Categories
प्रवास

पुणे मुंबई पुणे

एक्सप्रेस प्रवास, वातानुकूलित, स्लीपर आणि तिकीट नसेल मिळालं तर जनरल, काही जण विनातिकीट, हो……अर्थात मी बोलतोय ते रेल्वे प्रवासाबद्दल.

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच गाड्यांना पुणे ते लोणावळा मधल्या स्टेशनची इतकी ऍलर्जी आहे की त्या कधी चुकूनही सिग्नलला म्हणून थांबत नाहीत, त्यामुळे पिंपरी चिंचवड आकुर्डी पासून ते लोणावळा पर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाचा योग मिळतो, या प्रवासात खासगी व सरकारी चाकरमानी, भाजीवाले, शेतकरी, अनपेक्षित आणि अपेक्षितपणे येणारे नातेवाईक, दूधवाले ही मंडळी…

या प्रवासात बरेचदा रोज भेटणारी मंडळी असल्याने त्यांचे अनेक छोटे छोटे ग्रुप असतात, भेटल्यावर नमस्कार! राम राम! होतातच आणि गप्पांमध्ये, मार्केटमद्धे नवीन आलेल्या फोनपासून गावाकडच्या भाच्याला नोकरीचा वशीला, असे वेगवेगळे अनेक विषय येतात, लोणावळा आला की लोणावळ्याला जाणारी मंडळी लोणावळा उतरतात, आणि मुंबईला जाणारी जागा मिळेल तशी बाकड्यांवर किंवा उभ्याने एक्सप्रेसच स्वागत करण्यास तयार असतात, कोणी सकाळचं ८ वाजताच ऊन खात असत तर काहीजण फलाटावर सकाळचा मॉर्निंग वॉक किंवा व्यायामही करून घेतात, कुठे इंजिन जोडणी – काढणीची काम चालू असतात, इंजिनचे – प्रवाश्याचे आवाज असतात, मग अचानक वडा -इडलीवाले, वडापाववाले आणि प्रवाश्याचे आवाज, गाडी आली रे! अशी ओरड चालू होते, सर्व प्रवासी अलर्ट होऊन ते बोगीच्या एका उघड्या दरवाज्यामधून गाडी सुटायच्या वेळेआधी आत जायची आणि रिकाम्या जागा पकडायची कसरत चालू होते, त्यात रोजच्या ओळखी कामात येतात, तर कधी रोजचा प्रवास करणारा मित्र किंवा नातेवाईकही उपयोगी पडून जातो.

यात तुम्ही किती सोशल आहात यावर तुमचा प्रवास सुखकर का खडतर डिपेंड असतो, यातच जागा पकडणार्या माणसाच्या मनात तुमचे स्थान कितवे हे देखील कधी कधी समजून जाते, पण इथे जुगाडू माणसांची नेहमीच चलती असते. बसणारे प्रवासी आणि उभे प्रवासी यांचं सिलेक्शन झाल्यावर जनता थोडी स्थिरस्थावर होते.

मग गाडी हलली की डेलीवाल्याचे जेवन्याच डब्बे उघडतात, अमुक अमुक “साहेब या जेवायला …” अशी आग्रहाची आमंत्रणही कानावर पडतात, त्यानंतर डबे उघडतात, आणि सर्व काकूंनी पहाटे पहाटे केलेल्या स्वयंपाकाचा सुगंध दरवळतो, डबे शेअरिंग झाल्यावर स्वीट बाहेर निघते, हे सर्व बघून tempt झालेली लोक उडीद वडा आणि इडली वर आपली भूक भागवतात, वर्तमानपत्रांची अदलाबदल होते. काहीजण रात्रीची झालेली जागरण भरून काढण्याच्या कामी लागतात, त्यात काही जणांना सूर सापडतो, तो कल्याणचा सिग्नल लागोस्तोपर्यंत तसाच! त्यात काहीजण फुगवलेली उशी किंवा फुगवायची कॉलर वापरतात तर काहीजण शेजारच्यांचा खांदा! सीटवर जागा पकडण्यासाठी ठेवलेले पेपर किंवा बस्कर असतातच!

travel tales from a mumbai -pune express train

यात अनेकजण वेगवेगळ्या पोसिशनमद्धे असते, कोणी आख्या सीटावर पूर्ण पहुडलेले असते तर काहीजण पोटात पाय घेऊन झोपतात, तर कोणी सामान ठेवायच्या जागेवर झोप काढतात. यात काही जणांची प्रवचने चालू होतात तर काही ठिकाणी गप्पा चालू होतात, काही ठिकाणी माहितीची आदानप्रदान होते, कधीकधी यातूनच चांगले सोर्सही सापडुन जातात.

लोकतर सर्व निराळीच असतात, कुणी शांत कुणी खूप अशांत! घरी गृहलक्ष्मी बोलू देत नाही म्हणून संपूर्ण प्रवासात त्यांची टकळी नॉनस्टॉप चालू असते, तर काही घरी नाहीतर नाही इथे तरी शांतता मिळावी म्हणून एखादे पुस्तक काढून वाचत बसतात. विचित्र किंवा विशेष केशरचना असलेली व्यक्ती म्हणून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. डोक्यावर लावलेला टिळा, जाड काड्यांचा चष्मा, रोज लावलेले हेडफोन, घातलेलं सोनं, कृश- स्थूल देहयष्टी प्रत्येक माणसाचे वेगळे कॅरेक्टर बनवत असते.

विशेष म्हणजे जागेसाठी जागेजागेवर भांडणारी ही लोकं दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री, वाढदिवस, सेंन्डऑफ खूप छानपणे साजरा करतात.आपल्या आजूबाजूला कचरा नको, म्हणून अनेकांना कचरा खिडकीबाहेर टाकण्याची सवय असते, पण हे न करता, ते एक कौतुक काम करतात ते कचरा व्यवस्थापनाचे! प्यायलेल्या चहा कॉफीचे कप, इडली वड्याचे बाउल चमचे खिडकी बाहेर न टाकता ही लोकं कचरापेटीत टाकतात, तर आळशी मंडळी सीटाखाली ठेवतात, पण यामुळे पुणे ते मुंबई मध्ये निसर्गाची हानी आणि निसर्गाचा कचरा न होण्यास खारीचा वाटा यांच्याकडून होतो, तेंव्हा सर्वांनीच हीच सवय अंगीकारून खिडकीबाहेर कचरा टाकणे टाळले पाहिजे.