Categories
प्रवास

पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे

पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. याची तुलना दिल्लीच्या ऐतिहासिक वास्तूंशी करता येत नसली तरी पुण्याला एक विशेष स्थान आहे.

चला पुण्यातील काही अतिशय महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे आणि त्यामागील कथा जाणून घेऊया.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - पुणे lal mahal

लाल महाल

पुण्यातील हे पहिले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. लाल महाल इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले. जिजामाता (त्याची आई) आणि दादोजी कोंडदेव यांच्याबरोबर तारुण्यातील शिवाजी महाराज इथे राहत आणि प्रशिक्षण घेत असे. मूळ महाल शहाजी महाराज (शिवबांचे वडील) यांनी शिवाजी आणि जिजाबाईन साठी बांधला होता, पण तो राजवाडा काळाच्या ओघाने कोसळला. सध्याचा लाल महाल प्रतीकात्मक असून तो पीएमसीने बांधला आहे. शिवाजी महाराजांनी जिथे शाईस्ताखानाची बोटे कापली ती जागा म्हणजे लाल महाल. शिवाजी महाराजांच्या काळातील चित्रे आणि प्रतिकृती असलेल्या मिनी संग्रहालयात आज लाल महालचे रुपांतर झाले आहे.

शनिवारवाडा

पेशव्यांच्या काळात शनिवारवाडा बांधला गेला आणि त्याला महत्त्व प्राप्त झाले. लाल महालाच्या जवळच असलेले, शनिवारवाडा हे सत्तेचे स्थान होते आणि येथे बरेच महत्वाचे निर्णय घेण्यातआले होते. सत्तेच्या हव्यासासाठी काका व काकूंनी ठार मारलेल्या तरुण नारायणराव पेशवे ह्यांच्या भुताने पछाडल्याची ख्याती शनिवारवाड्याला आहे. आज जरी तो वाडा मोडलेल्या अवस्थेत असला तरी तिथे एक ‘साऊंड अँड लाईट शो’ असतो जो बघण्या सारखा आहे . 

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - पुणे shanivarwada

केसरीवाडा

केसरीवाडा हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा भाग आहे. लोकमान्य बालगंगाधर टिळक यांचे ते निवासस्थान होते. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाचे उपक्रम येथे घडले. टिळकांनी इथं मराठीत केसरी आणि इंग्रजीत मराठा ही वर्तमानपत्रं सुरू केली. वाड्यात वर्तमानपत्र कार्यालय ठेवले. स्वराज्य आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी बरीच चर्चा येथे झाली. सार्वजनीक गणेश उत्सवाची कल्पना व अंमलबजावणीही केसरीवाड्याने पाहिली. केसरीवाड्यात आज वृत्तपत्र केसरी चे कार्यालय, लेखन डेस्क आणि टिळकांचे मूळ पत्रे याविषयी म्युरल्स आहेत. वाड्यात मॅडम कामाने फडकावलेला पहिला भारतीय राष्ट्रीय ध्वज देखील बघायला मिळतो. 

आगा खान पॅलेस

१८९२ मध्ये आगा खान पॅलेस सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा याने बांधला होता. आजूबाजूच्या गावांतील दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी हा महाल बनवला. ह्यामुळे तब्बल १००० लोकांना रोजगार मिळाला. भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेव देसाई यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले तेव्हा राजवाड्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली.

महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी दोघांचा याच काळात मृत्यू झाला आणि त्यांची समाधी इथे आहे. आगा खान पॅलेस मध्ये एक छोटेसे संग्रहालय देखील आहे, ज्यात त्या काळातील  काही फर्निचर, पत्रे, छायाचित्रे आणि गांधींनी निवास करत असताना वापरल्या गेलेल्या काही घरगुती वस्तूंचा ही समावेश आहे.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे- Aga khan palace पुणे

फर्ग्युसन महाविद्यालयाची खोली क्रमांक 17

मुलांच्या वसतिगृहाच्या ब्लॉक १ मधील फर्ग्युसन महाविद्यालयाची खोली क्रमांक १७ बाहेरून इतर खोल्यांच्या भागासारखी दिसते, तथापि वरच्या बाजूस एक लहान संगमरवरी फलक लोकांना माहिती देतो की १९०२ -०५ दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या खोलीत राहत होते. अंदमानमधील तुरुंगवासा बद्दल अनेकांना माहिती आहे पण पुण्यात असतानाच त्यांची राष्ट्रवादाची कल्पना मजबूत झाली हे माहित नाही. ते युवा नेते होते आणि त्यांनी अभिनव भारत सोसायटी सुरू केली. त्याची आठवण खोलीत आहे. स्वातंत्रवीर विनायक सावरकरांचा अर्धपुतळा ( दिवाळे )असून त्यांच्या जन्म व मृत्यू वर्धापन दिनानिमित्त ही जागा सार्वजनिक आहे.

सिंहगड किल्ला

या किल्ल्याचे नाव यापूर्वी कोंढाणा असे होते. शिवाजी महाराजांचा  शूर सेनापती तान्हाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला, पण लढताना आपले प्राण गमवले. ह्या प्रसंगी शिवाजी महाराज प्रसिद्धपणे म्हणाले, “गड आला पण सिंह गेला” नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले गेले.

ह्या कहाणीला आता भारतभर प्रचीती लाभली ते म्हणजे ‘तान्हाजी ‘ ह्या चित्रपटामुळे. आज सिंहगडावर नरवीर तान्हाजी मालुसरे ह्यांची समाधी आहे आणि गडाविषयी माहिती व इतिहास सांगणारे छोटेसे माहिती केंद्र सुद्धा आहे.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - sinhagad पुणे

कसबा गणपती

कसबा गणपती मंदिर जिजामाता (शिवरायांची आई) यांनी बांधायचा आदेश दिला असे मानले जाते. कथा अशी आहे की जेव्हा जिजाबाई, छोट्या शिवाजीसमवेत पुण्याला आल्या आणि पुण्याचे प्रशासक दादोजी कोंडदेव यांना शहराची पुनर्बांधणी करायला सांगितली तेव्हा काम चालू असताना एक गणेश मूर्ती सापडली. त्यांनी ह्याला एक शुभ संकेत समजून तिथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. तेव्हापासून कसबा गणपती ला पुण्याचा ग्राम देवता ही मानले जाऊ लागले . 

जर आपण पुण्यात असाल तर आपल्या मुलांना या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी नेण्यास विसरू नका. पुस्तकात वाचण्यापेक्षा अश्या ऐतिहासीक ठिकाणी जाऊन तिथली माहिती मिळवणे मनाला  जास्त भावणारे आहे नाही का ? 


