्ट आज झाले
निसर्गाचा भयग्रस्त कोप झाला
आणि देशावर पडे क्रूर घाला ॥
अनेकांची घरकुले भग्न झाली
तरीही धारणी ही शांत न जाहली
सूर्य उदयाला , सूर्यास्त जणू झाला
दीन वस्त्यांचा पोळून जीव गेला ॥
ती देवभक्त होती। कुळाचार , रीतीभाती सांभाळणे तिला आवडायचे , मनापासून दान-धर्म करायला आवडायचे. तिने आणि आजोबांनी त्यांच्या गावातल्या ग्राम-देवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बरीच रक्कम खर्च केली होती. पुण्याच्या घराजवळच्या मंदिरातही दान-धर्म चाले.। पण काही बाबतीत आजी ची विचारसरणी “आधुनिक’ होती आणि आजोबांचे आणि तिचे याबाबतीत पटत नव्हते. आजोबांना सोवळं लागायचं. त्यांचं म्हणणं पडे की पूजा, दान धर्म आपण शास्त्रोक्त पद्धतीनेच केला पाहिजे. तिचे म्हणणे असे की ते नेहमीच शक्य आहे असे नाही. दोघे देवभक्त पण दोघांचे दृष्टीकोन वेग-वेगळे. तिला मासिक पाळीचे चार दिवस बाजूला बसणे पटत नव्हतं. दान-धर्म योग्य माणसाला करावे असे तिला वाटे. ज्यांच्याकडे आहे त्यांनाच देण्यात काय अर्थ आहे. तिला देव माणसातच दिसायचा.तिच्या एका कवितेत तिने लिहिले आहे :
जेथे जावे तेथे मजला
दिव्यत्वाची प्रचिती येते
आपोआप मम दृष्टी वळते
त्यांना पाहूनी मस्तक लवते.
फिरण्या जाता चार पावले
सज्जन दिसती जिकडे तिकडे
भेदभाव मी विसरूनी जाते
त्यांना पाहूनी मस्तक लवते॥
याच भावनेतून तिने घरी आलेल्या सर्व माणसांचे आवडीने केले. याबाबतीत मात्र आजोबा आणि तिचे विचार जुळत होते. घरी सामान पोचवणारा मजूर किंवा रिक्षावाला कधीच चहा/पाणी/अल्पोपहार घेतल्याशिवाय गेला नाही. दोघांनी खूप माणसं जोडली. गोवंडी मध्ये जिथे भाड्याने आधी राहत होते तिथे जवळच दोघांनी मिळून नंतर घर घेतले.
त्याकाळी हिंदीतून काम करणे सगळ्यांनाच जमत होते असे नाही. म्हणजे मुंबईत तेंव्हा हिंदी कमी बोलली जायची आणि कार्यालयीन काम हिंदीतून करणे सोपे नव्हते. पण आमच्या ‘मिसेसकाळे’बाई ते काम सुद्धा आवडीने करायच्या. त्यासाठी तिने बरीच कार्यालयीन बक्षिसे ही पटकावली होती. बॉस सोबत भांडणंही होत होती. समोर स्पष्ट बोलून द्यायची. मागून गॉसिप तिने कधी केले नाही.
‘आजी’ म्हणून तिने तसे लाड कमीच केले. बोलायची गोड. कौतुक करायची. तिच्या तोंडून‘सोनू गं, माझा सोनचाफा’ ऐकायला खूप आवडायचं. पण शिस्त कडक होती. मी भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे तिच्या प्रेमाबरोबर तिचा कडक स्वभाव ही जास्त अनुभवला आहे. पुण्यात शिकायला होते तेव्हा तिच्याकडे रहात होते. आईने जरी तिच्या स्वभावाची कल्पना आधी दिली असली आणि तिच्याच मुलीच्या हाताखाली वाढलेले असले तरी तिचा ओरडा खायचे. माझ्या मैत्रिणींना वाटायचं ही आजी-आजोबांजवळ राहते म्हणजे काय मज्जा आहे हिची. आता काय सांगू त्यांना!
