Categories
पाककृती भावसंग्रह

फराळाचं ताट तुम्हाला नक्की काय सांगतं ?

यावर्षी पावसानी अगदीच सगळयांना वेठीस धरलंयं. दिवाळी आली तरी पाऊस काय परतीचा निरोप घेईना. आता दिवाळीची खरेदी, घरातली साफ सफाई सगळ्यांनी कसरत करून, कशी बशी पुर्ण केलीच, पण फराळाचं काय करायचं? हा प्रश्न फक्त जी मंडळी अजूनही घरी फराळ करतात त्यांना नक्कीच पडला. कारण  फराळ केला तर तो मऊ पडतो म्हणून.

दिवाळीचा फराळ .
फोटो क्रेडिट- Pixabay free images.

माझही काही असच झालं, फराळाचं घरी करू की नको? अश्या कात्रीत असतानाच आमच्या इकडे पावसानी जरा दोन दिवस रजा घेतली …लगेच ह्यांनी फर्मान सोडलं आता काय पाऊस थांबलाय वाटतं ..आता किमान लाडू आणि चिवडा तरी घरी करता येईल ..म्हणलं हो ,करूया की आजचं! मग लगे हाथ, चिवडा आणि लाडू घरी केले, म्हणलं जरा जमलंच तर् करंजी, चकली पण करूनच टाकू .. शेवटी एकदाचा आमचा फराळ तयार झाला. दिवाळी म्हणलं कि फटाके आणि  फराळ हे आलंच …नवीन कपडे वैगरे आता असं काही फार अप्रूप राहिलं नाही ..कारण हल्ली बारा महिने कपड्यांची खरेदी चालूच असते. यावर्षी तर पाऊस आणि प्रदूषण यामुळे ग्रीन दिवाळी हाच फंडाय! मग उरला तो दिवाळीचा फराळचं फक्त… शिवाय आपल्याकडे कुठलाही सण असला तर खाण्याचं विशेष कौतुक …त्यात माझ्यासारख्या खवय्येना तर त्याचं विशेष कौतुक असतंच.

फराळाचं ताट.
फोटो क्रेडिट – अमृता गोखले.