Categories
काही आठवणीतले

संगीतमय घरकाम😀


गेल्या शनिवारी कामवाल्या मावशीची सुट्टी होती… त्यांनी सकाळी सकाळीच फोन करुन सांगितलं…..ताई बरे वाटतं नाही…..आता काय आलीया भोगासी असावे सादर☺️…रविवारी तिची हक्काची साप्ताहिक सुट्टी असते…..😢 २ दिवस कामाचा रामरगाडा मलाच ओढायचा होता …..No worries, आपण असतोच ना any time every time available 😀.सकाळच्या Classच्या बॅचेस चालूच होत्या!!!! स्वयंपाक, डबा सगळे तयार होतेच!!! क्लास झाल्यावर दीर्घ श्वास घेतला आणि एक जुनाचं पण झगमगीत ड्रेस घातला…खास आवरण्यासाठी!!!!! आता काम तर करायचे होतेच मग जरा style मध्ये करावे ना……मस्त पैकी मोबाईल वर FM लावले 95 ….Big Fm फर्निचर वर, एरवी दुर्लक्षित केले जाणारे धुळीचे साम्राज्य आज अगदी जाणवत होते…मग काय एक नवीनच फडके काढले….कर्म-धर्म-संयोगाने गाणे कोणते  लागले असेल ……हाथोमें आ गया जो कल रुमाल आपका😊पुढची ओळ मला सुचली…. घर साफ करेगा मेरा ये प्यारा फडका……फटाफट सगळीकडे हात फिरवून मी जरा सोफ्यावर बसले…..गाणी चालूच होती…पिया का घर है ये, रानी हू मैं….. नौकरानी हूं आज के दिन की!!!! 


मग काय कपड्यांचा एवढा मोठा ढीग होता बाथरूम मध्ये….आज रपट जाये तो हमे … उठय्यो …..साबण जो गिरे खुद भी फिसल जय्यो☺️ गाणी म्हणत म्हणत संचरल्यासारखे सपाट्याने धप्पाटे देणे सुरूच होते कपड्यांना!!! मग वॉशिंग मशीनला टाकून मी जरा घाम आणि पाणी पुसले!!! आता मात्र कॉफीची जाहिरात ऐकून कॉफीची तल्लफ आली. मग काय मस्त कॉफी ब्रेक!!!!वाफळलेली कॉफी …आईंनी करुन दिली!!!!मस्त refreshing….आता केर काढायचा होता….. दरवाजा मागे लटकवलेला कुंचा बघून मलाच गाणे सुचले…तू मेरे सामने, मैं तेरे सामने, तुझे देखू या केर काढू…….
जाळे जळमटे काढतांना एक पालीच छोटेसे पिलू दिसले, मोठा आवंढा गिळून मी मोठ्यानेच गाणे म्हणाले, जा जा जा जा पाली तू पटकन बाहेर जा, कामाचा तो ढीग पडलाय त्रास नको देऊ जा…. ती बया कुठली ऐकतीये, जोरात कुंचा आपटला तर मॅडम कपटामागे जाऊन लपल्या… जणू म्हणत होती…. ये दोस्ती हम नही छोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा घर ना छोडेंगे….एवढं मोठं घर आणि टेरेस झाडून पोटात खड्डा पडला होता😂दुनिया मे हम आये है तो खाना हि पडेगा। खानेके बाद फिरसे बाकी काम करनाही पडेगा!!!!
आता सोहमलाही माझी दया आली…microwave मध्ये गरम करून त्याने ताटे वाढली…..मी म्हणाले… चंदा है तू  मेरा सूरज है तू……त्याचे आणि आईंचे चेहरे बघून मला खूपच मज्जा वाटली. जेवण झाल्यावर मागचा पसारा बघून जामच tension आले….मी सुरु केले मग… साथी हाथ बटाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना….जरा पाठ टेकते ना टेकते तोच वॉशिंग मशीन आठवले…कपडे वाळत घालायचे होते…FM चालू केले….आज ना छोडूंंगी तुझे दम दमा दम म्हणत झटकून सगळे दोरीवर टाकले!!!सकाळीच किराणा मालाची यादी काढली होती…तुझको चलना  होगा….म्हणत दुकानात जाऊन आले….आल्यावर  टबभरभांडी पण झाली….झाडांना पाणी टाकायचे होते….अगदी आवडीचे काम!  मी मुद्दाम राखीसारखे, झिलमिल सितारो का आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा  म्हणत फुलांच्या सान्निध्यात खूपच मज्जा आली सगळा शिणवटा कुठच्या कुठे गेला…..आता परत batch होती….आवरून  बॅच घेतली…संध्याकाळी मस्त गरमागरम चहा अहाहा…तेवढ्यात बाहेर धुवाधार सुरु झाला…..पाऊस!!! रिमझिम रिमझिम …भिगी भिगी ऋत मै तुम हम हम तुम…..
इतक्यात ऑफिसमधून अजित आला आणि म्हणाला चला बाहेर जाऊ या….मग काय आज मै उपर आसमा नीचे……🤗
बापलेकांची मिलीभगत होती..आईला आराम!!एक दुसरे से करते है प्यार हम, एक दुसरे के लिये बेकरार हम!!! रात्री घरी परत आल्यावर  पलंगावर लोळताना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली Now a days all independent women are totally dependent on their maids….खरंच ती पण एक बाईच आहे ना कामवाली…तिलाही हक्काची सुट्टी हवीच ना!! एरवी तिची दर रविवारची डोळ्यात सलणारी सुट्टी आज मात्र अगदी योग्य, वाजवी वाटत होती…. असो पण एकूण काय तर गाण्याच्या संगतीमुळे माझा the most happening day कसा संपला ते कळलेच नाही…उद्याचा नाश्ता काय करायचा ते ठरवून माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती…ये जीवन है, इस जीवन का यही हैं यही हैं रंगरूप!!!
दिलसे सुज्ञा

Categories
आरोग्य

बहुउपयोगी धातू

चणे खावे लोखंडाचे। दूध प्यावे सोन्याचे।। भाग एकभाग दोन च्या चांगल्या प्रतिसाद बद्दल मनापासून आभार. त्यामध्ये आपण विविध बहुउपयोगी धातू व त्यांचे शरीरात होणारी कार्ये पाहिली. हे धातू आहारात समाविष्ट करण्याच्या काही पद्धतींचा उल्लेख त्या दोन भागांमध्ये आहे. त्याच पद्धती आता जरा विस्तारात बघू.

