Categories
काही आठवणीतले

सय- बुचाच्या फुलांची!!!

पांढरा रंग तर खूपच सुंदर आणि त्यातून पांढरी सुवासिक फुले तर निसर्गाची देणगीच आपल्याला!!! सुवासिक जाई, जुई, मोगरा, चमेली, कुंद, निशिगंध, प्राजक्त…आणि किती तरी! वास न येणारी चांदणी, तगर, बटमोगरा, काटेकोरांटी….असंख्य नावे आहेत…. पण या सगळ्यात एक वेगळे आणि सहज उपलब्ध असूनही तसे दुर्लक्षिले गेलेले एक फुल म्हणजे बुचाचे!! रस्त्यावर पावसाळ्यात पडलेला खच कायमच आपले लक्ष वेधून घेतो. लहानपणी शाळेत जात येताना वाटेवर बुचाची झाडे होती. मस्त सुगंधित वाटायचे. आम्ही मैत्रिणी गोळा करायचो फुले आणि एका मैत्रिणीला वेणी करता यायची त्याची…रोज एक एक वेणी करून बाईंना द्यायचो डोक्यात माळायला… देताना आमचे हात आणि घेताना बाईंचे मन, त्या सुंदर परीमळाने आनंदित, सुगंधित व्हायचे…अजूनही शाळेजवळ ते झाड आहेच….आणि मनात आठवणी !!!

फोटो क्रेडिट- सुज्ञा.


बुचाचे झाड तसे सर्वत्र आढळते..सरळ सरळ उंच २५-३० फूट उंचीची झाडे असतात. सहा महिने तरी बहर असतोच…माझ्या घराजवळ असलेल्या बस स्टॉप पाशी एक मोठे जुने झाड आहे. तिथून जात येताना मन प्रफुल्लित होते. खाली पडलेल्या फुलातून एक तरी उचलल्याशिवाय पाय निघतचं नाही तिथून!
बुचाची फुले पांढरीच, पण क्वचित गुलाबी, पिवळी छटा पण दिसते. फुलांचा देठ हा बारीक नळीसारखा आणि साधारण दोन ते अडीच इंच लांब असतो. फुलाला पाच पाकळ्या असल्या तरी त्यापैकी दोन पाकळ्यांची.. एकच पाकळी वाटावी अश्या एकमेकांना जोडलेल्या असतात. झाडावर फुलांचे घोस लटकलेले असतात, पण झाडावर न राहता ती खालीच पडतात. पूर्ण बहरात झाडाखाली फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. सुगंध आजूबाजूच्या परिसरात दरवळतो… खूपच मस्त वाटते.
आज मात्र पु. ल.देशपांडे उद्यानात त्याचा खच पडलेला पाहून थोडे वाईट वाटले…एकतर खूप पाऊस त्यामुळे फुलांचा अगदी चिखल झाला होता….चालणारी लोक त्यांना पायदळी तुडवून जात होती….साहजिक आहे म्हणा.. इतकी फुले ताजी -शिळी फुलं एकत्र. कोण किती काळजी घेणार ना!!! पण तरी वाकून मी ताजी नुकतीच पडलेली फुले उचलली आणि एक गुच्छ केला आणि घरी घेऊन आले…माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या….
जी गोष्ट मुबलक प्रमाणात असते त्या गोष्टीचे आपल्याला महत्त्व नसते हेच खरे.. नवरात्रात गजरे महाग मिळाले तरी आपण घेतो पण निसर्गाचीच देणगी असलेली ही फुले मात्र दुर्लक्षित करतो….कदाचित गाडी वरून जा ये होत असल्याने पायी जाताना दिसणारी हि फुले आपल्या नजरेत येतचं नसावीत. ३-४ तास झाले तरी ती फुले ताजीच आहेत…का त्याची वेणी करून आपण देवाला किंवा डोक्यात घालत नाही?असा प्रश्न मला पडला.

ते काहीही असो आज या फुलांच्या स्पर्शाने आणि सुवासाने मन भूतकाळात गेले आणि प्रसन्न झाले…

निसर्गाची किमया आणि बालपण!!!!

