Categories
काही आठवणीतले

पहिला पाऊस

🌧🌧☔

तप्त मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस..
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस..
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच,
चिंब करणारा पहिला पाऊस……

लखलखत्या उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या, तप्तशील जमिनीतून पावसामुळे हिरवेगार समृद्धीचे अंकुर उमटून सुखाच्या, रमणीय गालिच्याची चादर कधी पसरते, हे मनाला न सुटणारे गणित आहे.

कधीकधी मनाला उन्हाळ्यातही बाहेरील जगाची सफर करावीशी वाटते; पण घराचा उंबरठा ओलांडल्यावर भासणारा उकाडा आणि रणरणतं ऊन पाहून डोळे आपोआपच घरातील ‘Air Conditioner’ कडे वळतात आणि बाहेर पडण्याचे मनसुबे रहित होतात.पण मन मात्र घरबसल्या साऱ्या दुनियेच्या सफरीला जातंच…

परंतु जेव्हा आषाढाला सुरुवात होते, तेव्हा हे मन शरीराला घरात स्थिरपणे थांबू देत नाही. कारण मनाला मोह होतो बाहेरील सृष्टी प्रत्यक्ष पाहण्याचा…तिला अनुभवण्याचा.

जेव्हा आपले पाय ग्रीष्म ऋतूतील उष्णतेचे चटके विसरून जाऊन मनमोकळेपणाने बाहेरील जग पाहण्यास बाहेर पडतील, तेव्हा माथ्यावरील ढगांचाही संयम संपून तेसुद्धा अफाटपणे, आनंदाने बरसायला लागतील, आणि पावसाळ्यातील पहिल्या पावसाची सुरुवात होईल….

पायांखालील मृदा जणू कस्तुरीच्या असंख्य माळा कवेत घेऊन निजली आहे, असे नाकांना जाणवेल. म्हणूनच हा सुगंध भरभरून घेऊन आपल्या मनात साठवून ठेवावा तो थेट दुसऱ्या पावसाळ्यापर्यंत!

साधारणतः आठ-साडे आठ मासांनंतर पाहिलेले सृष्टीचे असे रूप पाहून नेत्रांना सुख मिळते. पिवळसर-सोनेरी रंगाचे हिरव्यागार रंगात रूपांतर झालेले सर्वत्र दिसते. जिकडे नजर जावी, तिकडे पृथ्वीमाता सुंदर हिरव्या रंगाचा शालू परिधान करुन प्रसन्न मुद्रेने आपला आनंद व्यक्त करताना दिसते.

पावसाळ्यात काळ्या ढगांची रांगच्या रांग फिरत फिरत आकाशात जमा होणं, त्यांचा तो आपापसांत भांडल्यासारखा गडगड आवाज ऐकू येणं, अशा गोष्टींनी कधीकधी मन घाबरायलाही होते.

कधीकधी बाहेरची ही सफर करीत असताना पायाखाली नकळत सूक्ष्म अंकुरांचा नाश होतो, हे मनाला समजत ही नाही. मात्र जेव्हा त्याची जाणीव होते, तेव्हा मन हळहळते.

‘पावसाळयाबरोबर’ म्हणून येणाऱ्या शहरातल्या बाकी सगळ्या कटकटीच्या गोष्टी पटकन लक्षात येतच नाहीत. पण पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यांवरचा चिकचिकाट, पाणी तुंबणे आणि मग ‘ट्रॅफिक’ सारख्या समस्या भासणे, या गोष्टींना दुर्लक्षित करणे हेसुद्धा जमले पाहिजे!

पावसाला सुरुवात झाली, की ‘शहरातील’ लोकांची आवडती जागा म्हणजे घराची खिडकी. खिडकीत बसून पावसाच्या रिमझिमत्या सरी पाहत गरमागरम, चटपटीत असे खाद्य खात पावसातल्या थंडीचा अनुभव मिळवत ते आनंद लुटत असतात.

तसेच गावाकडील, खेड्यातील लोकांची पावसाविषयीची भावना शब्दात कशी सांगावी ?

उन्हाळा संपत येताच, आसुसलेल्या नजरेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाचे केवळ ‘पाऊस’ हेच जीवन होय.

first rains- पहिला पाऊस

आभाळाकडे पाहून तो त्याच्या इच्छा व्यक्त करीत असतो. कदाचित याच प्रबळ इच्छाशक्तीमुळे मेघराजही स्वतःचा संकोच बाजूला ठेऊन कोसळू लागतो.. आणि लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देत असतो.

“ये रे, ये रे पावसा” हे बालगीत गाताना चिमुरड्या मंडळींना वाटणारा उत्साहही अनमोल असतो. पावसाच्या सरींमध्ये या चिमुरडयांचे शेताच्या बांधावर होत असलेले आनंदाचे नाचगाणे पाहण्याला खरोखर नशीब लागते!

सकाळी पडणारे ते हलकेसे धुके, मधूनच येणारी ती रिमझिम, ऊन-सावल्यांचा लपंडाव, कधी हळूच डोकावणारा तो सूर्यप्रकाश आणि सप्तरंगांची उधळण करणारा ते इंद्रधनुष्य.. ते पाहण्यासाठी आपण आतुर असतो. ते नजरेस पडले, की जसे स्वर्गसुखच मिळते.

उन्हाळ्यात जे पक्षी चिडीचुप असतात, तेच या पावसाळ्यात गाणे गाऊन देवाच्या ह्या देणगीला धन्यवाद देत असतात. झाडे-पाने तर आनंदाने जणू पावसाच्या तालावर नाचत असतात! पावसात खळखळून वाहणारे झरे, आनंदाचा बांध फुटून तुडुंब वाहणाऱ्या नद्या, तो फेसाळणारा समुद्र, आणि त्यावर उसळणाऱ्या त्या उंचच उंच लाटाही प्रेक्षणीय असतात.

हवाहवासा वाटणारा पाऊस वर्षातून एकदाच का येतो? असा प्रश्न मला पडतो. थोडी उष्णता, थोडी थंडी, मध्येच सरींची भुरभूर हे सारे असेच का राहत नाही? असे मनात सारखे येते..

पण म्हणतात ना, ‘अतिपरिचयात् अवज्ञा सन्ततगमनात् अनादरो भवति।’ असाच जर पाऊस रोज- रोज येत राहिला, तर आपल्याला हळूहळू त्याचा कंटाळा येईल व तो नकोसा होईल!

खरंतर पावसाची मजा ही जून ते सप्टेंबर अशा पावसाळी महिन्यांमध्येच येते. ती त्याच वेळेला उपभोगण्यातच गंमत आहे.

हाच तो उन्हाळ्यासारख्या कंटाळवाण्या, नीरस ऋतूमधून मुक्त करणारा, सर्वांना आनंद देणारा, मन उल्हासित करणारा, ‘कधी येतो?’ असा ध्यास लावणारा, संपूर्ण पृथ्वीला आनंदित व प्रफुल्लित करणारा पावसाळा..!