लोखंड (लोहयुक्त पदार्थ):-

 • भारतीयांचा प्रमुख आहार हा तृणधान्ये (cereals) याच्यावर अवलंबून असतो जसे गहू, मका, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी या सगळ्यांमध्ये लोह सापडते.
 • मांसाहारी पदार्थ जसे मांस, मासे, अंडी, इत्यादींमध्ये लोह सापडते.
 • जास्ती लोह असणाऱ्या पालेभाज्या जसे की चवळी, पालक, मोहरीची पाने, पुदिना, मुळ्याची पाने, शेपू, धोप्याची वाळलेली पाने.
 • पण फळं भाज्यांमध्ये म्हणाल तर टमाटो, हिरव्या शेंगा, बटाटे.
 • बाळंतिणीचे आळीवाचे लाडू तर सगळ्यांना माहीत असतीलच अळीवात अगदी उत्तम प्रकारे लोह असते पण त्याचे लाडू सगळ्यांनाच आवडतात असे नाही. त्यासाठी आळीवाचा वापर फोडणीत करून बघा हा एक उत्तम पर्याय आहे.
 • मसाल्याचे पदार्थ – तीळ, हिंग, आमचूर, पिंपळी, खसखस, हळद.
 • फळांमध्ये म्हणाल तर करवंद, केळी, टरबूज, सीताफळ, पेरू, खजूर.

 Dietitian special

 • मागील भागात मी तुम्हाला पदार्थ करताना लोखंडाची कढई वापरा तसेच त्यात लिंबू घातल्यास त्यामध्ये लोखंडाचे प्रमाण जास्ती वाढण्यास मदत होते असे सांगितले आहेच.
 • घरच्या घरी iron fortified पोळी बनवायची असेल तर लोखंडी तव्याचा वापर करावा.
 • त्याचबरोबर आपल्या शरीरात लोह शोषून घ्यायला व त्याचे पचन व्हायला vitamin C  ची आवश्यकता असते म्हणून वरील सर्व उपाय वापरताना त्याबरोबर लिंबू, संत्र, मोसंबी, आवळा, मोड आलेली कडधान्ये याचा सुद्धा वापर आपल्या आहारात करावा.

चांदी (silver):- 

 • चांदी आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी चांदीच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी उठून प्यावे.
 • आहारात चांदी मिळवण्याचा अजून एक पर्याय म्हणजेच चांदीचा वर्ख. घरच्या मिठाईवर हा वर्ख लावून तुम्ही चांदी मिळवू शकता. शुद्ध चांदीचा वर्ख कसा ओळखावा? त्याचे घरगुती सोपे उपाय तुम्ही चणे खावे लोखंडाचे भाग-1 मध्ये  वाचले असतीलच. 

सोनं (gold):-

Health Tips - Milk of Gold
 • शुद्ध सोनं मिळवण्याचे उपाय जसे की आयुर्वेदिक तत्वानुसार लहान मुलांना आपण जी बालगुटी देतो. त्याच्यात इतर सामग्री बरोबर शुद्ध सोन्याचा एक वेढा उगाळावा.
 • सुवर्णसिद्ध जल ह्या प्रकाराने सुद्धा आपल्या शरीरात सोनं मिळता येत. सुवर्णसिद्ध जल बनवण्याची पद्धत तुम्हाला चणे खावे लोखंडाचे भाग दोन मध्ये सापडेलच.
 • हल्ली सोनं सेवनाचे फायदे अनेकांना पटल्यामुळे ठराविक आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये सुवर्णप्राशन केले जाते.( ह्या संदर्भात अधिक माहिती साठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

तांब (copper):-

 • Copper च्या सेवनामुळे होणारे फायदे आपण मागील भागात पाहिले. तेच copper आहारात मिळवण्यासाठी हल्ली copper pipes वापरून तयार केलेले प्युरिफायर, त्यानंतर coper water bottles, तसेच जेवण वाढण्यासाठी ताट, वाटी. तयार अन्न काढून ठेवण्यासाठी copper ची भांडी सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा.
 • आपल्या रोजच्या खाद्यपदार्थ पासून सुद्धा तांब मिळवता येतं. मांसाहारी पदार्थ म्हणाल तर liver, shellfish, oysters, beef liver.  
 • काही शाकाहारी पदार्थांमधून तांब मिळतं जसं मसुराची डाळ, dark chocolate, मनुका, बदाम, सोयाबीन, लिंबाचे साल.

लोखंड, चांदी, सोनं, तांब ह्या सगळ्या स्त्रोत(sources) तुम्हाला विस्ताराने वाचता यावे म्हणून हा लेख लिहिला.कसा वाटला ते नक्की कळवा.

Categories
काही आठवणीतले

माझ्या आठवणीतला पाऊस

आज पाऊसाचा जोर पाहून मुलांना शाळेत सुट्टी जाहीर झाली. हे ऐकुन एकीकडे सकाळी उठुन डब्ब्याची गडबड नाही म्हणूनसुटकेचा निःश्वास सोडला पण दुसरीकडे आता ह्यांना घरी व्यस्त कसे ठेवावे? हा ही प्रश्न पडला. मग वाटलं आमच्या लहानपणी आमच्या आई वडीलांना सुद्धा असे प्रश्न पडत होते का?

पाऊस म्हटलं की सगळ्यांच्या आठवणी ताज्या होतात. पावसाळा एक असा ऋतु आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो आणि सगळ्यांच्याच काही खूप जवळच्या अश्या आठवणी ह्या ऋतुशी जोडलेल्या आहेत. 

पाऊसाच्या सरी खिडकीत पडायला लागल्या की मी माझ्या आठवणीच्या दुनियेत हरवते. तेव्हा मी अगदी माझ्या बालपणात रंगते. 

पाऊसाची पहिली सर जुन महिन्यात आली की आठवतो शाळेचा पहिला दिवस. ‘ अग रेनकोट घेतलास ना? नाहीतर नक्की भिजून येशील अशी आईची हाक ‘ आणि खरंच जर रेनकोट विसरला तर चिंब भिजून आलेली मी! तेव्हाचा पाऊस तसा शहाणा होता. १० तारखेला गजर लावल्या सारखा पडायचा. 

सायकल वर शाळेत जाताना खड्डे वाचवत शाळेत पोहोचायच आणि येताना त्याच खड्या मधून जोरात सायकल चालवत सगळीकडे पाणी उडवायच. शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची. त्या दिवशी जर शाळेतून येताना पाऊस पडला तर मात्र हमखास भिजत घरी यायचं आणि वाटेत गरम गरम वडा पाव खायचा!
घनदाट झाडे बहरलेली असायची . त्या झाडाखाली आम्ही पाऊसा पासून थोडीशी उसंत मिळावी म्हणून थांबायचो, पाऊस पडून गेल्यावर फांदी हलवून पुन्हा पावसाची मज्जा घ्यायची. झाडाला झोके बांधायचे आणि सुट्टी असली कि पावसात भरपूर भिजायचं. 

