Categories
काही आठवणीतले

मोखाड्याचा बोहाडा

मोखाड्याचा बोहाडा
प्रत्येक सणाची, उत्सवाची आपल्याकडे विशेष अशी संस्कृती आहे. अजूनही काही खेड्यांमध्ये वंशपरंपरागत चालत आलेल्या काही मजेशीर पण ज्ञानप्रबोधन करणाऱ्या आणि आपल्या सांस्कृतिक प्रथा जतन केलेल्या रूढी पाळल्या जातात. एवढ्यातच होळी सण झाला. होळी संबंधित तर खूप वेगवेगळ्या रूढी, प्रथा दिसून येतात. एका माझ्या नाशिकच्या मित्राने अशाच एका बोहाडा या उत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ share केले. इतके वर्षे नाशिक मध्ये राहूनही नाशिकबद्दलच्या या गोष्टीची मला अजिबातच कल्पना नव्हती. अर्थात उत्सुकता शिगेला पोहोचली. थोडी त्याच्याकडून,थोडी गूगल साहेबांकडून मी माहिती मिळवली. खरंच किती विविधता आहे आपल्या संस्कृतीमध्ये!!! आदिवासी लोकांनाच नाही तर आपल्यालासुद्धा या परंपरांचा सार्थ अभिमान वाटायला हवा. तर या उत्सवाबद्दल मला मिळालेली माहिती☺️

नाशिक पासून 60 km वर मोखाडा गाव आहे, ते आता पालघर जिल्हयात आहे. त्रिंबकेश्वरच्या पुढे. तेथे होळी पासून 7 दिवस किंवा रंगपंचमी पासून 4 दिवस रामायण महाभारत या महाकाव्यांमधील पात्रे घेऊन गावाची वेस ते गावदेवीचे मंदिर अशी मिरवणूक नाचत नाचत आणतात.

मोखाड्याचा बोहाडा
संकलित छायाचित्रं.


गावाच्या परंपरेनुसार प्रत्येक घराला ठरवून दिलेले पात्राचे सोंग घ्यायचा मान असतो. ती लोक अभिमानाने तशी सोंग वर्षानुवर्षे घेत असतात.


गावकरी, पाड्यातील आदिवासी आणि बघ्यांची प्रचंड गर्दी ,चैतन्य आणि उत्साहपूर्ण वातावरण, आनंद, सणासारखी किंबहुना त्याहुनही जास्त धामधूम ह्या चार दिवसांमध्ये असते. शेवटच्या दिवशी मंदिरातील पुजारी देवीचा मुखवटा धारण करून गावात मानाच्या घरी दर्शन द्यायला जातात आणि परत मंदिरात येऊन उत्सव समाप्त होतो.


ठाणे जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासी पट्ट्यातील गावात नुकताच ‘बोहाडा’ उत्सव पार पडला. सुमारे २०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा जगंदबा यात्रा उत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो. हा उत्सव होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून सुरू होऊन सात दिवस चालतो.
मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहाडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेषभूशा परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात. सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगं काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते.


काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे


गावात मंदिराच्या पुढे गावातील लोक कुठलाही मोबदला न घेता ह्या पात्रांना रंगवत (make up) असतात, तेही बघायला मजा येते. मंदिराच्या बाहेर नाच्या रात्रभर नाचत असतो, तो filler चे काम करत असतो, दोन सोंगांच्या मधल्या वेळात हा नाच्या पायाचा किस पडेपर्यंत ( ती ही एकच स्टेप) नाचत असतो. आदिवासी लोक विशिष्ठ पारंपरिक गाणी तार सप्तकात म्हणत असतात, रात्र जसजशी चढते तसतशी गाणी आणि नाच्याचा चाळांचा आवाज चढत जातो. हल्ली filler म्हणून लायटिंगचा विंचू, भुतं इत्यादी अनेक “item” लोकांना आकर्षित करत आहेत.
वेगवेगळ्या पाड्यावरचे आदिवासी आबालवृद्ध तरुण तरुणी एक कांबळे घेऊन दुपार पासून गावातल्या मिरवणुकीच्या रस्त्यावर खास जागा बघून ठाण मांडतात. अंतरा अंतराने येणाऱ्या सोंगांना झोपेने जड पडलेल्या डोळ्यात साचवून घेत असतात. आता घराघरात tv आला तरी बोहाड्याच्या सोंगांचे आकर्षण आजही तितकेच आहे. टेंभ्याच्या(चाफ्याची(च) फांदी घेऊन कापड कच्च्या तेलात भिजवून ठेवलेले मशालीसारखे टेम्भे) प्रकाशात कलाकार बघताना झोपने तारवटलेले डोळे विस्मयाने तेजोमय होतात. अवर्णनीय अनुभूती पूर्ण रात्रभर मिळते.


