Categories
माझा कट्टा

कारण आम्ही अस्वस्थ झालो-जीवित नदी भाग २

नदीशी आपले आणि आपल्या संस्कृतीचे खूप घट्ट नाते आहे. आजही बरेच ठिकाणी त्या त्या स्थानिक नद्यांसाठी वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. जसं गंगोत्सव, कृष्णामाईचा उत्सव, काहीजण तर नर्मदा परिक्रमा देखील करतात.  पेशवेकालीन पुण्यामध्ये एकेकाळी लकडी पूल ते मुळा -मुठा संगम या भागामध्ये १४ नदीकाठचे घाट होते. घाट होते म्हणजे नदीपाशी येणे जाणे होते हे अगदीच समजून येते. पेशवाईचा सोनेरी काळ या नद्यांनी आणि या घाटांनीं अनुभवला आहे. अगदी त्यानंतर देखील घाट आणि नदीशी लोकांचं हे नातं अगदी घट्ट होतं.

 १२ जुलै १९६१ हा दिवस अगदी पुणेकरांच्या लक्षात असणारा दिवस आहे. याच दिवशी पानशेत धरणं फुटलं आणि पुण्यात भयानक पूर आला. त्या पूरामध्ये बऱ्याच देवळांची आणि घाटांची हानी झाली. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणे याला प्राधान्य असल्याने घाटांची दुरुस्ती आणि त्यांचे जतन हि कामे थोडी मागे राहिली. त्यातच पूरामुळे वाहून आलेला राडारोडा आणि त्यातच लोकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली ,यामध्ये डासांची पैदास होऊ लागली. हळू हळू लोकांचेही  नदी काठी जाणं येणं बंद झालं. एक सुंदर नातं इथे दुरावले.

फोटो सौजन्य -जीवित नदी

हेच दुरावलेले सुंदर नाते पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित करण्याचे काम जीवित नदी ही संस्था करत आहे. एखाद्या जागेचे संवर्धन करायचे असेल तर त्या जागेचा भौगोलिक अभ्यास करणे हे खूप महत्वाचे असते.

 पुण्यातील पर्यावरण तज्ञ श्री. प्रकाश गोळे यांच्या इकॉलोजिकल सोसायटी तर्फे Sustainable Management of Natural Resources & Nature Conservation  असा अभ्यासक्रम घेतला जातो. त्यामुळेच बऱ्याच गोष्टींचा ज्ञान झाले आणि काही मंडळींनी एकत्र येऊन जीवितनदी हि स्वयंसेवी संस्था सुरु केली. ही संस्था सुरु करण्यासाठी सम विचारांची,नदी साठी मनापासून ज्यांना तळमळ आहे  अश्या लोकांनी एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं होतं. श्री.प्रकाश गोळे सरांनी १९८२ मध्ये नदी संवर्धनावर तयार केलेल्या आणि पुणे महानगरपालिकेला सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करायचा आणि त्यावरून सद्य स्थितीमध्ये जे काही आवश्यक बदल आहेत ते करून, नवीन तयार केलेल्या आराखड्यासाठी नदीचे सर्वेक्षण करायचे असे ठरले. काम  करत असताना असे लक्षात आले की लोकांच्या सहभाग असेल तर लोक भावनिक रित्या त्या गोष्टीशी एका वेगळ्याच नात्याने जोडले जातात. अभ्यास करताना प्रत्यक्ष नदी परिसराचा आढावा घेऊन तेथील स्थानिक लोकांशी बोलून चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे देखील गरजेचे होते. हाती घेतलेले प्रकल्प आणि योजना या लोकांचा सहभाग असल्याने लवकर यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतात. जसं जशी कामाला सुरुवात झाली तसे लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली. त्यातून  एक गोष्ट समजली ती म्हणजे प्रत्येकाला नदीसाठी काहीतरी करायचं होतं पण नक्की काय करायचं आणि ते कसं ? हे कळतं नव्हतं. सर्व लोकांसाठी म्हणून “दत्तक घेऊया नदी किनारा “हा एक प्रकल्प सुरू झाला. आता जीवित नदीसाठी काम करणारे बरेच जण शनिवार आणि रविवार वेळ काढून, या प्रकल्पासाठी हातभार लावतात. कधी काळी नदीशी असलेलं नातं परत एकदा पुन्हा नव्यानं तयार करणं हेच या संस्थेचं ध्येय. लोकांचा नदीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हीच अपेक्षा. पुण्यातील मुळा -मुठा या नद्यांवर मुख्यतः ही संस्था काम करते. या संस्थेमध्ये आधी काहीच सभासद होते हळू हळू लोकांना माहित होत गेले आणि अनेक माणसं  जोडली गेली.