पुढे मोठी झाल्यावर कॉलेज मध्ये वेगळीच मज्जा होती. Bus ची वाट बघत असताना धो धो पाऊस येणे , ती बस नेमकी अर्ध्या वाटेत बंद पडण आणि मग त्या पाऊसात मी चालत घरी येणे हे ठरलेला प्रसंग. एक समोसा किंवा भजी प्लेट ३ मैत्रिणी मध्ये वाटून खायचो .तेव्हा कॅन्टीन मध्ये मसाला चहा पीत गप्पा रंगायच्या. 

भिजून ओले चिंब घरी आले कि आई वैतागायची आणि ‘ सरळ बाथरूम मध्ये जाऊन सगळे कपडे बदल आता ‘ म्हणून रागवायची पण टॉवेल नी डोके पुसत बाहेर येताच हातात गरम गरम आलं घातलेला चहा ही ठेवायची.

नोकरी करायला लागल्यावर पाऊस अला म्हटलं की सुट्टीच्या दिवशी मित्र मैत्रीणी बरोबर long drives ला जायचो . एखाद्या रविवारी असा मस्त पाऊस बाहेर, घरात मी मऊ पांघरुणात बसून एक छान पुस्तक वाचत गरम चहाचा घोट घेत असले की कसा दिवस सार्थकी लागला असा वाटायचं!

ह्या सगळ्या काळात मी कधी पाऊसाच रौद्र रूप बघितलेले मला आठवत नाही. म्हटलं ना तेव्हा बहुतेक पाऊस आणि आपण, हे दोघे ही थोडे शहाणे होतो.

आता मात्र पाऊस म्हटलं की मनात धस्स होते. ह्या वेळी कुठे पुर येऊ नये असं मनात पटकन येते. पावसाळा सुरु झाला की बातम्या येतात त्या म्हणजे इकडे पाणी भरले, तो रस्ता वाहून गेला, तिकडे पूर आला वगैरे. रस्त्यावर खड्डे, नाल्या चे पाणी रस्त्यावर आणि बरंच काही. ह्या सगळ्यात आता काही नाविन्य उरलच नाही. निसर्ग रम्य ठिकाणी जायच्या आधी १० वेळा सुरक्षिततेचा विचार मनात येऊन जातो. नदी कधी रौद्र रूप घेईल ह्याची खात्री नसते. विसावा घ्यायला झाडे नाहीत आणी मदद मिळेल ह्याची खात्री नाही.

 कुठे तरी काहीतरी चुकतंय असा नाही का वाटत तुम्हाला? पाऊसाची मजा कुठेतरी हरवली आणि तो चिंतेचा विषय झाला ह्याला आपणच कुठे तरी जबाबदार आहोत का?

Categories
Uncategorized अभिप्राय

करावा असाही वेडेपणा!

परवाच मला माझ्या मुलीने रात्री जेवायला बाहेर गेलेले असताना ice cream मागितलं. “आई , please, मला देना घेऊन,परत नाही मागणार”. म्हणलं ” घे ,कुठलं हवंय ते सांग “. असं म्हणून मग सगळे वेग वेगळ्या रंगाचे flavorचे विचारून आणि खूप गहन  विचार करून परत एकदा माझ्या मुलींनी strawberry ice cream ची order एकदाची दिली. बाहेर गेले कि ती icecream मागणार…. मग मी नाही म्हणणार… मग ती अगदी please ,please म्हणणार. मग मलाच वाटतं , “अरे बापरे ,आजू बाजूच्या लोकांना काय वाटेल? किती ‘दुष्ट आई’ आहे हि बाई, मुलगी एवढी please म्हणतेय तरी घेऊन देत नाहीये”. आता पर्यंत हि गोष्ट बरेचदा झालीय म्हणजे तिने मागायचं ..मग मी नाही म्हणायचं .. परत लोक काय म्हणतील हा विचार करून तिला दरवेळी सांगायचं परत नाही हं .. ती पण अगदी आज्ञाधारक मुलीसारखं हो  म्हणते. मग icecream खाऊन घरी येते. मलाही माहिती असतं ती ऐकणार नाही ,तिलाही माहिती असतं कि मी तिला आधी नाही म्हणणार आणि नंतर घेऊन देणार. कधी तरी वाटतं चुकीचं आहे, मग वाटतं हेच तर तीच वय आहे हट्ट करण्याचं ! केला थोडा हट्ट तर काय हरकत आहे.

मी पण हट्ट करतंच होते की लहान असताना …. मी तर बापरे … एक वर्ष काय झालं ,माझे आई बाबा आणि  भाऊ बाहेर फिरायला जातो असे सांगून, चांगले चार दिवस बाहेर ice cream खाऊन आले होते. मला सर्दी असल्याने आईने मला दिलं नव्हते. ती मला म्हणाली होती. तुझी सर्दी जाऊदे मग तुला पण देते. मी बापडी बरं म्हणून एकून घेतलं. मनातून मात्र  ice cream खाण्याचा विचार काही जात नव्हता. मग एक दिवस मीच आईला म्हणलं आई, मला ice cream खायचं आहे. तुम्ही मला दिलं नाही. माझं चार दिवसांचं ice cream राहील आहे. आई म्हणाली, “अगं ,चाल मग लगेच आज सर्दी नाहीये ना ..जाऊ या चल … घराबाहेर पडलो.. दुकानात गेलो , त्या बिचाऱ्या दुकानदारांनी विचारले, किती    ice cream देऊ ताई”? आई बोलायच्या आधीच मी म्हणलं ,” काका, मला एका कोन वर चार वेग वेगळ्या फ्लेवरचे ice cream द्या”. तो बिचारा गोंधळला … एका कोन वर”? त्यांनी परत मला विचारलं . आई म्हणाली, “हे काय अगं? तू धरणार कसं ? सांडेल ना ते … चार एकदम कशाला ,दोन फ्लेवर घे फार फार तर… पण माझे तर चार ice cream राहिले आहेत ना? मग परत परत कोण येणार म्हणून एकाच वेळेला चार घेऊन टाकते.. धन्य आहेस तू बाई  असे म्हणण्याशिवाय माझ्या आई कडे दुसरे काहीच शब्द नव्हते. शेवटी एकदाच हो नाही करत आईनी मला ice cream घेऊन दिलं… त्या ice cream कोनाच्या उंचीएवढंच ice cream घेऊन …. पुर्ण लक्ष ice cream वर ठेऊन ..मग वेळ मिळाला तर …मध्ये मध्ये रस्तावर लक्ष्य ठेवत …रस्तावरची सगळीच लोकं आपल्याकडे बघून गालातल्या गालात हसत आहेत …हे कळून देखील मी आपली माझा ice cream खाण्याचा कार्यक्रम यथा मति ,यथा शक्ती पार पाडत होते. शेवटी एकदा घरी येऊन पोहचलो. घरी आल्या आल्या आईने बाबांकडे तक्रार केली,”अहो, काय हट्टी मुलगी आहे हि, कसं होणार हीचं”? अशी तमाम आई वर्गाला जी काळजी तेव्हा आणि आजतागायत वाटते तशीच ती तेव्हा तिलाही वाटली.माझे बाबा अगदीच निर्विकार पणे वादळे,”चालायचंच ,लहान आहे अजून …आता कुठे सात वर्षाची आहे. बाल हट्ट आहेत…आपण पुरवायचे. हळू हळू समजेल तिला तिचंच “. असं म्हणून ते आपले त्यांच्या कामात गुंतून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा घसा दुखू लागला …तेव्हा मला कळलं माझे बाल हट्ट ..मलाच कसे नडले ते …असो. खरंतर हेच सगळं मी पुन्हा जेहाद अनुभव आहे. फक्त यावेळेस आईच्या चष्म्यातून. 