मला असं नेहमी वाटतं आपलं खाणं आणि आपलं जगणं ,वागणं हे कुठेना कुठे एकमेकांशी रिलेट होत असतं. आता आपला फराळचं घ्याना, चिवडा तर खरं पोह्याच्याच.. पण आपण त्यात सर्व प्रकारच्या चवी एकत्र करतो. तिखट, मीठ ,साखर, मोहरीचा थोडासा कडसरपणा, पंढरपुरी डाळ थोडीशी कडक, शेंगदाणा, तीळ यामध्ये तेल असत, कडीलिंब, खोबरं  जे खरंतर नगण्य स्वरूपात असतं पण त्याचं अस्तित्व आपल्याला तेेेव्हाच जाणवतं, जेव्हा ते खाताना दाताखाली येतं. आपलं जगणं देखील असंच असतं हर तर्हेच्या माणसांनी आणि अनुभवांनी भरलेलं. आता चकलीचं बघा, कशी दिसते एकदम गोल, तरीही तिला काटे असतात (म्हणजे चकली चांगली झाली असेल तर तिला काटे दिसतात अन्यथा दिसत नाहीत) चकली करताना मधून सुरुवात करूनं ती तिच्याच भोवती वेढली जाते… आपणही अगदी असेच कुठलाही विचार करताना आधी स्वतःपासून सुरुवात करतो आणि स्वतःशीच येऊन थांबतो. आतून बाहेरून गोल त्यात परत तूप आणि वेलदोड्याची पूड शिवाय गोड… ओळखा बरं काय? बरोबर लाडू मग तो बेसनाचा असो किंवा नारळीपाकातला रव्याचा लाडू त्यावर परत मनुका आणि काजूचा साज चढवलेला असतोच. तो आबालवृद्धांना आवडतो. आपल्या आयुष्यातही अशी काही माणसं असतात ती अगदी सगळ्यांना लाडकी असतात. कुठल्याही वयोगटामध्ये ती अगदीच बिनधास्तपणे वावरू शकतात . करंजी तर मला पोटात हजारो गुपित ठेऊन, ओठी हसू असणाऱ्या एखाद्या आजीसारखी वाटते. तिला तिच्या मुलांपासून नातवंडांपर्यंत सगळ्याची गुपितं माहित असतात. मग एखादा प्रसंग history repeat असा असला तर ती फक्त हसते, तिच्या हसण्यातूनच प्रत्येकाला तिचं मत कळलं असतं तिला त्यावेळी काही मतप्रदर्शन वैगरे करायची गरज नसते. कडबोळी आणि शंकरपाळे म्हणजे येता जाता असं मुठीत घेऊन खाण्याचे पदार्थ.. कधीही सकाळ..दुपार ..संध्याकाळ चालतं .. ती म्हणजे घरातली शाळेला न जाणारी पिल्लावळ .. कोणीही घराच्या बाहेर जातंय म्हणल्यावर …मी पण येणार ..असं म्हणून पायात चप्पल सरकवून बाहेर सैर सपाटा करण्यास सज्ज असणारी. अनारसे करावेत ते घरातल्या अनुभवी बायकांनी .. ते तांदूळ भिजवणे ..मग त्याचे पाणी बदलत राहणं .. मग त्या वाटलेल्या तांदुळामध्ये अगदी काटेकोरपणे मोजून मापून गूळ घालणे… मग हलकेच हातानी पीठ तयार करणे.. एकदा का एवढं झालं कि मग अनारसा तयार करताना त्यावर  अगदी हलकेच हातानी खस खस लावणे..बरं त्याचही योग्य प्रमाण हवं बरं ..जास्त झाली तर जळायची शक्यता .. हे एवढं करून परत तो अनारसा अगदी बारीक गॅस करून तळायचा …त्यात परत तो जास्त कडकही नको आणि आतपर्यंत तळलाही गेला पाहिजे… एवढ्या सगळ्या अटी.. इतक्या निगुतीने हे सगळं करायचं म्हणजे त्यासाठी अनुभवचं हवा … माझी आई अनारसे करते घरी .. तिला ते अनारसे करताना पाहिलं कि वाटायचं किती सोप्प आहे हे सगळं… नंतर मोठं झाल्यावर कळलं की, दिसतं तेवढं सोप्प नाहीये हे बर का? यासाठी वेगळी तपश्चर्या लागते..पण आईने केलेल्या अनारस्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. याच्यासाठी एक कसब लागतं ..आयुष्य जगण्याचं … बऱ्याच गोष्टी त्यांनी लीलया पेलल्या असतात .. बऱ्याच गोष्टींना त्यांनी स्वीकारलं असतं तेव्हा कुठे असे अनारसे होतात.

चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, कडबोळी, अनारसे अश्या पदार्थांनी भरलेलं ताट तुम्हाला काय सांगत? आयुष्य जगायला शिका..फराळाचं सेवन करणं जेवढं सोप्पंय ..तेवढंच हे देखील सोप्पंय.. फक्त त्या पदार्थाची चव राखा …आणि प्रत्येक नात्याचा मान राखा… फराळाच्या ताटासारखंच, तुमचं आयुष्यही अगदी रंगीत आणि चवदार होईल ..यात तीळमात्र  शंका नाही. तुम्हा सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

अरे, माझं फराळाचं ताट माझी वाट बघतंय .. तुम्ही देखील आस्वाद घ्या फराळाचा. चकली, चिवडा खाताना माझी आठवण असू द्या, चालू द्या! फराळमध्ये असतो तसाच खुस खुशीतपणा, थोडासा कडकपणा, बऱ्यापैकी गोडवा तुमच्याही आयुष्यात आणि स्वभावात असू द्या! पाऊस थांबला तर बाहेर एक सैर सपाटा देखील मारून या!

Categories
माझा कट्टा

एक दुर्लक्षित आयुष्य

होय त्या तशा कुणासाठी खास नव्हत्या आणि त्यांच्या नसण्याने ही कुणाला विशेष फरक पडणार नव्हता. अशा येसुआत्या. माझ्या लहानपणापासून मी त्यांना बघत आली आहे. सगळ्यांना त्या असल्या तरी आणि नसल्या तरी एकच होत्या. असं म्हणतात की प्रत्येक जण आपलं नशीब घेवून जन्माला येतो, तसचं येसू आत्या त्यांचं नशीब जगत होत्या. 

