Categories
खाऊगिरी पाककृती

होळी साठी थंड गार बीटचे सूप

आली आली होळी आली…

होळी रे होळी..पुरणाची पोळी!

अस म्हणायची वेळ आली, पण ह्या वेळी होळीचा रंग थोडा बेरंग झाला आहे ‘कोरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्गामुळे. भारतात तब्बल 40 केसेस आढळल्यामुळे सगळे सावधगिरी बाळगत आहेत आणि ह्यात काहीच गैर नाही पण घरातले चिमुकले मात्र ह्याने हिरमुसले असतील नाही का? आमच्या घरी सुद्धा तेच झालं.

“पण आम्ही थोडासा रंग खेळलो तर काय बिघडलं?” अश्या प्रश्नांची उत्तरे देऊन नाकी नऊ आले माझ्या! अश्या परिस्थितीत काय करावे हा प्रश्न होता माझ्या समोर. आमची काळजी योग्यच होती, पण त्यांचा हिरमुसलेला चेहेरा ही बघवत नव्हता.

कॊरोनो’ किंवा COVID-19 च्या संसर्ग हवेतून आणि एखाद्याच्या सहवासात आल्यामुळे होत असल्याने आम्हाला गर्दीचे ठिकाण टाळायचे होते. अगदी सोसायटी मध्येच खेळायचे ठरवले तरी 50-60 लोक सहज जमतील. बाहेर कुठे जाऊन खेळायचा तर प्रश्नच नाही! 

पण म्हणून ह्या वेळी मी एक युक्ती केली आहे. 

मुलीच्या मैत्रिणींना एकत्र करून त्यांना रंगीत खाऊ आणायला सांगितला आहे. प्रत्येकानी रंगीत खाऊ घेऊन यायचा आणि सगळ्यांनी एकत्र बसून तोच खायचा! होळी themed प्रीतिभोजन ! 

मुली एकदम खुश झाल्या! त्यांना म्हंटलं “ प्रीतिभोजनच्या आधी फुलांच्या पाकळ्यांनीं थोड घरीच खेळा आणि मग जेवूया”

आता ह्या आहेत चौघी जणी, म्हणून प्रत्येकाला 1 पदार्थ सांगितले आहेत! सगळ्यांच्या आया एकदम जोशात आहेत आणि फार मस्त प्रकार करणार आहेत. एकीची आई पुरणपोळी तर दुसरीची आई पालक पुरी करत आहे. तिसरी मैत्रीण गाजर हलवा आणत आहे! आमच्या घरी म्हणाल तर बीट आणि नारळ चे सूप मी केले आहे. नवल वाटलं ना? 

मी पण हे  सूप पहिल्यांदाच केले आणि ते सगळ्यांना खूप आवडले सुद्धा! विशेष म्हणजे हे सूप तुम्ही गरम किंवा गार सुद्धा सर्व करू शकता!

मी त्याची विधी खाली विस्तृत पणे दिलेली आहे, मग जरूर करून पहा, होळी साठी गार बीटचे सूप

होळी साठी थंड गार बीटचे सूप

नारळाचे दूध  घालून बीटचे सूप

१ बीट – उकडलेला 

१ वाटी  नारळाचे दूध 

१/२ इंच  आले 

१/२ हिरवी मिरची 

१/२ कांदा चिरलेला 

२ टी -स्पून तेल 

कृती 

प्रथम एका  पॅन मध्ये तेलावर  कांदा, आले, मिरची चांगले परतून घ्यावे 

हे मिश्रण गार झाले की बीटाचे बारीक काप करून ह्या वरील मिश्रणा बरोबर मिक्सर वर पाणी घालून बारीक करून घ्यावे. 

बीटचे हा रस गाळून घ्यावा.

ह्यात नारळाचे दूध, चवी पुरते मीठ आणि मिरपूड घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी 

हे सूप तुम्ही असेच गरम सर्व्ह करू शकता किंवा ह्या मुलींसाठी जस मी केला आहे तसं फ्रिज मध्ये ठेवून गार पण सर्व्ह करू शकता . 

आवडत असल्यास ह्यात सर्व्ह करताना थोडा लिंबू पिळावा. 

तुमचे नारळाचे दूध घालून केलेले healthy बीटचे सूप तयार आहे !

कसा वाटला बेत?   

तुम्हचे ह्या वर्षी काय प्लॅन्स आहेत? तुमचीपण अशी आगळी वेगळी होळी असणार आहे का ? तस असेल तर नक्की कळवा 🙂

तो पर्यंत स्वस्थ राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या!

Categories
आरोग्य

बहुउपयोगी धातू

चणे खावे लोखंडाचे। दूध प्यावे सोन्याचे।। भाग एकभाग दोन च्या चांगल्या प्रतिसाद बद्दल मनापासून आभार. त्यामध्ये आपण विविध बहुउपयोगी धातू व त्यांचे शरीरात होणारी कार्ये पाहिली. हे धातू आहारात समाविष्ट करण्याच्या काही पद्धतींचा उल्लेख त्या दोन भागांमध्ये आहे. त्याच पद्धती आता जरा विस्तारात बघू.