खरंच पण आता कधी कधी वाटतं काय तो वेडेपणा … मग दुसऱ्याच क्षणाला वाटतं …असे ना का ..जोपर्यंत या गोष्टी दुसऱ्याला अडचणीत आणीत नाहीत…तोपर्यंत असा वेडेपणा करायला काय हरकते? आधी रस्त्यानी एकटच कुणीतरी बडबडताना दिसलं कि वेगळंच काहीतरी वाटायचं पण आता जवळपासचे सगळीच लोक एका हातात मोबाईल आणि कानाला इअरफोन लावून  रस्त्यानी एकटेच बडबड करताना दिसतातच कि! आम्ही बहीण आणि भाऊ अजूनही एकत्र आलो कि घरी अगदी जोकवर जोक सुरूच असतात तेव्हा कुठे वाटतं.. आज काय वेड्यासारखं हसलो. एकदा का मोठे झालो ,घर,नोकरी,संसार यामध्ये रमलो कि लहानपण आणि त्यातुनही त्यातलं निरागस,नि:स्पृह जगणं विसरून जातो आपण सगळेच.मला सुद्धा कधी कधी वाटतं ,अरे काय हे ,किती बोर होतयं … मग मी आणि माझी मुलगी दोघीजणी मिळून सापशिडी खेळ, आवाज बंद करून गाण्यांचे व्हिडीओ लाव आणि त्याच्यावर दुसरी कुठलीतरी गाणी आपणच म्हणायची, कुणाची तरी नक्कलच करून दाखव ,नाहीतर चक्क कधी कधी सिन्ड्रेलाला प्रिन्स च्या ऐवजी स्पायडरमॅन,सुपरमॅन किंवा दुसरा कुठल्या तरी गोष्टीतला हिरो भेटला असता तर … ती गोष्ट पुढे कशी तयार झाली असाही खेळ खेळतो त्यांनी मुख्यतः आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. अश्या काहीश्या गमती जमती आम्ही करतो.

मोठे झाल्यावर आपोआपच आपण आपल्यातलं ते वेडेपण विसरतो पण कधी कधी हेच वेडेपण आपल्याला शहाणपण शिकवून जातं. आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला शिकवतं. माणसांची खरी ओळख करून देतं. आपण सगळेच जण आपल्यातलं ते लहानमुलं जिवंत ठेवू शकलो तर किती छान होईल नाही. लहान मुलं कशी मस्त असतात ,ना जगाची भीती, ना उद्याची भ्रांत, कोण काय म्हणेल याचा विचार त्यांच्या मनाला देखील स्पर्श करत नाही. बिनधास्त असतात अगदीच …म्हणून त्यांना ताण नसतो कसलाच. आपण मोठे मात्र सतत कुठल्यातरी विचारांनी ग्रासलेले असतो म्हणूनच करावा असाही वेडेपणा. Party pubbing च्या आजच्या जगात, हा थोडासा वेडेपणा तुम्हाला खूप रिलॅक्स करून जातो. म्हणूनच मी म्हणते कधीतरी वेड्यासारखं वागून त्यातलं शहाणपण अनुभवून पहा. बघा त्यातही एक वेगळीच मजाय.

आज हे सगळं वाचल्यावर तुम्ही म्हणाल कदाचित “ हे सगळं काय लिहिलं आहे आज, थोडी फार विसंगती दिसते आहे लिखाणात … आज कुछ जम्या नहीं। खुशाल म्हणा … 

रोज रोज चांगलंच लिहून मला पण आज खूप बोर होत होतं ,नवीन काही लिहायला सुचत नव्हतं … 

मग ,आज  मनात आलं … आज लिहिण्यातही असाही काही वेडेपणा करावा… मग वाटलं बघूया तरी try करून. नवीन काही सुचलं तर सुचेल उद्या . तेव्हा उद्याच उद्या बघू असा विचार करून लिहायला बसले.. आणि हा लिखाणातला वेडेपणा  तुम्हाला सादर केला. समजून घ्याल अशी अपेक्षा. 

Categories
माझा कट्टा

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक शूरवीर

मी पर्वा गाडी चालवत होते. माझा पाच वर्षाचा मुलगा मागे car seat मध्ये बसला होता. माझी गाडी आमच्या lane मध्ये जात असताना एकदम मधे एक बाईक वाला आला. ‘अहो बाईक कर काका जरा जपून!’ माझ्या तोंडून पटकन असे उदगार निघाले. तोच माझा मुलगा पटकन म्हणाला, बाईक कर काका म्हणजे कोण? तुझे काका की माझे काका? त्याच्या प्रश्नांनी मला हसूच आले. तर हे बाईक कर काका कोण आणि का?

पुण्यात गाडी चालवत असताना मला विविध प्रकारचे लोक दिसतात. ह्यातील काही प्रकार वारंवार दिसतात आणि अश्या लोकांच्या विशिष्ट सवयींमुळे मी त्यांना काही विशिष्ट नावे दिली आहेत. त्यातलाच एक नाव म्हणजे बाईक कर काका.

