Categories
महत्वाचे दिवस संस्कार

अनंत पद्मनाभ व्रत पूजा

श्री गणपती उत्सवातील अनंत चतुर्दशी दिवस. म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्दशी हा दिवस.ह्या दिवशी करायचे व्रत म्हणजे “अनंत पद्मनाभ व्रत”. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत सुरू केल्यावर १४ वर्षे करावे. म्हणजे एक आवर्तन पूर्ण होते. तशी ही पूजा मोठी आहे. पण खूप समाधान मिळते. आनंद, उत्साहात पूजा पार पडते. 

सौ नमिता पटवर्धन ह्यांच्या घरची अनंत व्रत पूजा

            श्री विष्णु ह्या दिवशी शेषा वर आरूढ होवून अवतरतात अशी आख्यायिका आहे. दंपतीने जोडीने ही पूजा करायची असते. लाल वस्त्र परिधान करून पूजेस बसावे. हे व्रत मुख्यतः वैभव वृद्धी, दुःख नाशक, संकट मुक्ती साठी करतात. ह्यामध्ये विशेष म्हणजे लाल दोरकाची पूजा करतात. ह्या दोरकाला १४ पदर आणि १४ गाठी मारलेल्या असतात. हा दोरक श्री विष्णू पूजेबरोबर पूजला जातो. हा दोरक पूजकाने नंतर हातात बांधायचा असतो. तो वर्षभर हातात बांधावा अशी प्रथा आहे. पण दोरकाचे पावित्र्य राखण्यासाठी पूजा विसर्जन झाल्यावर तो काढून ठेवला जातो. ह्या पूजेमध्ये प्रथम गणेश पूजन , यमुना पूजन, शेष पूजन, अनंत पूजन , दोरक पूजन केले जाते. विष्णु सहस्त्र नामाचे पठण केले जाते. अनारसे चा नैवेद्य दाखवला जातो. 

पूजे निमित्त केलेले १४ दाम्पत्य पूजन

             हे सारे सविस्तर लिहिण्यामागे हेतू आहे तो म्हणजे आमच्या घरी ( पटवर्धन, शिर्सी, कर्नाटक) ही पूजा जवळ जवळ १०० वर्षांपासून निर्विघ्नपणे होत आहे. श्री नीलकंठ राव पटवर्धनांनी हे व्रत  करण्यास सुरुवात केली. त्यांच्या नंतर हे व्रत त्यांचा धाकटा मुलगा डॉ श्री.अनंत पटवर्धन यांनी सुरू ठेवले. श्री. अनंत व सौ. इंदिरा पटवर्धन यांनी ही पूजा ४२ वर्षे म्हणजेच ३ आवर्तनं पूर्ण केली. त्यानंतर हे व्रत त्यांचा धाकटा मुलगा डॉ श्री. मुकुंद पटवर्धन दंपती ने सुरू ठेवले. हे व्रत आम्ही (श्री मुकुंद व सौ नमिता) २८वर्षे केल्यानंतर यावर्षी व्रताचे उदयापन केले. हा २ दिवसांचा कार्यक्रम खूप थाटामाटात, यथासांग पार पडला. ह्यामध्ये शुद्धी होम, नांदी,  श्री अनंत व्रत पूजा , कथा वाचन, अष्टांग सेवा व दुसऱ्या दिवशी उद्यापन होम १४ दंपतींना पूजन, वायन दान, विसर्जन असा भरगच्च कार्यक्रम झाला. सर्व आप्त, मित्र, सहकारी, एकत्र येवुन खूपच नीटनेटका असा हा कार्यक्रम पार पडला. 

  ता.क. पूजेच्या माहिती मध्ये चुका ,त्रुटी असण्याची शक्यता आहे. तरी क्षमस्व.

                                         

Categories
महत्वाचे दिवस संस्कार

निरंतर ज्ञानेश्वरी

नेहमीप्रमाणे पेपर वाचत होते. त्याच्यातील एक बातमी मुलांना वाचून दाखवावीशी वाटली. तर बातमी अशी होती की रमेश (काल्पनिक नाव) एका बारा वर्षाच्या मुलाने प्रसंगावधान दाखवून त्याच्या मित्रांचे प्राण वाचवले. बातमी वाचून दाखवल्यावर मुलं म्हणाली की “आम्ही पण असं काम केलं तर आमचं नाव पेपर मध्ये छापून येईल का?” आता मुलांच्या या प्रश्नाला काय उत्तर देऊ? पेपर मध्ये नाव यावं म्हणून चांगलं काम करायचं का? नाही ना ! पण मग मुलांना कसं समजावून सांगू. विचार करता करता मला एक गोष्ट आठवली, गोष्ट आहे एका ग्रंथाची. जो ग्रंथ गेली सातशे वर्षांपासून आपण पाहतो आहे. त्याची मनापासून पूजा करतो आहे. ज्याची ओवी न ओवी आपण आपले जगणे सुसह्य करण्यासाठी वापरतो. तुम्हाला एव्हाना कळलं असेल, तो ग्रंथ म्हणजे भावार्थदीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. तर गोष्ट अशी आहे….