लोखंड (लोहयुक्त पदार्थ):-

 • भारतीयांचा प्रमुख आहार हा तृणधान्ये (cereals) याच्यावर अवलंबून असतो जसे गहू, मका, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी या सगळ्यांमध्ये लोह सापडते.
 • मांसाहारी पदार्थ जसे मांस, मासे, अंडी, इत्यादींमध्ये लोह सापडते.
 • जास्ती लोह असणाऱ्या पालेभाज्या जसे की चवळी, पालक, मोहरीची पाने, पुदिना, मुळ्याची पाने, शेपू, धोप्याची वाळलेली पाने.
 • पण फळं भाज्यांमध्ये म्हणाल तर टमाटो, हिरव्या शेंगा, बटाटे.
 • बाळंतिणीचे आळीवाचे लाडू तर सगळ्यांना माहीत असतीलच अळीवात अगदी उत्तम प्रकारे लोह असते पण त्याचे लाडू सगळ्यांनाच आवडतात असे नाही. त्यासाठी आळीवाचा वापर फोडणीत करून बघा हा एक उत्तम पर्याय आहे.
 • मसाल्याचे पदार्थ – तीळ, हिंग, आमचूर, पिंपळी, खसखस, हळद.
 • फळांमध्ये म्हणाल तर करवंद, केळी, टरबूज, सीताफळ, पेरू, खजूर.

 Dietitian special

 • मागील भागात मी तुम्हाला पदार्थ करताना लोखंडाची कढई वापरा तसेच त्यात लिंबू घातल्यास त्यामध्ये लोखंडाचे प्रमाण जास्ती वाढण्यास मदत होते असे सांगितले आहेच.
 • घरच्या घरी iron fortified पोळी बनवायची असेल तर लोखंडी तव्याचा वापर करावा.
 • त्याचबरोबर आपल्या शरीरात लोह शोषून घ्यायला व त्याचे पचन व्हायला vitamin C  ची आवश्यकता असते म्हणून वरील सर्व उपाय वापरताना त्याबरोबर लिंबू, संत्र, मोसंबी, आवळा, मोड आलेली कडधान्ये याचा सुद्धा वापर आपल्या आहारात करावा.

चांदी (silver):- 

 • चांदी आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी चांदीच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी उठून प्यावे.
 • आहारात चांदी मिळवण्याचा अजून एक पर्याय म्हणजेच चांदीचा वर्ख. घरच्या मिठाईवर हा वर्ख लावून तुम्ही चांदी मिळवू शकता. शुद्ध चांदीचा वर्ख कसा ओळखावा? त्याचे घरगुती सोपे उपाय तुम्ही चणे खावे लोखंडाचे भाग-1 मध्ये  वाचले असतीलच. 

सोनं (gold):-

Health Tips - Milk of Gold
 • शुद्ध सोनं मिळवण्याचे उपाय जसे की आयुर्वेदिक तत्वानुसार लहान मुलांना आपण जी बालगुटी देतो. त्याच्यात इतर सामग्री बरोबर शुद्ध सोन्याचा एक वेढा उगाळावा.
 • सुवर्णसिद्ध जल ह्या प्रकाराने सुद्धा आपल्या शरीरात सोनं मिळता येत. सुवर्णसिद्ध जल बनवण्याची पद्धत तुम्हाला चणे खावे लोखंडाचे भाग दोन मध्ये सापडेलच.
 • हल्ली सोनं सेवनाचे फायदे अनेकांना पटल्यामुळे ठराविक आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये सुवर्णप्राशन केले जाते.( ह्या संदर्भात अधिक माहिती साठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

तांब (copper):-

 • Copper च्या सेवनामुळे होणारे फायदे आपण मागील भागात पाहिले. तेच copper आहारात मिळवण्यासाठी हल्ली copper pipes वापरून तयार केलेले प्युरिफायर, त्यानंतर coper water bottles, तसेच जेवण वाढण्यासाठी ताट, वाटी. तयार अन्न काढून ठेवण्यासाठी copper ची भांडी सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा.
 • आपल्या रोजच्या खाद्यपदार्थ पासून सुद्धा तांब मिळवता येतं. मांसाहारी पदार्थ म्हणाल तर liver, shellfish, oysters, beef liver.  
 • काही शाकाहारी पदार्थांमधून तांब मिळतं जसं मसुराची डाळ, dark chocolate, मनुका, बदाम, सोयाबीन, लिंबाचे साल.

लोखंड, चांदी, सोनं, तांब ह्या सगळ्या स्त्रोत(sources) तुम्हाला विस्ताराने वाचता यावे म्हणून हा लेख लिहिला.कसा वाटला ते नक्की कळवा.

Categories
काही आठवणीतले

खाद्य भ्रमंती – गोष्ट जळगावच्या केळीच्या वेफर्सची !

यंदा दिवाळीत आम्ही सगळे माहेरच्या कुलदेवीला यावलला गेलो. भुसावळच्या पुढे यावल हे छोटेसे गाव आहे…. नाशिक धुळे रस्ता तर मस्तच, पुढे मात्र खूपच खड्डे… जळगावच्या पुढे भुसावळ आणि मग यावल चा रस्ता…. जळगाव तर केळींसाठी प्रसिद्धच!!! रस्त्याच्या दुतर्फा केळीच्या बागा डोळ्यांना सुखावत होत्या…
रस्त्यावर एक छोटीशी टपरी दिसली…. केळ्याच्या वेफर्सची…. आम्ही सगळे कुतूहल म्हणून खाली उतरून बघू लागलो…. त्या टपरीत एक जोडपे होते. तिथे शेड मध्ये… त्या ताई… मागच्या बाजूला ताजे वेफर्स करत होत्या आणि दादा बाहेर रस्त्यावर त्या गरम वेफर्सना तिखट मीठ लावून वजन करून विकत होता…ताज्या वेफर्सच्या वासाने जीभेला अगदी पाणी सुटले होते…

फोटो क्रेडिट- सुज्ञा.


