Categories
संस्कार

भव्यसिंदूर लेपना हनुमान

दिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा।पातालदेवताहंता भव्यसिंदूर लेपना ।।३।।

( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक तिसरा.)

जो दीन भक्तांचा, गरिबांचा पालन करणारा आहे. हरिकृपा म्हणजेच जो श्रीरामाचा सेवक आहे. जो सुंदर देखणा आहे. जगदंतरा याचा अर्थ जो पारलौकिक (परलोक)आहे. पातळातल्या दुष्ट शक्तींचा नाश करणारा पातालदेवताहंता आहे. जो अंगावर सगळीकडे कुंकूवाचा (सिंदूर) लेप लावलेला आहे. असा आपला सगळ्यांचा लाडका हनुमान बाप्पा. पण हे असं का बरं म्हणत असतील? भव्यसिंदूर लेपना. काय कारण असेल हनुमंताला असे म्हणण्या मागे त्याच्या पाठीमागे सुद्धा कथा आहे.

रावणवधानंतर सर्व मंडळी आयोध्या पोहोचली. श्रीराम राज्याभिषेक झाला आणि रामराज्य सुरू झालं. त्यानंतर सुग्रीव, बिभीषण आपल्या राज्यात परतले पण हनुमान श्रीरामा बरोबर अयोध्येतच राहिला. श्रीरामच त्याचे माता, पिता, गुरु, मित्र सर्वकाही झाले. प्रभूची सेवा हाच त्याचा प्रथम धर्म होता. एके दिवशी तो माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना जाऊन भेटला आणि म्हणाला “तुम्ही माझ्या प्रभुंना तर लहानपणापासूनच बघता. तर आता तुम्हीच सांगा माझ्या प्रभुंना सगळ्यात जास्त काय आवडतं?” तिन्ही माता हनुमानास म्हणाल्या “आम्ही त्याच्या माता आहोत पण या प्रश्नाचे उत्तर तुला तुझी सीता माता देईल.”

मग हनुमान सीता मातेचे भेटावयास जातो. परत तोच प्रश्न हनुमंत विचारतो “सीता माते माझ्या प्रभुंना काय आवडते? तेव्हा माता म्हणाली “तुझ्या प्रभुंना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही. त्यांना स्वतःसाठी असे कधीच काही आवडले नाही. श्रीरामांनी नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आवडीचा विचार केला. हनुमान परत मनात विचार करू लागला “मग काय करायचं?” तेव्हाच सीता माता कपाळा वरती कुंकू लावत असते. ते पाहून हनुमंताला प्रश्न पडतो “माते हे तू कपाळा वरती कुंकू का लावते आहेस? मग सीता माता त्यास म्हणाली “हे मारुतीराया श्रीरामांशी माझे लग्न झाले आहे ना मग मी त्यांच्या नावाचे कुंकू कपाळावर लावते आणि माझ्या कपाळा वरचे कुंकू पाहून श्रीरामांना खूप आनंद होतो.”

मग काय! मारुतीरायाच्या सुपीक डोक्यात एक कल्पना चमकून जाते. काय बरं असेल ती कल्पना? त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागतात की, मातेच्या कपाळा वरचे एवढेसे कुंकू पाहून प्रभू आनंदित होतात. अख्खा मीच कुंकूवात न्हाऊन निघालो तर प्रभू खूपच खुश होतील.

त्यानंतर हनुमान बाप्पानी काय केलं असेल! ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मारुतीराया कुंकवा मध्ये नखशिखांत लेपून आला आणि राज दरबारात श्रीरामांना समोर उभा ठाकला. त्याचे हे रूप पाहून सगळे खो खो हसायला लागले.

ते पाहून हनुमान तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्र सुद्धा गेले. प्रभूंनी त्यास विचारले “हनुमान सगळे तुला हसले तुला वाईट वाटले का?” तेव्हा मारुती त्यांना म्हणाला “हो प्रभू मला वाईट वाटले पण ते सगळे मला हसले म्हणून नाही. माझ्यामुळे तुमचे हसू झाले याचे मला अतिव दुःख आहे.”

हनुमानाची ही निस्सीम भक्ती प्रभुं पर्यंत पोहोचली. म्हणूनच श्रीरामा शिवाय हनुमान नाही आणि हनुमान शिवाय श्रीराम नाही. त्यासाठीच आपण म्हणतो ना –

रामदासीं अग्रगण्य कपिकुळासि  मंडणू।रामरुपी अंतरात्मा दर्शने  दोष नासती।।१७।।

( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक सतरावा. )