Categories
काही आठवणीतले

पहिला पाऊस

🌧🌧☔

तप्त मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस..
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस..
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच,
चिंब करणारा पहिला पाऊस……

लखलखत्या उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या, तप्तशील जमिनीतून पावसामुळे हिरवेगार समृद्धीचे अंकुर उमटून सुखाच्या, रमणीय गालिच्याची चादर कधी पसरते, हे मनाला न सुटणारे गणित आहे.

कधीकधी मनाला उन्हाळ्यातही बाहेरील जगाची सफर करावीशी वाटते; पण घराचा उंबरठा ओलांडल्यावर भासणारा उकाडा आणि रणरणतं ऊन पाहून डोळे आपोआपच घरातील ‘Air Conditioner’ कडे वळतात आणि बाहेर पडण्याचे मनसुबे रहित होतात.पण मन मात्र घरबसल्या साऱ्या दुनियेच्या सफरीला जातंच…

परंतु जेव्हा आषाढाला सुरुवात होते, तेव्हा हे मन शरीराला घरात स्थिरपणे थांबू देत नाही. कारण मनाला मोह होतो बाहेरील सृष्टी प्रत्यक्ष पाहण्याचा…तिला अनुभवण्याचा.

जेव्हा आपले पाय ग्रीष्म ऋतूतील उष्णतेचे चटके विसरून जाऊन मनमोकळेपणाने बाहेरील जग पाहण्यास बाहेर पडतील, तेव्हा माथ्यावरील ढगांचाही संयम संपून तेसुद्धा अफाटपणे, आनंदाने बरसायला लागतील, आणि पावसाळ्यातील पहिल्या पावसाची सुरुवात होईल….

पायांखालील मृदा जणू कस्तुरीच्या असंख्य माळा कवेत घेऊन निजली आहे, असे नाकांना जाणवेल. म्हणूनच हा सुगंध भरभरून घेऊन आपल्या मनात साठवून ठेवावा तो थेट दुसऱ्या पावसाळ्यापर्यंत!

साधारणतः आठ-साडे आठ मासांनंतर पाहिलेले सृष्टीचे असे रूप पाहून नेत्रांना सुख मिळते. पिवळसर-सोनेरी रंगाचे हिरव्यागार रंगात रूपांतर झालेले सर्वत्र दिसते. जिकडे नजर जावी, तिकडे पृथ्वीमाता सुंदर हिरव्या रंगाचा शालू परिधान करुन प्रसन्न मुद्रेने आपला आनंद व्यक्त करताना दिसते.

पावसाळ्यात काळ्या ढगांची रांगच्या रांग फिरत फिरत आकाशात जमा होणं, त्यांचा तो आपापसांत भांडल्यासारखा गडगड आवाज ऐकू येणं, अशा गोष्टींनी कधीकधी मन घाबरायलाही होते.

कधीकधी बाहेरची ही सफर करीत असताना पायाखाली नकळत सूक्ष्म अंकुरांचा नाश होतो, हे मनाला समजत ही नाही. मात्र जेव्हा त्याची जाणीव होते, तेव्हा मन हळहळते.

‘पावसाळयाबरोबर’ म्हणून येणाऱ्या शहरातल्या बाकी सगळ्या कटकटीच्या गोष्टी पटकन लक्षात येतच नाहीत. पण पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यांवरचा चिकचिकाट, पाणी तुंबणे आणि मग ‘ट्रॅफिक’ सारख्या समस्या भासणे, या गोष्टींना दुर्लक्षित करणे हेसुद्धा जमले पाहिजे!

पावसाला सुरुवात झाली, की ‘शहरातील’ लोकांची आवडती जागा म्हणजे घराची खिडकी. खिडकीत बसून पावसाच्या रिमझिमत्या सरी पाहत गरमागरम, चटपटीत असे खाद्य खात पावसातल्या थंडीचा अनुभव मिळवत ते आनंद लुटत असतात.

तसेच गावाकडील, खेड्यातील लोकांची पावसाविषयीची भावना शब्दात कशी सांगावी ?

