Categories
काही आठवणीतले माझा कट्टा

माझा शालेय अनुभव

नमस्कार मंडळी! आज तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजे नक्कीच तुम्ही साक्षर आहात. म्हणजेच तुम्ही लहान असताना शाळेतही गेला आहात. मी पण! विनोदाचा भाग सोडला तर शाळा हा नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि शाळेच्या कुठल्या न कुठल्या वर्षात आपण केशवकुमारांच्या ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही,जसा माऊली बाळा!’ या ओळींचा अनुभव नक्की घेतलेला असतो. म्हणूनच की काय पण आजकाल खूप शाळांची रियूनियन्स होताना आपल्याला बघायला मिळतात.

        पण आपल्याला शाळेबद्दल हे इतकं प्रेम, आपुलकी का बरं वाटते असा विचार त्यादिवशी सहज माझ्या मनाला चाटून गेला. हे प्रेम नक्की कशाबद्दल/कुणाबद्दल असतं? शाळेच्या इमारतीबद्दल? शाळेच्या संस्कृतीबद्दल? तिथल्या शिक्षकांबद्दल? की तिथे आपण मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या मजेच्या आठवणींबद्दल? की मित्रमैत्रिणींबद्दल? पण मला काही या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही पण प्रश्न काही डोक्यातून गेला नाही.

माझा शालेय अनुभव

माझा शालेय अनुभव

        त्यासुमारास मी एका शाळेच्या प्राथमिक विभागाची ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. खरं सांगायचं तर मी घेतलेल्या शिक्षणाचा तिथे काही फारसा उपयोग होत नसल्यामुळे मला त्या नोकरीचा नाही म्हटलं तरी कंटाळाच आला होता. आदल्या दिवशी पडलेल्या प्रश्नाचा विचार करत करतंच मी दुसर्‍या दिवशी शाळेत गेले आणि काय आश्चर्य! मला पहिल्यांदा तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये मला माझे सहविद्यार्थी दिसू लागले. कुणी शांत, कुणी खोडकर, कुणी अभ्यासू, तर कुणी क्रीडापटू! एक शिक्षिका म्हणून मला ही सगळी मुलं इतकी जवळची वाटायला लागली. प्राथमिक शाळा असल्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीची मुलं माझ्या संपर्कात अधिक येत असत. त्यांचं तर त्यांच्या शिक्षकांवर इतकं प्रेम असतं. देवाच्या दयेनं मलाही ते वर्षभर अनुभवला मिळालं.

        त्या वर्षभरात मला शाळेबद्दल अनेक गोष्टी कळल्या. शिक्षकांचं आयुष्य कसं असतं, त्यांच्यावर किती जबाबदार्‍या असतात, त्यांच्या काय समस्या असू शकतात, या आणि अशा कितीतरी गोष्टी! अनेकदा मला असंही ऐकायला मिळालं, “अरे वा! तू काय शाळेत आहेस! सगळ्या सार्वजनिक सुट्ट्या मिळत असतील.” “वेळेवर घरी पोहोचत असशील.” ”मजा आहे बुवा तुझी!” वगैरे वगैरे…

शालेय शिक्षक आणि त्यांचा अनुभव

        हो! शाळेतल्या शिक्षकांना सगळ्या सार्वजनिक सुट्ट्या मिळतात. त्यांना मे महिन्याची आणि दिवाळीची सुट्टीही मिळते. पण त्या मे महिन्याच्या सुट्टीत ते घरी पुढल्या वर्षीचा लेसन प्लॅन तयार करत असतात. दिवाळीच्या सुट्टीत शाळेत येऊन किंवा घरी पेपर तपासात असतात आणि कदाचित म्हणूनच त्यांची एवढी मोठी रजा भरपगारी असते.

        तुमच्यापैकी शिक्षक नसलेले किती जण तुमच्या मुलांच्या शाळेत जातात? तिथे गेल्यावर अर्थातच तुम्ही फक्त आपल्या पाल्याबद्दल चौकशी करत असाल आणि साहजिकच आहे ते. पण प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांवर त्यांच्या स्वतःच्या मुलांइतकीच त्यांच्या वर्गातल्या मुलांचीही जबाबदारी असते. पहिलीच्या मुलांना तर अक्षरशः आईसारखं सांभाळावं लागतं. त्यांच्या खाण्यापिण्यापासून, औषधांपासून अभ्यासापर्यंतच्या बर्‍याच गोष्टींची जबाबदारी त्यांच्या वर्गाशिक्षकांवर असते, कारण हल्ली मुलांचा जास्त वेळ घरापेक्षा शाळेतच जातो. त्याखेरीज पोर्शन पूर्ण करण्यासाठी त्यांची होणारी धावपळ निराळीच! शाळेच्या वेळात तर शिक्षकांना अनेकदा त्यांच्या नैसर्गिक विधींनाही जाता येत नाही.

        तरी मी मुंबईसारख्या शहरात एका नावाजलेल्या शाळेत कार्यरत होते. त्यामुळे निदान शाळेची इमारत आणि इतर स्वच्छतेच्या सोयी उत्तम होत्या. पण खेड्यापाड्यातून एक-शिक्षकी शाळा चालवणार्‍या शिक्षकांचं तर मला जास्त कौतुक वाटतं. काही काही ठिकाणी तर मुलांना घरी आणण्यापासून त्यांच्या शाळेच्या संदर्भातील सगळ्याच गोष्टींची जबाबदारी या शिक्षकांना घ्यावी लागते. एवढं करून पुन्हा वेतन वेळेवर मिळेल, मिळेल की नाही याची काहीही शाश्वती देता येत नाही. या गोष्टीचा नुसता विचार करूनही माझ्या अंगावर शहारा आला आणि “तुम्ही काय नुसते शिक्षकच नं!” असं नाकं मुरडून म्हणणार्‍या अनेक मंडळींना सांगावंसं वाटलं की तुम्हाला फक्त शिक्षकांच्या सुट्ट्या आणि वेळेत जाणं-येणं दिसतं पण शाळेच्या वेळात त्यांना काय काय करायचं असतं याची तुम्हाला कदाचित पुसटशीही कल्पना नसेल. म्हणून मला तरी असं मनापासून वाटतं की प्रत्येकाने कमीत कमी सहा महिने तरी शाळेत नोकरी केली पाहिजे. तो आपल्याला सर्वार्थाने समृद्ध करणारा अनुभव असू शकतो.

        एवढ्या सगळ्या विचारांची डोक्यात गर्दी  झाल्यावर मला माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची, तिथल्या कार्यालयीन कर्मचार्‍यांची अगदी शिपाईदादांची सुद्धा आठवण आली. या सगळ्यांबद्दल माझ्या मनात असलेला आदर दुणावला आणि माझ्या या (जिथे मी कार्यरत होते त्या) आणि त्या (ज्या शाळेत मी शिकले त्या) अशा दोन्ही शाळांच्या बाबतीत पुन्हा एकदा केशवसुतांच्या ओळींची प्रचिती आली.

सौ. मधुरा बाळ.