Categories
आरोग्य महत्वाचे दिवस

शुभ संक्रांत : सुगड घ्या सुदृढ राहा

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष नवीन सण घेऊन येतो. त्यात वर्षातला पहिला सण म्हणजे संस्कृती आणि आरोग्य या दोन्हीची उत्कृष्ट सांगड असणारी आपली मकरसंक्रांत.

संक्रांतीची माहिती – बोरन्हाण आणि सुगड

आता संक्रांत म्हटलं की आठवते ते लहान मुलांचे बोरन्हाण. माझ्या लहानपणी, ह्या गोष्टीची मी खूप आतुरतेने वाट बघायचे. कधी तो सगळा खाऊ बाळाच्या डोक्या वरून खाली पडतोय आणि मी तो गोळा करतीये. बोरन्हाण म्हटलं की मला प्रेमाने आपल्या छोट्याश्या पिल्लाला भरवणारी आईच आठवते. हे कसं? तर गंमत अशी आहे. आई जसे वेगवेगळ्या युक्त्या, शक्कल लढवून चिमुकल्याला खाऊ घालते. तसेच आपल्या संस्कृतीत खेळाच्या माध्यमातून मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत म्हणून शोधून काढलेली ही शक्कल. हा सगळा खाऊ आपल्या शरीराला उपयुक्त आहे म्हणून तो खा. असे या बाळगोपाळांना सांगितलं तर ते खातील का? नाही ना! म्हणूनच नाचत बागडत वेचून खायचा हा गंमतशीर खेळ.

 संक्रांतीची माहिती - Sugad and Sankrantichi mahiti

संक्रांति मध्ये अजून एक येणारी गंमत म्हणजे सवाष्णींच सुगड. हे सुगड बघून मला समुद्रमंथनाची गोष्ट आठवते. सुगडाचा आणि समुद्रमंथनाचा तसा काही संबंध नाही. पण यामध्ये एका गोष्टीचे मात्र साम्य आहे. समुद्रमंथनात जशी वेगवेगळी रत्ने बाहेर आली त्याच प्रमाणे सुगडातून सुद्धा रत्नेच  बाहेर येतात. ही रत्ने म्हणजे शेतात बहरलेलं नवं पीक. या उपयुक्त रत्ना मुळेच तर त्याला सुघट असं म्हणतात. (सुघट- चांगला असा घडा. सुगड अपभ्रंश आहे सुघट ह्या शब्दाचा.)

बोरन्हाण काय किंवा सुगड काय या सगळ्यांमध्ये वापरण्यात येणारी रत्ने सारखीच आहेत.  उघडूयात का रत्नांचा खजिना?

माणिकां सारखी गाजरं :-

हिवाळ्यात येणारी गाजरं शरीराला उष्णता देतात. हीच गाजर जेवल्यानंतर खाल्ल्यास दातही स्वच्छ होतात. शिवाय ते डोळ्यांसाठी उत्तम असते हे तर जगजाहीर आहे. तंतुमय पदार्थ असलेलं गाजर पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा मदत करते 

पाचूं सारखे मटार :-

भरपूर तूप लावून तिळगुळाच्या पोळीवर ताव मारताय ना! मग मटार खायला विसरू नका. कारण ह्याच्यात fats चे प्रमाण अगदी कमी व शिवाय fibers चे प्रमाण जास्ती असते म्हणजे तुमचं वजन तुमच्या ताब्यात राहणार.

जेड सारखा डहाळा ( ओला हरभरा) :-

हिवाळ्यात सगळ्यांमध्ये व्यायाम करायचा उत्साह संचारतो. व्यायाम म्हटलं की डोले- शोले, muscles ची ताकद वाढवायची तयारी. हो ना! कशी? निसर्गाने ती सोय सुद्धा करून ठेवलेली आहे. बाजारात येणारा कोवळा, लुसलुशीत डहाळा. भरपूर protein असलेलं एक उत्तम माध्यम. बाकी तर हाडांसाठी, दातांसाठी, रक्त वाढवण्यासाठी त्याच्यात calcium, phosphorus, iron हे तर आहेच.

पुष्कराज सारखी बोरं :-

थंडी नंतर येणाऱ्या उन्हाळ्यातील व पावसाळ्यातील ऋतू बदलांना सामोरं जाण्याची सोय बोरं खाऊन आपल्याला करता येते. थोडक्यात काय बोरं खाण्याने आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. (Vitamin C  चा भरपूर साठा बोरां मध्ये सापडतो.) त्याच vitamin C मुळे तिळगुळाच्या पोळीतून, हरभऱ्यातुन, गाजरतून जे iron मिळतं ते शोषून घ्यायचं काम सुद्धा आपोआपच होतं. ह्यामुळे एकाच कृतीतून दोन गोष्टी साध्य करता येतात म्हणजे हे तर असं झालं ना की मुर्ती लहान पण किर्ती महान.

हिऱ्यां सारखा ऊस :-

सणासाठी लागणारा गोडवा व माधुर्य द्यायचे काम शेतातल्या ताज्या उसाचे. शिवाय हिवाळ्यात भरपूर लागणार्‍या कॅलरीज ऊसातून मिळतात व त्यामुळे शरीरातील ऊब टिकून राहते.

Food for thought :-

संक्रांति बद्दलची माहिती तर झाली. पण पतंग उडवायचा राहिलाच ना! उडवायचा का मग पतंग? कोवळ्या उन्हात पतंग उडवुयात व त्याचबरोबर निसर्गाकडून फ्री मध्ये vitamin D सोबत घेऊन येऊयात. ही सोय सुद्धा आपल्या संस्कृतीने करून ठेवलेली आहे. 

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.