Categories
Uncategorized कविता

काटेरी

काट्यांची सवय झाली आहे मला

त्यांच्या रुतण्यातही सुख वाटतंय,

वाटेवर एखादं फुल असलं तरी,

मला त्या सुखाचं भय वाटतंय ll१ll

फुलांच्या गळण्याचं सावट

मनावर सदा मी बाळगलय,

शाश्वत काट्यांच्या आधारावर

म्हणूनच मन विसंबलय ll२ll

फुलांपासून अलीकडे मी

चार हात अंतर ठेवलंय

काट्यांमध्येच उमलण्यात

सुख मी शोधलय ll३ll

काट्यांच्या सहवासाने

मलाही काटेरी बनवलय,

फुलांसारखं नाजुक असण्यापेक्षा

काटेरी असणं मी पसंत केलंय ll४ll

काटेरी झाल्यावर

भीती नसते कुणी खरचाटण्याची,

फुलांना मात्र सदा भीती

कुणीतरी कुस्करण्याची ll५ll