नेवासे या गावी ज्ञानेश्वर महाराज गीतेचे निरुपण मराठीत करणार. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. हा हा म्हणता लोक जमा झाले. प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या शिवमंदिरात सगळी जमवाजमव झाली.

 ज्ञानेश्वर महाराज ओव्या सांगणार आणि सच्चिदानंद बाबा त्या ओव्या उतरवून घेणार आणि म्हणूनच सच्चिदानंद बाबांच्या जवळ मसी भरून मसी पात्र व पिसाची लेखणी अशी सगळी जय्यत तयारी झाली. ( मसी पात्र :- शाईची दौत) ज्ञानेश्वरांन बरोबरच त्यांचे गुरु, ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, सोबतच सोपान व मुक्ताई आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या संगतीने गीतेचे निरूपण सुरू झाले. बघता बघता अठरा अध्याय संपत सुद्धा आले आणि शेवटी ज्ञानेश्वरीच्या सांगतेचा दिवस उगवला. सर्व गावकरी मंडळींना वाटू लागले ज्ञानेश्वर माऊलींचे आभार मानलेच पाहिजेत. आता काय बरं करूयात? सर्वांनी एक मतांनी माऊलींची हत्ती वरून मिरवणूक काढायचे ठरवले. त्यासाठी लागणारी सर्व तयारी जोरात सुरू झाली हत्ती, त्याच्यावरची चांदीची अंबारी, फुले, हार, आरतीचे ताट आणि अजून बरंच काही.

शके बाराशतें बारोत्तरे । तै टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंद बाबा आदरे । लेखकु जाहला ।।१८१०

ज्ञानेश्वरीतील शेवटची ओवी

अशी ज्ञानेश्वरीची सांगता करून ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले. तेव्हा सगळ्यांनी त्यांना अंबारीत बसायची विनंती केली आणि सांगितलं की, आम्हाला तुमची मिरवणूक काढायची आहे. त्यावर माऊली म्हणाले “ह्या अंबारीत बसायची माझी योग्यता नाही पण ज्या माझ्या गुरुमुळे मी हे गीतेचे निरूपण करू शकलो त्या माझ्या निवृत्ती दादाला अंबारीत बसवा.” त्यावर निवृत्तीनाथ लगेचच उत्तरले आणि म्हणाले “आमच्या लहानपणीच आमचे माता पिता आम्हाला सोडून गेले. आमची माते सारखी काळजी घेतली ती आमच्या मुक्ताईने. गुरुं पेक्षा सुद्धा मातेचे महत्व जास्ती आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या मुक्ताईलाच अंबारीत बसवा. तो मान तिचा आहे.” त्यावर मुक्ताई काय म्हणाली माहितीये का? ती म्हणाली “माझ्यापेक्षा मोठे असलेले माझे बंधू निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान दादा  इथे असताना. मी बरी अंबारीत बसेन.” एवढें म्हणून मुक्ताई थांबली नाही, पुढे ती म्हणाली म्हणाली “खरं सांगू का गावकरी मंडळी, मी काय किंवा माझे सगळे भाऊ काय,आम्ही सगळे अशाश्वत आहोत पण माझ्या दादाने सांगितलेली ज्ञानेश्वरी मात्र शाश्वत आहे. तर तुम्ही या ज्ञानेश्वरीलाच अंबारीत बसवा.” आहे की नाही सुंदर कल्पना. सगळ्या गावकऱ्यांना पटेल असंच बोलली मुक्ताई. नंतर सर्व गावकरी मंडळींनी मखमलीच्या वस्त्रांमध्ये ज्ञानेश्वरी बांधली आणि तिलाच अंबारीत ठेवून तिची मिरवणूक काढली.

ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की, व्यक्तीच्या नावा आणि देहापेक्षा सुद्धा त्याचं कार्य मोठे असायला पाहिजे. ह्या चार भावंडांचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला हेच सांगतो . म्हणूनच आज इतकी वर्ष होऊन सुद्धा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आजही निरंतर आपल्या बरोबर आहे आणि नंतरही राहील. त्याच ज्ञानेश्वरीची आज जयंती आहे. त्याचीच ही गोष्ट.