सहाजिकच तायडे ताईशी गप्पा सुरु झाल्या.. रोज केळीच्या बागेतून कमीत कमी अर्धा क्विंटल किलो केळी आणून ते वेफर्स तयार करतात आणि फक्त जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना ते विकतात…. season मध्ये अजूनही आणतात… पण कोणत्याही दुकानात हॉटेल मध्ये नाही तर लागेल तसे रस्त्यावरच ते समोर तळून देतात… चुलीवरच्या कढईत! रोज त्यांना 10 ते 15 लिटर तेल लागते. चुलीची धग दिवसभर चालूच…. केळीची साले धारदार सोलण्याने पटापट काढून, ती तुरटीच्या पाण्यात टाकायची आणि मग किसणीने सपासप किसून कढईत डायरेक्ट सोयाबीन तेलात किसायची….बापरे!!!! इतक्या धारदार होत्या दोन्ही गोष्टी. मला भीतीच वाटली ..जेव्हा मी प्रयत्न केला वेफर्स करण्याचा तेव्हा!!!!😢 खरंच कमाल त्या बाईची, एकटी दिवसभर ते जोखमीचे काम करत होती…. हाताची बोटे पूर्ण काळी झालेली….संध्याकाळीच घरी जाऊन लिंबाने धुवायची…. सगळे काम दोघेच करणार… मदतनीस ठेवणे पण परवडत नाही… जवळच्या गावातून ते येतात… त्या ताई मला सहज जीवनाचा सार सांगून गेल्या… ” कष्टाविना पैसे नाही!!!! हाताला लागते बऱ्याचदा पण काय करणार… करावे लागते “… लागलेल्या बोटाना लिंबू लावताना किती वेदना होत असतील, या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला….
पण वाफर्सची चव मात्र कमालच होती….थोडी थोडके नाही तर तब्बल 6 किलो वेफर्स आम्ही घेतले….त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून मला खूपच छान वाटले.
दुकानामध्ये पुण्यात पण ताजी तळून मिळतातच पण तरीही मला ते सगळे live बघून निसर्गाच्या सानिध्यात विकत घेताना खूपच समाधान वाटले.

सहज जाता जाता!

सुज्ञा

Categories
खाऊगिरी पाककृती

खस खस खीर – उडूपी कर्नाटक येथील पारंपरिक पदार्थ

सण वार आले कि नवनवीन पदार्थ करण्याचा उत्साह येतो. आत्ताच दसरा झाला. नेहमीचे श्रीखंड- पुरी खाऊन मुलांना कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळे पदार्थ करायचे ठरवले. माझी आजी कर्नाटकची आहे, खरं तर दक्षिण कर्नाटक. त्यामुळे तिथले काही पारंपरिक पदार्थ आजी नेहमी करत असे. त्यातलाच एक पदार्थ जो मला खूप आवडतो तो म्हणजे खस-खस खीर. 

बनवायला एकदम सोपी आणि नावीन्य पूर्ण आणि हो healthy सुद्धा! अजून काय हवं नाही का ?

ह्या खीरीमध्ये अगदी जुजबी सामान लागतं जसं कि, खस – खस, ओला नारळ, तांदूळ, गूळ आणि सजावटीसाठी काजू बेदाणे. मी ही रेसिपी अजून थोडी healthy करावी म्हणून त्यात dry – fruits ( काजू , बदाम,अक्रोड, पिस्ता ) ची भरड घातली होती, पण ते तुमच्या मनावर आहे.

ह्या खीरीला उडूपी, कर्नाटक मध्ये गसगसे पायसा असे म्हणतात. ह्या खिरीची अगदी पहिली आठवण म्हणजे आजी कडे सुट्टीत गेलो कि सगळ्यांसाठी म्हणून ती गरमा गरम खीर करत असे. गप्पा मारता मारता कधी दोन वाट्या संपायच्या ते कळायचंच नाही. मग ती हसत म्हणायची “आता काय तुम्ही तुमच्या आईला त्रास देणार नाही थोडा वेळ! द्या ताणून खुशाल” (आईची आई ती-त्यामुळे तिला आपल्या मुलीची काळजी!)

आपल्या इथे मैला- मैलावर भाषा आणि खाद्यसंस्कृती बदलते. त्यामुळे ह्याच खिरीच्या अजून बऱ्याच पद्धती असतील, पण ह्या पारंपरिक रेसिपीची मला येत असलेली कृती खालील प्रमाणे आहे. 

खस-खस –  2 टेबलस्पून

तांदूळ – 4 टेबलस्पून

ओला नारळ- ½ वाटी

गूळ – ¾ वाटी

वेलचीपूड – चिमूट भर

पाणी – एक कप

दूध – एक कप

Dry fruits ची भरड- दोन चमचे

खस -खस खीरीची कृती

प्रथम एका कढईत खस – खस आणि तांदूळ घेऊन ते गुलाबी होई पर्यंत भाजून घ्यावे.  जरा त्याला मंद सुवास येऊ लागला कि गॅस लगेच बंद करावा, नाहीतर खस खस जळण्याची शक्यता असते. 

