Categories
संस्कार

योगिनी भिल्लीण शबरी

श्रीरामांना व लक्ष्मणांना उष्टी बोरं प्रेमाने आणि आदराने खाऊ घातली. ती शबरी तुम्हाला ठाऊक असेलच. हो ना!  पण ही शबरी कोण होती. चला तर मग तिचीच सर्वांना न माहीत असलेली गोष्ट.

शबर राजाची कन्या शबरी. भिल्ल समाजाचे मुख्य म्हणजेच शबर राजा, आपल्या कुटुंबा बरोबर जंगलात राहत असतो. एके दिवशी शबरीचे बाबा घरी छोटंसं बोकड घेऊन येतात. थोड्याच दिवसात शबरीची आणि बोकडाची एकदम घट्ट मैत्री जमते. आठ-दहा वर्षांची शबरी त्या बोकडा बरोबर छान रमत असते. त्याच्या बरोबर खेळत असते, त्याचं सर्व प्रेमाने करत असते. दोघांनाही एकमेकांचा लळा लागलेला असतो. लहानश्या शबरीचे तिच्या वडिलांनी लग्न ठरवलेले असते. काही दिवसांनी तिच्या आईकडून तिला कळले की, तुझ्या लग्नात या बोकडाचा बळी द्यायचा आहे. त्यासाठी ते बोकड येथे आणलेले आहे. एवढ्याश्या शबरीचा जीव कळवळला. ती धावत आपल्या वडिलांकडे गेली त्यांना विनवणी करू लागली. ती वडिलांना म्हणाली “असे करू नका. माझ्या लग्नात या मुक्या जनावराला मारू नका.” पण छे वडील काही ऐकायलाच तयार नाहीत. हा तर भिल्लांच्या  प्रतिष्ठेचा प्रश्न. मीच भिल्लांचा प्रमुख, मीच नियम कसे मोडणार असा त्यांचा समज.

शबरीला तर, इकडे आड तिकडे विहीर. काय करायचं? त्या चिमुकलीने खुप विचार केला. तिच्या मनात आलं की, जर आपलं लग्नच झालं नाही तर, हे बोकड काही कापले जाणार नाही. त्या क्षणी रात्रीच्या वेळी ती लगेचच घरातून निघून गेली. भिल्लींणच ती त्यामुळे जंगलातील रस्ते तिला खडान्खडा माहीत होते. रस्ता माहित होता पण कुठे जायचं ते माहीत नव्हतं.

चालत चालत ती मातंग ऋषींच्या आश्रमात पोहोचली. तिची सर्व कथा तिने मातंग ऋषींना सांगितली. तिच्यात असलेली करुणा मातंग ऋषींनी ओळखली. त्यांनी शबरीला त्यांच्या आश्रमात राहायचे स्थान दिले. नुसती ती तिथे राहिली नाही तर, मातंग ऋषींनी तिला ज्ञानसंपन्न केले. त्यांनी दिलेल्या योग सामर्थ्याने तिच्यात परिपूर्णता आली. खऱ्या अर्थाने ती योगिनी झाली. मातंग ऋषींनी तिला प्रभू श्रीरामांचे तुझ्याकडे येणे होईल असे सांगितले होते . त्यानंतर शबरी रोज न चुकता नित्यनियमाने आपली झोपडी झाडून व पुसून स्वच्छ ठेवीत असे. आपल्या मातंग ऋषींच्या वचनाप्रमाणे प्रभू रामचंद्र कधीतरी आपल्याला भेटावयास येतील. या एका आशेवर तिने आपलं जीवन व्यतीत केलं. असे शबरीने अनेक वर्षे करीत होती .

पुढे वयोवृद्ध झाल्यावर ती श्रीरामांना भेटली. ती नुसती अज्ञानी भिल्लींण म्हणून नाही, तर एक योगिनी म्हणून! नुसती उष्टी बोरं तिने श्रीरामांना दिली नाहीत तर…

कंद मूल फल सुरस अति दिए राम कहुँ आनि ।

प्रेम सहित प्रभू खाए बारंबार बखानि ।।३४।।

(तुलसीदास विरचित, श्रीरामचरित्रमानस, अरण्यकाण्ड, श्लोक चौतिसावा.)

तिने अत्यंत रसाळ आणि स्वादिष्ट कंद, मूल, फळे आणून श्रीरामांना दिली. प्रभूंनी वारंवार प्रशंसा करीत ती प्रेमाने खाल्ली.।।३४।।

त्यानंतर तिनेच श्रीरामांना आणि लक्ष्मणाला पंपा सरोवरास जाण्यास सांगितले.( पंपा सरोवर म्हणजे आत्ताचे हम्पी. त्याच्याजवळ कोप्पल जिल्हा आहे, राज्य कर्नाटक तिथे हे सरोवर आहे.) हे सर्व सांगून तिने श्रीरामांचे मुखदर्शन करून त्यांचे चरणकमल हृदयात धारण केले आणि योगअग्नी ने देहत्याग( स्वतःच्या योगसामर्थ्याने अग्नी निर्माण करून देह अग्नीला समर्पित केला.) केला.

Baby photo created by freepik – www.freepik.com