उन्हाळा संपत येताच, आसुसलेल्या नजरेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाचे केवळ ‘पाऊस’ हेच जीवन होय.

first rains- पहिला पाऊस

आभाळाकडे पाहून तो त्याच्या इच्छा व्यक्त करीत असतो. कदाचित याच प्रबळ इच्छाशक्तीमुळे मेघराजही स्वतःचा संकोच बाजूला ठेऊन कोसळू लागतो.. आणि लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देत असतो.

“ये रे, ये रे पावसा” हे बालगीत गाताना चिमुरड्या मंडळींना वाटणारा उत्साहही अनमोल असतो. पावसाच्या सरींमध्ये या चिमुरडयांचे शेताच्या बांधावर होत असलेले आनंदाचे नाचगाणे पाहण्याला खरोखर नशीब लागते!

सकाळी पडणारे ते हलकेसे धुके, मधूनच येणारी ती रिमझिम, ऊन-सावल्यांचा लपंडाव, कधी हळूच डोकावणारा तो सूर्यप्रकाश आणि सप्तरंगांची उधळण करणारा ते इंद्रधनुष्य.. ते पाहण्यासाठी आपण आतुर असतो. ते नजरेस पडले, की जसे स्वर्गसुखच मिळते.

उन्हाळ्यात जे पक्षी चिडीचुप असतात, तेच या पावसाळ्यात गाणे गाऊन देवाच्या ह्या देणगीला धन्यवाद देत असतात. झाडे-पाने तर आनंदाने जणू पावसाच्या तालावर नाचत असतात! पावसात खळखळून वाहणारे झरे, आनंदाचा बांध फुटून तुडुंब वाहणाऱ्या नद्या, तो फेसाळणारा समुद्र, आणि त्यावर उसळणाऱ्या त्या उंचच उंच लाटाही प्रेक्षणीय असतात.

हवाहवासा वाटणारा पाऊस वर्षातून एकदाच का येतो? असा प्रश्न मला पडतो. थोडी उष्णता, थोडी थंडी, मध्येच सरींची भुरभूर हे सारे असेच का राहत नाही? असे मनात सारखे येते..

पण म्हणतात ना, ‘अतिपरिचयात् अवज्ञा सन्ततगमनात् अनादरो भवति।’ असाच जर पाऊस रोज- रोज येत राहिला, तर आपल्याला हळूहळू त्याचा कंटाळा येईल व तो नकोसा होईल!

खरंतर पावसाची मजा ही जून ते सप्टेंबर अशा पावसाळी महिन्यांमध्येच येते. ती त्याच वेळेला उपभोगण्यातच गंमत आहे.

हाच तो उन्हाळ्यासारख्या कंटाळवाण्या, नीरस ऋतूमधून मुक्त करणारा, सर्वांना आनंद देणारा, मन उल्हासित करणारा, ‘कधी येतो?’ असा ध्यास लावणारा, संपूर्ण पृथ्वीला आनंदित व प्रफुल्लित करणारा पावसाळा..!

Categories
Uncategorized अभिप्राय

करावा असाही वेडेपणा!

परवाच मला माझ्या मुलीने रात्री जेवायला बाहेर गेलेले असताना ice cream मागितलं. “आई , please, मला देना घेऊन,परत नाही मागणार”. म्हणलं ” घे ,कुठलं हवंय ते सांग “. असं म्हणून मग सगळे वेग वेगळ्या रंगाचे flavorचे विचारून आणि खूप गहन  विचार करून परत एकदा माझ्या मुलींनी strawberry ice cream ची order एकदाची दिली. बाहेर गेले कि ती icecream मागणार…. मग मी नाही म्हणणार… मग ती अगदी please ,please म्हणणार. मग मलाच वाटतं , “अरे बापरे ,आजू बाजूच्या लोकांना काय वाटेल? किती ‘दुष्ट आई’ आहे हि बाई, मुलगी एवढी please म्हणतेय तरी घेऊन देत नाहीये”. आता पर्यंत हि गोष्ट बरेचदा झालीय म्हणजे तिने मागायचं ..मग मी नाही म्हणायचं .. परत लोक काय म्हणतील हा विचार करून तिला दरवेळी सांगायचं परत नाही हं .. ती पण अगदी आज्ञाधारक मुलीसारखं हो  म्हणते. मग icecream खाऊन घरी येते. मलाही माहिती असतं ती ऐकणार नाही ,तिलाही माहिती असतं कि मी तिला आधी नाही म्हणणार आणि नंतर घेऊन देणार. कधी तरी वाटतं चुकीचं आहे, मग वाटतं हेच तर तीच वय आहे हट्ट करण्याचं ! केला थोडा हट्ट तर काय हरकत आहे.

