Categories
काही आठवणीतले

सुट्टीची गंम्मत सांगतोय समीहन

माझा मुलगा चि. समीहन ह्यांने सुट्टीत केलेली गंम्मत तो तुम्हाला सांगतोय. चला तर मग ऐकूयात त्याची सुट्टीची गंम्मत त्याच्याच शब्दांत.

नमस्कार मित्रांनो, मी सुट्टीत मुंबईला गेलो होतो. तिकडे माझी आजी राहते. मी तिकडे खूप मज्जा केली आणि मला जास्तीत जास्त गेटवे ऑफ इंडिया आवडला. मी तिकडे होडीत बसलो. मी अजून पण खूप गोष्टी पाहिल्या आणि तुम्हाला माहिती आहे का? मी भलीमोठी युद्धनौका पण पाहिली. तिथे मोठ्या मोठ्या cruise ship पण येतात. मी मत्स्यालय पाहिलं त्याचं खरं नाव होतं तारापोरवाला मत्स्यालय. मी अजून कुठेतरी गेलो होतो. ते म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. अजून काही पाहिजे असेल तर, हे बघा! मी तिकडे जादू पण शिकलो. माझ्या गुरूंचे चे नाव कृती आहे. मी जादू मध्ये शिकलो की, माझी जादूची कांडी काही नसलेल्या हातातून अचानक कशी आणायची, छोट्या छोट्या तीन रंगीत गोंड्यातून अचानक एक नवीन गोंडा आणायचा, वेगवेगळ्या length च्या माकडांच्या शेपट्या जादू करून सगळ्या एकसारख्या length च्या करायच्या. आता ही झाली माझी मुंबईची ट्रिप.

त्याच्या नंतर मी सिद्धेश्वर ट्रेन पकडली आणि सोलापूरला आलो. सध्या मी इकडे पण मज्जा करतोय. मुंबई सारखच मी सोलापूर मध्ये पण मज्जा केली. मी तिकडे आईस्क्रीम खाल्ले अजुन मी सिद्धेश्वर मंदिराला गेलो होतो. मुंबईमध्ये आणि सोलापूर मध्ये मी खूप मजा केली पण मी फक्त थोड्याशाच लिहिल्या. ही झाली माझी सोलापूरची ट्रीप.

झुकू झुकू आगीन गाडी ……….

 त्याच्यानंतर मी  हुतात्मा एक्सप्रेस पकडली आणि पुण्याला आलो. नंतर मी पोहायला जायला लागलो( म्हणजे त्याला असे सांगायचे आहे की, तो basic पोहायला शिकला ). दहा दिवसातच मी पोहण्याची पहिली लेवल पार केली. मला काही दिवसात पोहोण्याच सर्टिफिकेट मिळालं. मग त्याच्या नंतर तीन जूनला माझी शाळा सुरू झाली. मी आत्ता खूप काही नवीन शिकतोय आणि मी तिसरीत असल्यामुळे अभ्यास पण वाढला आहे. आता पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मी कुठे जाणार आहे ते माहीत नाही .जेव्हा मज्जा करिन तेव्हा परत तुम्हाला सांगेन. आत्ता पुरते टाटा.

तुम्हाला कशी वाटली समीहन ची सुट्टीची गंम्मत? नक्की कळवा आणि हो तुमच्या मुलांच्या अश्या गमती जमती भाव मराठी वर लिहायला विसरू नका .

Categories
काही आठवणीतले

माझ्या आठवणीतली उन्हाळ्याची सुट्टी

आली आली उन्हाळ्याची सुट्टी आली! आई -बाबांची गडबड सुरु झाली. कशी काय बुआ? अहो आता उन्हाळ्याचे शिबीर शोधा, मग मुलांना तिथे सोडा आणि आणा, एखाद्या खेळाचे कोचिंग क्लास शोधा, जमल्यास मुलांना सायकल, किंवा स्विमिंग असे काहीतरी शिकवा … एक ना दोन!

मीही त्यातलीच. शाळा संपायच्या मार्गावर होती आणि मी चौकशी सुरु केली. असाच विचार करत, हातात चहा चा कप घेऊन मी बाल्कनीत बसले होते, तोच माझा धाकटा मुलगा झोक्यात येऊन बसला. त्याला सहज विचारला तुला कुठल्या क्लासला जायच आहे? तोच त्याने मला साफ नकार दिला . मी काही करणार नाही असा म्हणाला आणि निघून गेला.

त्याच्या अश्या उत्तराने मी थोडी चकित झाले पण त्याच बरोबर तिथे चहा पिता पिता मी माझ्या उन्हाळयाच्या सुट्ट्यांच्या आठवणीत रमले.