 येशु आत्या म्हणजे माझ्या आजोबांची चुलत बहीण. माझ्या आजोबांना सख्खी भावंडे नव्हती. त्यामुळे आत्या आणि त्यांच्या बहिणी आजोबांना जवळच्या वाटायच्या. 

लहानपणापासून फार कोड कौतुक न होता वाढल्या. त्यांच्या आईला म्हणे ३ मुलगे झाले पण तिन्ही दगावले. वाचल्या त्या तिघी मुली. म्हणून मोठी आजी म्हणायच्या मुली काय उकिरड्यावर ठेवल्या तरी जगतात. मोठ्या आजीला मुलींबद्दल खास आपुलकी नव्हती. 

येसु आत्या लहानपणी आजारी पडल्या आणि त्यांना कमी ऐकायला येवू लागले. वयपरत्वे हे बहिरे पण वाढत गेले. लग्नानंतर १२वर्षे संसार झाला, पण मुलबाळ झाले नाही. नंतर वैधव्य आले. कुणी आधार नाही म्हणून आजोबा त्यांना माहेरी घेवून आले. तेव्हा मोठ्या आजी होत्या, त्यांना हा निर्णय विशेष पटला नाही पण दुसरा पर्याय ही नव्हता. हे त्यांना ठाऊक होते. त्या म्हणायच्या स्वतःची मुलगी असली म्हणून काय झाले सतत सहवासामुळे माणूस मनातून उतरतो. त्या दोघींचं पटायचं नाही म्हणून दूध, स्वयंपाकाचे जिन्नस दोघींचे वेगळे ठेवलेले असायचे. आपापल्या कपाटात. येसु आत्यांचा खर्च कसा चालायचा हे मला माहीत नव्हते. कदाचित आजोबा देत असावेत. घरच्या शेतीत त्यांचा हिस्सा होता. 

अशा ह्या आत्या आजी , थोड्याशा संशयी, रागीट आणि घाबरट होत्या. त्या आजोबांबरोबर मोठ्या काकांकडे राहायच्या. त्यांची ठरलेली कामं होती. सकाळी देव पूजेची तयारी करायची. मग स्वतःचे कपडे धुवून घालायचे. दुपारचा चहा आणि संध्याकाळच्या भाकरी त्या करायच्या. 

त्यांचे उपासाचे दिवस ठरलेले असायचे. गुरूवार आणि शनिवार. उपवासाच्या दिवशी संध्याकाळी हमखास साबुदाण्याची खिचडी करायच्या. आम्हा मुलांमध्ये माझा धाकटा भाऊ योगेशवर त्यांचा विशेष जीव होता. त्याला एका वाटीत खिचडी काढून ठेवायच्या. चहाच्या वेळी आम्ही दिसलो तर अर्धा कप चहा आम्हालाही मिळायचा. लगेच त्यांना पोच पावती लागायची. चहा छान झालाय म्हटलं की खूश व्हायच्या. आपली स्तुती, कौतुक व्हावे ह्यासाठी त्या नेहमीच उत्सुक असायच्या.”काय म्हणतो दादा माझ्याबद्दल किंवा सूनबाई काय म्हणते माझ्याबद्दल”? असे त्या आम्हा मुलांना नेहमी विचारायच्या. मोठ्या आजी बोललेल्या त्यांना ऐकू येत नव्हते त्या आपल्यालाच काही बोलल्या असे समजून रागा रागाने आजीकडे बघायच्या. त्यांच्या बहिरेपणामुळे त्यांच्याशी खाणा खुणा करून बोलावे लागायचे. माझे धाकटे काका त्यांची खूप थट्टा करायचे. त्यांना खुणा करून खोट्या गोष्टी सांगायचे आणि आत्यांना ते खरे वाटायचे. 

ज्योतिष शास्त्राचा थोडा अभ्यास होता त्यांचा. आजूबाजूच्या बायका दुपारी त्यांच्याकडे प्रश्न विचारायला यायच्या.त्यांनी दक्षिणा म्हणून दिलेले १० ,२०  रुपये आत्या जपून ठेवायच्या. 

