Categories
महत्वाचे दिवस संस्कार

निरंतर ज्ञानेश्वरी

नेहमीप्रमाणे पेपर वाचत होते. त्याच्यातील एक बातमी मुलांना वाचून दाखवावीशी वाटली. तर बातमी अशी होती की रमेश (काल्पनिक नाव) एका बारा वर्षाच्या मुलाने प्रसंगावधान दाखवून त्याच्या मित्रांचे प्राण वाचवले. बातमी वाचून दाखवल्यावर मुलं म्हणाली की “आम्ही पण असं काम केलं तर आमचं नाव पेपर मध्ये छापून येईल का?” आता मुलांच्या या प्रश्नाला काय उत्तर देऊ? पेपर मध्ये नाव यावं म्हणून चांगलं काम करायचं का? नाही ना ! पण मग मुलांना कसं समजावून सांगू. विचार करता करता मला एक गोष्ट आठवली, गोष्ट आहे एका ग्रंथाची. जो ग्रंथ गेली सातशे वर्षांपासून आपण पाहतो आहे. त्याची मनापासून पूजा करतो आहे. ज्याची ओवी न ओवी आपण आपले जगणे सुसह्य करण्यासाठी वापरतो. तुम्हाला एव्हाना कळलं असेल, तो ग्रंथ म्हणजे भावार्थदीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. तर गोष्ट अशी आहे….

नेवासे या गावी ज्ञानेश्वर महाराज गीतेचे निरुपण मराठीत करणार. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. हा हा म्हणता लोक जमा झाले. प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या शिवमंदिरात सगळी जमवाजमव झाली.

 ज्ञानेश्वर महाराज ओव्या सांगणार आणि सच्चिदानंद बाबा त्या ओव्या उतरवून घेणार आणि म्हणूनच सच्चिदानंद बाबांच्या जवळ मसी भरून मसी पात्र व पिसाची लेखणी अशी सगळी जय्यत तयारी झाली. ( मसी पात्र :- शाईची दौत) ज्ञानेश्वरांन बरोबरच त्यांचे गुरु, ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, सोबतच सोपान व मुक्ताई आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या संगतीने गीतेचे निरूपण सुरू झाले. बघता बघता अठरा अध्याय संपत सुद्धा आले आणि शेवटी ज्ञानेश्वरीच्या सांगतेचा दिवस उगवला. सर्व गावकरी मंडळींना वाटू लागले ज्ञानेश्वर माऊलींचे आभार मानलेच पाहिजेत. आता काय बरं करूयात? सर्वांनी एक मतांनी माऊलींची हत्ती वरून मिरवणूक काढायचे ठरवले. त्यासाठी लागणारी सर्व तयारी जोरात सुरू झाली हत्ती, त्याच्यावरची चांदीची अंबारी, फुले, हार, आरतीचे ताट आणि अजून बरंच काही.

शके बाराशतें बारोत्तरे । तै टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंद बाबा आदरे । लेखकु जाहला ।।१८१०

ज्ञानेश्वरीतील शेवटची ओवी

अशी ज्ञानेश्वरीची सांगता करून ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले. तेव्हा सगळ्यांनी त्यांना अंबारीत बसायची विनंती केली आणि सांगितलं की, आम्हाला तुमची मिरवणूक काढायची आहे. त्यावर माऊली म्हणाले “ह्या अंबारीत बसायची माझी योग्यता नाही पण ज्या माझ्या गुरुमुळे मी हे गीतेचे निरूपण करू शकलो त्या माझ्या निवृत्ती दादाला अंबारीत बसवा.” त्यावर निवृत्तीनाथ लगेचच उत्तरले आणि म्हणाले “आमच्या लहानपणीच आमचे माता पिता आम्हाला सोडून गेले. आमची माते सारखी काळजी घेतली ती आमच्या मुक्ताईने. गुरुं पेक्षा सुद्धा मातेचे महत्व जास्ती आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या मुक्ताईलाच अंबारीत बसवा. तो मान तिचा आहे.” त्यावर मुक्ताई काय म्हणाली माहितीये का? ती म्हणाली “माझ्यापेक्षा मोठे असलेले माझे बंधू निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान दादा  इथे असताना. मी बरी अंबारीत बसेन.” एवढें म्हणून मुक्ताई थांबली नाही, पुढे ती म्हणाली म्हणाली “खरं सांगू का गावकरी मंडळी, मी काय किंवा माझे सगळे भाऊ काय,आम्ही सगळे अशाश्वत आहोत पण माझ्या दादाने सांगितलेली ज्ञानेश्वरी मात्र शाश्वत आहे. तर तुम्ही या ज्ञानेश्वरीलाच अंबारीत बसवा.” आहे की नाही सुंदर कल्पना. सगळ्या गावकऱ्यांना पटेल असंच बोलली मुक्ताई. नंतर सर्व गावकरी मंडळींनी मखमलीच्या वस्त्रांमध्ये ज्ञानेश्वरी बांधली आणि तिलाच अंबारीत ठेवून तिची मिरवणूक काढली.

ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की, व्यक्तीच्या नावा आणि देहापेक्षा सुद्धा त्याचं कार्य मोठे असायला पाहिजे. ह्या चार भावंडांचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला हेच सांगतो . म्हणूनच आज इतकी वर्ष होऊन सुद्धा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आजही निरंतर आपल्या बरोबर आहे आणि नंतरही राहील. त्याच ज्ञानेश्वरीची आज जयंती आहे. त्याचीच ही गोष्ट.

