Categories
माझा कट्टा

एक दुर्लक्षित आयुष्य

होय त्या तशा कुणासाठी खास नव्हत्या आणि त्यांच्या नसण्याने ही कुणाला विशेष फरक पडणार नव्हता. अशा येसुआत्या. माझ्या लहानपणापासून मी त्यांना बघत आली आहे. सगळ्यांना त्या असल्या तरी आणि नसल्या तरी एकच होत्या. असं म्हणतात की प्रत्येक जण आपलं नशीब घेवून जन्माला येतो, तसचं येसू आत्या त्यांचं नशीब जगत होत्या. 

 येशु आत्या म्हणजे माझ्या आजोबांची चुलत बहीण. माझ्या आजोबांना सख्खी भावंडे नव्हती. त्यामुळे आत्या आणि त्यांच्या बहिणी आजोबांना जवळच्या वाटायच्या. 

लहानपणापासून फार कोड कौतुक न होता वाढल्या. त्यांच्या आईला म्हणे ३ मुलगे झाले पण तिन्ही दगावले. वाचल्या त्या तिघी मुली. म्हणून मोठी आजी म्हणायच्या मुली काय उकिरड्यावर ठेवल्या तरी जगतात. मोठ्या आजीला मुलींबद्दल खास आपुलकी नव्हती. 

येसु आत्या लहानपणी आजारी पडल्या आणि त्यांना कमी ऐकायला येवू लागले. वयपरत्वे हे बहिरे पण वाढत गेले. लग्नानंतर १२वर्षे संसार झाला, पण मुलबाळ झाले नाही. नंतर वैधव्य आले. कुणी आधार नाही म्हणून आजोबा त्यांना माहेरी घेवून आले. तेव्हा मोठ्या आजी होत्या, त्यांना हा निर्णय विशेष पटला नाही पण दुसरा पर्याय ही नव्हता. हे त्यांना ठाऊक होते. त्या म्हणायच्या स्वतःची मुलगी असली म्हणून काय झाले सतत सहवासामुळे माणूस मनातून उतरतो. त्या दोघींचं पटायचं नाही म्हणून दूध, स्वयंपाकाचे जिन्नस दोघींचे वेगळे ठेवलेले असायचे. आपापल्या कपाटात. येसु आत्यांचा खर्च कसा चालायचा हे मला माहीत नव्हते. कदाचित आजोबा देत असावेत. घरच्या शेतीत त्यांचा हिस्सा होता. 

अशा ह्या आत्या आजी , थोड्याशा संशयी, रागीट आणि घाबरट होत्या. त्या आजोबांबरोबर मोठ्या काकांकडे राहायच्या. त्यांची ठरलेली कामं होती. सकाळी देव पूजेची तयारी करायची. मग स्वतःचे कपडे धुवून घालायचे. दुपारचा चहा आणि संध्याकाळच्या भाकरी त्या करायच्या. 

त्यांचे उपासाचे दिवस ठरलेले असायचे. गुरूवार आणि शनिवार. उपवासाच्या दिवशी संध्याकाळी हमखास साबुदाण्याची खिचडी करायच्या. आम्हा मुलांमध्ये माझा धाकटा भाऊ योगेशवर त्यांचा विशेष जीव होता. त्याला एका वाटीत खिचडी काढून ठेवायच्या. चहाच्या वेळी आम्ही दिसलो तर अर्धा कप चहा आम्हालाही मिळायचा. लगेच त्यांना पोच पावती लागायची. चहा छान झालाय म्हटलं की खूश व्हायच्या. आपली स्तुती, कौतुक व्हावे ह्यासाठी त्या नेहमीच उत्सुक असायच्या.”काय म्हणतो दादा माझ्याबद्दल किंवा सूनबाई काय म्हणते माझ्याबद्दल”? असे त्या आम्हा मुलांना नेहमी विचारायच्या. मोठ्या आजी बोललेल्या त्यांना ऐकू येत नव्हते त्या आपल्यालाच काही बोलल्या असे समजून रागा रागाने आजीकडे बघायच्या. त्यांच्या बहिरेपणामुळे त्यांच्याशी खाणा खुणा करून बोलावे लागायचे. माझे धाकटे काका त्यांची खूप थट्टा करायचे. त्यांना खुणा करून खोट्या गोष्टी सांगायचे आणि आत्यांना ते खरे वाटायचे. 

ज्योतिष शास्त्राचा थोडा अभ्यास होता त्यांचा. आजूबाजूच्या बायका दुपारी त्यांच्याकडे प्रश्न विचारायला यायच्या.त्यांनी दक्षिणा म्हणून दिलेले १० ,२०  रुपये आत्या जपून ठेवायच्या. 

नऊवारी लुगडे नेसायाच्या त्या. मग दर वर्षी माझ्या आई बरोबर लुगडी खरेदीला पंढरपूरची वारी असायची. मीही एक, दोनदा त्या दोघींन बरोबर पंढरपूरला गेलीय. विठोबाचं दर्शन मग लुगडी खरेदी करून संध्याकाळी घरी परतायचं असा ठरलेला कार्यक्रम असायचा. 

दर गुरुवारी आमच्या घरी जेवायला यायच्या. आई त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची. काहीतरी गोड करायची. म्हणून त्या आईवर खुष असायच्या 

काळाप्रमाणे आम्ही भावंडं मोठी झालो .आम्ही मुली लग्न होवून आपापल्या संसारात मग्न झालो. माहेरी गेल्यावर आत्या प्रेमाने पाठीवर हात फिरवून सगळं बराय ना ? असं विचारायच्या. 

हळू हळू आत्यांच वय होत गेलं. कधी तरी फोनवर आई त्याच्याबद्दल सांगायची आणि एक दिवस त्या गेल्याचं कळलं. 

शेवटचे काही दिवस त्या झोपून होत्या. त्यांची नातसून देवयानी वहिनीने त्यांची खूप छान सेवा केली. आयुष्यभर रख रख सोसली पण शेवट सुखाचा झाला त्यांचा. असं हे आयुष्य ना कुणाचं ना कुणासाठी पण त्या जगत राहिल्या. 

 आज महालय अमावास्येला त्यांची आठवण आली. म्हणून हा प्रपंच. 

नमिता पटवर्धन