Categories
माझा कट्टा

कोरोना आणि अभ्यास … एक अनुभव

सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू आहे. कोरोना आणि त्या मुळे होत असलेले नुकसान. पण ह्या सगळ्या मध्ये चंदेरी किनार काय आहे माहिती आहे? अहो आपण किती सहज गोष्टी ऑनलाईन करायला लागलो आहे ते! ह्याचा सर्वात मोठा फायदा आपल्या मुलांना आणि त्यांच्या अभ्यासाला झाला आहे असे मला वाटतं.

हे कोरोनाचं सावट आलं तेव्हा माझ्या मुलांची परीक्षा नुकतीच संपली होती. CBSE पद्धतीच्या अभ्यासक्रमात असल्यामुळे त्यांना पंधरा दिवसांची सुट्टी होती आणि मग एप्रिल मध्ये परत नवीन वर्ष सुरु होणार होते. आता नेमकं तेव्हाच कोरोनाचा संचार वाढल्यामुळे आणि सगळीकडे lockdown जाहीर झाल्यामुळे आमची पंचाईत झाली. म्हणजे नवीन वर्षाची काहीच तयारी करू शकलो नाही. अगदी पुस्तके आणि वह्या आणणे सुद्धा शक्य नव्हते.

मला तर वाटलं आता काही नवीन वर्ष सुरु होत नाही आणि आधीचे वर्ष संपल्या मुळे मुलांना अभ्यासाला बसवण्याचा प्रश्नच नाही. मग ह्यांचा वेळ सत्कारणी कसा लावायचा ? शाळा सुरु झाल्या नंतर मुलांवर किती ताण पडेल? पुढच्या सुट्ट्या मिळतील का? ते सगळे ह्या सुट्ट्या भरून काढण्यात जातील का ? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घोळत असतानाच शाळेचा ई-मेल आला. 

ई-मेल मध्ये लिहिले होते की शाळा online classes सुरु करत आहे. ई-मेल वाचून सुद्धा माझ्या मनात शंका होतीच! असे किती आणि काय शिकवणार, मुलांकडे वह्या पुस्तके कुठे आहेत? टीचर नी शिकवलं तरी सराव कसे करणार इत्यादी. 

अखेर तो दिवस उजाडला. आम्हाला कुठे लॉगिन करावे, password, किती वाजता? इत्यादि ची माहिती ई-मेल वर आली होतीच, त्या प्रमाणे सकाळी जवळ जवळ शाळा सुरु होते त्याच दरम्यान माझी मुलगी तयार होऊन कॉम्पुटर समोर बसली. लॉगिन केले आणि सगळं इतकं सोपे झाले, जणू कोणी जादूची कांडीच फिरवली.

कोरोना आणि अभ्यास … एक अनुभव

Dashboard वर सगळ्या तासांची माहिती, त्यांच्या वेळा इत्यादी लिहिले होते. विडिओ session कधी सुरु होणार ह्याची देखील माहिती होती. विडिओ session मध्ये जॉईन झाले की तिथे नेहमीच्या टीचर दिसल्या. सगळ्या वर्गातील मुलांना शिक्षकांशी संवाद साधता यावा म्हणून chat ची सोय होती. ते सोडून मुलांना आणि शिक्षकांना एकमेकांशी बोलण्यासाठी विडिओ आणि ऑडिओ फॅसिलिटी सुद्धा होती.

जणू भविष्यातील ऑफीस जीवनासाठी मुलांना आत्ता पासूनच तयार करत आहेत असं मला वाटलं. वर्ग सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी एक वेगळे टॅब/ पान उघडायला सांगितले ज्यावर ह्यांचे पुस्तके अपलोड केलेली होती.

मला शिक्षक आणि शाळेचे खूप कौतुक वाटले. त्यांनी आत्ताच्या परिस्थितीत सुद्धा मुलांचा वेळ वाया जाऊ नये ह्या साठी बरेच कष्ट घेतले होते.

माझ्या मुलीसाठी सुद्धा हा अनुभव अतिशय प्रेरणादायी आणि आनंदी होता. पहिल्या दिवशी Online classes असे तब्बल 4  तास झाले. झाल्यानंतर जेवताना अगदी वर्गात बसून आल्यासारखी माझी मुलगी गमती जमती सांगत होती. एक वर्ग संपवून दुसरा चालू होई पर्यंत मुलांनी कश्या एक दुसर्याशी मनसोक्त गप्पा मारल्या हे हि त्यात आलंच! 

