Categories
कविता

कोकणचं माझो स्वर्ग

चाकरमान्यांचो निरोप घेत सुटता माझ्या कोकणाची राणी,
डोंगरातून वाट काढत येता दाखवता हयल्या निसर्गाच्या सौंदर्याचे खाणी.

हापूसचो आंबो आसा माझ्या कोकणाचो राजा,
परदेशातसुद्धा त्येचोच आसा गाजावाजा. 

अमृताहून गोड लागता  हयल्या नारळाचा पाणी, 
म्हणान काय असता हयल्या माणसाची गोड  वाणी. 

पावसाची मजा वाढयतत हयले चुलीत भाजलेले काजी, 
हयल्या न्याहारीकसुद्धा असता परसातली ताजी भाजी. 

हयली वडे सागोती आणि माश्याची कडी तर लय भारी, 
म्हणून जो तो करता महिन्यातून एकदा तरी कोकणाची वारी. 

दशावतारी बनता  हयल्या जत्रेचो राजा, 
सगळीकडे फेमस हा हयलो गुळाचो खाजा. 

चतुर्थीक येता हय लय भारी मजा, 
हयल्या प्रत्येक घरात बसता गणपती राजा. 

दिवाळी असो वा दसरो हयले गाडये चाकरमान्यांनी नेहमी फुल्ल, 
जो तो म्हणता काय ह्या कोकणातल्या लोकांका गावाक जावचा खुळ. 

हयली माणसा तर फणसातल्या गऱ्यासारखी गोड, 
नाय ह्यांच्या प्रेमाक कशाची तोड.

माझी कोकणी माणसा पाहुणचारात नंबर वन, 
कारण हयल्या समुद्राइतक्या मोठा हा त्यांचा मन. 

माझ्या कोकणातली माणसा आसत देवभोळी साधी, 
पण कोणाची हिम्मत नाय होवची लागाची ह्यांच्या नादी. 

हय लागलो हा मन मोहून टाकणारो समुद्राचो किनारो, 
त्याका भेट दिल्याशिवाय नाय जाना हयसून जानारो येणारो. 

माझो कोकण ताठ मानेन उभो हा इली जरी संकटा लाखो, 
कारण सह्याद्री हा माझ्या कोकणाचो पाठीराखो. 

हयल्या समुद्रात उभो हा शिवाजी महाराजांनी बांधलेलो दुर्ग, 
माझ्यासाठी तर कोकणचं माझो स्वर्ग ! 

Categories
कविता

विरह

विरहाचं दुःख काय असतं ते त्या नभाला विचारा,
कारण स्वतःची सावली त्या सागरावर पडून देखील तो सागराला भेटू शकत नाही…
आणि सरतेशेवटी त्या देवाला सुद्धा त्यावर दया येत असावी,
म्हणूनच तो एक कल्पनात्मक रेष निर्माण करतो.
आपण त्याला ‘क्षितिज’ या नावाने ओळखतो…
विरह म्हणजे विरस आणि दुरावा यांच मिलन,
की फक्तचं प्रेमाने रुसून फुगून बसलेली माणसं
हे दुःख मात्र प्रत्येक हृदयाला कधी ना कधी वेडं करतं एवढं मात्र खरं.
आणि मग पश्चात्ताप असतो तो, की ती माणसं आपल्या आयुष्यात आलीच का…
जर दुरावा नियतीत होता,
तर का बरं ही जवळीक मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात अजून जिवंत होती…
तेव्हा मात्र नशिबाचं गणित चुकल्याचा भास होतो,
आणि मन मात्र अजूनही हट्ट करत असतं, की हा विरह कधी संपेल का…
मनाला फार हुरहुर होती कारण वेळ कमी होता.
कदाचित विरहाच्या भीतीमुळे कायमचा दुरावा येणार नाही ना,
शेवटी त्या मनाने आस सोडली…
कारण नात्यांना गमावणे लहानपणीच अनुभवलेले आपण सगळेच…
पण हो, कोणावाचून कोणाचं अडत नाही हे जितकं खरं असलं तरी
भावना मनातून पुसून काढणं निव्वळ अशक्य…
असा आहे हा विरह जिथे दुःख आणि खेद तर आहेच.
पण त्या सोबत एक ओली जाणीव आहे मनाच्या कोपऱ्यात जी जगणं शिकवते…

