Categories
खाऊगिरी पाककृती

होळी साठी थंड गार बीटचे सूप

आली आली होळी आली…

होळी रे होळी..पुरणाची पोळी!

अस म्हणायची वेळ आली, पण ह्या वेळी होळीचा रंग थोडा बेरंग झाला आहे ‘कोरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्गामुळे. भारतात तब्बल 40 केसेस आढळल्यामुळे सगळे सावधगिरी बाळगत आहेत आणि ह्यात काहीच गैर नाही पण घरातले चिमुकले मात्र ह्याने हिरमुसले असतील नाही का? आमच्या घरी सुद्धा तेच झालं.

“पण आम्ही थोडासा रंग खेळलो तर काय बिघडलं?” अश्या प्रश्नांची उत्तरे देऊन नाकी नऊ आले माझ्या! अश्या परिस्थितीत काय करावे हा प्रश्न होता माझ्या समोर. आमची काळजी योग्यच होती, पण त्यांचा हिरमुसलेला चेहेरा ही बघवत नव्हता.

कॊरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्ग हवेतून आणि एखाद्याच्या सहवासात आल्यामुळे होत असल्याने आम्हाला गर्दीचे ठिकाण टाळायचे होते. अगदी सोसायटी मध्येच खेळायचे ठरवले तरी 50-60 लोक सहज जमतील. बाहेर कुठे जाऊन खेळायचा तर प्रश्नच नाही! 

पण म्हणून ह्या वेळी मी एक युक्ती केली आहे. 

मुलीच्या मैत्रिणींना एकत्र करून त्यांना रंगीत खाऊ आणायला सांगितला आहे. प्रत्येकानी रंगीत खाऊ घेऊन यायचा आणि सगळ्यांनी एकत्र बसून तोच खायचा! होळी themed प्रीतिभोजन ! 

मुली एकदम खुश झाल्या! त्यांना म्हंटलं “ प्रीतिभोजनच्या आधी फुलांच्या पाकळ्यांनीं थोड घरीच खेळा आणि मग जेवूया”

आता ह्या आहेत चौघी जणी, म्हणून प्रत्येकाला 1 पदार्थ सांगितले आहेत! सगळ्यांच्या आया एकदम जोशात आहेत आणि फार मस्त प्रकार करणार आहेत. एकीची आई पुरणपोळी तर दुसरीची आई पालक पुरी करत आहे. तिसरी मैत्रीण गाजर हलवा आणत आहे! आमच्या घरी म्हणाल तर बीट आणि नारळ चे सूप मी केले आहे. नवल वाटलं ना? 

मी पण हे  सूप पहिल्यांदाच केले आणि ते सगळ्यांना खूप आवडले सुद्धा! विशेष म्हणजे हे सूप तुम्ही गरम किंवा गार सुद्धा सर्व करू शकता!

मी त्याची विधी खाली विस्तृत पणे दिलेली आहे, मग जरूर करून पहा, होळी साठी गार बीटचे सूप

होळी साठी थंड गार बीटचे सूप

नारळाचे दूध  घालून बीटचे सूप

१ बीट – उकडलेला 

१ वाटी  नारळाचे दूध 

१/२ इंच  आले 

१/२ हिरवी मिरची 

१/२ कांदा चिरलेला 

२ टी -स्पून तेल 

कृती 

प्रथम एका  पॅन मध्ये तेलावर  कांदा, आले, मिरची चांगले परतून घ्यावे 

हे मिश्रण गार झाले की बीटाचे बारीक काप करून ह्या वरील मिश्रणा बरोबर मिक्सर वर पाणी घालून बारीक करून घ्यावे. 

बीटचे हा रस गाळून घ्यावा.

ह्यात नारळाचे दूध, चवी पुरते मीठ आणि मिरपूड घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी 

हे सूप तुम्ही असेच गरम सर्व्ह करू शकता किंवा ह्या मुलींसाठी जस मी केला आहे तसं फ्रिज मध्ये ठेवून गार पण सर्व्ह करू शकता . 

आवडत असल्यास ह्यात सर्व्ह करताना थोडा लिंबू पिळावा. 