मी पण हट्ट करतंच होते की लहान असताना …. मी तर बापरे … एक वर्ष काय झालं ,माझे आई बाबा आणि  भाऊ बाहेर फिरायला जातो असे सांगून, चांगले चार दिवस बाहेर ice cream खाऊन आले होते. मला सर्दी असल्याने आईने मला दिलं नव्हते. ती मला म्हणाली होती. तुझी सर्दी जाऊदे मग तुला पण देते. मी बापडी बरं म्हणून एकून घेतलं. मनातून मात्र  ice cream खाण्याचा विचार काही जात नव्हता. मग एक दिवस मीच आईला म्हणलं आई, मला ice cream खायचं आहे. तुम्ही मला दिलं नाही. माझं चार दिवसांचं ice cream राहील आहे. आई म्हणाली, “अगं ,चाल मग लगेच आज सर्दी नाहीये ना ..जाऊ या चल … घराबाहेर पडलो.. दुकानात गेलो , त्या बिचाऱ्या दुकानदारांनी विचारले, किती    ice cream देऊ ताई”? आई बोलायच्या आधीच मी म्हणलं ,” काका, मला एका कोन वर चार वेग वेगळ्या फ्लेवरचे ice cream द्या”. तो बिचारा गोंधळला … एका कोन वर”? त्यांनी परत मला विचारलं . आई म्हणाली, “हे काय अगं? तू धरणार कसं ? सांडेल ना ते … चार एकदम कशाला ,दोन फ्लेवर घे फार फार तर… पण माझे तर चार ice cream राहिले आहेत ना? मग परत परत कोण येणार म्हणून एकाच वेळेला चार घेऊन टाकते.. धन्य आहेस तू बाई  असे म्हणण्याशिवाय माझ्या आई कडे दुसरे काहीच शब्द नव्हते. शेवटी एकदाच हो नाही करत आईनी मला ice cream घेऊन दिलं… त्या ice cream कोनाच्या उंचीएवढंच ice cream घेऊन …. पुर्ण लक्ष ice cream वर ठेऊन ..मग वेळ मिळाला तर …मध्ये मध्ये रस्तावर लक्ष्य ठेवत …रस्तावरची सगळीच लोकं आपल्याकडे बघून गालातल्या गालात हसत आहेत …हे कळून देखील मी आपली माझा ice cream खाण्याचा कार्यक्रम यथा मति ,यथा शक्ती पार पाडत होते. शेवटी एकदा घरी येऊन पोहचलो. घरी आल्या आल्या आईने बाबांकडे तक्रार केली,”अहो, काय हट्टी मुलगी आहे हि, कसं होणार हीचं”? अशी तमाम आई वर्गाला जी काळजी तेव्हा आणि आजतागायत वाटते तशीच ती तेव्हा तिलाही वाटली.माझे बाबा अगदीच निर्विकार पणे वादळे,”चालायचंच ,लहान आहे अजून …आता कुठे सात वर्षाची आहे. बाल हट्ट आहेत…आपण पुरवायचे. हळू हळू समजेल तिला तिचंच “. असं म्हणून ते आपले त्यांच्या कामात गुंतून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा घसा दुखू लागला …तेव्हा मला कळलं माझे बाल हट्ट ..मलाच कसे नडले ते …असो. खरंतर हेच सगळं मी पुन्हा जेहाद अनुभव आहे. फक्त यावेळेस आईच्या चष्म्यातून. 