snappygoat.com

Categories
काही आठवणीतले

पत्र ते ई-मेल पर्यंतचा प्रवास

परवा रस्त्यावरुन चालत येताना ती दिसली, एका कोपऱ्यावर उभी होती. कुणीतरी आपल्याकडे बघेल असे तिला वाटत असेल. तेवढ्यात माझ्या मुलीने विचारले, “आई, ते तिकडे तो लाल रंगाचा डब्बा उभा केलाय ना? ते काय आहे?” मी म्हणलं “तो डब्बा नाही, पोस्ट पेटी आहे ती!” तशी माझी मुलगी जरा गोंधळली…आई, मोबाईलवर जे येतात, ते पोस्ट ना? ते पेटीतून कसे येतील? ते तर मोबाईलवर येतात. पेटीतून तर सा रे ग म प असे सूर येतात, पण ती पेटी अशी नसते”. आता “पोस्ट आणि पेटी” या शब्दातून तिला दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतील हे मला तरी कुठे ठाऊक होते. म्हणलं थांब गोंधळ घालू नकोस. पेटी म्हणजे हार्मोनियम, मोबाईल वर येते ती पोस्ट, पण त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. ही आहे पत्र पेटी म्हणजे पोस्ट बॉक्स.

पोस्ट पेटी.
ठिकाण-मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक.
फोटो क्रेडिट- अजय काणे,विरार.

आम्ही लहान असताना, या पोस्टपेटीचा खूप उपयोग असायचा, त्यावेळी घरोघरी फोन नसायचे, अगदीचं घाई गडबडीत काही निरोप द्यायचा असेल तरच फोन करायचा. जरा निवांत वेळ असेल आणि खूप काही सांगायचं असेल तर मग मात्र पत्रं लिहायचे. पोस्टमन काका त्या त्या घरी जाऊन पत्रं देऊन यायचे. कसे दिसतात पोस्टमनकाका? तिने मला विचारलं. मी म्हणलं त्यांनी खाकीड्रेस घातला असतो, सायकल आणि तिच्यावर मोट्ठीशी खाकी पिशवी आणि त्यात असंख्य पत्र, डोक्यावर टोपी असते. कानावर एक पेन लावलं असतं. बाहेरूनच ओरडतात, पत्रं घ्या! आता  सगळेजण ई-मेल  पाठवतात नाहीतर फोन, मेसेजेस करतात. विडिओ कॉल, ऑडिओ कॉल हे आलचं त्यात! खरंच आहे ना? आताच्या  पिढीमध्ये खूप कमी मुलांना पोस्टमन काका माहीत असतील. जग किती झपाट्याने बदलतयं.

आधी कसं, पोस्टमन काकांची वाट बघावी लागत असे. मग पत्र आलं रे आलं, ते कोणाचं? कोणासाठी? कश्यासाठी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोण वाचणार? ह्या साठी अगदी चढाओढ असे. त्यातसुद्धा कोणाबद्दल काय लिहिले आहे आणि काय विचारले आहे यासाठी उत्कंठा शिघेला पोहोचायची. मग सगळ्यांनी एकत्र बसून आलेल्या नातेवाईकांचे पत्र कान देऊन नीट ऐकायचे. मग त्याला उत्तर म्हणून परत पत्र लिहायचे. प्रत्येकाच्या हस्ताक्षरातील एक ओळ तरी नक्की असणार. एक ओळ लिहिली तरी आपण पत्र लिहिल्याचं सुख त्या एका ओळींमध्ये मिळायचे.

आज असं वाटत की, किती गुपितं त्या पोस्टाच्या पेटीला माहीत असतील नाही का? कुठल्या सासुरवाशीण मुलीचं क्षेमकुशल तिने वाचले असेल, तर कधी सासरी त्या मुलीला कसा त्रास होतोय? हे देखील तिला समजले असेल. आर्मी मध्ये भरती होणाऱ्या इच्छूक तरुणाची, ते भरती होण्यासाठी येणार पत्र, म्हणजे आनंदाची खबरच जणू. तर एकीकडे “मुलगी आम्हास पसंत आहे”! हे निरोप देखील या पोस्ट पेटीने इच्छित स्थळी पोहचवले असतील. गावातल्या गावात कितीतरी जणांचे प्रेमपत्र तिने हळूच वाचली असतील! त्यातल्या किती जणांचे प्रेम विवाह झाले, याचा खात्रीशीर ताळेबंद तोही या पोस्टपेटीलाच माहीत. लग्नाचे आमंत्रण किंवा अमुक अमुक स्वर्गवासी झाल्याचे निरोपही हिनेच आपल्याला कळवले एवढे वर्ष. नकळत का होईना माणसांच्या भाव-भावना त्या पत्रांशी, पोस्टपेटीशी आणि पोस्टमन काकांशी जोडलेल्या होत्या. पुढे काही वर्षांनी  संगणक आले आणि घराच्या पत्त्याची जागा email id ने घेतली.

