Categories
माझा कट्टा

मी अनुभवलेले रस्ता रुंदीकरण

काळाप्रमाणे रस्त्यांवर गर्दी वाढते. वाहनांसाठी रस्ते कमी पडायला लागतात. traffic jam होतात. त्यामुळे नगरपालिकेला रस्ता रुंदीकरणाचे निर्णय घ्यावे लागतात. त्यांना ते निर्णय पूर्णत्वाला आणायला खूप विरोध सहन करावे लागतात. सर्वात आधी ज्यांची घर किवा दुकानं पाडावी लागतात त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि बाकी सगळ्या प्रकारच्या नोटीस तयार करायला लागतात. तो निर्णय पूर्ण पार पाडायला आणि रुंदीकरण करून रस्ता बनवेपर्यंत खूप दिवस लागतात. त्याबरोबर मनुष्यबळ लागते. compensation द्यावे लागते. पैसा, वेळ सगळे लागते. त्यात काही जण पालिकेविरुद्ध कोर्टात जातात. मग परत रस्ता रुंदीकरण अडकते. बाकीचे ताब्यात घेवून जेवढे कोर्टात गेले आहेत, त्या जागा सोडून बाकी रस्ता तयार करावा लागतो. त्यामुळे रस्ता रुंदीकरण हा नक्कीच सोप्पा विषय नसतो पालिकेसाठी.

दुकानाचा फोटो .
फोटो सौजन्य – मीनल रिसबूड

आमचे दूकान सदाशिव पेठेतल्या हौदापाशी होते. ५० वर्ष ते दूकान होते. आमचे आजोबा सुरुवातीला ते दूकान चालवत असत. त्यात त्यांनी खूप व्यवसाय केला. तिथे आधी लौंड्री होती पण ती बंद करून कापड दूकान सुरु केले. मी लहान असल्यापासून फक्त कापड दूकान बघितले. आमच्याकडे तेव्हा समोरासमोर दोन दुकाने होती. त्यात समोरच्या दुकानात वेगवेगळे जण असायचे. काही वर्ष एक सोनार होता. १-२ वर्ष माझ्या आईने तिथे शिवणकामाचे दूकान पण सुरु केले होते. पण आजीच्या विरोधामुळे ते बंद झाले असावे. माझी आज्जी वाईट होती असे म्हणणार नाही मी. पण बाईने बाहेर जावून काम करण्याच्या विरोधात होती. पण तिची मत सुनेसाठी वेगळी आणि मुलीसाठी वेगळी अशी मात्र होती. कारण माझी आत्या SBI मध्ये officer म्हणून होती असो.. आजी जुन्या काळातील होती असे म्हणू . पण आम्हा नातवंडांवर तिचा खूप जीव होता.

तर आमचे मुख्य दूकान म्हणजे कापडाचे आणि समोरचे दूकान वेगवेगळ्या लोकांना भाड्याने दिले होते. शेवटचा भाडेकरू म्हणजे एक XEROX चं दूकान. मी शाळेत असतानाच ते दूकान आमच्या डोळ्यासमोर पाडलेले बघितले. आम्ही लहान होतो, पण तरी आमच्यासाठी ते दुकान महत्वाचे होते. अगदी थोडं का होईना पण त्याचे भाडे यायचे आणि ते दूकान कोपऱ्यावरील असल्याने दोन्ही बाजूने जागा गेली. त्यामुळे जवळजवळ अख्खं दूकान गेले रस्त्यात. त्याची भरपाई पालिकेने दिली. पण ती रक्कम नगण्य होती.

आमचं मुख्य दुकान म्हणजे कापड दूकान. ते दुकान आजोबा आणि बाबा मिळून चालवायचे. चादरी, बेडशीट, आभ्रे, पंचे, टॉवेल आणि अजून काही काही त्यात विक्रीकरिता असायचे. सोलापूर चादरी आणि हुबळीचे पंचे. हि आमची दुकानातील खासियत. आमची USP म्हणेन मी त्याला. अर्थात आम्हा दोन्ही बहिणींची शिक्षणे, लग्न, घरखर्च सगळे काही मुख्य ह्या दुकानावर आणि बाकी नंतर आई बाबांच्या कष्टांवर झालेले आहे. त्यांच्या कष्टांवर एक आख्खा वेगळा लेख होईल. तर आमचे हे दूकान आमचे उपजीविकेचे मुख्य साधन होते. जागा पण मोक्याची होती. शगुन चौकातून नागनाथपाराकडे जाताना उजव्या कोपऱ्यावर कुमठेकर रोड वर. आमचे लग्न झाले आणि त्यानंतर १-२ वर्षात ते दूकान पाडले. ते दूकान पडणार म्हणून नोटीस आली होती बाबांना. तसे आम्हाला खूप वर्ष माहित होते दूकान जाणार म्हणून. कारण पालिकेने खूप वर्षांपूर्वीच नोटीस दिली होती. पण तेव्हा मात्र शेवटची नोटीस आली. आजूबाजूच्या सगळ्यांना माहित झाले आता हे दूकान जाणार. नातेवाईक, मित्र सगळे जेव्हा जेव्हा दुकानात यायचे तेव्हा हि एकच चर्चा. सगळे बाबांना विचारायचे. आता तू काय करशील शाम. बाबा म्हणाले दूकान नक्की नाही चालवणार. पण सगळ्यांनी विचारून विचारून बाबांना हैराण केले अगदी आणि तेव्हा पासून बाबांना BP ची गोळी लागली. विचारणारे सगळे काही काळजी पोटी विचारायचे असे नाही. काही मोजक्याचं लोकांना काळजी असते बाकी कुचकट हेतूने विचारायचे. बाबांना सगळ्यांना टाळता पण येत नसे. तेव्हा बिच्चारे झाले होते ते.

