Categories
आरोग्य

शेतातून थेट तुमच्या निरोगी आयुष्यात

गोष्ट अगदी अलीकडचीच, मंडईच्या जवळ कामानिमित्त गेले होते. तेवढ्यात एक भलीमोठी काळी चकचकीत गाडी भाजीवाल्या समोर उभी राहिली. खिडकीची काच उघडली आणि आतून आवाज आला एक किलो बटाटे, अर्धा किलो टोमॅटो , कोथिंबीर अमुक अमुक…भाजीवाल्या दादांनी भराभरा सगळ्या भाजीपाला पिशवीत भरला आणि गाडीत ठेवून दिला. जाता जाता गाडीच्या खिडकीतून पैसे घेऊन गेला. सहजच मनात विचार आला की, जी गाडी एकदम चकचकीत well maintained, well serviced अशी आहे. मग शरीर नावाच्या गाडीचं काय? जसे आचार्य चाणक्य म्हणाले होते की, “आत्मा अविनाशी आहे, पण एखादे ध्येय किंवा चांगलं काम करायचं असेल. तेव्हा साथ मात्र शरीराची लागते.” तर अशा ह्या शरीर रुपी गाडीला लागणारे इंधन ते तर पारखायलाच पाहिजे हो ना! तरच आपलं शरीर well maintained, well serviced, तेजस्वी होईल. ज्या अन्नामुळे आपलं शरीर सुदृढ, निरोगी, सतेज बनते, ते अन्न पारखायलाच आपल्या कडे वेळ नाही. आपण तो वेळ काढलाच पाहिजे आणि तुमच्या आमच्या भाषेत selection of food झालंच पाहिजे. आता हे अन्न निवडायचं कसं? हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर याचे उत्तर आपल्याला श्रीकृष्णांनी ५१०० वर्षांपूर्वीचं गीतेतच सांगितले आहे.

आयु: सत्व बलारोग्यसुखप्रीती विवर्धना: ।
रस्या:सिग्धा:स्थिरा हृद्या आहारा: सात्विकप्रिया:।।८।।
भग्वदगीता, अध्याय १७, श्लोक ८

म्हणजेच जे अन्न आयुष्य वाढवण्यास मदत करते. ज्याच्या मुळे मनाची दृढता, ताकद आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जे अन्न सत्वशील/ सात्विक व पौष्टिक आहे. असे अन्न हृदयासाठी आनंददायी व महत्त्वपूर्ण आहे. अशा अन्नाच्या सेवनामुळे सात्विक वृत्तीची वृद्धी होते म्हणजेच चांगले कर्म करण्याची प्रवृत्ती वाढते. अशा सात्विक आहारामुळे मनुष्याच्या चांगल्या विचार शक्तीला चालना मिळते. असा त्याचा अर्थ होत.

हल्लीच्या काळात आपण organic foods हा एक सात्विक आहाराचा घटक मानतो. त्याचे खूप फायदे आणि चांगले लेख आपल्याला पाहायला मिळतात. पण गंमत अशी आहे की, हे सर्व ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सातशे वर्षांपूर्वी सांगितलेले आहे. आपण अन्न कसं निवडायचं? याचे उत्तर गीतेतील सतराव्या अध्यायातील वरील श्लोकात आहे. त्याचं निरूपण करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की,

  • जे पदार्थ स्वभावताच चांगले रसभरीत {water percentage} व मुळातच गोड असतात {natural sugar} असे पदार्थ निवडावेत. उदाहरणार्थ- ताजी फळे व भाज्या. जसजसे हे पदार्थ शिळे होऊ लागतात तसे तसे त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून कायम ताजी फळे आणि भाज्या यांना प्राधान्य द्यावे. तर आता ही ताजी भाजी कशी ओळखायची?(*) कोथिंबिरीची बुटकी गड्डी, पण पाने रुंद असलेली पेंडी निवडावी. तसेच मेथीच्या पानांवर लालसर किनार असते त्या मेथीची चव चांगली असते.
  • ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या स्निग्धता असते असे पदार्थ खाण्यास उत्तम. उदाहरणार्थ- सुकामेवा, नारळ, काजू इत्यादी.
  • फळांची परिपक्वता सांगताना माऊली म्हणतात की, असे अन्नपदार्थ जे खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले म्हणजेच, जे नैसर्गिक रित्या झाडावर पिकलेले थोडक्यात गाभूळलेले आणि तयार होताच झाडावरून खाली काढलेले, असे पदार्थ चवदार व पौष्टिक असतात. उदाहरणार्थ-(*) अंजीर निवडून आणताना त्याला पूर्ण जांभळा रंग हवा म्हणजे देठा पर्यंत सारखा पसरलेला हवा. जर देठावर हिरवा असेल तर समजावं की, अंजीर कच्ची तोडून आणली आहेत. सुरकुतलेला हापूस आंबा म्हणजे समजावा की, तो छान झाडावरच तयार झालेला आहे.असा हापूस आंबा कापल्यावर त्याची फोड तुपकट दिसते.
  • आकाराने मोठे व बेडब असलेले अन्न पदार्थ न निवडता ज्यांची साल पातळ व जे अन्नपदार्थ मध्यम आकाराचे असतात त्यांची निवड करावी. उदाहरणार्थ- काकडी, दोडका, दुधी भोपळा हे सर्व(*) सरळ लांबट आकाराचे घ्यावेत.
  • ह्या अशा परिपूर्ण सात्त्विक आहाराचे वर्णन करताना माऊली सांगतात की, ज्याप्रमाणे गुरूंनी केलेल्या उपदेशाचे शब्द दिसावयास थोडकेच असतात. परंतु त्याचा परिणाम मोठा असतो. त्याचप्रमाणे हा आहार दिसावयास अगदीच थोडासा असतो. परंतु जो सेवन केला तर कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो.

म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की,

येणें  सात्विक रसें। जंव देहीं मेहो वरिषे।
तंव आयुष्यनदी उससे। देहाची देहा।।३२।।

सत्वचिये कीर पाळती। कारण हाचि सुमती।
दिवसाचिये उन्नती। भानु जैसा।।३३।।
ज्ञानेश्वरी, ओवीं १३२ व १३३.

जेव्हा हा सात्विक आहार रुपी मेघ देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्य रुपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते।।३२।।

ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करायला सूर्य हा कारण आहे. त्याप्रमाणे सत्व गुणांचे पोषण करावयला हाच आहार कारण आहे।।३३।।

(*)छंदांविषयी, अनिल अवचट.