आधी कसं असायचं, घराचा पत्ता हा पिनकोड सकट पाठ असायचा, अगदी छोट्या छोट्या खुणांसह, म्हणजे अमुक एक दुकान, तमुकं  एक सायकल मार्ट, पानवाल्याची टपरी असं काहीसं. आता फक्त ईमेल आयडी फीड असतो आणि मोबाईल नंबर. पत्राची सुरुवात करताना…

तीर्थरूप आजोबांना/आजीला, अथवा तीर्थरूप बाबांना/आईस,

शि.सा.न.वि.वि म्हणजेच शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष असे लिहायचे पद्धत असे.

आपल्या बरोबरीचे असल्यास स. न. वि. वि. अर्थात सप्रेम नमस्कार विनंती विशेष असे लिहायचे. पत्राच्या मध्येच आमची ठकी काय म्हणते? बंडू त्रास तर देत नाही ना? या अश्या आशयाचे प्रश्नही असतं.

मनुला माझा गोड-गोड पापा! हे सांगायला कुठलीच मावशी कधी विसरली नसेल. मो. न. ल. आ. म्हणजे (मोठ्यांना नमस्कार, लहानांस आशिर्वाद) यानेच पत्राचा शेवट होत असे. पण आता मात्र कसं असतं, सोशल मीडिया वर सगळेच ऍक्टिव्ह  असतात. कोण ऑनलाईन आहे हेही लगेच कळतं. काही काम असेल तर ती कामंही लवकर होतात. Hey! Hi! Hello! ने सुरुवात होते Good Night, Take Care ने शेवट होतो. सोबतीला OMG, Wow, Sad असे expression दाखवणारे Emoji सुद्धा असतात. आपला आज्ञाधारक आपला विश्वासू याची जागा Thanks & Regards यांनी घेतली.

मला बरेचदा असं वाटतं पत्र लेखन म्हणजे मनातल्या भाव भावनांना करून दिलेली एक वाट असते. आपलं प्रेम, राग, काळजी, कुणाशी केलेली सल्ला-मसलत, तर काही औपचारिक पत्रं. पत्रं लेखनामुळे भाषा शुद्ध होण्यास मदत होत असे. नकळत का होईना शुद्धलेखनाचा सराव होत असे. आता ई-मेलची सोय असल्यामुळे आपल्याला कुणाचा ई-मेल वाचायचा आहे अथवा नाही हे आपल्याला ठरवता येतं. कुणाशी chat करायचे नसेल तर सहज तिकडून गायब होण्याचीही सोय उपलब्ध आहे. Technically खूप  पुढे गेलो आहोत सगळे पण मनानी एकमेकांच्या किती जवळ आहोत ते कुणालाच माहीत नाही. वाचून झालेली पत्रं आणि पावत्या एका तारेला अडकवून ठेवायची पद्धत होती तेव्हा! ती तार वर्षातून एकदा काढून त्यातील नको असलेल्या पावत्या टाकून दिल्या जातं, पण त्यातून नातेवाईकांची आलेली पत्रं कधी टाकून दिलेली मला आठवत नाही. त्या एवढयाश्या तारेमध्ये कितीतरी जणांचे आशिर्वाद असायचे. कुणीतरी केलेल्या प्रेमळ तक्रारी, त्यांच्या मुलांनी केलेली शैक्षणिक प्रगती यांचा आढावाचं असायचा. आता काय सगळचं इन्स्टंट, खाण्यापासून ते प्रेमापर्यंत, सगळं एका click वर! नाविन्याचा स्वीकार करताना, जुनं आहे ते मागे टाका असं कुणीचं सांगितलं नव्हतं. आपण मात्र नेमकं तेच केलं.

बघा तुमच्याही घरात असतील अशी कुठलीतरी पत्रं,  ती पत्रं परत एकदा नव्याने वाचा, कदाचित काही वर्षांखाली त्यातल्या  ज्या गोष्टी तुमच्या मनाला पटल्या नसतील, त्या कदाचित आज पटतीलं! बरेच न उलगडलेले अर्थ आज कळतील.

खरंतर आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पत्रापासून  ते ई-मेल पर्यंतचा हा प्रवास केला. आधी कित्येक किलोमीटर दूर राहणारी आपली माणसं, पत्रं लिहिताना खूप जवळची वाटायची. आता मात्र सगळेच एका click वर available असून सुद्धा खूप दूरचे वाटतात, किती हा विरोधाभास! बघा आज प्रयत्न करून कदाचित पत्रं लिहून या प्रवासामध्ये खूप मागे राहिलेली, रस्ता विसरलेली, ओळख विसरलेली माणसं कदाचित पुन्हा भेटतील आणि काय सांगावे change म्हणून का होईना तुम्ही तुमच्या काका मामा भाचा भाच्चीला पत्र लिहून त्या पोस्टपेटीत टाकालही!