सौ. मानसी दीक्षित .

Categories
संस्कार

भव्यसिंदूर लेपना हनुमान

दिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा।पातालदेवताहंता भव्यसिंदूर लेपना ।।३।।

( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक तिसरा.)

जो दीन भक्तांचा, गरिबांचा पालन करणारा आहे. हरिकृपा म्हणजेच जो श्रीरामाचा सेवक आहे. जो सुंदर देखणा आहे. जगदंतरा याचा अर्थ जो पारलौकिक (परलोक)आहे. पातळातल्या दुष्ट शक्तींचा नाश करणारा पातालदेवताहंता आहे. जो अंगावर सगळीकडे कुंकूवाचा (सिंदूर) लेप लावलेला आहे. असा आपला सगळ्यांचा लाडका हनुमान बाप्पा. पण हे असं का बरं म्हणत असतील? भव्यसिंदूर लेपना. काय कारण असेल हनुमंताला असे म्हणण्या मागे त्याच्या पाठीमागे सुद्धा कथा आहे.

रावणवधानंतर सर्व मंडळी आयोध्या पोहोचली. श्रीराम राज्याभिषेक झाला आणि रामराज्य सुरू झालं. त्यानंतर सुग्रीव, बिभीषण आपल्या राज्यात परतले पण हनुमान श्रीरामा बरोबर अयोध्येतच राहिला. श्रीरामच त्याचे माता, पिता, गुरु, मित्र सर्वकाही झाले. प्रभूची सेवा हाच त्याचा प्रथम धर्म होता. एके दिवशी तो माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना जाऊन भेटला आणि म्हणाला “तुम्ही माझ्या प्रभुंना तर लहानपणापासूनच बघता. तर आता तुम्हीच सांगा माझ्या प्रभुंना सगळ्यात जास्त काय आवडतं?” तिन्ही माता हनुमानास म्हणाल्या “आम्ही त्याच्या माता आहोत पण या प्रश्नाचे उत्तर तुला तुझी सीता माता देईल.”

मग हनुमान सीता मातेचे भेटावयास जातो. परत तोच प्रश्न हनुमंत विचारतो “सीता माते माझ्या प्रभुंना काय आवडते? तेव्हा माता म्हणाली “तुझ्या प्रभुंना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही. त्यांना स्वतःसाठी असे कधीच काही आवडले नाही. श्रीरामांनी नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आवडीचा विचार केला. हनुमान परत मनात विचार करू लागला “मग काय करायचं?” तेव्हाच सीता माता कपाळा वरती कुंकू लावत असते. ते पाहून हनुमंताला प्रश्न पडतो “माते हे तू कपाळा वरती कुंकू का लावते आहेस? मग सीता माता त्यास म्हणाली “हे मारुतीराया श्रीरामांशी माझे लग्न झाले आहे ना मग मी त्यांच्या नावाचे कुंकू कपाळावर लावते आणि माझ्या कपाळा वरचे कुंकू पाहून श्रीरामांना खूप आनंद होतो.”

मग काय! मारुतीरायाच्या सुपीक डोक्यात एक कल्पना चमकून जाते. काय बरं असेल ती कल्पना? त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागतात की, मातेच्या कपाळा वरचे एवढेसे कुंकू पाहून प्रभू आनंदित होतात. अख्खा मीच कुंकूवात न्हाऊन निघालो तर प्रभू खूपच खुश होतील.

त्यानंतर हनुमान बाप्पानी काय केलं असेल! ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मारुतीराया कुंकवा मध्ये नखशिखांत लेपून आला आणि राज दरबारात श्रीरामांना समोर उभा ठाकला. त्याचे हे रूप पाहून सगळे खो खो हसायला लागले.

ते पाहून हनुमान तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्र सुद्धा गेले. प्रभूंनी त्यास विचारले “हनुमान सगळे तुला हसले तुला वाईट वाटले का?” तेव्हा मारुती त्यांना म्हणाला “हो प्रभू मला वाईट वाटले पण ते सगळे मला हसले म्हणून नाही. माझ्यामुळे तुमचे हसू झाले याचे मला अतिव दुःख आहे.”

हनुमानाची ही निस्सीम भक्ती प्रभुं पर्यंत पोहोचली. म्हणूनच श्रीरामा शिवाय हनुमान नाही आणि हनुमान शिवाय श्रीराम नाही. त्यासाठीच आपण म्हणतो ना –

रामदासीं अग्रगण्य कपिकुळासि  मंडणू।रामरुपी अंतरात्मा दर्शने  दोष नासती।।१७।।

( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक सतरावा. )