आता असे classes सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. मुलगी अगदी व्यवस्थित रुळली आहे. Online पुस्तके बघून गृहपाठ सुध्दा करायला लागली आहे. आता पुढच्या आठवड्यात प्रत्येक धड्या वर शिक्षक छोटी टेस्ट सुद्धा घेणार आहेत. हे सगळं अर्थात ऑनलाईन! आता घरी  चित्र असं आहे की आई -वडील remote working आणि मुलगी remote learning करत आहे . 

ऑनलाईन शिक्षण जे अगदी काही महिन्यापूर्वी पर्यंत असंभव किंवा फक्त कॉलेजच्या मुलांनी अथवा executive learning साठी वापरल्या जाण्याचे साधन मानले जात होते ते आज चिमुकली मुलंही वापरत आहेत. माझी एक मैत्रीण सातारा मध्ये शिक्षिका आहे. ती देखील online साधने आणि zoom कॉल्सच्या मदतीने वर्ग घेते असं मला समजलं. 

जबरदस्ती ने घरी बांधल्या गेल्यामुळे का होईना पण ही एक अतिशय चांगली बाब झाली आहे असं मला वाटतं. विचार करा जर अशी साधने आपल्या संपूर्ण शिक्षण प्रणाली ने वापरली तर एक सुद्धा मूल अशिक्षित राहणार नाही . फक्त एक चांगला फोन एका मुलाची शाळा होऊ शकते! 

कोरोनाच हे सावट कधी पर्यंत असेल हे माहित नाही. देशाच्या पातळीवर मी काही बदल घडवून आणू शकेन असे मला वाटत नाही  पण ह्या अनुभवानंतर आमच्या शाळेच्या पातळीवर मी नक्की प्रयत्न करेन. अशी online साधने जास्तीत जास्त शाळेनी वापरावी ह्या साठी माझा आग्रह असेल. 

तुमच्या शाळेत सुद्धा अशी काही साधने वापरली गेली का? तुमच्या मुलांचा अनुभव कसा होता ? आणि मुख्य म्हणजे तुमचं ह्या सगळ्याबद्दल काय मत आहे ? जरूर कळवा!

Categories
प्रवास

कच्छच्या रण ला भेट देताना लक्षात ठेवायच्या 10 महत्वाच्या गोष्टी

म्हणता म्हणता २०१९ सरेल आता! २०२० हाक देऊ लागलं आहे. आता डिसेंबर म्हटलं की नाताळ ची सुट्टी आली. नवीन वर्ष कुठे साजरे करूया असा प्रश्न आला, नाही का? तुमचं नवीन वर्ष कुठे साजरे करायचे ठरले का? नसेल ठरले तर ह्या वर्षी रण ऑफ कच्छ चा विचार करा. 

कच्छ चा रण म्हंटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती अमिताभ बच्चन ची उंच प्रतिमा, त्याच्या गहिऱ्या आवाजात “ रण नही देखा तोह कुछ नही देखा” असं निमंत्रण करत असलेली छवी आणि मागे दूरवर पसरलेला पांढरा वाळवंट! तसा वर्षभर कठोर अश्या हवामान आणि तुरळक लोकसंख्या असलेला कच्छ नोव्हेंबर ते जानेवारी च्या दरम्यान रंगांनी, लोककलेनी नटतो – रण उत्सव च्या माध्यमातून. खरंच डोळे दिपून टाकणारे आहे रण उत्सव.

Rann of Kutch in marathi

कच्छच्या रण ला भेट देताना लक्षात ठेवायच्या 10 महत्वाच्या गोष्टी
Photo Credit – Nikhil Tambe

आम्ही 2012 च्या डिसेंबर महिन्यात रण उत्सव ला गेलो होतो. तेव्हा कच्छ रण उत्सव पंधराच दिवसांचा असायचा. तिकिटे मिळणे ही अवघड होते. पण तिथे पोहोचल्या नंतर जाणवल की हा रण उत्सव साकार करण्या साठी खूप लोकांची शक्ती आणि जिद्द लागत असेल! आता एकतर हा उत्सव दोन महिने चालतो, त्या मुळे बुकिंग सहज मिळते. दुसरे कारण म्हणजे तिथे आता काही रिसॉर्ट ही आले आहेत. ज्यामुळे वर्षभर कच्छचा रण ला पर्यटकांची येजा असते.