थंड  झाल्यावर मिक्सर मध्ये खस-खस, तांदूळ आणि ओला नारळ घालून वाटून घ्यावे. गरजे प्रमाणे  थोडे पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. 

एका कढईत पाणी आणि गूळ घालून, गूळ वितळून घ्यावा. गूळ -पाणी तयार झाले की त्यात खस -खस, नारळाची पेस्ट घालून शिजवून घ्यावे 

ह्या मिश्रणात वेलची पूड, dry-fruits ची भरड घालून एक उकळी काढावी.

आता हे मिश्रण जरा घट्टसर होऊ लागले कि त्यात थोडे पाणी आणि दूध घालावे. नंतर गरमा -गरम खायला द्यावे. हि खीर गार सुद्धा उत्तम लागते. 

टीप – दूध घातल्या नंतर खीर फार वेळ तापवू नका, दूध फुटण्याची शक्यता असते .  

आवडली का रेसिपी ? जरूर करून बघा आणि आपले अभिप्राय कळवा 🙂

Categories
आरोग्य

मधु गोलक :- मोदक

झाला ना! श्रावण संपत आला. आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. नुसतं बाप्पांचे आगमन एवढं जरी म्हटलं, तरी अंगात उत्साह संचारतो. बरचं काहीतरी आठवतं जे करायचं असतं. बाप्पांची मूर्ती, सजावटीचे सामान, पूजेचे सामान, बाकीच्या सामानाची जमवाजमव हो ना! सगळ्यात महत्त्वाचं तर राहुनच गेलं. काय? गणपती बाप्पांचा प्रसाद. तो तर राहिलाच ना. आपण सगळे जण आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्या लंबोदर गजाननाच्या प्रसादाची म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मधु गोलक नाही समजलं. अहो! मोदक.

आता सरळ विषयालाच हात घालते. आपल्याकडे तळलेला मोदक, खव्याचा मोदक, आजकाल तर चॉकलेटचे मोदक, पेढ्याचे मोदक सुद्धा मिळतात. पण आज मी तुम्हाला काही गमतीशीर गोष्टी सांगणार आहे. ते आपल्या पारंपारिक उकडीच्या मोदकांची.

उकडीचे मोदक व त्याच्या गमतीशीर गोष्टी :-

उकडीच्या मोदकांसाठी लागणारे सगळे जिन्नस तर तुम्हाला माहित आहेतच. ओला नारळ, खसखस, गुळ, तांदळाची पिठी, वेलदोडा इत्यादी. ह्या सगळ्या लागणाऱ्या सामानाच्या काही interesting fact.

 • ओला नारळ :- पावसाळा ऋतु आणि बाप्पांचं आगमन हे अगदी ठरलेले समीकरण. आता पावसाळा म्हटलं की सर्दी सारखे आजार आलेच. तर त्यावर उपाय म्हणून ओला नारळ. त्याचं कामच  आहे ते. म्हणजे ओला नारळ आपली प्रतिकारशक्ती वाढवतो व सर्दी पासून रक्षण करतो शिवाय तो iron शोषून घेऊन Hb वाढवण्यास मदत करतो.
 • खस-खस :- ही तर दिसायला खूप छोटी छोटी. पण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं असतं. अजून एक महत्त्वाचं कार्य खसखस करते. ते म्हणजे bad cholesterol कमी करून good cholesterol वाढवण्यास मदत करते.
 • गुळ :- गुळ म्हणजे गोडवा. आपल्या मधु गोलक मधील येणारी मधुरता ती या गुळा मुळेच. शिवाय त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह असते.
 • तांदळाची पिठी :- तांदळाच्या पिठाचे मऊ व लुसलुशीत मोदकांच्या वरचे आवरण. पचायला अगदी सोप्पे. तांदळाच्या पिठामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे blood clotting होण्यास मदत होते.
 • वेलदोडा :- हा तर नैसर्गिक mouth freshener. पावसाळ्यात सततच्या दमट हवेमुळे होणारा nausea दूर करणारा हाच तो वेलदोडा. हा motion sickness घालवायला सुध्दा मदत करतो.
 • जायफळ :- आपल्या मधु गोलकात घातले जाणारे जायफळ तर एकदम गुणकारी. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे होणारे त्रासाची कल्पना सर्वांना आहे. त्या सगळ्या त्रासाची सुटका करणारे जायफळ. Help to reduce diarrhoea.
 • केळीचे पान :- ते तुम्ही म्हणताना ‘last but not the least’.  उकड काढताना लागणारे केळीचे पान. आपल्याकडे मोदकाची उकड काढताना मोदकांच्या खाली केळीचे पान वापरण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीचे पान आपण कुठे खातो. ते तर फक्त उकड काढताना वापरतो. त्याचा काय उपयोग? पण त्या पद्धती मागचे कारण विचार करायला लावणारे आहे. केळीच्या पानांमध्ये polyphenols (पॉलिफिनॉल)नावाचा घटक असतो जो पदार्थ गरम करताना त्यात शोषला जातो आणि त्याच्या मुळे बऱ्याच lifestyle diseases  ना प्रतिबंध (prevent) होतो. उदाहरणार्थ- डायबिटीस.