नऊवारी लुगडे नेसायाच्या त्या. मग दर वर्षी माझ्या आई बरोबर लुगडी खरेदीला पंढरपूरची वारी असायची. मीही एक, दोनदा त्या दोघींन बरोबर पंढरपूरला गेलीय. विठोबाचं दर्शन मग लुगडी खरेदी करून संध्याकाळी घरी परतायचं असा ठरलेला कार्यक्रम असायचा. 

दर गुरुवारी आमच्या घरी जेवायला यायच्या. आई त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची. काहीतरी गोड करायची. म्हणून त्या आईवर खुष असायच्या 

काळाप्रमाणे आम्ही भावंडं मोठी झालो .आम्ही मुली लग्न होवून आपापल्या संसारात मग्न झालो. माहेरी गेल्यावर आत्या प्रेमाने पाठीवर हात फिरवून सगळं बराय ना ? असं विचारायच्या. 

हळू हळू आत्यांच वय होत गेलं. कधी तरी फोनवर आई त्याच्याबद्दल सांगायची आणि एक दिवस त्या गेल्याचं कळलं. 

शेवटचे काही दिवस त्या झोपून होत्या. त्यांची नातसून देवयानी वहिनीने त्यांची खूप छान सेवा केली. आयुष्यभर रख रख सोसली पण शेवट सुखाचा झाला त्यांचा. असं हे आयुष्य ना कुणाचं ना कुणासाठी पण त्या जगत राहिल्या. 

 आज महालय अमावास्येला त्यांची आठवण आली. म्हणून हा प्रपंच. 

नमिता पटवर्धन

Categories
कविता

आनंदवन

सूर्यकुलाच्या सदस्यांना तेजाची कवच कुंडल लाभतात!

त्यांच्या जीवनाला सूर्याचा कांचन स्पर्श झळाळून टाकतो!

बाबा, आपण सूर्यकुलाचे सदस्य होता.

आणि म्हणूनच, पृथ्वीच्या निबिड अंध:कारात

आपल्या तेजाची पावलं उमटली,

आणि हां हां म्हणता त्या तेजस्पर्शाने

पृथ्वीचं अंत:करण गलबलून गेलं!

आपल्या हृदयातून कुष्ठरोग्या विषयीची

ममता पाझरू लागली!

त्यांना जगण्यासाठी लागणारी 

स्वाभिमानाची कवच कुंडलं प्रदान करत असताना,

आनंदवनाच्या वाटेवरचे कातळं फुटत होते!

ते फोडणारे आपले दोन हात 

त्यांना कळत- नकळत हजारो हातांचं बळ लाभलं!

आनंदवनात एकच नाद घुमला,

स्वावलंबन! स्वाभिमान!! आत्मसन्मान!!!

तीन शब्दांचा मंत्र जागर करणारे 

समाजाने बहिष्कृत केलेले 

माया- ममतेला वंचित झालेले 

आमचेच बांधव होते!

त्यांच्या तना-मनात आपण 

ज्वाला निर्माण केली आणि या ज्वालांचीच 

आनंदवनात फुले झाली!

बाबा, आपण माडिया- गोंड यांच्या 

भेगाळलेल्या तनमनावर फुंकर घातलीत!

आनंदवन हेमलकसा सोमनाथ येथे 

माणुसकीचे झरे फुटले!

माणसांना तुम्ही जिंकलात 

माणुसकीची पेरणी केलीत, 

त्यामुळेच आनंदवन माणुसकीचं नंदनवन बनलं!

आपण आनंदवन, सोमनाथ, हेमलंकसाच्या वाटेवर 

प्रदीर्घ वाटचाल करीत राहिलात!

यामागे, साधना ताईंची तपश्चर्या, 

प्रकाश आणि विकास या पुत्रांचे योगदान 

आपल्या सामर्थ्याला उत्तुंग उंचीवर नेत राहिलं!

नव्हे, तर आमटे कुटुंबीयांनी 

माणुसकीचं गौरीशंकर गाठलं!

माणुसकीच गौरीशंकर गाठल!!