कच्छचा रण हे जगातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट आहे. खरं तर हा एक नैसर्गिक चमत्कारच म्हणा ना! त्याची खरी सुंदरता पौर्णिमेच्या रात्री उजळून येते. स्वच्छ आकाशात सुंदर पूर्ण चंद्र त्याची चंदेरी किरणे पसरतो आणि त्या किरणांनी कच्छच्या रण मधील मिठाचे वाळवंट लखलखते.

कच्छच्या रण च्या ट्रीप साठीची महत्वाची माहिती 

१. जरी  कच्छ ला वर्षभर जाता येत असले तरी तिथली  खरी मजा रण उत्सव मधेच आहे . रण उत्सव साठी मिठाच्या वाळवंटा जवळ, धोरडो ह्या जागेत एक मोठी टेन्ट सिटी बांधलली जाते. सगळ्या सुख सुविधांनी सज्ज अशी हि टेन्ट सिटी, इथे राहण्याची उत्तम सोय होऊ शकते . 

२. टेन्ट सिटी मध्ये वेग वेगळ्या प्रकारचे टेन्ट असतात . Non A/C Tent, A/C Tent, Premium Tent असे त्याचे प्रकार आहेत.

tent city in Kutch- marathi blog
photo Credit – Nikhil Tambe

3. टेन्ट मध्ये राहणे पसंद नसल्यास तिथे काही रिसॉर्ट आहेत ज्याच्या मध्ये कच्छ मधील पारंपरिक घरे म्हणजे ‘भुंगा’ ह्या मध्ये राहण्याची सोय करतात. कच्छी भुंगा म्हणजे गोल मातीची घरे. 

4. रण उत्सव हे गुजरात पर्यटन द्वारा आयोजित केले जाते. ह्याचे बुकिंग तुम्ही online किंवा ठराविक agent कडून करता येते. गुजरात पर्यटन कडून भुज पासून धोरडो ला जाण्याची सोय केली जाते. भूज पर्यंत येण्याची आपण आपली सोय केली पाहिजे.

5. आम्ही पुणे – अहमदाबाद विमान आणि मग अहमदाबाद – भूज बस असा प्रवास केला होता. मुंबई हुन थेट भूज पर्यंत ट्रेन ची सोय आहे. 

6. भूज पासून धोरडो ला पोहोचायला जवळ जवळ दोन तास लागतात. धोरडो ला पोहोचल्या नंतर तुम्हाला तुमचा टेन्ट दिला जातो आणि मग तुम्ही टेन्ट सिटी मध्ये फिरायला मोकळे असता. तिथे जेवणाचे मोठे A/C दालने आहेत, जिथे सगळ्या वेळेचे जेवण, नाश्ता आणि चहा इत्यादी ची सोय केली जाते.

7. टेन्ट सिटी मध्ये लोक कला, संगीत, शॉपिंग अश्या अनेक करमणुकीची साधने असतात. आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे ह्या सगळ्या बरोबरच ढोलावीरा, ह्या हरप्पन काळातील स्थळाचे exhibition होते. त्याच बरोबर एके रात्री नक्षत्र माहिती ( स्टार पार्टी) चे आयोजन ही केले होते. 

8. टेन्ट सिटी ही कच्छी कला नी नटलेली असते. तेथील भिंतींवर सुद्धा आरश्या च्या तुकड्यांनी तयार केलेले सुबक असे चित्र आणि म्युरल्स पहिला मिळतात. ते सोडून धोराडो जवळील कलाग्राम मध्ये कच्छी भरतकाम, चित्रकला आणि विविध हस्तकला चे नमुने पाहायला आणि विकत घ्यायला मिळतात. अहो, तिथे उंटाच्या चामड्या नी तयार केलेल्या मोजडी वर सुद्धा रंगीत भरतकाम केले होते !

Embroidery and art work in Kutch village

9. टेन्ट सिटी च्या जवळ पास असलेली प्रेक्षणीय स्थळे  म्हणजे – काला डुंगर, मांढवी नदी, विजय विलास महाल. कच्छ मध्ये दिवसा गरम आणि रात्री खूप थंडी असे हवामान असते, म्हणून त्या प्रकारे कपडे न्यावेत. 