तर अशा आहेत आपल्या सगळ्या उकडीच्या मोदकांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या गमतीशीर गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की वाचून कळवा.

Categories
पाककृती

एळनीर पायसम

सगळ्यांना सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!!

राखी हा भाऊ बहिणींचा सण….. त्यास आपण नारळी पौर्णिमा म्हणून पण साजरा करतो. मुख्यतः सागरी किनारपट्टी वरील लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. खवळलेल्या सागराला नारळ वाहून, राजा, सागरा आता शांत हो बाबा, आम्हाला आमची नाव आत समुद्रात घेऊन जायची आहे. त्यावरच आमचा पोटपाणी आहे. अशी विनवणी करतात. आपण मात्र नारळाचे तिखट-गोड पदार्थ बनवून सणाचा आनंद घेतो.
मराठी घरात मुख्यत्वे नारळाची वडी, नारळी भात, नारळाची खीर असे प्रकार बनतात. खूप वर्ष बंगलोरला राहिल्याने तिथले काही पदार्थ हे आता आमच्या जेवणाचा भाग बनला आहे.

आज मी तुम्हाला तिथला एक खिरीचा प्रकार दाखवणार आहे. त्या खिरीचे नाव आहे एळनीर पायसम, म्हणजेच शहाळ्याची खीर. खूप छान चव आणि करायला अगदी सोप्पी.

साहित्य
नारळाचे घट्ट दूध – १ कप
शहाळ्याचे पाणी – १/२ कप
शहळ्याची मलई -१ कप
कंडेन्सड मिल्क – ६ टेबले स्पूनस

कृती
नारळाचे दूध मी घरीच काढून घेतले. तुम्हाला अगदी वेळ नसल्यास किंवा जमत नसल्यास तयार कोकोनट मिल्क बाजारातून आणले तरी चालेल. नारळाचे दूध काढताना मी साधे पाणी न वापरता शहाळ्याचे पाणी वापरले तर त्याची चव अगदीच खास लागते. आता शहळ्याची मलई घेऊन त्याची मिक्सर मध्ये अगदी बारीक पेस्ट करावी. आता पेस्ट, नारळाचे दूध आणि कंडेन्सड मिल्क सर्व एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. म्हणजे छान मिसळले जातील. तुम्हाला हवे तसे कॅडेन्सड मिल्क आणि शाहळ्याच्या पाण्याचे प्रमाण adjust करू शकता. पण ही खीर जर घट्टच छान लागते. हवे असल्यास फ्रिजमध्ये ठेवून गार खीर सर्व्ह करा.
आम्ही जिथे सर्व प्रथम ही खीर खाल्ली त्यांनी ती short Glasses मध्ये सर्व्ह केली होती. नक्की करून बघा आणि आपल्या भावाला खुश करा.

Categories
खाऊगिरी पाककृती

तंबीटाचे लाडू

श्रावण महिना सुरू झालाय…. आता बघता बघता एकेक सण सुरू होतील. आपल्याकडे सण असला की जेवढे व्रतवैकल्ये महत्वाचे तितकेच पदार्थही. आपल्या पूर्वजांनी ही अगदी चोखंदळपणे ऋतू आणि सणाप्रमाणे नैवेद्याचे पदार्थ ठरावलेत. आता बघा नागपंचमी उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नैवेद्याची तयारी तर करायलाच हवी ना….


माझं माहेर कर्नाटकी म्हणजे बाबा कर्नाटकातले आणि आई महाराष्ट्रीयन. तर माहेरी नागपंचमीला नैवेद्य असतो तो तंबीटाचे लाडू…. तंबीट्टू.

साहित्य
डाळ्या/ डाळवं( पंढरपुरी डाळ) – १ कप
तांदूळ – १/४ कप
दाण्याचा कूट – १/२ कप
सुक्या खोबऱ्याचा किस – १कप
तीळ – १टेबल स्पून
खसखस -१ टीस्पून
गूळ – १ कप
वेलची पावडर – १/२ टीस्पून

कृती
प्रथम तांदूळ कोरडेच कढईत मंद आचेवर भाजून घ्या. थोडे तपकिरी रंग यायला हवा. थंड झाल्यावर तांदूळ आणि डाळवं मिक्सर मध्ये दळून घ्यावे. तुमच्या आवडीप्रमाणे अगदी बारीक पूड किंवा भरड करून घ्यावी. गूळ किसून घ्या आणि १/२ कप पाण्यात मिक्स करा. २ ते ३ मिनिटे गरम करून घ्या. म्हणजे सर्व गुळ छान विरघळून जाईल. आता ह्या गुळाच्या पाकात उर्वरित सर्व पदार्थ घाला आणि छान मिसळून घ्या. थोडं कोमट झाल्यावर लाडू वळून घ्या. हे लाडू नेहमी प्रमाणे गोल गरगरीत न वळता त्याला पेढीघाटी म्हणजे थोडा चपटा आकार देतात. तर मैत्रिणींनो ह्या वर्षी नागोबाला हा नैवेद्य नक्की करून बघा.

Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग 2

नमस्कार मैत्रिणींनो, काय निघालात ना गावाला? मागील भटकंतीच्या भागात आपण लहान बाळांना (सहा महिने ते दोन वर्ष) चालतील असे काही पदार्थ पाहिले. या भागात आपण तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना चालतील असे पदार्थ बघणार आहोत.