सुज्ञा

Categories
माझा कट्टा

सुमनांचे सु‘मन’

परवा काही खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. थोडी फार खरेदी झाली, मग नेहमीप्रमाणे भाजी घेण्यासाठी बाजारात गेले. थोडी फार भाजी हवी होती ती घेतली आणि निघाले. आता भाजी घ्यायला गेलेय म्हणल्यावर लिंबु, कोथिंबीर, पुदिना, नारळ, मेथी आणि कांदा या भाज्यांचे वास म्हणजे अगदीच ओळखीचे झाले आहेत. माझे डोळे बंद करून जरी मला कोणी विचारले, हि कुठली भाजी आहे ते सांग? तरी ते मी सांगू शकेन. “झाली बाबा एकदाची भाजी घेऊन” असं मी म्हणलं आणि तितक्यात कुठलासा छानसा सुगंध माझ्या नासिकेतून थेट मनापर्यंत पोहोचला. “अहाहा! किती सुंदर सुगंध येतोय” …. असं  म्हणतं, मी त्या दिशेने वळले आणि पाहते तर काय? समोर निशिगंध, चाफा या फुलांची रास होती. मन पार हर्षुन गेलं. कितीतरी वर्षांनी मी अशी निशिगंध आणि चाफ्याच्या फुलांची रास बघितली होती. लगेहाथ मी चाफ्याची आणि निशिगंधाची फुलं घेऊन बाजारातून बाहेरदेखील पडले, पण त्या फुलांच्या सुगंध काही केल्या मनातून नाहीसा होत नव्हता आणि तो नाहीसा व्हावा अशी माझी इच्छाही नव्हती. 

घरी आल्यावर आधी भाजी काढून ठेवली. मग त्या फुलांना अलगद पिशवीतून बाहेर काढलं आणि निशिगंधाचा काय सुगंध पसरला, आहाहा!  चाफ्याची फुलं थोड्यावेळ छान पाण्यामध्ये भिजवून ठेवली. घरामधल्या एका छान नक्षीकाम असलेल्या फुलदाणीत त्या निशिगंधाच्या फुलांना सजवलं. तेव्हा एक प्रश्न नक्की पडला. “मी त्या फुलांना सजवलं कि त्या फुलांनीच  माझं घर सजवलं”? तुम्हाला काय वाटतं? विचार केला तर आपल्या कितीतरी सणा समारंभांना आपण कैक प्रकारची फुलं वापरतो. लग्न- मुंज अश्या शुभकार्यानां गजरे-हार अगदी हमखास लागतातच. लग्न समारंभात लांब सडक केसांच्या वेणीवर माळलेला  मोगरा आणि अबोलीचा नाजूक गजरा खरंतर अजूनच शोभा आणतो. एखाद्या लावण्यवती स्त्रीला खरंतर मेकअपची गरजचं नसते. एक गजरा घातला की झालं… तसंच परकं पोलकं घातलेल्या एखाद्या छोट्याश्या गोंडस मुलीला गजरा केसात माळला तर ती अजूनच गोड दिसते नाही का?

फुलांचे सुद्धा स्वभाव असतात नाही का? म्हणजे आता बघा ना.. लग्न समारंभात मोगरा, अबोली,शेवंती ही फुलं अगदी हमखास हजेरी लावतातचं. चाफा आता तसा दुर्मिळ झाला आहे. पण मला मात्र चाफा नेहमी देखणा वाटतो. त्याचा रंग, सुगंध, छान मऊ पाकळ्या… फक्त डोळ्यासमोर पटकन अवतरित होत नाही झाडाच्या  पानांमागे दडून बसतो. शोधावं लागतं त्याला! सदाफुलीची फुलं मात्र अगदी सहज नजरेस पडतात. शाळेमध्ये एखादी सतत हसणारी मुलगी असावी… जी कधीही शाळा बुडवत नाही ना तशी. अबोली मात्र नावाप्रमाणे शांत, तिला सुगंधही नाही पण अंगणाच्या एखाद्या कोपऱ्यात ती मात्र तग धरून वाढते. एखादं दिवस अबोलीचं  फुलं दिसलं नाही तर मग मात्र तिचं अस्तित्व जाणवतं. कमळ, ब्रह्मकमळ हि फुलं मला उत्सुकता वाढवणारी आणि अध्यात्मिक प्रगती करणारी फुलं वाटतात. जास्वदींचे फुल मात्र अगदी आपली सहनशीलता बघत कधी कधी. आपण अगदी अधीर असतो नवीन उमललेलं फुल बघण्यासाठी,पण एकदा का ते उमललं कि, “चला आज फुल आलं, आता आधी देवघरातल्या गणपतीला वाहूया”  हाच भाव मनी जागृत होतो. हा आपला गुलाब मात्र वेगवेगळ्या रंग रूपात अगदी छान वावरताना आढळतो. कधी लाल, पिवळा, कधी गुलाबी, कधी अगदी शुभ्र, तर कधी अगदी काळा देखील. वेगवेगळ्या रंगांच्या छटामध्ये सतत भुरळ घालत राहतो. कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांकडून तर याला फारच डिमांड! Rose day, valentines day, Propose day या दिवशी तर गुलाबाच्या फुलाशिवाय चालतचं नाही. कधी कधी मला वाटतं….त्या गुलाबांना बोलता येत असतं..  तर कितीतरी successful or unsuccessful love stories ऐकायला मिळाल्या असत्या नाही का? किती जणांच्या प्रेमाचा ‘गुलकंद’ झाला हे देखील कळलं असतं, किती गम्मत आली असती. झेंडूच्या फुलांचा मात्र एक वेगळाच तोरा असतो. एरवी सजावटीसाठी आपण झेंडूच्या माळा करतो पण दसरा आणि दिवाळीला मात्र अगदी सोन्यासारखा दिसणारा झेंडू, सोन्याचेच भाव घेऊन बाजारात मिरवत असतो.