10. मिठाचा वाळवंट बघायला तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास किंवा सूर्योदय च्या सुमारास जा. अतिशय सुंदर आणि रमणीय असे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे तुम्ही बस, jeep , अथवा पारंपरिक प्रकारे सजवलेल्या उंटांवर बसून जाऊ शकता.

तुम्ही कच्छ च्या रण ला भेट दिली आहे का? कसा होता तुमचा अनुभव? तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर जरूर comments मध्ये कळवा. मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.

Categories
काही आठवणीतले प्रवास

सुधा कार्स म्यूझिअम

सुधा कार्स म्युझियम हे भारतातील हैद्राबाद येथे असणारे एक special ऑटोमोबाइल संग्रहालय आहे . संग्रहालयामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आकाराच्या cars कनिबॉयना सुधाकर (के. सुधाकर किंवा के. सुधाकर यादव) यांनी बनवल्या आहेत. गंमत म्हणजे त्यांनी आपले शालेय दिवसांत त्यांचा छंद म्हणून गाड्या बनवण्यास सुरुवात केली आणि 2010 मध्ये हे संग्रहालय उघडले. नावातच त्यांच्या cars बद्दलचे प्रेम दिसून येते.

संग्रहालयात जगातील सर्वात लहान दुहेरी डेकर बस आहे जी 10 लोकांना सामावून घेण्यास सक्षम आहे. लहान आकाराचे 12 वेगवेगल्या मोटर सायकली आहेत. ज्यात सर्वात कमी 33 सेंटिमीटर (13 इंच) उंचीचे आहेत आणि 30 किलोमीटर प्रति तास (19 मील प्रति तास) वेगाने चालविले जाऊ शकतात.

वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या जसे lipstick, purse, high heel shoe, पतंगाची रेल्वे, लाडू, सॉफासेट, पलंग, पेन, पेन्सिल, eraser, कंडोम, खंजीरआणि खूप काही.. या सगळ्या कार बरोबरच इथे काही unique models पण ठेवलेली आहेत. त्यातलेच एक म्हणजे foldable motorcycle जी मुख्यत्वे paratroopers सैनिकांसाठी १ल्या आणि 2ऱ्या महायुदधात वापरली गेली होती. ही बाईक 1 फुटापेक्षा कमी उंचीची 30 kmph ने चालवता येत असे आणि फोल्ड करून इतर ठिकाणी नेता येत असे. तिथे काही old vintage cars पण ठेवलेल्या आहेत ex.Old Rolls Royce, Ford, Ambassador models. गम्मत म्हणजे तिथे जुने Advertising Posters लावलेले होते ज्यात गाड्यांबद्दल माहिती दिलेली होती. त्या काळच्या जाहिराती!!👌यावरून पूर्वी गाड्यांची निर्मिती आणि विक्री कशी व्हायची याची झलक बघायला मिळाली. इथे काही Multiseater Cyclesचे मॉडेल्स बघितले जे इतर देशांमध्ये वापरले जातात.

मोटारींच्या उत्पादनासाठी बरेच खर्च होतात पण या गाड्या विक्रीसाठी नाहीत. गाड्या वर्षातून एक दोनदा रोड शोसाठी संग्रहालयातून बाहेर काढल्या जातात जेथे लोक त्यांना चालवताना पाहू शकतात .तसे फोटो सुद्धा तिथे लावले आहेत. जगावेगळे काही करण्याच्या ध्यासात, K Sudhakar यांच्यासारख्या अवलीयांंनी निर्माण केलेल्या या गाड्या आणि हे आगळेवेगळे संग्रहालय …आवर्जून भेट द्यावे असेच आहे…यातूनच पुढे आविष्कार निर्माण होतात हे मात्र नक्की!!

यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही हैैैद्राबादला गेलो तेव्हा या अनोख्या संग्रहालयाला भेटण्याचा योग आला. सोहम बरोबरच आम्हीही खूप एन्जॉय केले. सालारजंग museum आणि इतर प्रेक्षणीय स्थळांबरोबरच आवर्जून बघावे असे एक आगळे वेगळे Wacky Car Museum of hand made cars!! ज्याची Guiness book of records ने नोंद केली आहे ते अगदी जरूर बघावे👌

सुज्ञा

Categories
माझा कट्टा

मी अनुभवलेले रस्ता रुंदीकरण

काळाप्रमाणे रस्त्यांवर गर्दी वाढते. वाहनांसाठी रस्ते कमी पडायला लागतात. traffic jam होतात. त्यामुळे नगरपालिकेला रस्ता रुंदीकरणाचे निर्णय घ्यावे लागतात. त्यांना ते निर्णय पूर्णत्वाला आणायला खूप विरोध सहन करावे लागतात. सर्वात आधी ज्यांची घर किवा दुकानं पाडावी लागतात त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि बाकी सगळ्या प्रकारच्या नोटीस तयार करायला लागतात. तो निर्णय पूर्ण पार पाडायला आणि रुंदीकरण करून रस्ता बनवेपर्यंत खूप दिवस लागतात. त्याबरोबर मनुष्यबळ लागते. compensation द्यावे लागते. पैसा, वेळ सगळे लागते. त्यात काही जण पालिकेविरुद्ध कोर्टात जातात. मग परत रस्ता रुंदीकरण अडकते. बाकीचे ताब्यात घेवून जेवढे कोर्टात गेले आहेत, त्या जागा सोडून बाकी रस्ता तयार करावा लागतो. त्यामुळे रस्ता रुंदीकरण हा नक्कीच सोप्पा विषय नसतो पालिकेसाठी.

दुकानाचा फोटो .
फोटो सौजन्य – मीनल रिसबूड

आमचे दूकान सदाशिव पेठेतल्या हौदापाशी होते. ५० वर्ष ते दूकान होते. आमचे आजोबा सुरुवातीला ते दूकान चालवत असत. त्यात त्यांनी खूप व्यवसाय केला. तिथे आधी लौंड्री होती पण ती बंद करून कापड दूकान सुरु केले. मी लहान असल्यापासून फक्त कापड दूकान बघितले. आमच्याकडे तेव्हा समोरासमोर दोन दुकाने होती. त्यात समोरच्या दुकानात वेगवेगळे जण असायचे. काही वर्ष एक सोनार होता. १-२ वर्ष माझ्या आईने तिथे शिवणकामाचे दूकान पण सुरु केले होते. पण आजीच्या विरोधामुळे ते बंद झाले असावे. माझी आज्जी वाईट होती असे म्हणणार नाही मी. पण बाईने बाहेर जावून काम करण्याच्या विरोधात होती. पण तिची मत सुनेसाठी वेगळी आणि मुलीसाठी वेगळी अशी मात्र होती. कारण माझी आत्या SBI मध्ये officer म्हणून होती असो.. आजी जुन्या काळातील होती असे म्हणू . पण आम्हा नातवंडांवर तिचा खूप जीव होता.

तर आमचे मुख्य दूकान म्हणजे कापडाचे आणि समोरचे दूकान वेगवेगळ्या लोकांना भाड्याने दिले होते. शेवटचा भाडेकरू म्हणजे एक XEROX चं दूकान. मी शाळेत असतानाच ते दूकान आमच्या डोळ्यासमोर पाडलेले बघितले. आम्ही लहान होतो, पण तरी आमच्यासाठी ते दुकान महत्वाचे होते. अगदी थोडं का होईना पण त्याचे भाडे यायचे आणि ते दूकान कोपऱ्यावरील असल्याने दोन्ही बाजूने जागा गेली. त्यामुळे जवळजवळ अख्खं दूकान गेले रस्त्यात. त्याची भरपाई पालिकेने दिली. पण ती रक्कम नगण्य होती.