बरेचदा असं होतं की, आपण साईट सीन बघायला जातो पण तिथे उशीर होतो आणि आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळेस मुलांना मध्येच भूक लागते. कित्येकदा बाहेर मुलांच्या आवडीचे पदार्थ मिळतच नाही किंवा शोधायला वेळ लागतो. तेव्हा तहान लाडू भूक लाडू बरोबर असलेले बरे.

(अ ) नाचणीचे लाडू :-

नाचणी   :-२० ग्रॅमभरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त.
काजू      :- ५ ग्रॅम प्रथिनांचा साठा असतो.
बदाम      :- ५ ग्रॅमप्रथिनांन बरोबर तंतू सुद्धा असतात त्यामुळे भूक भागते.
वेलदोडा   :- २ ग्रॅमथंडावा देतो आणि चवही उत्तम.
खारीक     :- २ ग्रॅमरक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.
साखर       :- गरजे नुसार तातडीची ऊर्जा मिळते.
तूप           :- १० ग्रॅमस्निग्धता आणि त्याच बरोबर oil soluble vitamin मिळतात.

(*) कृती :-

 1. प्रथम नाचणीचे पीठ तुपावर छान भाजून घ्या.
 2. त्यानंतर काजू, बदाम, खारीक  (त्यातील बी काढून छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे मिक्सर मधून काढण्यास सोपे जाईल.) यांची मिक्सर मधून पूड करून घ्या.
 3. वरील केलेली सर्व पूड तुपावर भाजून घ्या.
 4. आता वरील सर्व पदार्थ एकत्र करून घ्या.
 5. गरजेनुसार (प्रत्येकाचे साखरेचे प्रमाण वेगवेगळे असते कोणाला गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं त्यानुसार ज्याचे त्याने ठरवावे.) त्यात पिठीसाखर घालून सगळं मिश्रण एकत्रित हलवून लाडू वळा.

Thought for food :-

 • नाचणीचे पीठ वापरण्याच्या ऐवजी त्याएवजी तुम्ही मुगाचे पीठ वापरून बाकी सर्व साहित्य तेच घालून मुगाचे लाडू सुद्धा बनवू शकता.

(ब) राजाराणी :-

शेंगदाणे :- २० ग्रॅमस्निग्धता मिळवून देतात. त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू सुद्धा असतात.
फुटाण्याची डाळ:- २ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
कढीपत्ता  :- ५ ग्रॅमफॉस्फरसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे व दात बळकट होण्यास मदत होते.
हिंग   :- ३ ग्रॅम उत्तम मिनरल्सचा साठा व लोहाचे प्रमाण जास्त असते.
तेल   :- ५ ग्रॅमठराविक विटामिन्स तेलातून मिळतात.
मीठ:- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स संतुलन नीट ठेवण्यास मदत.
साखर  :- गरजे नुसारInstant energy मिळते.
तिखट :- गरजे नुसार

(*)कृती :-

 1. प्रथम दाणे व फुटाणे भाजून घ्यावेत भाजल्यानंतर त्याची सालं काढून घ्यावीत.
 2. तेल गरम करून त्यात हिंग व कढीपत्ता घाला. (कडीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर तळावा.)
 3. वरील मिश्रणात भाजलेले फुटाणे आणि दाणे घालून ते छान खुसखुशीत होईपर्यंत परता.
 4. गरजेप्रमाणे त्यात मीठ, तिखट व साखर घाला.

Thought for food :-

 • साधारणपणे आमटी किंवा पोह्यात घातलेला कडीपत्ता आपण बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याऐवजी तो आपण बारीक चिरून घातल्यास बाहेर काढता येत नाही व त्यातले गुणधर्म आपल्याला मिळतात.
 • राजाराणी या पदार्थात आपल्या आवडीनुसार त्यात जिरे / धने किंवा चाट मसाला घालू शकता.
Instant upma is a delicious option while traveling

(क )  इंस्टंट उपमा :-

जाड रवा             :- ३० ग्रॅमपचायला सोपे आणि पोटभरीचे.
कांदा                 :- १० ग्रॅमतंतू व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. उन्हाळ्यात फायदेशीर
आहे.
गाजर                :- १० ग्रॅमविटामिन ए भरपूर प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांसाठी
उपयुक्त.
कोथिंबीर            :- ५ ग्रॅमऔषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
फोडणीचे साहित्य:-गरजे नुसार

(*) कृती :-

 1. रवा चांगला भाजून घ्या व बाजूला काढून ठेवा.
 2. नंतर तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा तपकिरी रंगावर येईस्तोवर परतून घ्या. म्हणजे त्यातील सगळा पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल व टिकण्यासाठी सोपे होईल.
 3. गाजर किसून उन्हात ठेवल्यास त्यातील पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होईल. कोथिंबीर सुद्धा अशीच वाळवून घ्या.
 4. आता तेल गरम करून त्यात फोडणी करून घ्या. फोडणीमध्ये वाळलेला कडीपत्ता घालावा.
 5. फोडणी गार झाल्यानंतर त्यात परतलेला कांदा, वाळलेलं गाजर आणि भाजलेला रवा घालावा. शेवटी साखर मीठ घालून नीट हलवून ठेवावं.
 6. हा इन्स्टंट उपमा नंतर लागेल तेव्हा गरम पाणी घालून पटकन शिजवता येतो.