तुमचे नारळाचे दूध घालून केलेले healthy बीटचे सूप तयार आहे !

कसा वाटला बेत?   

तुम्हचे ह्या वर्षी काय प्लॅन्स आहेत? तुमचीपण अशी आगळी वेगळी होळी असणार आहे का ? तस असेल तर नक्की कळवा 🙂

तो पर्यंत स्वस्थ राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या!

Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग 2

नमस्कार मैत्रिणींनो, काय निघालात ना गावाला? मागील भटकंतीच्या भागात आपण लहान बाळांना (सहा महिने ते दोन वर्ष) चालतील असे काही पदार्थ पाहिले. या भागात आपण तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना चालतील असे पदार्थ बघणार आहोत.

बरेचदा असं होतं की, आपण साईट सीन बघायला जातो पण तिथे उशीर होतो आणि आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळेस मुलांना मध्येच भूक लागते. कित्येकदा बाहेर मुलांच्या आवडीचे पदार्थ मिळतच नाही किंवा शोधायला वेळ लागतो. तेव्हा तहान लाडू भूक लाडू बरोबर असलेले बरे.

(अ ) नाचणीचे लाडू :-

नाचणी   :-२० ग्रॅमभरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त.
काजू      :- ५ ग्रॅम प्रथिनांचा साठा असतो.
बदाम      :- ५ ग्रॅमप्रथिनांन बरोबर तंतू सुद्धा असतात त्यामुळे भूक भागते.
वेलदोडा   :- २ ग्रॅमथंडावा देतो आणि चवही उत्तम.
खारीक     :- २ ग्रॅमरक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.
साखर       :- गरजे नुसार तातडीची ऊर्जा मिळते.
तूप           :- १० ग्रॅमस्निग्धता आणि त्याच बरोबर oil soluble vitamin मिळतात.

(*) कृती :-

 1. प्रथम नाचणीचे पीठ तुपावर छान भाजून घ्या.
 2. त्यानंतर काजू, बदाम, खारीक  (त्यातील बी काढून छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे मिक्सर मधून काढण्यास सोपे जाईल.) यांची मिक्सर मधून पूड करून घ्या.
 3. वरील केलेली सर्व पूड तुपावर भाजून घ्या.
 4. आता वरील सर्व पदार्थ एकत्र करून घ्या.
 5. गरजेनुसार (प्रत्येकाचे साखरेचे प्रमाण वेगवेगळे असते कोणाला गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं त्यानुसार ज्याचे त्याने ठरवावे.) त्यात पिठीसाखर घालून सगळं मिश्रण एकत्रित हलवून लाडू वळा.

Thought for food :-

 • नाचणीचे पीठ वापरण्याच्या ऐवजी त्याएवजी तुम्ही मुगाचे पीठ वापरून बाकी सर्व साहित्य तेच घालून मुगाचे लाडू सुद्धा बनवू शकता.

(ब) राजाराणी :-

शेंगदाणे :- २० ग्रॅमस्निग्धता मिळवून देतात. त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू सुद्धा असतात.
फुटाण्याची डाळ:- २ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
कढीपत्ता  :- ५ ग्रॅमफॉस्फरसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे व दात बळकट होण्यास मदत होते.
हिंग   :- ३ ग्रॅम उत्तम मिनरल्सचा साठा व लोहाचे प्रमाण जास्त असते.
तेल   :- ५ ग्रॅमठराविक विटामिन्स तेलातून मिळतात.
मीठ:- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स संतुलन नीट ठेवण्यास मदत.
साखर  :- गरजे नुसारInstant energy मिळते.
तिखट :- गरजे नुसार

(*)कृती :-

 1. प्रथम दाणे व फुटाणे भाजून घ्यावेत भाजल्यानंतर त्याची सालं काढून घ्यावीत.
 2. तेल गरम करून त्यात हिंग व कढीपत्ता घाला. (कडीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर तळावा.)
 3. वरील मिश्रणात भाजलेले फुटाणे आणि दाणे घालून ते छान खुसखुशीत होईपर्यंत परता.
 4. गरजेप्रमाणे त्यात मीठ, तिखट व साखर घाला.

