Categories
पाककृती

एळनीर पायसम

सगळ्यांना सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!!

राखी हा भाऊ बहिणींचा सण….. त्यास आपण नारळी पौर्णिमा म्हणून पण साजरा करतो. मुख्यतः सागरी किनारपट्टी वरील लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. खवळलेल्या सागराला नारळ वाहून, राजा, सागरा आता शांत हो बाबा, आम्हाला आमची नाव आत समुद्रात घेऊन जायची आहे. त्यावरच आमचा पोटपाणी आहे. अशी विनवणी करतात. आपण मात्र नारळाचे तिखट-गोड पदार्थ बनवून सणाचा आनंद घेतो.
मराठी घरात मुख्यत्वे नारळाची वडी, नारळी भात, नारळाची खीर असे प्रकार बनतात. खूप वर्ष बंगलोरला राहिल्याने तिथले काही पदार्थ हे आता आमच्या जेवणाचा भाग बनला आहे.

आज मी तुम्हाला तिथला एक खिरीचा प्रकार दाखवणार आहे. त्या खिरीचे नाव आहे एळनीर पायसम, म्हणजेच शहाळ्याची खीर. खूप छान चव आणि करायला अगदी सोप्पी.

साहित्य
नारळाचे घट्ट दूध – १ कप
शहाळ्याचे पाणी – १/२ कप
शहळ्याची मलई -१ कप
कंडेन्सड मिल्क – ६ टेबले स्पूनस

कृती
नारळाचे दूध मी घरीच काढून घेतले. तुम्हाला अगदी वेळ नसल्यास किंवा जमत नसल्यास तयार कोकोनट मिल्क बाजारातून आणले तरी चालेल. नारळाचे दूध काढताना मी साधे पाणी न वापरता शहाळ्याचे पाणी वापरले तर त्याची चव अगदीच खास लागते. आता शहळ्याची मलई घेऊन त्याची मिक्सर मध्ये अगदी बारीक पेस्ट करावी. आता पेस्ट, नारळाचे दूध आणि कंडेन्सड मिल्क सर्व एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. म्हणजे छान मिसळले जातील. तुम्हाला हवे तसे कॅडेन्सड मिल्क आणि शाहळ्याच्या पाण्याचे प्रमाण adjust करू शकता. पण ही खीर जर घट्टच छान लागते. हवे असल्यास फ्रिजमध्ये ठेवून गार खीर सर्व्ह करा.
आम्ही जिथे सर्व प्रथम ही खीर खाल्ली त्यांनी ती short Glasses मध्ये सर्व्ह केली होती. नक्की करून बघा आणि आपल्या भावाला खुश करा.

Categories
खाऊगिरी

खाद्य संस्कृती गुढीपाडव्याची

परवा असंच मी आणि माझ्या काही मैत्रिणी भेटलो. सगळ्या काही महाराष्ट्रीयन नाही. आंध्र प्रदेशातल्या, कानडी, उडपी कडच्या काहीजणी, तर काहीजणी गोव्याकडच्या! स्वयंपाक हा स्त्रियांचा आवडता विषय असल्याने, चारजणी भेटल्यावर रेसिपीसचा विषय निघणार नाही, असं नाही होणार. प्रत्यक्ष घरी गेल्यावर त्यातल्या निम्म्या पेक्षाही कमी रेसिपीज करून बघितल्या जातात पण असो! त्यामुळे चार रेसिपीस माहित तरी होतात.

Photo credit -http://khaugiri.blogspot.com/
पुरण पोळी ,दुध आणि साजूक तूप – P.C प्रीती बिनीवाले 

तर अश्याच आम्ही चार-पाच जणी. सहज गप्पा मारताना गुढीपाडव्याचा विषय निघाला. श्रीखंड-पुरी हा बेत कुणाला आवडणार नाही? पुरणपोळी हा प्रकार खाल्ला नाही, माहित नाही किंवा आवडत नाही, अशी व्यक्ती मला तरी आजपर्यंत भेटली नाही.