बाजारामध्ये फुलांचे बुके किंवा नुसती फुलं घ्यायला गेले कि आजूबाजूला दरवळणाऱ्या सुंगंधाने मन आपोआपचं  प्रसन्न होतं. तेव्हा जाणवतं …मन शांत करायला काही लागू पडत असेल तर हीच ती थेरपी. फुल विक्रेते देखील व्यवसाय म्हणूनच फुलं विकत असले तरी, मी तरी त्यांना आज पर्यंत कधी चीड चीड करून बोलताना ऐकलं नाही.मोगऱ्याचा गजरा विकणाऱ्या बायकादेखील किती प्रेमाने बोलतात, “ताई, गजरा घ्या ना, बघा छान दिसेल तुम्हाला” तेव्हाच फक्त केस कापल्याचे दुःख होतं. कदाचित फुलांच्या सुगंधाने त्यांचही मन शांत होत असेल. आपण आपली डोके दुखी, पाठदुखी, गुडघे दुखी कुरवाळत बसतो. पण या फुल विक्रेत्यांना मात्र एक दवा लागू पडतं असेल ती म्हणजे हे फुलरूपी सुखाची टोपली! बस्स, अजून काय पाहिजे? किती छान नाही का? सकाळी उठल्या उठल्या अशी छान टवटवीत फुलं नजरेस पडली तर दिवसभर आपल्यालाही कसं ताजतवानं वाटतं. मधुमालती, बुचाची फुलं याचा सुगंध अगदी थोडासाच येतो पण तरीही मनाला सुखावून जातो. मी राहते त्या सोसायटीमध्ये आम्ही लहान असताना एक गुलमोहराचं झाड होतं. त्याला फुलांचा इतका छान बहर असायचा. त्या फुलांमध्ये असणाऱ्या पाकळ्यात एक पाकळी थोडी वेगळी असते. त्या पाकळीमध्ये लाल आणि पांढरा असे दोन रंग असतात. त्याला आम्ही ‘कोंबडा’ असे म्हणायचो. मग खाली पडलेल्या फुलांमध्ये किती कोंबडे मिळतात त्यासाठी खटाटोप करायचो. त्याचबरोबर कॉलनीमध्ये अजून दोन झाडं लावली होती बरेचजणांना माहितही नव्हतं कि ती कुठली झाडं आहेत. बरेच वर्ष म्हणजे जवळ जवळ २० वर्षानंतर ते झाड पूर्ण वाढल्यावर त्याला खूप फुलं आली नंतर कळलं कि ते कैलासपतीचे झाड आहे. किती  छान सुगंध पसरतो त्या फुलांचा. आता माझी मुलगी त्या झाडांची फुलं गोळा करते. काही आठवणी असतात अश्याच ज्या मनात घर करून राहतात.

या फुलांचं आयुष्य खरं तर किती? फारफार एक दोन दिवसांचं पण सगळ्यांना प्रसन्न करतात, आपलंस करून घेतात. आपल्याला मात्र आयुष्यभर मदत करतात. त्यांची कुठे अपेक्षा असते मला अमुक हीच जागा पाहिजे. कधी देवाच्या चरणी अर्पण केली जातात. कधी लहान मुलांच्या हाती सापडतात. कधी कुणाच्या गळ्यातला हार होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. तर कधी कुणाच्या अंत्य संस्काराचे साक्षी होतात. अगदी जन्माला आल्यापासून आपल्या  अंत्य संस्कारापर्यंत आणि त्यानंतरही. फुलं खरंच कधी कुठलाही भेदभाव करत नाहीत.

फुलांना राग, लोभ, मोह, माया, मत्सर, यापैकी कोणीही भुरळ घालूचं शकत नाहीत. आयुष्यातला एक दिवस असं जगून बघा, बघा जमतंय का? कुठलीही अपेक्षा न करता सतत दुसऱ्याला देत राहणं हे आपण …त्या फुलांकडून शिकलं पाहिजे नाही का?