लाड पुरवणे हा विभाग पूर्णपणे आजोबांकडे होता. चॉकलेट, बॉन-बॉनची बिस्किटे, खारी बिस्किटे, नाना प्रकारच्या गोळ्या आजोबा आणायचे. ती म्हणायची हे सगळं मुलांना नाही द्यायचं. मात्र लाडू बनवून देणे, भाकरी करणे, वरण-भात खाऊ घालणे तिला आवडायचं. तिला आमच्या वह्या पहायला आवडायचं. अक्षर चांगलं काढा असं सारखी म्हणायची. अभ्यासातल्या प्रगतीवर विशेष जोर द्यायची.म्हणूनच आम्हाला ती आजोबांपेक्षा खाष्ट वाटायची. आजोबा म्हणजे निःस्वार्थ अमर्याद प्रेम, आजी म्हणजे थोडं भीतीयुक्त प्रेम असं समीकरण होतं. तिने जर काही आणण्यासाठी पैसे दिले तर तिला पूर्ण हिशोब द्यायला लागायचा. बिना मागता हिशोब दिला की ती खुश. तसं नंतर ती जस-जशी म्हातारी होत गेली तिचा कडक शिस्तीचा स्वभाव थोडा मवाळ झाला. पुण्यात राहायला लागल्यावर बऱ्याच गोष्टी आता विकत आणलेल्या चालत होत्या. काही निवडक गोष्टीच घरात करत होती. बाकी बाहेरून आणायची. आता पैश्याच्या दृष्टीने तसे काही चिंतेचे कारण नव्हते. पगारापेक्षा पेन्शन जास्त अशी ही पिढी. आरामात जगत होती. कविता वाचन, पुण्यातील नवीन मैत्रिणी, नातेवाईक, नातवंडं चालूच होतं. कवितांचे प्रकाशन करायची इच्छा होती. प्रयत्नही सुरू केले होते. पण आजोबांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाल्यामुळे ती थोडी खचली. ते दोघे पुण्यात शिफ्ट होउन काहीच वर्षे झाली होती. मुंबईचे घर विकून पुण्यात स्थाईक झाले होते आणि आता एकदम आरामात जगायचं होतं. पण दैवाला ते मान्य नव्हतं. आजोबा गेल्यावर आजी कवितेत लिहिते :
किती प्रेमाने त्यांच्यासाठी
सुख दुखाच्या सोसूनी राशि
दिवस सुखाचे येतील म्हणूनी
निशिदिनी श्रमले वाट पाहूनी ॥
कष्टकष्टले ना विश्रांती
लगेच का हो ही चिरशांती
वैराग्याचे जिणे ऐसे
विरह दुख मी साहू कैसे ॥
यमराजा तव उलटी रिती
कशास असली दुष्टच नीती?
मनीं किती मी व्याकूळ! व्याकूळ!
जगण्याचे मग कोठून रे बळ ? ॥
आजोबा गेल्यावरही लिखाण, वाचन चालू होतेच. पण तिला आता एकटं-एकटं वाटायला लागलं होते. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग इत्यादी कामे ही चालूच होती. आमच्याकडे रहायला तिला नको वाटे. स्वतःच्या घरीच राहायचं होतं. तब्बेत उत्तम असल्यामुळे एकटं रहायला काही वाटत नव्हतं. मग तिने ते केलं जे तिला खूप दिवसांपासून करायचे होते. कुठे तरी काही कारणांमुळे ते तिला करायचे जमत नव्हते. कोणाच्या तरी ओळखीतून तिने एका मुलीला स्वतः कडे ठेवून घेतले. आम्हाला आश्चर्य वाटलं नव्हतं कारण आम्ही आजीला ओळखत होतो . पण आमचा त्या परक्या मुलीवर विश्वास नव्हता. तिने असे एकटच अनोळखी मुलीसोबत राहवे आम्हाला पटत नव्हतं. तिचे फक्त नाव कळले होते. मराठवाडयातील कुठल्या तरी गावातून एका मागासवर्गीय कुटुंबातून ती आली होती . घरी आई वडील