Categories
काही आठवणीतले

सुट्टीची गंम्मत सांगतोय समीहन

माझा मुलगा चि. समीहन ह्यांने सुट्टीत केलेली गंम्मत तो तुम्हाला सांगतोय. चला तर मग ऐकूयात त्याची सुट्टीची गंम्मत त्याच्याच शब्दांत.

नमस्कार मित्रांनो, मी सुट्टीत मुंबईला गेलो होतो. तिकडे माझी आजी राहते. मी तिकडे खूप मज्जा केली आणि मला जास्तीत जास्त गेटवे ऑफ इंडिया आवडला. मी तिकडे होडीत बसलो. मी अजून पण खूप गोष्टी पाहिल्या आणि तुम्हाला माहिती आहे का? मी भलीमोठी युद्धनौका पण पाहिली. तिथे मोठ्या मोठ्या cruise ship पण येतात. मी मत्स्यालय पाहिलं त्याचं खरं नाव होतं तारापोरवाला मत्स्यालय. मी अजून कुठेतरी गेलो होतो. ते म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. अजून काही पाहिजे असेल तर, हे बघा! मी तिकडे जादू पण शिकलो. माझ्या गुरूंचे चे नाव कृती आहे. मी जादू मध्ये शिकलो की, माझी जादूची कांडी काही नसलेल्या हातातून अचानक कशी आणायची, छोट्या छोट्या तीन रंगीत गोंड्यातून अचानक एक नवीन गोंडा आणायचा, वेगवेगळ्या length च्या माकडांच्या शेपट्या जादू करून सगळ्या एकसारख्या length च्या करायच्या. आता ही झाली माझी मुंबईची ट्रिप.

त्याच्या नंतर मी सिद्धेश्वर ट्रेन पकडली आणि सोलापूरला आलो. सध्या मी इकडे पण मज्जा करतोय. मुंबई सारखच मी सोलापूर मध्ये पण मज्जा केली. मी तिकडे आईस्क्रीम खाल्ले अजुन मी सिद्धेश्वर मंदिराला गेलो होतो. मुंबईमध्ये आणि सोलापूर मध्ये मी खूप मजा केली पण मी फक्त थोड्याशाच लिहिल्या. ही झाली माझी सोलापूरची ट्रीप.

झुकू झुकू आगीन गाडी ……….

 त्याच्यानंतर मी  हुतात्मा एक्सप्रेस पकडली आणि पुण्याला आलो. नंतर मी पोहायला जायला लागलो( म्हणजे त्याला असे सांगायचे आहे की, तो basic पोहायला शिकला ). दहा दिवसातच मी पोहण्याची पहिली लेवल पार केली. मला काही दिवसात पोहोण्याच सर्टिफिकेट मिळालं. मग त्याच्या नंतर तीन जूनला माझी शाळा सुरू झाली. मी आत्ता खूप काही नवीन शिकतोय आणि मी तिसरीत असल्यामुळे अभ्यास पण वाढला आहे. आता पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मी कुठे जाणार आहे ते माहीत नाही .जेव्हा मज्जा करिन तेव्हा परत तुम्हाला सांगेन. आत्ता पुरते टाटा.

तुम्हाला कशी वाटली समीहन ची सुट्टीची गंम्मत? नक्की कळवा आणि हो तुमच्या मुलांच्या अश्या गमती जमती भाव मराठी वर लिहायला विसरू नका .

Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग १

नमस्कार मैत्रिणींनो, आला उन्हाळा आला. मग काय झालं का? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन. म्हणजेच भटकंतीचे नियोजन? कुठे जायचं? ट्रेनची तिकीट, की विमान प्रवास. लागणाऱ्या सामानाची जमवा जमव. त्यातून लहान मुलं बरोबर असतील, तर मग खूप विचार आणि नियोजनाची आवश्यकता आहे.

मुलांचे सामान, नवीन ठिकाणी जाऊन मुलं काय खातील. प्रवासात त्यांची खायची चिंता. त्यातून प्रवास लांबचा असेल तर, मग काय करायचं? हे सतत चे पडणारे प्रश्न. हे सगळे प्रश्न मला नेहमी पडतात. तुम्हाला पण पडत असतीलच. चला तर मग शोधूयात या प्रश्नांची उत्तरं. या लेखातून आज मी तुम्हाला असे काही पदार्थ आणि त्यांच्या कृती सांगणार आहे. की जे पदार्थ तुम्ही सहज प्रवासात बरोबर नेऊ शकता आणि राहण्याच्या ठिकाणी सुद्धा सोप्या पद्धतीने शिजवू शकता. सगळ्यात  पंचाईत येते ती लहान बाळांची म्हणून खास ६ महिने ते दोन वर्षाच्या मुलांपर्यंत चालणारे पदार्थ.