आमचं मुख्य दुकान म्हणजे कापड दूकान. ते दुकान आजोबा आणि बाबा मिळून चालवायचे. चादरी, बेडशीट, आभ्रे, पंचे, टॉवेल आणि अजून काही काही त्यात विक्रीकरिता असायचे. सोलापूर चादरी आणि हुबळीचे पंचे. हि आमची दुकानातील खासियत. आमची USP म्हणेन मी त्याला. अर्थात आम्हा दोन्ही बहिणींची शिक्षणे, लग्न, घरखर्च सगळे काही मुख्य ह्या दुकानावर आणि बाकी नंतर आई बाबांच्या कष्टांवर झालेले आहे. त्यांच्या कष्टांवर एक आख्खा वेगळा लेख होईल. तर आमचे हे दूकान आमचे उपजीविकेचे मुख्य साधन होते. जागा पण मोक्याची होती. शगुन चौकातून नागनाथपाराकडे जाताना उजव्या कोपऱ्यावर कुमठेकर रोड वर. आमचे लग्न झाले आणि त्यानंतर १-२ वर्षात ते दूकान पाडले. ते दूकान पडणार म्हणून नोटीस आली होती बाबांना. तसे आम्हाला खूप वर्ष माहित होते दूकान जाणार म्हणून. कारण पालिकेने खूप वर्षांपूर्वीच नोटीस दिली होती. पण तेव्हा मात्र शेवटची नोटीस आली. आजूबाजूच्या सगळ्यांना माहित झाले आता हे दूकान जाणार. नातेवाईक, मित्र सगळे जेव्हा जेव्हा दुकानात यायचे तेव्हा हि एकच चर्चा. सगळे बाबांना विचारायचे. आता तू काय करशील शाम. बाबा म्हणाले दूकान नक्की नाही चालवणार. पण सगळ्यांनी विचारून विचारून बाबांना हैराण केले अगदी आणि तेव्हा पासून बाबांना BP ची गोळी लागली. विचारणारे सगळे काही काळजी पोटी विचारायचे असे नाही. काही मोजक्याचं लोकांना काळजी असते बाकी कुचकट हेतूने विचारायचे. बाबांना सगळ्यांना टाळता पण येत नसे. तेव्हा बिच्चारे झाले होते ते.

दूकान रस्तारुंदीत जाणे म्हणजे असलेल्या मालाचे काय करायचे? तो काही परत घेतला जाणार नाही. काही मित्रांकडे ज्यांची कापडाची दुकाने होते त्यांच्याकडे बाबांनी माल पोचवला तो या बोलीवर कि विकला गेला कि पैसे द्या ह्या बोलीवर. त्र्यंबक मोरेश्वर दुकानात सगळे पंचे दिले. सेल लावला. जेवढा माल विकता येईल तेवढा विकायला काढला. जेवढे पैसे सोडवता येतील तेवढे सोडवले. तरी ३,४ वर्ष घरी पण माल पडला होता. हळू हळू मूळ किमतीत विकत होते. शेवटी ती वेळ आलीच आणि सगळे दूकान रिकामे करावे लागले. कपाटे वगैरे सगळे मिळेल त्या किमतीत विकले. अर्थात त्यातील खूप सामान जुने असल्याने त्याची खूप काही किंमत आली नाही. rack घरी घेऊन गेले, त्यादिवशी माझे ऑफिस होते. ऑफिस मधून घरी जाताना बघितले. दूकान पडलेले. बघून सगळ्या आठवणी आल्या दुकानाच्या. हे दूकान पण कोपऱ्यावर असल्याने दोन्ही बाजूने गेले. अगदी छोटी जागा राहिली. पण बाबांनी त्यावर पण पाणी सोडले. त्यांना तिथे आता काहीच नको होते. बाबांना त्या नंतर किती त्रास झाला असेल. आपण एवढी वर्ष ज्या जागेत काम केले. दिवसभर आपण तिथे असायचो ती जागाच आता उरली नाही. करायला काम उरले नाही. अगदी खाण्यापिण्याची काळजी नसली तरी उपजीविकेसाठी असलेले मुख्य साधन बंद झाले. दिवसभर काय करायचे? हा प्रश्न. तोपर्यंत बाबांना ६० पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांचा retirement सुरु झाली,असा त्यांनी समज करून घेतला.

बर आता त्या रस्त्यात भला मोठ्ठा फुटपाथ केलाय. तिथे गाड्या उभ्या करतात. तिथे कोपऱ्यावर आता एक डोश्याची गाडी उभी असते. ते बघून खूप त्रास होतो. पार्किंग साठी असलेली जागा, खरीखुरी सामान्य जनतेच्या पार्किंग साठी वापरली जाते एवढेच काय ते समाधान.