आम्ही लहान होतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट बघायचो. सुट्टी खऱ्या अर्थाने निवांत आणि अनियोजित होती. सुट्टी लागली कि निवांत उठायचं, घरात काय थोडी कामं असतील ती करायची आणि खेळायला जायचं. तेव्हा काही ऊन लागायच नाही आणि मित्र मैत्रिणी एकत्र असले की तहान भूक ही लागायची नाही.

मग सूर्य डोक्यावर आला की प्रत्येकाच्या घरून हाक यायला सुरु व्ह्यायची. “अरे जेवायला येताय ना का डबा ऐसपैस खेळून पोट भरणार आहात?” अशी टिप्पणी आली की मात्र सगळे पसार व्हायचे! सुट्टीत आईचा ओरडा कशाला खा!

friends together in summer vacation

जेवण झालं की कलाकुसर किंवा वाचनाला ऊत यायचा. घरातले जुने पेपर, चिंध्या, गेल्या वर्षीची पुस्तके, जुनी मासिके, तुटलेले आभूषण, काचा, कवड्या हे सगळं आमचा खजिनाचं असायचा. ह्यातून काहीतरी नवीन बनवायचे एखादा किंवा नवीन खेळ तयार करायचा. ह्यात कुठेही घरातील मोठ्यांचा सहभाग होत नसे. एखादी शोभेची वस्तू किंवा उपयोगी वस्तू तयार झाली की केवढा तो आनंद व्हायचा!

गोष्टीचे पुस्तक, कादंबरी वाचायची वेगळीच गंमत होती. माझ्या बाबांना वाचनाची खूप आवड होती. ते माझ्यासाठी जवळच्या लायब्ररीमध्ये खाते उघडून द्यायचे. मला कुठल्या कादंबऱ्या आवडतील हे हि त्यांना माहित असायचं. ते लेखकांची नावे सुचवत. ते सोडून फूटपाथ वर सेकंड हॅन्ड पुस्तक मिळत, तिथे आम्ही तासंतास हिंडत राहायचो आणि एखादे चांगले पुस्तक मिळाले की भरून पावल्यासारख वाटायचं.

अजून एक उन्हाळ्याची गंमत म्हणजे, उन्हाळ्यात करण्यात येणारे पापड, कुर्डया. माझी आई ह्याचा फार काही घाट घालत नसे. ती आम्हाला घेऊन बटाट्याचा कीस आणि थोड्या कुर्डया करायची, पण त्यात सुद्धा अख्ख कुटुंब कामाला लागायचं. सकाळी उठून गच्चीत चादर, प्लास्टिक घालणे, बटाटे सोलणे, किस करणे, मग त्या सगळ्यावर नजर ठेवणे आणि संध्याकाळी खाली आणणे ह्या सगळ्यात आम्हा मुलांचा हातभार असायचा.

रात्र झाली कि रस्त्यावरची वाहने कमी व्हायची आणी मग तोच रास्ता आमच बॅडमिंटन कोर्ट व्हायचं. रात्री उशिरापर्यंत कधी बॅडमिंटन तर कधी पत्ते असा डाव रंगायचा. सोसायटी मध्ये सगळे एकाच आर्थिक आणि सांस्कृतिक श्रेणी मधले, म्हणून सगळ्यांच्या घरी एकसारख वातावरण. मग कोणाला चांगले मार्क मिळाले किंवा कोणाचा वाढदिवस असला कि आमची वडापाव आणि आइसक्रीमची पार्टी रंगायची.

Summer vacation travel plans.

ह्या सगळ्यात मग कट्ट्यावर बसून कधी सहलीचे बेत आखले जायचे, तर कधी चांदणी भोजनाचे, कधी सोसायटी फन फेअर ठरवायचो तर कधी चित्रकला स्पर्धा.

उन्हाळ्याच्या सुट्टीतच आजोळीही जाणं व्हायचं. तिथे सगळे आत्ते मामे भावंडं जमली कि गप्पा आणि मस्तीला ऊत यायचा.  झाडवरील बोरा, चिंचा आणि कैऱ्या तोडायला, पोटभर आंबे आणि फणस खाण्याची वेगळीच मजा असायची. ह्या सगळ्या मध्ये २ महिने कसे निघून जायचे कळायचं हि नाही.

“आई दूध दे, खेळायला जायचंय, “अशी हाक कानावर आली आणि मी वास्तव्यात आले. मी मनात हसले आणि लक्षात आलं अशी मुक्त आणि स्वछंदी उन्हाळ्याची सुट्टी घालवणार असेल तर नाही केला कुठला क्लास ह्या वर्षी तरी चालेल नाही का ?