सौ. मानसी दीक्षित .

Categories
संस्कार

योगिनी भिल्लीण शबरी

श्रीरामांना व लक्ष्मणांना उष्टी बोरं प्रेमाने आणि आदराने खाऊ घातली. ती शबरी तुम्हाला ठाऊक असेलच. हो ना!  पण ही शबरी कोण होती. चला तर मग तिचीच सर्वांना न माहीत असलेली गोष्ट.

शबर राजाची कन्या शबरी. भिल्ल समाजाचे मुख्य म्हणजेच शबर राजा, आपल्या कुटुंबा बरोबर जंगलात राहत असतो. एके दिवशी शबरीचे बाबा घरी छोटंसं बोकड घेऊन येतात. थोड्याच दिवसात शबरीची आणि बोकडाची एकदम घट्ट मैत्री जमते. आठ-दहा वर्षांची शबरी त्या बोकडा बरोबर छान रमत असते. त्याच्या बरोबर खेळत असते, त्याचं सर्व प्रेमाने करत असते. दोघांनाही एकमेकांचा लळा लागलेला असतो. लहानश्या शबरीचे तिच्या वडिलांनी लग्न ठरवलेले असते. काही दिवसांनी तिच्या आईकडून तिला कळले की, तुझ्या लग्नात या बोकडाचा बळी द्यायचा आहे. त्यासाठी ते बोकड येथे आणलेले आहे. एवढ्याश्या शबरीचा जीव कळवळला. ती धावत आपल्या वडिलांकडे गेली त्यांना विनवणी करू लागली. ती वडिलांना म्हणाली “असे करू नका. माझ्या लग्नात या मुक्या जनावराला मारू नका.” पण छे वडील काही ऐकायलाच तयार नाहीत. हा तर भिल्लांच्या  प्रतिष्ठेचा प्रश्न. मीच भिल्लांचा प्रमुख, मीच नियम कसे मोडणार असा त्यांचा समज.

शबरीला तर, इकडे आड तिकडे विहीर. काय करायचं? त्या चिमुकलीने खुप विचार केला. तिच्या मनात आलं की, जर आपलं लग्नच झालं नाही तर, हे बोकड काही कापले जाणार नाही. त्या क्षणी रात्रीच्या वेळी ती लगेचच घरातून निघून गेली. भिल्लींणच ती त्यामुळे जंगलातील रस्ते तिला खडान्खडा माहीत होते. रस्ता माहित होता पण कुठे जायचं ते माहीत नव्हतं.

चालत चालत ती मातंग ऋषींच्या आश्रमात पोहोचली. तिची सर्व कथा तिने मातंग ऋषींना सांगितली. तिच्यात असलेली करुणा मातंग ऋषींनी ओळखली. त्यांनी शबरीला त्यांच्या आश्रमात राहायचे स्थान दिले. नुसती ती तिथे राहिली नाही तर, मातंग ऋषींनी तिला ज्ञानसंपन्न केले. त्यांनी दिलेल्या योग सामर्थ्याने तिच्यात परिपूर्णता आली. खऱ्या अर्थाने ती योगिनी झाली. मातंग ऋषींनी तिला प्रभू श्रीरामांचे तुझ्याकडे येणे होईल असे सांगितले होते . त्यानंतर शबरी रोज न चुकता नित्यनियमाने आपली झोपडी झाडून व पुसून स्वच्छ ठेवीत असे. आपल्या मातंग ऋषींच्या वचनाप्रमाणे प्रभू रामचंद्र कधीतरी आपल्याला भेटावयास येतील. या एका आशेवर तिने आपलं जीवन व्यतीत केलं. असे शबरीने अनेक वर्षे करीत होती .

पुढे वयोवृद्ध झाल्यावर ती श्रीरामांना भेटली. ती नुसती अज्ञानी भिल्लींण म्हणून नाही, तर एक योगिनी म्हणून! नुसती उष्टी बोरं तिने श्रीरामांना दिली नाहीत तर…

कंद मूल फल सुरस अति दिए राम कहुँ आनि ।

प्रेम सहित प्रभू खाए बारंबार बखानि ।।३४।।

(तुलसीदास विरचित, श्रीरामचरित्रमानस, अरण्यकाण्ड, श्लोक चौतिसावा.)

तिने अत्यंत रसाळ आणि स्वादिष्ट कंद, मूल, फळे आणून श्रीरामांना दिली. प्रभूंनी वारंवार प्रशंसा करीत ती प्रेमाने खाल्ली.।।३४।।

त्यानंतर तिनेच श्रीरामांना आणि लक्ष्मणाला पंपा सरोवरास जाण्यास सांगितले.( पंपा सरोवर म्हणजे आत्ताचे हम्पी. त्याच्याजवळ कोप्पल जिल्हा आहे, राज्य कर्नाटक तिथे हे सरोवर आहे.) हे सर्व सांगून तिने श्रीरामांचे मुखदर्शन करून त्यांचे चरणकमल हृदयात धारण केले आणि योगअग्नी ने देहत्याग( स्वतःच्या योगसामर्थ्याने अग्नी निर्माण करून देह अग्नीला समर्पित केला.) केला.

Baby photo created by freepik – www.freepik.com