आता सुद्धा रस्ता मोठा करतात. पण त्यामुळे कोणाला फायदा होतो? हातगाडी लावणाऱ्यांना. garriage वाल्यांना. ज्यांच्याकडे आपल्या गाड्या लावायला जागा नाही त्यांना. आत्ताच कोंढवा मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. रस्ता बनवत असताना मनात  म्हणाले छान मोठा रस्ता होईल. रोज होणारे traffic jam कमी होईल. पण ते स्वप्न ठरले. एका garriage च्या आधी ५,६ गाड्या असायच्या. आता रस्ता रुंदीकरणानंतर  २०,२५ असतात. बरोबर आहे म्हणा. त्यांनी तरी गाड्या कुठे लावायच्या. स्वतःचा व्यवसाय कसा वाढवायचा. त्यातील काही गाड्या तर आता इथून परत हलणार नाहीत,अश्या स्थितीतील आहेत. बाकी traffic काय. हलणारे असते. ते त्याची वाट काढून जातील बरोबर. आप्पर इंदिरा पाशी झालेल्या मोठ्या रस्त्यावर truck, टेम्पो, पाणीपुरी, भाजीवाले , रिक्षा लावल्या जातात. रस्ता रुंदीकरणामागे असलेला उदात्त हेतू लक्षात घ्यायला पाहिजे. अश्या सगळ्या लोकांचे व्यवसायवृद्धी हाच तर मुख्य हेतू असतो. बाकी ज्यांची घर दुकाने जातात त्यांना तर काय त्यांचे म्हणणे मांडायला काही जागाच नसते. त्यांना जागा द्यायलाच पाहिजे. नाही देत म्हणले कि लगेच विकासाला अडथळा आणतात असे म्हणणार. विकासाला म्हणजे अश्या लोकांच्या विकासाला. शहराच्या नाही हा!

खराखुरा रस्ता रुंदीकरण म्हणजे काय. तर रस्ता मोठा केला आणि सामान्य लोकांना त्यांच्या गाड्यांसाठी जागा मिळाली. रस्ता खराखुरा मोठा झाला. मोठा झालेल्या रस्त्यावर नीट डांबरीकरण झाले. त्यावरून नीट गाड्या जावू लागल्या. असे झाले तर, ज्यांनी रस्त्यासाठी जागा दिली त्यांना पण वाईट वाटणार नाही आणि खराखुरा लोकांसाठी रस्ता उपलब्ध होईल. ह्याला म्हणतात रस्ता रुंदीकरण.

सौ. मीनल रिसबूड.

Categories
माझा कट्टा

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक शूरवीर

मी पर्वा गाडी चालवत होते. माझा पाच वर्षाचा मुलगा मागे car seat मध्ये बसला होता. माझी गाडी आमच्या lane मध्ये जात असताना एकदम मधे एक बाईक वाला आला. ‘अहो बाईक कर काका जरा जपून!’ माझ्या तोंडून पटकन असे उदगार निघाले. तोच माझा मुलगा पटकन म्हणाला, बाईक कर काका म्हणजे कोण? तुझे काका की माझे काका? त्याच्या प्रश्नांनी मला हसूच आले. तर हे बाईक कर काका कोण आणि का?

पुण्यात गाडी चालवत असताना मला विविध प्रकारचे लोक दिसतात. ह्यातील काही प्रकार वारंवार दिसतात आणि अश्या लोकांच्या विशिष्ट सवयींमुळे मी त्यांना काही विशिष्ट नावे दिली आहेत. त्यातलाच एक नाव म्हणजे बाईक कर काका.

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक  शूरवीर

बाईक कर काका

हे सहसा ३० पार केलेले, पण अजूनही स्वत:हाला कॉलेज मध्ये समजणारे असतात. त्यांच्या कडे कुठली तरी स्कूटी असते किंवा कुण्या एके काळाची बाईक असते. अहो पण केवढा तो गाडीवरचा आत्मविश्वास! ते स्वतःची गाडी कुठल्या high speed bike पेक्षा कमी लेखत नाहीत. अर्थात त्यांच्या गाडीचा वेग हि high स्पीडचं . पण मनात कितीही असलं तरीही त्या बिचाऱ्या गाडीला झेपलं पाहिजे ना! ती आपली side hero ला स्टन्टस करायला लावल्या सारखी रडत जीव ओढत असते. Lane वगेरे पाळणे ह्यांना फारसे पटत नाही आणि सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबणे त्यांच्या तत्वांत बसत नाही.

