Categories
कविता

त्या तीन बहिणी (कविता हिमालयाची)

बा हिमालया, मन मोहना,

 आभाळ भिड्या पर्वतमाथा !

 तुझ्या रूपाचा महिमा अपार,

 हिरव्याकंच ऐश्वर्याचा संभार,

 पूर्वांचलातील हा रंग बहार

 नजरेत मागता मावेना,

 पर्वत माता ते पर्वत पायथा,

 हिरव्यागार वनराईचे साम्राज्य,

 तुझ्या अंतःकरणातील ओलावा

 दऱ्याखोऱ्यातून वाहतो,

 तर कधी हिरवाई नवलाईत हरवते 

वळण वाटांवर विसावलेले तन-मन

 तुझ्या अद्भुत रूपात हरखते!

 निसर्गाचा रूप- रंग- रस, गंध बहार

 अंत:करणात उतरतो!

 निसर्गाच्या लयीत मन धुंद होते.

 आसामच्या निसर्ग सौंदर्याचे तुझे 

असीम मनोहर रूप मोहवते

 सिक्कीमचा प्रवासातील तुझे रूप,

 स्वतःच्याच मस्तीत झुलते.

 शेकडो झऱ्यांच्या रूपात 

स्वतःच्या अंगाखांद्यावर 

स्वतःलाच धारण करीत,

 चिंब- चिंब भिजणारे रूप

 धरणी मातेवर आनंदाचा वर्षाव करते.

 तुझ्या लक्षावधी वृक्षांची छत्रचामरे,

 धरणीमायच्या अंतःकरणाला सुखावते.

 काश्मीरच्या वाटेवर बर्फाच्छादित रूप 

मनाला फेन धवल बनवते.

 शुभ्रतेचा मुकुट धारण करून

 मानवी मन ही शुभ्रधवल व्हावे

 हेच का तू आम्हाला सुचवतोस?

 गंगा- यमुना- अलकनंदा, मंदाकिनी, तिस्ता,

 सिंधू- बियास- सतलज- रावी या साऱ्या 

तुझ्या रुपाची ची महिमा गाणाऱ्या कन्या 

यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे 

तुझ्या पितृ वत्सल रूपाला वंदन असो!

 चारीधाम यात्रेत, अध्यात्माचा स्पर्श करणारे तुझे रूप,

अंतकरणात साठवत माझ्या समोर लेह- लडाख

मधील तुझे विरक्त रूप मानवी 

जगण्याची फल:श्रुती सांगते!