Thought for food :-

 • ह्या झटपटीत उपम्यामध्ये  तुम्हाला लागेल तसे शेंगदाणे, काजू आणि यासारख्या इतर गोष्टी घालून त्याची पौष्टिक मूल्ये वाढवू शकता.
Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग १

नमस्कार मैत्रिणींनो, आला उन्हाळा आला. मग काय झालं का? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन. म्हणजेच भटकंतीचे नियोजन? कुठे जायचं? ट्रेनची तिकीट, की विमान प्रवास. लागणाऱ्या सामानाची जमवा जमव. त्यातून लहान मुलं बरोबर असतील, तर मग खूप विचार आणि नियोजनाची आवश्यकता आहे.

मुलांचे सामान, नवीन ठिकाणी जाऊन मुलं काय खातील. प्रवासात त्यांची खायची चिंता. त्यातून प्रवास लांबचा असेल तर, मग काय करायचं? हे सतत चे पडणारे प्रश्न. हे सगळे प्रश्न मला नेहमी पडतात. तुम्हाला पण पडत असतीलच. चला तर मग शोधूयात या प्रश्नांची उत्तरं. या लेखातून आज मी तुम्हाला असे काही पदार्थ आणि त्यांच्या कृती सांगणार आहे. की जे पदार्थ तुम्ही सहज प्रवासात बरोबर नेऊ शकता आणि राहण्याच्या ठिकाणी सुद्धा सोप्या पद्धतीने शिजवू शकता. सगळ्यात  पंचाईत येते ती लहान बाळांची म्हणून खास ६ महिने ते दोन वर्षाच्या मुलांपर्यंत चालणारे पदार्थ.

(अ)  सातूचे पीठ :-

साहित्य

गहू –             १वाटीभरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात.
हरभरा डाळ – १ वाटी प्रथिने व कॅल्शियम याच्यात जास्ती असते.

# कृती :-

(१) गहू आणि हरभरा स्वच्छ करून घेणे.(मुलांसाठी वापरत असल्यामुळे स्वच्छ धुऊन, वाळवून घेतले तरी चालेल, ( टिकून ठेवण्यासाठी लावलेली पावडर निघून जाण्यास मदत होईल.)

(२) त्यानंतर गहू व हरभऱ्याची डाळ छान गुलाबी होईपर्यंत भाजणे.

(३) भाजून गार झाल्यावर मिक्सर वरती बारीक पीठ करून घेणे. हे झाले तुमचे सातूचे पीठ.

Thoughts for food :-

(१) हे तयार पीठ तुम्ही गुळ, दूध, तूप, वेलदोडा घालून सरबरीत करून मुलांना देऊ शकता. भाजून घेतल्यामुळे शिजवण्याची गरज नाही व पचण्यास सुद्धा सोपे होते.

(२) जर तुम्ही प्रवास करत असाल आणि दूध घेऊन जाता येत नसेल तर तुम्ही दुधाची पावडर आणि पाणी मिसळून देऊ शकता.

(३) मुलं जर गोड खात नसतील तर जिरेपूड, मीठ व पाणी घालून तयार मिश्रण मुलांना देता येत.

(ब)  चिवडा

साहित्य

चुरमुरे   :- १५ ग्रॅम पचण्यास हलके.
शेंगदाणे :- ५ ग्रॅम स्निग्धता मिळवून देतात त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू असतात.
फुटाणे   :- ५ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
जिरेपूड :- २ ग्रॅमतंतूंचे प्रमाण जास्त असते व उन्हाळ्यात थंडावा देण्यास मदत होते.
साखर    :- गरजे नुसारतातडीची ऊर्जा मिळते.
मीठ       :- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स चे संतुलन नीट होण्यास सहाय्यक.
तेल        :- ५ ग्रॅमओईल सोल्युबल विटामिन्स असतात.

# कृती :-

(१) चुरमुरे नीट भाजून कुरकुरीत करून घ्या.

(२) तेल गरम करून त्यात जिरे पूड, शेंगदाणे आणि फुटाणे खुसखुशीत गुलाबी होई पर्यंत परतुन घ्या.

(३) त्याच्यात भाजलेले चुरमुरे घालून चिवडा तयार करा.

(४) तयार झालेला चिवडा मिक्सरमधून काढून घ्या.

Thoughts for food :-

(*) हा चिवडा मुलांना कधीही देता येतो. बारीक केल्यामुळे त्यांना सहज खाता येतो. शिवाय दाणे, फुटाणे असल्यामुळे तात्पुरती भूक भागवता येते.

(क)  मोड आणलेल्या धान्यांचे पीठ :-

साहित्य

हिरवे मुग :- १० ग्रॅमयाच्यामध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असते. इतर विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात.
मटकी.    :-१० ग्रॅमयाच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतात.

# कृती :-

(१) प्रथम मूग मटकी धुवून बारा तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावी.

(२) नंतर मूग,मटकी उपसून मोडण्यासाठी सुती कापडात किंवा चाळणीत सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवावी.

(३) व्यवस्थित मोडल्यानंतर स्वच्छ रुमाल किंवा पंचा घेऊन त्यावर मटकी व मूग पसरून ठेवावेत. जोपर्यंत ते चांगले वाळत नाहीत तोपर्यंत.( सावलीत वाळवल्यास चालतील.)

