Categories
कविता

वसुंधरा : एक चिंतन

59

२१ व्या शतकाच्या प्रारंभी, पृथ्वी सूर्याला म्हणाली

तुझ्या माझ्या दरम्यान, एक सनातन नाते आहे !

वसुंधरा : एक चिंतन

त्या नात्याला सृजनाचा, सुंदर आविष्कार आहे

म्हणूनच तुझ्या कक्षे भोवती फिरता -फिरता …

मी स्वतः चे गोलाकार विश्व तयार केले

त्यातच मी भान हरपून रममाण झाले.

मी स्वतःभोवती फिरत असताना, एक रमणीय विश्व तयार केले !

सुंदर पर्वतरांगा – डोंगर दऱ्या, समुद्र नद्या, पशु पक्षी, हवा -पाणी, अग्नी आणिक इतर बरेच काही..

सर्वात महत्वाचा माझा लाडका पुत्र ‘मानव’

मातेच्या वात्सल्याने त्याच्या गरजा भागविण्यात रममाण होत राहिले मी …

शतकं गेली, युगे लोटली हे सारं करत, गोलाकार फिरता -फिरता ,

माझी काया हि थकली !

माझ्या लाडक्या सुपुत्राची कर्तबगारी,

उंच -उंच इमारती, कारखाने, चांद्रमोहीम, अवकाश मोहीम, हे उभारण्यातच दमले !

पण भास्करा …

मातेलाच ओरबाडून, घणाचे घाव घालून, भौतिक सुखाची लयलूट करणाऱ्या या नादान महत्वाकांक्षी

पुत्राला मी उबगले आहे! म्हणून प्रार्थना करते …

हे आदित्या,

तुझ्या माझ्यातील सनातन नात्याला निरोप देऊया,

सृजनाचा मोहक अविष्कार कदाचित थांबेल हि !

मग ….तुझ्या आणि माझ्या नात्याला नवीन धुमारे फुटतील काय ??