बोहाडामध्ये भाग घेतलेल्या सोंगांना छान नटवले जाते. बोहाडा सादर होण्याआधी देव-देवतांची सोंग कलाकार करतात. राम लक्ष्मण त्राटिका सादर केली जाते. सातव्या दिवशी विशेष मोठा बोहाडा असतो. त्याची सुरुवात गणपतीच्या सोंगाने होते. कृष्णाने धारण केलेला मच्छ अवतार आदिवासींना विशेष भावतो. बोहाडासाठी आदिवासींची तुफान गर्दी हे दरवर्षीचेच चित्र आहे. हनुमानाचे सोंग गदा फिरवत येते तेव्हा त्याला आपसूकच वाट मोकळी करून दिली जाते.
आजकालच्या कृत्रिमतेच्या दुनियेत जिथे सगळे चित्रात बघण्याची मुलांना सवय झाली आहे, तिथे ही सोंगं घेतलेली जिवंत माणसे बघताना खरंच खूप छान अनुभूती मिळते यात काही शंकाच नाही…धकधकीच्या जीवनातूून थोडा बदल….आपणही एकदा तरी अनुभवायलाच हवे ना!!!
सुज्ञा
Heritage of India….

Categories
खाऊगिरी पाककृती

तंबीटाचे लाडू

श्रावण महिना सुरू झालाय…. आता बघता बघता एकेक सण सुरू होतील. आपल्याकडे सण असला की जेवढे व्रतवैकल्ये महत्वाचे तितकेच पदार्थही. आपल्या पूर्वजांनी ही अगदी चोखंदळपणे ऋतू आणि सणाप्रमाणे नैवेद्याचे पदार्थ ठरावलेत. आता बघा नागपंचमी उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नैवेद्याची तयारी तर करायलाच हवी ना….


माझं माहेर कर्नाटकी म्हणजे बाबा कर्नाटकातले आणि आई महाराष्ट्रीयन. तर माहेरी नागपंचमीला नैवेद्य असतो तो तंबीटाचे लाडू…. तंबीट्टू.

साहित्य
डाळ्या/ डाळवं( पंढरपुरी डाळ) – १ कप
तांदूळ – १/४ कप
दाण्याचा कूट – १/२ कप
सुक्या खोबऱ्याचा किस – १कप
तीळ – १टेबल स्पून
खसखस -१ टीस्पून
गूळ – १ कप
वेलची पावडर – १/२ टीस्पून

कृती
प्रथम तांदूळ कोरडेच कढईत मंद आचेवर भाजून घ्या. थोडे तपकिरी रंग यायला हवा. थंड झाल्यावर तांदूळ आणि डाळवं मिक्सर मध्ये दळून घ्यावे. तुमच्या आवडीप्रमाणे अगदी बारीक पूड किंवा भरड करून घ्यावी. गूळ किसून घ्या आणि १/२ कप पाण्यात मिक्स करा. २ ते ३ मिनिटे गरम करून घ्या. म्हणजे सर्व गुळ छान विरघळून जाईल. आता ह्या गुळाच्या पाकात उर्वरित सर्व पदार्थ घाला आणि छान मिसळून घ्या. थोडं कोमट झाल्यावर लाडू वळून घ्या. हे लाडू नेहमी प्रमाणे गोल गरगरीत न वळता त्याला पेढीघाटी म्हणजे थोडा चपटा आकार देतात. तर मैत्रिणींनो ह्या वर्षी नागोबाला हा नैवेद्य नक्की करून बघा.