(४) त्यानंतर त्यातून पाण्याचा अंश पूर्णपणे काढण्यासाठी कढईत चांगले भाजुन घ्या.

(५) तयार मिश्रण मिक्सर मधून काढा.

Thoughts for food :-

(*) मोड आल्या मुळे त्यातील पौष्टिक मूल्य वाढतात. त्यामुळे मुलांसाठी ते फायदेशीर आहे.

(*) बाहेर गेल्यावर राहण्याच्या ठिकाणी त्यात पाणी, मीठ यांचे मिश्रण करून जर तिथल्या स्वयंपाक घरात दिले. तर ते तुम्हाला पटकन शिजवून देऊ शकतात.

#  नोट्स  :-

 • वरील कृती मध्ये दिलेले प्रमाण अंदाजे घेतलेले आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांच्या गरजेप्रमाणे आपापले प्रमाण ठरवावे ही विनंती.
 • साधारण पाच ग्रॅम चा चमचा वापरल्यास प्रमाण ठरवण्यास सोपे जाईल.
Categories
आरोग्य

नवे वर्ष नवी पालवी

नवीन वर्षाचा पहिला दिवस  गुढीपाडवा. नवीन वर्ष शालिवाहन शके  १९४१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण निसर्ग आणि मानव सर्वांनाचं नवीन उत्साह देतो.  येणार नवीन वर्ष आपण सृष्टीच्या सानिध्यातच सुरू करतो.निसर्गच आपल्याला नवीन दिशा देतो .वसंत ऋतूच्या आगमना बरोबर वसुंधरा सुद्धा एक नवीन रूप घेण्यास सुरुवात करते. निसर्ग नियमाप्रमाणे तरु लता जुनी पिवळी पाने टाकून कोवळ्या हिरव्या नवीन पालवीची वस्त्र परिधान करतात.

आंब्याला मोहर याच महिन्यात येतो. तेव्हाच शेतकरी तयार पिकांची कापणी करून त्यातून नवीन धान्य काढीत असतो. हा सृष्टीने मानवाला दिलेला संकेतच आहे, की जसा वृक्ष नवीन पालवी धारण करतो तसेच आपण सुद्धा नवनवीन  संकल्प करायचे. त्याच बरोबर सरलेलं वर्ष मनात साठवून येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. हाच नवीन वर्षाचा उत्साह भारतातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तेही निसर्गातील बदलाव लक्षात घेऊनच. म्हणूनच प्रत्येक प्रांतातील गुढीपाडव्याचा प्रसाद हा निरनिराळ्या पद्धतीचा असतो. आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक सणाची आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतो.

गुढीपाडव्याची गुढी

सण आणि प्रसाद हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय हो ना! महाराष्ट्रातला प्रसाद हा तर मौल्यवान एकदम. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा  आपल्याला सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची आठवण सुद्धा करून देतो. म्हणूनच होणाऱ्या बदलांसाठी, आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी  पौराणिक काळापासून घालून दिलेली प्रसादाची सांगड. हा गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी निसर्गापासून मिळालेल्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे आपला कडू गोड प्रसाद. कडुलिंबाची फुले, गुळ ,चिंच ,मीठ, हिंग,जिरं  यांचे एकत्रित मिश्रण.

गुढीपाडव्याचा प्रसाद आणि त्याची उपयुक्तता:

कडुलिंब / निम (Azadirachta indica) : कडुलिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. शिवाय कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. कृषी संशोधनानुसार १०० पेक्षा जास्त कीटक प्रजातींचे नियंत्रण निम अर्काने करता येते. शिवाय कडुलिंबाची साल मलेरिया प्रतिबंधक असते. म्हणूनच पूर्वी  गावाच्या वेशीवर कडुलिंब लावायची प्रथा होती. ( औषधी वनस्पती, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर)

गुळ: गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

चिंच: चिंचेमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळा मधील लोह खेचून घेण्यास मदत होते.

मीठ:  मीठ इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण नीट ठेवण्यास मदत करते.

हिंग: हिंग पचण्यास सहाय्य करते.

जिरं: जिऱ्यामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते पचन संस्थेसाठी उत्तम असतं. शिवाय त्याच्यात विटामिन ई सुद्धा असतं.

असा आपला हा शक्तिवर्धक प्रसाद त्याच्याबरोबर उत्तम व्यायाम आणि सात्विक जेवण ह्या सगळ्याच समीकरण म्हणजे आपलं सुदृढ शरीर. म्हणुनच म्हणतात ना

परिश्रमो मिताहारो भूगतावश्विनीसुतौ ।

अश्विनी { दैवी जुळी मुले, Ashwins}कुमार हे जसे देवांचे दोन वैद्य आहेत, तसे पृथ्वीवरचे दोन वैद्य परिश्रम आणि आणि मित आहार (सात्त्विक जेवण). तर हाच संकल्प आपण ह्या नवीन वर्षी करूयात.

डायट टिप्स

  1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साखरेचे हार (गाठी हार) वापरतो, त्याऐवजी आपण सुक्यामेव्याचे हार बनवू शकतो.
  2. प्रसादासाठी वापरले जाणारे कडुलिंब फक्त त्या दिवशी न वापरता ते वाळवून धान्याला लावल्यास किडे होत नाहीत.
  3. कडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने काही तास पाण्यात ठेवून. ते पाणी आपण पिण्यास वापरू शकतो.