नव्हते. ते तिच्या लहानपणीच वारले होते. एक लहान भाऊ होता आणि म्हातारे आजी-आजोबा होते ज्यांनी हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला पुण्याला पाठवायची तयारी दाखवली होती. महिन्याला थोडे-फार पैसे ठरवून आजीने तिला ठेवून घेतले. सुरवातीला सगळ्यांना वाटलं घरातली कामं आणि आजी चा सांभाळ करण्यासाठी 11 वर्षाच्या मुलीला ठेवले आहे . पण काही महिन्यातच तसं नव्हतं हे सगळ्यांना दिसून आले. आम्ही सुट्ट्यांमध्ये गेल्यावर आम्हाला थोडा मत्सर वाटायचा. आजीच्या नातवंडांमध्ये अजून एक भर पडल्यामुळे प्रेम आटले असे आम्हाला वाटणं साहजिक होतं. आता ही कोण नवीन असे झाले होते. पण तिचे आजीवर खूप प्रेम होतं. आम्हाला आजीच्या स्वभावाचा जो भाग खाष्ट वाटत होता त्याच भागावर तिचे प्रेम होते. आम्ही आजीवर चिडायचो, ती आम्हाला आजीची बाजू घेऊन समजवायची! आजीने तिला हळू-हळू घरकाम तर शिकवलेच पण बरोबरीने लिहिणे-वाचणे, पाढे, रोजचा हिशोब ठेवणे, कपडे शिवणे, हार करणे, बैंकेची कामे इत्यादी सगळं शिकवले. सुरुवातीला ती थोडी ‘स्लो’ होती. तिला ऐकायलाही कमी यायचे. नंतर ती इतकी स्मार्ट झाली की आजी तिचे फारच कौतुक करे. ती आता आमच्या घरातली सदस्य झाली होती. आजी सोबत ती सगळ्यांकडे जायची-यायची. हळू-हळू आम्हाला ही तिची सवय झाली आणि आता मत्सर न वाटता ती हवीहवीशी वाटायला लागली. आजी जबलपूरला आली की ती पण आमच्याकडे यायची आमच्याकडे ही सगळ्यांना तिचा लळा लागला होता. वर्षातून कधीतरी ती घरी गेल्याची मला आठवते पण आता ती तशी आजीची पूर्ण वेळ जोडीदार झाली होती. जवळ-जवळ 10 वर्षे ती आजी जवळ राहिली. आम्हाला सुरवातीला जी भीती वाटत होती ती पूर्णपणे चुकीची ठरली. आजीने तिचा वयात येण्यापासून लग्नाच्या वयापर्यंत सांभाळ केला. अर्थात कोणी कोणाचा सांभाळ केला हे सांगणे कठीण आहे. आज तिचे लग्न होउन ती सुखी संसार करत आहे.आजीनेच तिचे लग्न ही लावून दिले.
आज मला वाटतं आजी खऱ्या अर्थाने ‘आधुनिक’ होती. तिने हे दाखवून दिलं की माणूस कपड्यांनी नाही, राहणीमानाने नाही तर विचारांने ‘मॉडर्न’ असतो. फार शिकलेली नसूनही ती व्यावहारिक होती. सगळ्या बंधनात असून सुद्धा ती स्वतंत्र होती. साधारण असून असाधारण आयुष्य जगली. आपल्या आयुष्यातली 85 वर्षांत तू एकही दिवस वेळ वाया घालवला असशील असे मला वाटत नाही, आजी ! तू सगळ्यांना वाट दाखवली आणि स्वतः ही वेगळी वाट चाललीस. तुझ्यासारखी तूच!
तू गेल्यापासून तुझी खूप आठवण येते गं,आजी! तुझे शब्द आम्हाला चांगले जगण्याची प्रेरणा देत असतात.
चित्तवृत्ति मम पुलकित करीते
विवेकबुद्धि जागी होते
कर्तव्याची जाणीव देते
कानमंत्र मज देऊनी जाते
आणि अचानक मजला नेते ॥
एकच अद्भुत शक्ती येते…….
- आजीची नात
- सौ.समृद्धी मिलिंद पटवर्धन,
- samruddhipathak86@gmail.com