खरंच पण आता कधी कधी वाटतं काय तो वेडेपणा … मग दुसऱ्याच क्षणाला वाटतं …असे ना का ..जोपर्यंत या गोष्टी दुसऱ्याला अडचणीत आणीत नाहीत…तोपर्यंत असा वेडेपणा करायला काय हरकते? आधी रस्त्यानी एकटच कुणीतरी बडबडताना दिसलं कि वेगळंच काहीतरी वाटायचं पण आता जवळपासचे सगळीच लोक एका हातात मोबाईल आणि कानाला इअरफोन लावून  रस्त्यानी एकटेच बडबड करताना दिसतातच कि! आम्ही बहीण आणि भाऊ अजूनही एकत्र आलो कि घरी अगदी जोकवर जोक सुरूच असतात तेव्हा कुठे वाटतं.. आज काय वेड्यासारखं हसलो. एकदा का मोठे झालो ,घर,नोकरी,संसार यामध्ये रमलो कि लहानपण आणि त्यातुनही त्यातलं निरागस,नि:स्पृह जगणं विसरून जातो आपण सगळेच.मला सुद्धा कधी कधी वाटतं ,अरे काय हे ,किती बोर होतयं … मग मी आणि माझी मुलगी दोघीजणी मिळून सापशिडी खेळ, आवाज बंद करून गाण्यांचे व्हिडीओ लाव आणि त्याच्यावर दुसरी कुठलीतरी गाणी आपणच म्हणायची, कुणाची तरी नक्कलच करून दाखव ,नाहीतर चक्क कधी कधी सिन्ड्रेलाला प्रिन्स च्या ऐवजी स्पायडरमॅन,सुपरमॅन किंवा दुसरा कुठल्या तरी गोष्टीतला हिरो भेटला असता तर … ती गोष्ट पुढे कशी तयार झाली असाही खेळ खेळतो त्यांनी मुख्यतः आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. अश्या काहीश्या गमती जमती आम्ही करतो.

मोठे झाल्यावर आपोआपच आपण आपल्यातलं ते वेडेपण विसरतो पण कधी कधी हेच वेडेपण आपल्याला शहाणपण शिकवून जातं. आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला शिकवतं. माणसांची खरी ओळख करून देतं. आपण सगळेच जण आपल्यातलं ते लहानमुलं जिवंत ठेवू शकलो तर किती छान होईल नाही. लहान मुलं कशी मस्त असतात ,ना जगाची भीती, ना उद्याची भ्रांत, कोण काय म्हणेल याचा विचार त्यांच्या मनाला देखील स्पर्श करत नाही. बिनधास्त असतात अगदीच …म्हणून त्यांना ताण नसतो कसलाच. आपण मोठे मात्र सतत कुठल्यातरी विचारांनी ग्रासलेले असतो म्हणूनच करावा असाही वेडेपणा. Party pubbing च्या आजच्या जगात, हा थोडासा वेडेपणा तुम्हाला खूप रिलॅक्स करून जातो. म्हणूनच मी म्हणते कधीतरी वेड्यासारखं वागून त्यातलं शहाणपण अनुभवून पहा. बघा त्यातही एक वेगळीच मजाय.

आज हे सगळं वाचल्यावर तुम्ही म्हणाल कदाचित “ हे सगळं काय लिहिलं आहे आज, थोडी फार विसंगती दिसते आहे लिखाणात … आज कुछ जम्या नहीं। खुशाल म्हणा … 

रोज रोज चांगलंच लिहून मला पण आज खूप बोर होत होतं ,नवीन काही लिहायला सुचत नव्हतं … 

मग ,आज  मनात आलं … आज लिहिण्यातही असाही काही वेडेपणा करावा… मग वाटलं बघूया तरी try करून. नवीन काही सुचलं तर सुचेल उद्या . तेव्हा उद्याच उद्या बघू असा विचार करून लिहायला बसले.. आणि हा लिखाणातला वेडेपणा  तुम्हाला सादर केला. समजून घ्याल अशी अपेक्षा.