दूकान रस्तारुंदीत जाणे म्हणजे असलेल्या मालाचे काय करायचे? तो काही परत घेतला जाणार नाही. काही मित्रांकडे ज्यांची कापडाची दुकाने होते त्यांच्याकडे बाबांनी माल पोचवला तो या बोलीवर कि विकला गेला कि पैसे द्या ह्या बोलीवर. त्र्यंबक मोरेश्वर दुकानात सगळे पंचे दिले. सेल लावला. जेवढा माल विकता येईल तेवढा विकायला काढला. जेवढे पैसे सोडवता येतील तेवढे सोडवले. तरी ३,४ वर्ष घरी पण माल पडला होता. हळू हळू मूळ किमतीत विकत होते. शेवटी ती वेळ आलीच आणि सगळे दूकान रिकामे करावे लागले. कपाटे वगैरे सगळे मिळेल त्या किमतीत विकले. अर्थात त्यातील खूप सामान जुने असल्याने त्याची खूप काही किंमत आली नाही. rack घरी घेऊन गेले, त्यादिवशी माझे ऑफिस होते. ऑफिस मधून घरी जाताना बघितले. दूकान पडलेले. बघून सगळ्या आठवणी आल्या दुकानाच्या. हे दूकान पण कोपऱ्यावर असल्याने दोन्ही बाजूने गेले. अगदी छोटी जागा राहिली. पण बाबांनी त्यावर पण पाणी सोडले. त्यांना तिथे आता काहीच नको होते. बाबांना त्या नंतर किती त्रास झाला असेल. आपण एवढी वर्ष ज्या जागेत काम केले. दिवसभर आपण तिथे असायचो ती जागाच आता उरली नाही. करायला काम उरले नाही. अगदी खाण्यापिण्याची काळजी नसली तरी उपजीविकेसाठी असलेले मुख्य साधन बंद झाले. दिवसभर काय करायचे? हा प्रश्न. तोपर्यंत बाबांना ६० पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांचा retirement सुरु झाली,असा त्यांनी समज करून घेतला.

बर आता त्या रस्त्यात भला मोठ्ठा फुटपाथ केलाय. तिथे गाड्या उभ्या करतात. तिथे कोपऱ्यावर आता एक डोश्याची गाडी उभी असते. ते बघून खूप त्रास होतो. पार्किंग साठी असलेली जागा, खरीखुरी सामान्य जनतेच्या पार्किंग साठी वापरली जाते एवढेच काय ते समाधान.

आता सुद्धा रस्ता मोठा करतात. पण त्यामुळे कोणाला फायदा होतो? हातगाडी लावणाऱ्यांना. garriage वाल्यांना. ज्यांच्याकडे आपल्या गाड्या लावायला जागा नाही त्यांना. आत्ताच कोंढवा मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. रस्ता बनवत असताना मनात  म्हणाले छान मोठा रस्ता होईल. रोज होणारे traffic jam कमी होईल. पण ते स्वप्न ठरले. एका garriage च्या आधी ५,६ गाड्या असायच्या. आता रस्ता रुंदीकरणानंतर  २०,२५ असतात. बरोबर आहे म्हणा. त्यांनी तरी गाड्या कुठे लावायच्या. स्वतःचा व्यवसाय कसा वाढवायचा. त्यातील काही गाड्या तर आता इथून परत हलणार नाहीत,अश्या स्थितीतील आहेत. बाकी traffic काय. हलणारे असते. ते त्याची वाट काढून जातील बरोबर. आप्पर इंदिरा पाशी झालेल्या मोठ्या रस्त्यावर truck, टेम्पो, पाणीपुरी, भाजीवाले , रिक्षा लावल्या जातात. रस्ता रुंदीकरणामागे असलेला उदात्त हेतू लक्षात घ्यायला पाहिजे. अश्या सगळ्या लोकांचे व्यवसायवृद्धी हाच तर मुख्य हेतू असतो. बाकी ज्यांची घर दुकाने जातात त्यांना तर काय त्यांचे म्हणणे मांडायला काही जागाच नसते. त्यांना जागा द्यायलाच पाहिजे. नाही देत म्हणले कि लगेच विकासाला अडथळा आणतात असे म्हणणार. विकासाला म्हणजे अश्या लोकांच्या विकासाला. शहराच्या नाही हा!

खराखुरा रस्ता रुंदीकरण म्हणजे काय. तर रस्ता मोठा केला आणि सामान्य लोकांना त्यांच्या गाड्यांसाठी जागा मिळाली. रस्ता खराखुरा मोठा झाला. मोठा झालेल्या रस्त्यावर नीट डांबरीकरण झाले. त्यावरून नीट गाड्या जावू लागल्या. असे झाले तर, ज्यांनी रस्त्यासाठी जागा दिली त्यांना पण वाईट वाटणार नाही आणि खराखुरा लोकांसाठी रस्ता उपलब्ध होईल. ह्याला म्हणतात रस्ता रुंदीकरण.

सौ. मीनल रिसबूड.