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक शूरवीर

बाईक कर काका

हे सहसा ३० पार केलेले, पण अजूनही स्वत:हाला कॉलेज मध्ये समजणारे असतात. त्यांच्या कडे कुठली तरी स्कूटी असते किंवा कुण्या एके काळाची बाईक असते. अहो पण केवढा तो गाडीवरचा आत्मविश्वास! ते स्वतःची गाडी कुठल्या high speed bike पेक्षा कमी लेखत नाहीत. अर्थात त्यांच्या गाडीचा वेग हि high स्पीडचं . पण मनात कितीही असलं तरीही त्या बिचाऱ्या गाडीला झेपलं पाहिजे ना! ती आपली side hero ला स्टन्टस करायला लावल्या सारखी रडत जीव ओढत असते. Lane वगेरे पाळणे ह्यांना फारसे पटत नाही आणि सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबणे त्यांच्या तत्वांत बसत नाही.

Airplane mode Kaku

ह्या सहसा स्वत:हा गाडी शिकलेल्या, license वगेरे मिळवायच्या फंदात न पडलेल्या मूली आणि काकू असतात. गाडी balance झाली म्हणजे, गाडी आली हे त्यांचे ठाम मत असते. ह्या सहसा आपल्या माहितीचा परिसर सोडून फार कुठे जात नाहीत. पण तेवढ्या भागात फिरताना त्या स्वत:हला स्पेशालिस्ट पेक्षा कमी समजत नाहीत. इंडिकेटर, साईड मिरर हे सगळे जास्तीचे पैसे उकळण्यासाठी गाडी बनवणाऱ्या कंपन्यांनी दिलेले फीचर्स आहेत, असे त्यांचे ठाम मत असते. ह्या गोष्टी म्हणून वापरल्या जात नाहीत किंवा दयनीय अवस्थेत असतात. कधी कधी मिरर चा वापर लिपस्टिक लावण्यासाठी आणि इंडिकेटर चा वापर मुलाला खेळण्यासाठी असा केला जाऊ शकतो.

स्टाइल भाई

हे आपले नवीन गाडी हातात मिळालेले तरुणअसतात. त्यांच्या गाडी मध्ये फीचर्स आणि वेग ह्याची कमी नसते. हेल्मेट घालणे, traffic शिस्त पाळणे वगेरे त्यांच्या लेखी महत्त्वाचे नाही. जागा मिळेल तिथे गाडी घालणे, म्हणजे अगदी फूटपाथ वर सुद्धा गाडी घालणे ह्यात त्यांना काहिं चुकीचे वाटत नाही. Lane cutting, मोठ्या गाड्यांना कट मारून जाणे ह्यातच thrill असत असं त्यांना वाटते, पण घरी आपली कोणी वाट बघत आहे, हे त्या thrill मध्ये ते विसरून जातात.

मल्टी तस्कर

ह्यांना कमालीचा आत्मविश्वास असतो. ह्या सिग्नल वर एकाच वेळी त्या कानात लावलेल्या रेडिओ चे गाणे बदलत असतात, दुसरीकडे रस्त्यावर काहीतरी विकत घेत असतात आणि सिग्नल सुटणार म्हणलं कि, नेमके पैसे काढून देतात आणि मागून हॉर्न वाजवणाऱ्या लोकांना शिव्या देत सरळ निघून जातात. ही वेगळी गोष्ट की, हे सगळे करत असताना त्यांनी u-turn आणि उजवीकडे वळणारे traffic अडवून धरलेले असतात. हेल्मेट चा वापर डोके वाचायलाच न्हवे तर मोबाईल होल्डर म्हणून पण करता येतो हे मी ह्याचाच कडून शिकले.

डी जे बाबू

हे तरुण असतात, वडिलांची किंवा तत्सम कोणाची तरी नवीन अथवा महागडी गाडी फिरवत असतात. त्या गाडी मध्ये त्यांचे मित्र मैत्रीणी ही असतात आणि हे सगळे joyride साठी आलेले असतात. सहसा ह्यांच्या गाडीत लेटेस्ट गाणी एकदम high volume वर चालू असतात. ही गाणी इतक्या जोरात असतात की, बंद खिडकीतून सुद्धा मंद आवाज बाहेर येत असतो. ह्यांना मागच्या लोकांचे हॉर्न ऐकू येतात का? ही दाट शंका मला नेहमीच असते. 

हे काही लोक जे मला पुण्याच्या रस्त्यांवर सर्रास आढळले. तुमच्या शहरात असे लोक तुम्हाला आढळले का? काय सांगता, काही नवीन प्रकार चे लोक ही दिसले? जरूर कळवा खाली कमेंट मध्ये.

Categories
महत्वाचे दिवस

गुरु पौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा!

आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाला म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. राणी सत्यवती आणि पराशर ऋषी हे त्यांचे माता आणि पिता. व्यास ऋषींनी वेदांतील ज्ञानाचे विभाजन करून ते चार प्रकारात समाविष्ट केले.साम वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्व वेद . त्यांनी वेदाचे विभाजन केले आणि प्रत्येक व्यक्तीला ते अध्ययन करण्यास सोपे होईल याची काळजी घेतली. म्हणूनच त्यांना वेद व्यास असेही म्हणले जाते. तसेच व्यास ऋषींनी १८ पुराण आणि महा-ग्रंथ महाभारताची निर्मिती केली. श्री गणेश यांना त्यांनी महाभारत लिहिण्यास मदत करावी अशी विनंती केली. त्यानुसार वेद व्यास ऋषींनी महाभारताचे वर्णन केले आणि श्री गणेशांनी महाभारताचे लिखाण केले. महाभारतातील घटनांना त्यांनी खूप जवळून अनुभवले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास हे त्रिकालदर्शी आहेत असेही मानले जाते. किंबहुना ते श्री विष्णूंचा अवतार आहेत असेही मानले जाते. महर्षी व्यासांनी प्रत्येक शिष्यास सखोल ज्ञान मिळेल आणि ज्ञान ग्रहण करण्यास सुलभ सोयीचे होईल, याचा किती सखोल अभ्यास आणि विचार तेव्हा केला हेच दिसून येते. भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार महर्षी वेद व्यास हेच आहेत. महाभारतातील धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्र  हे आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतं. महर्षी वेद व्यास यांना आद्य गुरु मानलं जातं म्हणूनच गुरु पौर्णिमा हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो.