“तुम्ही काय-काय करता गुढीपाडव्याला?” असं मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं. ती आंध्र प्रदेशातली आहे. मग तिला महाराष्ट्रातली गुढीपाडव्याची माहिती दिली. श्रीखंड-पुरीचा बेत कसा करतो तेही सांगितलं. मग त्याचबरोबर ओघानेच पुरण पोळी, शेवयांची खीर याचीही चर्चा झाली. गरम चहाच्या एक-एक घोटा सहित आता आमच्या गप्पा सुद्धा रंगू लागल्या. प्रत्येक चौका-चौकाला भाषा आणि खाद्य संस्कृती बदलते असं मानलं जातं.

मग उमा मला म्हणाली, “अगं, आम्हीही गोव्याला गुढी उभी करतो. आम्ही इडली सारखाच एक प्रकार करतो, खवलेल्या नारळाच्या गोड रसाबरोबर खातो. त्यात गुळ,वेलची पुड, थोडंसं मीठ पण घालतो. त्यात अजून वेगळाच प्रकार आम्ही करतो. त्याला आम्ही हिट रोस असं म्हणतो. नारळ, गुळ, ड्राय फ्रुटस असं घालून मिश्रण करतो. फणसाच्या पानाच्या द्रोण तयार करून त्यात खालचा एक थर इडलीच्या पिठाचा. त्यावर मग नारळाचं सारण आणि मग परत एक इडलीच्या पिठाचा थर, असे लेअर लावून आम्ही ते उकडून घेतो. नारळाच्या गोड रसाबरोबर ते इतकं मस्त लागत ना! मला तर हे ऐकून लगोलग करून बघावं असं वाटलं.

रूपा उडपी मध्ये राहणारी, ती म्हणाली, “आमच्याकडेही इडली करतो. त्याचबरोबर कैरी चिरून त्याला मोहरी, मिरची, हिंग, कडीलिंब याची फोडणी देऊन चटणी करतो त्याला पचडी म्हणतो. मग काजूचे पहिले बी घालून केलेली तोंडलीची भाजी. पनाक म्हणजे गुळ, वेलची पूड, मिरपूड, सुंठ आणि मीठ हे घालून केलेलं लिंबाचं सरबत!”  म्हणलं, वाह! क्या बात हैं।

त्रिपुरा म्हणाली, “आम्हीही पचडी करतो पण आमची आंध्राकडची पचडी म्हणजे, चिंचेचा कोळ, ओल्या नारळाचे तुकडे, पिकलेले केळं, कडुलिंबाची फुलं, गुळ, कापलेल्या कैरीचे तुकडे आणि थोडंसं मीठ अशी असते. ही पचडी म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट अनुभवांचे प्रतिक असं आम्ही समजतो.

गप्पांच्या ओघामध्ये महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश सगळं फिरून आल्यासारखं वाटलं! मग घड्याळाकडे लक्ष गेले. बघता बघता दोन तास कसे निघून गेले कळलं देखील नाही.मला आपलं असं वाटतं, पिझ्झा आणि बर्गरमध्ये जेवढी व्हरायटी मिळेल त्यापेक्षा कैकपटीने जास्त व्हरायटी फक्त आपल्या भारतामध्ये मिळेल. परदेशी जाऊन घरी आल्यावर, घरात शिजवलेला गरम वाफाळणारा वरण-भात, त्यावर मीठ आणि लिंबू आणि वर साजूक तुपाची धार! तळलेला पापड, लोणचे, शेंगदाण्याची चटणी हे एवढंच जरी खाल्लं तरी प्रवासाचा शीण गेल्यासारखं वाटतो! एक वेगळचं सुख असतं त्यात.

आता पुढच्या पॉटलकला काय मेनू करायचा? हा प्रश्नचं नव्हता. मेनू तयार होता, श्रीखंड-पुरी, इडली, तोंडलीची भाजी, पचडी आणि पनाक! तारीख आणि वेळ मात्र अजून ठरायची आहे.