Categories
आरोग्य

नवे वर्ष नवी पालवी

नवीन वर्षाचा पहिला दिवस  गुढीपाडवा. नवीन वर्ष शालिवाहन शके  १९४१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण निसर्ग आणि मानव सर्वांनाचं नवीन उत्साह देतो.  येणार नवीन वर्ष आपण सृष्टीच्या सानिध्यातच सुरू करतो.निसर्गच आपल्याला नवीन दिशा देतो .वसंत ऋतूच्या आगमना बरोबर वसुंधरा सुद्धा एक नवीन रूप घेण्यास सुरुवात करते. निसर्ग नियमाप्रमाणे तरु लता जुनी पिवळी पाने टाकून कोवळ्या हिरव्या नवीन पालवीची वस्त्र परिधान करतात.

आंब्याला मोहर याच महिन्यात येतो. तेव्हाच शेतकरी तयार पिकांची कापणी करून त्यातून नवीन धान्य काढीत असतो. हा सृष्टीने मानवाला दिलेला संकेतच आहे, की जसा वृक्ष नवीन पालवी धारण करतो तसेच आपण सुद्धा नवनवीन  संकल्प करायचे. त्याच बरोबर सरलेलं वर्ष मनात साठवून येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. हाच नवीन वर्षाचा उत्साह भारतातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तेही निसर्गातील बदलाव लक्षात घेऊनच. म्हणूनच प्रत्येक प्रांतातील गुढीपाडव्याचा प्रसाद हा निरनिराळ्या पद्धतीचा असतो. आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक सणाची आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतो.

गुढीपाडव्याची गुढी

सण आणि प्रसाद हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय हो ना! महाराष्ट्रातला प्रसाद हा तर मौल्यवान एकदम. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा  आपल्याला सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची आठवण सुद्धा करून देतो. म्हणूनच होणाऱ्या बदलांसाठी, आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी  पौराणिक काळापासून घालून दिलेली प्रसादाची सांगड. हा गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी निसर्गापासून मिळालेल्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे आपला कडू गोड प्रसाद. कडुलिंबाची फुले, गुळ ,चिंच ,मीठ, हिंग,जिरं  यांचे एकत्रित मिश्रण.

गुढीपाडव्याचा प्रसाद आणि त्याची उपयुक्तता:

कडुलिंब / निम (Azadirachta indica) : कडुलिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. शिवाय कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. कृषी संशोधनानुसार १०० पेक्षा जास्त कीटक प्रजातींचे नियंत्रण निम अर्काने करता येते. शिवाय कडुलिंबाची साल मलेरिया प्रतिबंधक असते. म्हणूनच पूर्वी  गावाच्या वेशीवर कडुलिंब लावायची प्रथा होती. ( औषधी वनस्पती, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर)

गुळ: गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

चिंच: चिंचेमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळा मधील लोह खेचून घेण्यास मदत होते.

मीठ:  मीठ इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण नीट ठेवण्यास मदत करते.

हिंग: हिंग पचण्यास सहाय्य करते.

जिरं: जिऱ्यामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते पचन संस्थेसाठी उत्तम असतं. शिवाय त्याच्यात विटामिन ई सुद्धा असतं.

असा आपला हा शक्तिवर्धक प्रसाद त्याच्याबरोबर उत्तम व्यायाम आणि सात्विक जेवण ह्या सगळ्याच समीकरण म्हणजे आपलं सुदृढ शरीर. म्हणुनच म्हणतात ना

परिश्रमो मिताहारो भूगतावश्विनीसुतौ ।

अश्विनी { दैवी जुळी मुले, Ashwins}कुमार हे जसे देवांचे दोन वैद्य आहेत, तसे पृथ्वीवरचे दोन वैद्य परिश्रम आणि आणि मित आहार (सात्त्विक जेवण). तर हाच संकल्प आपण ह्या नवीन वर्षी करूयात.

डायट टिप्स

    1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साखरेचे हार (गाठी हार) वापरतो, त्याऐवजी आपण सुक्यामेव्याचे हार बनवू शकतो.
    2. प्रसादासाठी वापरले जाणारे कडुलिंब फक्त त्या दिवशी न वापरता ते वाळवून धान्याला लावल्यास किडे होत नाहीत.
    3. कडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने काही तास पाण्यात ठेवून. ते पाणी आपण पिण्यास वापरू शकतो.