Categories
काही आठवणीतले

महाभारत आणि मी

प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या विस्तृत महाभारताचा ग्रंथ माझ्या आई-वडिलांनी मला वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सौ.निलांबरी व शशिकांत कुलकर्णी यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या महाराष्ट्र ग्रंथ भांडार मधून घेऊन भेट दिला होता. संस्कारक्षम वयात महाभारत वाचल्याने त्याचे माझ्या मनावर योग्य ते संस्कार त्या ग्रंथाच्या अनुषंगाने माझ्या आई-वडिलांनी केले. त्यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी राहीन. हे ग्रंथ म्हणजे त्यांचा माझ्याकडे असलेला अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथाच्या प्रचंड आवाक्याची त्यातल्या तत्त्वज्ञानाची प्रक्रिया आजही अखंड चालू आहे.

या ग्रंथाची कितीही पारायणे केली तरी दरवेळी वाचताना काहीतरी नवीन गवसल्या ची जाणीव होते. त्यातील व्यक्तिरेखा आणि घटना यांच्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते आणि पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, तसेच तात्विक अशी अनेक पातळ्यांवर ज्ञानसमृद्धी होते.

महाभारतातील ठळक व्यक्तिरेखा जसे पांडव, द्रौपदी, कौरव, कृष्ण यांची माहिती थोडीफार सर्वांनाच ज्ञात असते पण त्याहीपलीकडे जाऊन त्या व्यक्तिरेखांशी निगडित इतर हजारो व्यक्तिरेखा आणि अगणित कथा यांची उत्कृष्ट सांगड प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी घातली आहे. त्यांची लेखन पद्धती मंत्रमुग्ध करणारी आणि उत्कंठावर्धक आहे.

त्यातील व्यक्तिरेखा फक्त काळया आणि पांढऱ्या अशा दोन रंगांच्या फटकाऱ्यात न रंगवता, त्यांच्या इतर अनेक छटा प्राचार्य दसनूरकर यांनी दाखवल्या आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या ग्रंथातील अनेक तेजस्वी स्त्री व्यक्तिरेखांचे विस्तारपूर्वक वर्णन करून त्या व्यक्तिरेखांचे स्वभाव कंगोरे दाखवून त्यांना योग्य तो न्याय दिला आहे. जसे कुंतीची व्यथा आणि होणारी घालमेल, झालेल्या वस्त्रहरणमुळे लज्जित आणि अपमानित झालेली द्रौपदी, पांडवांच्या मनात तिने सतत धुमसत ठेवलेला क्रोधाचा अग्नी ही काही ठळक उदाहरणे आहेत.

महाभारत हे एक चिरंतन शाश्वत कालातीत सत्य आहे यावर काळाचा जास्त परिणाम झालेला नाही कारण आजही आपण महाभारतात घडलेल्या घटना आपल्या अवतीभवती घडताना बघतो. जसे भाऊबंदकी, स्त्रीची विटंबना, सूडबुद्धी, द्वेष, बेकायदेशीर मुलांच्या आणि त्यांच्या मातांच्या माथ्यावर लागलेला कलंक, सत्तेचा हव्यास वगैरे काही उदाहरणे आहेत.व्यक्तिशः माझ्याकरता प्राचार्य दसनूरकर यांचे महाभारत एक हवेहवेसे वाटणारे चक्रव्यूह आहे ज्यामध्ये मला हरवून जायला आवडते, काळ वेळेचे भान राहत नाही आणि त्यातून बाहेर पडावसं वाटत नाही.

एक वाचक

प्रिया सामंत

Categories
आरोग्य कथा-लघु कथा पाककृती

अमृततुल्य, शक्तिवर्धक सुधारस

सध्या कोरोना व्हायरस नी नुसता धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे lockdown, शहरांच्या हद्दी बंद, कर्फ्यू हेच शब्द कानावर येतात. एकदाचा हा कोरोना जगाच्या हद्दीतून कधी हद्दपार होतोय असं झालंय.