Thought for food :-

 • साधारणपणे आमटी किंवा पोह्यात घातलेला कडीपत्ता आपण बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याऐवजी तो आपण बारीक चिरून घातल्यास बाहेर काढता येत नाही व त्यातले गुणधर्म आपल्याला मिळतात.
 • राजाराणी या पदार्थात आपल्या आवडीनुसार त्यात जिरे / धने किंवा चाट मसाला घालू शकता.
Instant upma is a delicious option while traveling

(क )  इंस्टंट उपमा :-

जाड रवा             :- ३० ग्रॅमपचायला सोपे आणि पोटभरीचे.
कांदा                 :- १० ग्रॅमतंतू व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. उन्हाळ्यात फायदेशीर
आहे.
गाजर                :- १० ग्रॅमविटामिन ए भरपूर प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांसाठी
उपयुक्त.
कोथिंबीर            :- ५ ग्रॅमऔषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
फोडणीचे साहित्य:-गरजे नुसार

(*) कृती :-

 1. रवा चांगला भाजून घ्या व बाजूला काढून ठेवा.
 2. नंतर तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा तपकिरी रंगावर येईस्तोवर परतून घ्या. म्हणजे त्यातील सगळा पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल व टिकण्यासाठी सोपे होईल.
 3. गाजर किसून उन्हात ठेवल्यास त्यातील पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल. कोथिंबीर सुद्धा अशीच वाळवून घ्या.
 4. आता तेल गरम करून त्यात फोडणी करून घ्या. फोडणीमध्ये वाळलेला कडीपत्ता घालावा.
 5. फोडणी गार झाल्यानंतर त्यात परतलेला कांदा, वाळलेलं गाजर आणि भाजलेला रवा घालावा. शेवटी साखर मीठ घालून नीट हलवून ठेवावं.
 6. हा इन्स्टंट उपमा नंतर लागेल तेव्हा गरम पाणी घालून पटकन शिजवता येतो.

Thought for food :-

 • ह्या झटपटीत उपम्यामध्ये  तुम्हाला लागेल तसे शेंगदाणे, काजू आणि यासारख्या इतर गोष्टी घालून त्याची पौष्टिक मूल्ये वाढवू शकता.
Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग १

नमस्कार मैत्रिणींनो, आला उन्हाळा आला. मग काय झालं का? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन. म्हणजेच भटकंतीचे नियोजन? कुठे जायचं? ट्रेनची तिकीट, की विमान प्रवास. लागणाऱ्या सामानाची जमवा जमव. त्यातून लहान मुलं बरोबर असतील, तर मग खूप विचार आणि नियोजनाची आवश्यकता आहे.

मुलांचे सामान, नवीन ठिकाणी जाऊन मुलं काय खातील. प्रवासात त्यांची खायची चिंता. त्यातून प्रवास लांबचा असेल तर, मग काय करायचं? हे सतत चे पडणारे प्रश्न. हे सगळे प्रश्न मला नेहमी पडतात. तुम्हाला पण पडत असतीलच. चला तर मग शोधूयात या प्रश्नांची उत्तरं. या लेखातून आज मी तुम्हाला असे काही पदार्थ आणि त्यांच्या कृती सांगणार आहे. की जे पदार्थ तुम्ही सहज प्रवासात बरोबर नेऊ शकता आणि राहण्याच्या ठिकाणी सुद्धा सोप्या पद्धतीने शिजवू शकता. सगळ्यात  पंचाईत येते ती लहान बाळांची म्हणून खास ६ महिने ते दोन वर्षाच्या मुलांपर्यंत चालणारे पदार्थ.

(अ)  सातूचे पीठ :-

साहित्य

गहू –             १वाटीभरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात.
हरभरा डाळ – १ वाटी प्रथिने व कॅल्शियम याच्यात जास्ती असते.

# कृती :-

(१) गहू आणि हरभरा स्वच्छ करून घेणे.(मुलांसाठी वापरत असल्यामुळे स्वच्छ धुऊन, वाळवून घेतले तरी चालेल, ( टिकून ठेवण्यासाठी लावलेली पावडर निघून जाण्यास मदत होईल.)