विठ्ठलवाडी येथील मुठा नदीचा किनारा  

ओंकारेश्वर मंदिर येथील मुठा नदीचा  किनारा 

एस्  .एम् . जोशी पूल येथील मुठा नदीचा  किनारा 

औंध येथील मुळा  नदीचा किनारा

औंध येथील मुळा आणि राम नदी संगम इथला  किनारा या भागांमध्ये जीवितनदी या संस्थेने काम केले आहे. 

सगळ्यात आधी म्हणजे हे कार्यकर्ते स्वतःची नोकरी,व्यवसाय हे सर्व सांभाळून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जीवितनदीसाठी काम करतात. नदीचा एक किनारा दत्तक घ्यायचा आणि त्या भागाचे चांगल्या रीतीने, योग्य पद्धतीने, काळजीपूर्वक संवर्धन करायचं. पर्यावरण संवर्धन करताना त्यासाठी सामान्य लोकांना पर्यावरणाच्या जवळ घेऊन जाणे हे देखील काम ही संस्था करत आहे. आता हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल हे तर अगदीच सोप्पं काम आहे पण तसं नाहीये बरं .. नदीसाठी काम करायचं म्हणजे तेवढं सोप्पं नाही. एखाद्या जागेचे संवर्धन करायचे असेल तर त्या जागेचा भौगोलिक अभ्यास करणे हे खूप महत्वाचे असते. नदीकाठचा अभ्यास करण्यासाठी ती जागा स्वच्छ करणे हे ओघाने आलेच. आज आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 

नदीचा किनारा स्वच्छ करणे – 

नदी किनाऱ्यावर  बऱ्याच प्रकारचा कचरा दिसून येतो. त्याला घन कचरा(solid waste )असे म्हणतात. हा कचरा सर्वप्रथम कसा येतो? याचा विचार करू. काही कचरा हा नदी किनाऱ्यावर पुराबरोबर वाहून येतो. काही कचरा तिथल्याच जलवाहिनीत असतो, तर काही कचरा हा आपणचं  टाकला असतो. बरं  या कचऱ्यामध्ये काय काय असतं  याचा विचार केला तर तुम्ही चक्रावून जालं. त्यामध्ये काचेच्या बाटल्या असतात, कापसाच्या उश्या, गाद्यादेखील असतात. त्याचबरोबर प्लॅस्टिक तर असतेच. शिवाय सॅनिटरी वेस्ट या मध्ये जो कचरा येतो तोदेखील असतो. घरातील नको असलेल्या काही शोभेच्या वस्तू, थर्मोकॉलचे तुकडे आणि असाच बराच प्रकारचा कचरा त्यामध्ये असतो. आता हा कचरा गोळा करायचा म्हणजे खरंतर तसं अवघडचं  काम आहे नाही का? 

फोटो सौजन्य -जीवित नदी

Hand-gloves ,shoes घालून आणि डासांपासून संरक्षण व्हावे म्हणून योग्य ती काळजी घेतं. कुठे चिखलात पाय रुतलेला काढत.. योग्य त्या हत्यारांचा उपयोग करत .. मध्येच कुठेतरी बेडूक किंवा साप, नाग यांच्या पासून स्वतःचा बचाव करत हे सगळे कार्यकर्ते  हा सगळा कचरा गोळा करतात. 

हा कचरा कुठल्या प्रकारचा आहे याची नोंद ठेवण्यात येते. मग जो कचरा पुनर्वापर करण्यायोग्य नसेल तर तो महानगर पालिकेला पाठविण्यात येतो. जो कचरा ज्या मध्ये अखंड  काचेच्या बाटल्या असतील त्या स्क्रॅप च्या दुकानांमध्ये दिल्या जातात.

आताशी कुठे किनाऱ्यावरचा कचरा साफ केलाय अजून भरपूर काम बाकी आहे. आता यापुढे काय? अशी उत्सुकता तुम्हालाही वाटतं असेल ना …भेटुया पुढच्या भागात.. (क्रमशः)

या लेखाविषयी तुम्ही अधिक माहिती कारण आम्ही अस्वस्थ झालो- जीवित नदी भाग १ आणि भाग ३ मध्ये वाचू शकता.

अमृता गाडगीळ-गोखले

By अमृता गाडगीळ-गोखले

नमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.