Categories
महत्वाचे दिवस

मिसाइल मॅन!

१५ ऑक्टोबर १९३१ मध्ये त्याकाळच्या मद्रास प्रेसिडेंसि आणि आताच्या तामिळनाडू मध्ये असलेल्या रामेश्वरम या ठिकाणी एका कुटुंबामध्ये डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. भारताचे अंतराळ शास्त्रज्ञ … मिसाइल मॅन आणि सगळ्यात लोकप्रिय माजी राष्ट्रपती अशी त्यांची ओळख.  त्यांचा वाढदिवस “ जागतिक विद्यार्थी दिन ” म्हणून साजरा केला जातो आणि हाच दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणूनही साजरा केला जातो. कलाम म्हणलं तर डोळ्यासमोर उभं राहतं ते त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांची ओघवती वाणी. आज देखील त्यांची भाषणं ऐकली कि ती ऐकत  रहावी असंच वाटतं. 

डॉ.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस “ जागतिक विद्यार्थी दिन ” म्हणून साजरा केला जातो
Photo Credit – NDTV

आयुष्य कसं जगावं … स्वप्नं कशी पाहावीत.. आणि ती पूर्ण करताना अपयश आलेच तर त्याला कसे सामोरे जावे हे सगळं शिकवणारं त्यांचं आयुष्य. विद्यार्थ्याना मागदर्शन करण्यात रमणारे असे आपले सर्वांचे लाडके डॉ.अब्दुल कलाम. जगविख्यात असून देखील आणि खूप पुरस्कार मान सन्मान मिळून देखील त्यांच्या वर्तना मध्ये कायम साधेपणा असायचा  हे आपण सगळ्यांनीच बघितलं. त्यांचे बालपण खूप कष्टामध्ये गेलं. समुद्रावर जाऊन बसलं कि त्यांचे लक्ष समुद्रावर उडणाऱ्या पक्ष्यांकडे जात असे..आणि त्यातूनच त्यांनाही त्यांच्या स्वप्नांची दिशा सापडली. 

आजकाल शाळांमध्ये  जे ज्ञान दिले जाते त्यापेक्षाही जास्त गरजेचे आहे ते म्हणजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या अनेक व्यक्तिमत्वाची माहिती आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांचा खडतर प्रवास हा मुलांना समजावून सांगण्याची.. आयुष्य जगावं कसं ? या प्रश्नाचं उत्तर या कीर्तिमान व्यक्तिमत्वांकडे बघितलं कि मिळतं. एक शास्त्रज्ञ असले तरी त्यांचा ईश्वरी निष्ठेवर पूर्ण विश्वास होता. त्यांना आपल्या देशाचा अभिमान होता भारत देशाला सर्वोच्च स्थानावर बघण्याची त्यांची आस होती त्याचाच ध्यास घेऊन त्यांनी भारताला अनेक क्षेपणास्त्र दिली. कलाम यांचे लिखाण वाचले तर  एक वेगळीच प्रेरणा मिळते. त्यांची जास्तीत जास्त पुस्तकं आपण वाचू आणि आपल्या मुलांना वाचावयास देऊ ,यापेक्षा अजून कुठली चांगली गोष्ट असू शकते?  

एक शिक्षक म्हणूनच त्यांना ओळखलं  जावं हीच अब्दुल कलामांची इच्छा होती. विद्यार्थ्याना प्रेरणा देणाऱ्या, नाविन्याचा ध्यास देणाऱ्या आणि भविष्यात स्वप्नं  बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत शिकत रहा, संघर्ष करा अशी चेतना निर्माण करणाऱ्या या थोर व्यक्तीचा अंत २७ जुलै २०१५ मध्ये  शिलॉंगला चालू असणाऱ्या एका व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच झाला. आपल्यातला तो एक तारा निघून गेला ज्याची जागा परत कधी कुणीच घेऊ शकत नाही. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून माझी शब्दांजली त्यांना समर्पित.