(अ)  सातूचे पीठ :-

साहित्य

गहू –             १वाटीभरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात.
हरभरा डाळ – १ वाटी प्रथिने व कॅल्शियम याच्यात जास्ती असते.

# कृती :-

(१) गहू आणि हरभरा स्वच्छ करून घेणे.(मुलांसाठी वापरत असल्यामुळे स्वच्छ धुऊन, वाळवून घेतले तरी चालेल, ( टिकून ठेवण्यासाठी लावलेली पावडर निघून जाण्यास मदत होईल.)

(२) त्यानंतर गहू व हरभऱ्याची डाळ छान गुलाबी होईपर्यंत भाजणे.

(३) भाजून गार झाल्यावर मिक्सर वरती बारीक पीठ करून घेणे. हे झाले तुमचे सातूचे पीठ.

Thoughts for food :-

(१) हे तयार पीठ तुम्ही गुळ, दूध, तूप, वेलदोडा घालून सरबरीत करून मुलांना देऊ शकता. भाजून घेतल्यामुळे शिजवण्याची गरज नाही व पचण्यास सुद्धा सोपे होते.

(२) जर तुम्ही प्रवास करत असाल आणि दूध घेऊन जाता येत नसेल तर तुम्ही दुधाची पावडर आणि पाणी मिसळून देऊ शकता.

(३) मुलं जर गोड खात नसतील तर जिरेपूड, मीठ व पाणी घालून तयार मिश्रण मुलांना देता येत.

(ब)  चिवडा

साहित्य

चुरमुरे   :- १५ ग्रॅम पचण्यास हलके.
शेंगदाणे :- ५ ग्रॅम स्निग्धता मिळवून देतात त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू असतात.
फुटाणे   :- ५ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
जिरेपूड :- २ ग्रॅमतंतूंचे प्रमाण जास्त असते व उन्हाळ्यात थंडावा देण्यास मदत होते.
साखर    :- गरजे नुसारतातडीची ऊर्जा मिळते.
मीठ       :- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स चे संतुलन नीट होण्यास सहाय्यक.
तेल        :- ५ ग्रॅमओईल सोल्युबल विटामिन्स असतात.

# कृती :-

(१) चुरमुरे नीट भाजून कुरकुरीत करून घ्या.

(२) तेल गरम करून त्यात जिरे पूड, शेंगदाणे आणि फुटाणे खुसखुशीत गुलाबी होई पर्यंत परतुन घ्या.

(३) त्याच्यात भाजलेले चुरमुरे घालून चिवडा तयार करा.

(४) तयार झालेला चिवडा मिक्सरमधून काढून घ्या.

Thoughts for food :-

(*) हा चिवडा मुलांना कधीही देता येतो. बारीक केल्यामुळे त्यांना सहज खाता येतो. शिवाय दाणे, फुटाणे असल्यामुळे तात्पुरती भूक भागवता येते.

(क)  मोड आणलेल्या धान्यांचे पीठ :-

साहित्य

हिरवे मुग :- १० ग्रॅमयाच्यामध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असते. इतर विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात.
मटकी.    :-१० ग्रॅमयाच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतात.

# कृती :-

(१) प्रथम मूग मटकी धुवून बारा तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावी.

(२) नंतर मूग,मटकी उपसून मोडण्यासाठी सुती कापडात किंवा चाळणीत सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवावी.

(३) व्यवस्थित मोडल्यानंतर स्वच्छ रुमाल किंवा पंचा घेऊन त्यावर मटकी व मूग पसरून ठेवावेत. जोपर्यंत ते चांगले वाळत नाहीत तोपर्यंत.( सावलीत वाळवल्यास चालतील.)

(४) त्यानंतर त्यातून पाण्याचा अंश पूर्णपणे काढण्यासाठी कढईत चांगले भाजुन घ्या.

(५) तयार मिश्रण मिक्सर मधून काढा.

Thoughts for food :-

(*) मोड आल्या मुळे त्यातील पौष्टिक मूल्य वाढतात. त्यामुळे मुलांसाठी ते फायदेशीर आहे.

(*) बाहेर गेल्यावर राहण्याच्या ठिकाणी त्यात पाणी, मीठ यांचे मिश्रण करून जर तिथल्या स्वयंपाक घरात दिले. तर ते तुम्हाला पटकन शिजवून देऊ शकतात.

#  नोट्स  :-

  • वरील कृती मध्ये दिलेले प्रमाण अंदाजे घेतलेले आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांच्या गरजेप्रमाणे आपापले प्रमाण ठरवावे ही विनंती.
  • साधारण पाच ग्रॅम चा चमचा वापरल्यास प्रमाण ठरवण्यास सोपे जाईल.