एका बाजूला हे सगळं चालू असताना, दुसऱ्या बाजूला डी डी चैनल वर आपल्या सगळ्यांना जुन्या सिरीयल बघायला मिळत आहे. परवाच महाभारताच्या सिरीयल मध्ये भीमाची गोष्ट बघितली. दुर्योधनाने कपट करून काळकूट नावाचे जहाल विष खिरी मध्ये मिसळले. ते पिऊन भीम बेशुद्ध झाला. तश्या अवस्थेत दुर्योधनाने त्याला नदीत फेकून दिले. त्यानंतर तो नागलोकात पोहोचला. तिथे त्याला खुप साप चावले. पण काट्याने काटा काढण्या सारखे झाले आणि भिमाच्या पोटात गेलेले विष उतरले. भीम शुद्धीवर आला. नंतर तो नागराज वासुकी यांना भेटला. नागराज वासुकी यांनी भीमाला अमृततुल्य, शक्तिवर्धक सुधारस नावाचं पेय प्यायला दिलं व ते म्हणाले, “हे पेय तू जितकं अधिक घेशील तितकी अधिक शक्ती तुला मिळेल. एक भांडे भरून हे पेय प्यायलं तर दहा हत्तींचे बळ येतं.“(पुस्तक -महाभारत, लेखक- श्री. मंगेश पाडगांवकर) मग काय! बघता बघता भीमाने आठ भांडी सुधारस प्यायला. यानंतर भीमाची शक्ती तर सर्व प्रचलितच आहे.

अशाच शक्तीची सध्या आपल्याला गरज आहे. तरच ह्या काळकुट नामक कोरोना ला आपण हरवु शकू. त्यासाठी आपली आंतरिक शक्ती वाढायला हवी म्हणजेच, प्रतिकार शक्ती. हीच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरील गोष्टीप्रमाणे आपल्याकडे पण एक पेय आहे. जे अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे.माझी आज्जी सुद्धा हे पेय बनवायची. ज्याच्या मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. योगायोगाने त्या पेयाच नाव सुद्धा सुधारस च आहे.ह्या सगळ्या आपल्या जुन्या पद्धती व पक्वान्न आपण विसरलो होतो. त्या पुन्हा करून बघुयात. त्याच सुधारस पेयाची अगदी सोपी व सहज कृती खालीलप्रमाणे.

साहित्य :-

लिंबाचा रस :- १ छोटी वाटी

साखर :- ३ वाट्या

सोललेले वेलदोडे :- ५ ते ६

पाणी :- अर्धी / पाऊण 

( जी वाटि लिंबाच्या रसाला माप म्हणून वापराल, त्याच वाटीचे माप बाकीच्या साहित्यासाठी वापरावे.)

अमृततुल्य, शक्तिवर्धक  सुधारस - Photo credit Royalchef.info
अमृततुल्य शक्तिवर्धक सुधारस

कृती :-

  • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन मधोमध चिरून दोन भाग करून घ्यावे. नंतर गाळणीचा वापर करून लिंबाचा रस पिळून घ्यावा म्हणजे बियांचा त्रास होणार नाही. आता हा काढलेला लिंबाचा रस बाजूला ठेवून द्या.
  • वरील सांगितलेल्या मापा प्रमाणे साखर घेऊन त्यात पाणी मिसळावे. नंतर गॅसवर ठेवून गोळी बंद पाक तयार करावा.( गोळी बंद पाक बनवण्याची सोपी पद्धत:- एका पेल्यात थोडंसं पाणी घ्या. पाक तयार होत असताना त्यातला एक थेंब पाण्यात घालून बघा. पाण्यामध्ये त्या पाकाची घट्ट गोळी तयार झाल्यास समजावे आपला पाक तयार झाला. तयार नसेल तर पाक पाण्यात पसरतो.)
  • पाक तयार झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा.
  • आता या थंड पाकामध्ये आधी बाजूला काढून ठेवलेला लिंबाचा रस घालून मिश्रण नीट एकत्र करावे. या पद्धतीमुळे लिंबातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात.
  • शेवटी त्याच्यात आपल्या आवडीनुसार वेलदोड्याची पूड घालावी तुमचा शक्तिवर्धक, अमृततुल्य सुधारस तयार आहे.

Food for thought :-

नैसर्गिक लिंबू रस म्हटलं की चांगल्या गुणधर्मांची धावपट्टी सुरू होते. आधी vitamin C आठवते. मग iron absorption व त्याच्यामुळे वाढणार Hb, wound healing, heart disease वर गुणकारी. त्याच्यापाठोपाठ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत. हीच ती आंतरिक शक्ती आता एकदा हीच शक्ती वाढली की कितीतरी आजारांचे prevention होणार हो किनई. हुश्श! गुणधर्म सांगून दमले आता.