आजच्या  काळात पूर्वीसारखे गुरुकुल नाहीत. आता शिक्षण घेणं खूपच सोयीचं झालं आहे. तरीदेखील आपल्या आयुष्यातील गुरु आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतातच. आपला आजूबाजूलाच इतकी माणसं  अविरतपणे वावरत असतात कि, त्यातले किती लोक खरे आणि किती लोक खोटे हेच आपल्या लवकर लक्षात येत नाही. मग अश्यावेळी काय करायचं? आपले गुरु कोण? हे कसे बरे आपल्या लक्षात येईल. आपले गुरु आपल्याला कायमच  योग्य ते मार्ग दर्शन करतात, चूक झाली तर शिक्षाही करतात. पण कुठलेही गुरु आपल्याला आपले सत्कर्म करण्यापासून अडवत नाहीत. जशी आपली आई आपल्याला अगदी बालपणापासून सांभाळते, योग्य ती काळजी घेते. मार्गदर्शन करते आणि वेळ आल्यास फटकेही देते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील गुरु आपल्याला दिशा दर्शन करत असतात. म्हणूनच आपल्या आयुष्यातील पहिला गुरु हि आपली आईच असते. 
महाभारताच्या युद्ध प्रसंगी जेव्हा अर्जुनासमोर शत्रूपक्षामध्ये जेव्हा त्याचेच आप्त, स्वकीय ,गुरुजन उभे राहतात आणि अर्जुन विवंचनेत पडतो “मी हे युद्ध कसे करू”? तेव्हा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे श्रीकृष्ण त्याचे मार्गदर्शन करतात.
“तू तुझे कर्तव्य कर. त्याचे परिणाम काय होतील? मला माझ्या कृतीचे काय फळ मिळेल याची चिंता करू नकोस”, तू तुझे कर्तव्य कर. व्यक्तिगत विचार न करता प्रजेसाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी तू हे धर्मयुद्ध कर. असा संदेश स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला.
काही गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल बोलावे आणि लिहावे तेवढे कमीच आहे. मग ते श्रीकृष्ण आणि सांदिपनी ऋषी असो, नाहीतर अगदी एकलव्य आणि द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे एकालव्यांचे मानस गुरु होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु. 

आज काल सगळंच online झाल्याने बरेच जण  online चं शुभेच्छा पण देतात. पावसामध्ये भिजल्याशिवाय पावसाचा आनंद मिळेल का? चिखलात पाय रुतला तरच, रुतलेला पाय कसा काढावा? हे ज्ञान आपल्याला मिळेल नाही का? सगळ्याच गोष्ष्टींचे ज्ञान घरी बसून मिळतेच असे नाही. ज्ञान घेण्यासाठी शिष्याची तळमळ किती आहे? याची परीक्षा देखील गुरु घेतात, म्हणून तर आपल्या आयुष्यात सुख दुःख येतात. तुम्ही आलेल्या संकटाना कसे सामोरे जाता. त्यामध्ये तुमची तुमच्या गुरुप्रती असणारी श्रद्धा हीच तुम्हाला तारून नेत असते. आजूबाजूला रोज लाखो अनुभव घेत आपण जगत असतो, म्हणून बरेच जण अनुभव घेत घेत शहाणे होत असतात. पण खरा शिष्य तोच असतो जो लाखो संकट आली तरी आपल्या गुरुप्रती असणारी श्रद्धा आणि विश्वास तसाच कायम ठेवतो. 
म्हणून तर साई बाबांच्या देवळात गेलात तर “श्रद्धा” आणि “सबुरी” हे दोन्ही शब्द तुमच्या दृष्टीस पडतात.
श्री स्वामी समर्थ कायमच सांगतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.

Categories
माझा कट्टा

सुमनांचे सु‘मन’

परवा काही खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. थोडी फार खरेदी झाली, मग नेहमीप्रमाणे भाजी घेण्यासाठी बाजारात गेले. थोडी फार भाजी हवी होती ती घेतली आणि निघाले. आता भाजी घ्यायला गेलेय म्हणल्यावर लिंबु, कोथिंबीर, पुदिना, नारळ, मेथी आणि कांदा या भाज्यांचे वास म्हणजे अगदीच ओळखीचे झाले आहेत. माझे डोळे बंद करून जरी मला कोणी विचारले, हि कुठली भाजी आहे ते सांग? तरी ते मी सांगू शकेन. “झाली बाबा एकदाची भाजी घेऊन” असं मी म्हणलं आणि तितक्यात कुठलासा छानसा सुगंध माझ्या नासिकेतून थेट मनापर्यंत पोहोचला. “अहाहा! किती सुंदर सुगंध येतोय” …. असं  म्हणतं, मी त्या दिशेने वळले आणि पाहते तर काय? समोर निशिगंध, चाफा या फुलांची रास होती. मन पार हर्षुन गेलं. कितीतरी वर्षांनी मी अशी निशिगंध आणि चाफ्याच्या फुलांची रास बघितली होती. लगेहाथ मी चाफ्याची आणि निशिगंधाची फुलं घेऊन बाजारातून बाहेरदेखील पडले, पण त्या फुलांच्या सुगंध काही केल्या मनातून नाहीसा होत नव्हता आणि तो नाहीसा व्हावा अशी माझी इच्छाही नव्हती. 

घरी आल्यावर आधी भाजी काढून ठेवली. मग त्या फुलांना अलगद पिशवीतून बाहेर काढलं आणि निशिगंधाचा काय सुगंध पसरला, आहाहा!  चाफ्याची फुलं थोड्यावेळ छान पाण्यामध्ये भिजवून ठेवली. घरामधल्या एका छान नक्षीकाम असलेल्या फुलदाणीत त्या निशिगंधाच्या फुलांना सजवलं. तेव्हा एक प्रश्न नक्की पडला. “मी त्या फुलांना सजवलं कि त्या फुलांनीच  माझं घर सजवलं”? तुम्हाला काय वाटतं? विचार केला तर आपल्या कितीतरी सणा समारंभांना आपण कैक प्रकारची फुलं वापरतो. लग्न- मुंज अश्या शुभकार्यानां गजरे-हार अगदी हमखास लागतातच. लग्न समारंभात लांब सडक केसांच्या वेणीवर माळलेला  मोगरा आणि अबोलीचा नाजूक गजरा खरंतर अजूनच शोभा आणतो. एखाद्या लावण्यवती स्त्रीला खरंतर मेकअपची गरजचं नसते. एक गजरा घातला की झालं… तसंच परकं पोलकं घातलेल्या एखाद्या छोट्याश्या गोंडस मुलीला गजरा केसात माळला तर ती अजूनच गोड दिसते नाही का?