(२) त्यानंतर गहू व हरभऱ्याची डाळ छान गुलाबी होईपर्यंत भाजणे.

(३) भाजून गार झाल्यावर मिक्सर वरती बारीक पीठ करून घेणे. हे झाले तुमचे सातूचे पीठ.

Thoughts for food :-

(१) हे तयार पीठ तुम्ही गुळ, दूध, तूप, वेलदोडा घालून सरबरीत करून मुलांना देऊ शकता. भाजून घेतल्यामुळे शिजवण्याची गरज नाही व पचण्यास सुद्धा सोपे होते.

(२) जर तुम्ही प्रवास करत असाल आणि दूध घेऊन जाता येत नसेल तर तुम्ही दुधाची पावडर आणि पाणी मिसळून देऊ शकता.

(३) मुलं जर गोड खात नसतील तर जिरेपूड, मीठ व पाणी घालून तयार मिश्रण मुलांना देता येत.

(ब)  चिवडा

साहित्य

चुरमुरे   :- १५ ग्रॅम पचण्यास हलके.
शेंगदाणे :- ५ ग्रॅम स्निग्धता मिळवून देतात त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू असतात.
फुटाणे   :- ५ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
जिरेपूड :- २ ग्रॅमतंतूंचे प्रमाण जास्त असते व उन्हाळ्यात थंडावा देण्यास मदत होते.
साखर    :- गरजे नुसारतातडीची ऊर्जा मिळते.
मीठ       :- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स चे संतुलन नीट होण्यास सहाय्यक.
तेल        :- ५ ग्रॅमओईल सोल्युबल विटामिन्स असतात.

# कृती :-

(१) चुरमुरे नीट भाजून कुरकुरीत करून घ्या.

(२) तेल गरम करून त्यात जिरे पूड, शेंगदाणे आणि फुटाणे खुसखुशीत गुलाबी होई पर्यंत परतुन घ्या.

(३) त्याच्यात भाजलेले चुरमुरे घालून चिवडा तयार करा.

(४) तयार झालेला चिवडा मिक्सरमधून काढून घ्या.

Thoughts for food :-

(*) हा चिवडा मुलांना कधीही देता येतो. बारीक केल्यामुळे त्यांना सहज खाता येतो. शिवाय दाणे, फुटाणे असल्यामुळे तात्पुरती भूक भागवता येते.

(क)  मोड आणलेल्या धान्यांचे पीठ :-

साहित्य

हिरवे मुग :- १० ग्रॅमयाच्यामध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असते. इतर विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात.
मटकी.    :-१० ग्रॅमयाच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतात.

# कृती :-

(१) प्रथम मूग मटकी धुवून बारा तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावी.

(२) नंतर मूग,मटकी उपसून मोडण्यासाठी सुती कापडात किंवा चाळणीत सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवावी.

(३) व्यवस्थित मोडल्यानंतर स्वच्छ रुमाल किंवा पंचा घेऊन त्यावर मटकी व मूग पसरून ठेवावेत. जोपर्यंत ते चांगले वाळत नाहीत तोपर्यंत.( सावलीत वाळवल्यास चालतील.)

(४) त्यानंतर त्यातून पाण्याचा अंश पूर्णपणे काढण्यासाठी कढईत चांगले भाजुन घ्या.

(५) तयार मिश्रण मिक्सर मधून काढा.

Thoughts for food :-

(*) मोड आल्या मुळे त्यातील पौष्टिक मूल्य वाढतात. त्यामुळे मुलांसाठी ते फायदेशीर आहे.

(*) बाहेर गेल्यावर राहण्याच्या ठिकाणी त्यात पाणी, मीठ यांचे मिश्रण करून जर तिथल्या स्वयंपाक घरात दिले. तर ते तुम्हाला पटकन शिजवून देऊ शकतात.

#  नोट्स  :-

 • वरील कृती मध्ये दिलेले प्रमाण अंदाजे घेतलेले आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांच्या गरजेप्रमाणे आपापले प्रमाण ठरवावे ही विनंती.
 • साधारण पाच ग्रॅम चा चमचा वापरल्यास प्रमाण ठरवण्यास सोपे जाईल.