फुलांचे सुद्धा स्वभाव असतात नाही का? म्हणजे आता बघा ना.. लग्न समारंभात मोगरा, अबोली,शेवंती ही फुलं अगदी हमखास हजेरी लावतातचं. चाफा आता तसा दुर्मिळ झाला आहे. पण मला मात्र चाफा नेहमी देखणा वाटतो. त्याचा रंग, सुगंध, छान मऊ पाकळ्या… फक्त डोळ्यासमोर पटकन अवतरित होत नाही झाडाच्या  पानांमागे दडून बसतो. शोधावं लागतं त्याला! सदाफुलीची फुलं मात्र अगदी सहज नजरेस पडतात. शाळेमध्ये एखादी सतत हसणारी मुलगी असावी… जी कधीही शाळा बुडवत नाही ना तशी. अबोली मात्र नावाप्रमाणे शांत, तिला सुगंधही नाही पण अंगणाच्या एखाद्या कोपऱ्यात ती मात्र तग धरून वाढते. एखादं दिवस अबोलीचं  फुलं दिसलं नाही तर मग मात्र तिचं अस्तित्व जाणवतं. कमळ, ब्रह्मकमळ हि फुलं मला उत्सुकता वाढवणारी आणि अध्यात्मिक प्रगती करणारी फुलं वाटतात. जास्वदींचे फुल मात्र अगदी आपली सहनशीलता बघत कधी कधी. आपण अगदी अधीर असतो नवीन उमललेलं फुल बघण्यासाठी,पण एकदा का ते उमललं कि, “चला आज फुल आलं, आता आधी देवघरातल्या गणपतीला वाहूया”  हाच भाव मनी जागृत होतो. हा आपला गुलाब मात्र वेगवेगळ्या रंग रूपात अगदी छान वावरताना आढळतो. कधी लाल, पिवळा, कधी गुलाबी, कधी अगदी शुभ्र, तर कधी अगदी काळा देखील. वेगवेगळ्या रंगांच्या छटामध्ये सतत भुरळ घालत राहतो. कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांकडून तर याला फारच डिमांड! Rose day, valentines day, Propose day या दिवशी तर गुलाबाच्या फुलाशिवाय चालतचं नाही. कधी कधी मला वाटतं….त्या गुलाबांना बोलता येत असतं..  तर कितीतरी successful or unsuccessful love stories ऐकायला मिळाल्या असत्या नाही का? किती जणांच्या प्रेमाचा ‘गुलकंद’ झाला हे देखील कळलं असतं, किती गम्मत आली असती. झेंडूच्या फुलांचा मात्र एक वेगळाच तोरा असतो. एरवी सजावटीसाठी आपण झेंडूच्या माळा करतो पण दसरा आणि दिवाळीला मात्र अगदी सोन्यासारखा दिसणारा झेंडू, सोन्याचेच भाव घेऊन बाजारात मिरवत असतो.

बाजारामध्ये फुलांचे बुके किंवा नुसती फुलं घ्यायला गेले कि आजूबाजूला दरवळणाऱ्या सुंगंधाने मन आपोआपचं  प्रसन्न होतं. तेव्हा जाणवतं …मन शांत करायला काही लागू पडत असेल तर हीच ती थेरपी. फुल विक्रेते देखील व्यवसाय म्हणूनच फुलं विकत असले तरी, मी तरी त्यांना आज पर्यंत कधी चीड चीड करून बोलताना ऐकलं नाही.मोगऱ्याचा गजरा विकणाऱ्या बायकादेखील किती प्रेमाने बोलतात, “ताई, गजरा घ्या ना, बघा छान दिसेल तुम्हाला” तेव्हाच फक्त केस कापल्याचे दुःख होतं. कदाचित फुलांच्या सुगंधाने त्यांचही मन शांत होत असेल. आपण आपली डोके दुखी, पाठदुखी, गुडघे दुखी कुरवाळत बसतो. पण या फुल विक्रेत्यांना मात्र एक दवा लागू पडतं असेल ती म्हणजे हे फुलरूपी सुखाची टोपली! बस्स, अजून काय पाहिजे? किती छान नाही का? सकाळी उठल्या उठल्या अशी छान टवटवीत फुलं नजरेस पडली तर दिवसभर आपल्यालाही कसं ताजतवानं वाटतं. मधुमालती, बुचाची फुलं याचा सुगंध अगदी थोडासाच येतो पण तरीही मनाला सुखावून जातो. मी राहते त्या सोसायटीमध्ये आम्ही लहान असताना एक गुलमोहराचं झाड होतं. त्याला फुलांचा इतका छान बहर असायचा. त्या फुलांमध्ये असणाऱ्या पाकळ्यात एक पाकळी थोडी वेगळी असते. त्या पाकळीमध्ये लाल आणि पांढरा असे दोन रंग असतात. त्याला आम्ही ‘कोंबडा’ असे म्हणायचो. मग खाली पडलेल्या फुलांमध्ये किती कोंबडे मिळतात त्यासाठी खटाटोप करायचो. त्याचबरोबर कॉलनीमध्ये अजून दोन झाडं लावली होती बरेचजणांना माहितही नव्हतं कि ती कुठली झाडं आहेत. बरेच वर्ष म्हणजे जवळ जवळ २० वर्षानंतर ते झाड पूर्ण वाढल्यावर त्याला खूप फुलं आली नंतर कळलं कि ते कैलासपतीचे झाड आहे. किती  छान सुगंध पसरतो त्या फुलांचा. आता माझी मुलगी त्या झाडांची फुलं गोळा करते. काही आठवणी असतात अश्याच ज्या मनात घर करून राहतात.

या फुलांचं आयुष्य खरं तर किती? फारफार एक दोन दिवसांचं पण सगळ्यांना प्रसन्न करतात, आपलंस करून घेतात. आपल्याला मात्र आयुष्यभर मदत करतात. त्यांची कुठे अपेक्षा असते मला अमुक हीच जागा पाहिजे. कधी देवाच्या चरणी अर्पण केली जातात. कधी लहान मुलांच्या हाती सापडतात. कधी कुणाच्या गळ्यातला हार होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. तर कधी कुणाच्या अंत्य संस्काराचे साक्षी होतात. अगदी जन्माला आल्यापासून आपल्या  अंत्य संस्कारापर्यंत आणि त्यानंतरही. फुलं खरंच कधी कुठलाही भेदभाव करत नाहीत.

फुलांना राग, लोभ, मोह, माया, मत्सर, यापैकी कोणीही भुरळ घालूचं शकत नाहीत. आयुष्यातला एक दिवस असं जगून बघा, बघा जमतंय का? कुठलीही अपेक्षा न करता सतत दुसऱ्याला देत राहणं हे आपण …त्या फुलांकडून शिकलं पाहिजे नाही का?