Airplane mode Kaku

ह्या सहसा स्वत:हा गाडी शिकलेल्या, license वगेरे मिळवायच्या फंदात न पडलेल्या मूली आणि काकू असतात. गाडी balance झाली म्हणजे, गाडी आली हे त्यांचे ठाम मत असते. ह्या सहसा आपल्या माहितीचा परिसर सोडून फार कुठे जात नाहीत. पण तेवढ्या भागात फिरताना त्या स्वत:हला स्पेशालिस्ट पेक्षा कमी समजत नाहीत. इंडिकेटर, साईड मिरर हे सगळे जास्तीचे पैसे उकळण्यासाठी गाडी बनवणाऱ्या कंपन्यांनी दिलेले फीचर्स आहेत, असे त्यांचे ठाम मत असते. ह्या गोष्टी म्हणून वापरल्या जात नाहीत किंवा दयनीय अवस्थेत असतात. कधी कधी मिरर चा वापर लिपस्टिक लावण्यासाठी आणि इंडिकेटर चा वापर मुलाला खेळण्यासाठी असा केला जाऊ शकतो.

स्टाइल भाई

हे आपले नवीन गाडी हातात मिळालेले तरुणअसतात. त्यांच्या गाडी मध्ये फीचर्स आणि वेग ह्याची कमी नसते. हेल्मेट घालणे, traffic शिस्त पाळणे वगेरे त्यांच्या लेखी महत्त्वाचे नाही. जागा मिळेल तिथे गाडी घालणे, म्हणजे अगदी फूटपाथ वर सुद्धा गाडी घालणे ह्यात त्यांना काहिं चुकीचे वाटत नाही. Lane cutting, मोठ्या गाड्यांना कट मारून जाणे ह्यातच thrill असत असं त्यांना वाटते, पण घरी आपली कोणी वाट बघत आहे, हे त्या thrill मध्ये ते विसरून जातात.

मल्टी तस्कर

ह्यांना कमालीचा आत्मविश्वास असतो. ह्या सिग्नल वर एकाच वेळी त्या कानात लावलेल्या रेडिओ चे गाणे बदलत असतात, दुसरीकडे रस्त्यावर काहीतरी विकत घेत असतात आणि सिग्नल सुटणार म्हणलं कि, नेमके पैसे काढून देतात आणि मागून हॉर्न वाजवणाऱ्या लोकांना शिव्या देत सरळ निघून जातात. ही वेगळी गोष्ट की, हे सगळे करत असताना त्यांनी u-turn आणि उजवीकडे वळणारे traffic अडवून धरलेले असतात. हेल्मेट चा वापर डोके वाचायलाच न्हवे तर मोबाईल होल्डर म्हणून पण करता येतो हे मी ह्याचाच कडून शिकले.

डी जे बाबू

हे तरुण असतात, वडिलांची किंवा तत्सम कोणाची तरी नवीन अथवा महागडी गाडी फिरवत असतात. त्या गाडी मध्ये त्यांचे मित्र मैत्रीणी ही असतात आणि हे सगळे joyride साठी आलेले असतात. सहसा ह्यांच्या गाडीत लेटेस्ट गाणी एकदम high volume वर चालू असतात. ही गाणी इतक्या जोरात असतात की, बंद खिडकीतून सुद्धा मंद आवाज बाहेर येत असतो. ह्यांना मागच्या लोकांचे हॉर्न ऐकू येतात का? ही दाट शंका मला नेहमीच असते. 

हे काही लोक जे मला पुण्याच्या रस्त्यांवर सर्रास आढळले. तुमच्या शहरात असे लोक तुम्हाला आढळले का? काय सांगता, काही नवीन प्रकार चे लोक ही दिसले? जरूर कळवा खाली कमेंट मध्ये.

Categories
काही आठवणीतले

हौशी वारकरी

२०१८ च्या वारीत गीतांजली व तिची मैत्रीण मीनल या दोघीनीं आळंदी ते पुणे एवढा २१ – २२ कि.मी चा वारीचा पहिला टप्पा पूर्ण केला. हे कळल्या पासून २०१९ च्या वारीला जाण्याचा निश्चय मी व माझ्या धाकट्या बहिणी ने केला व त्या प्रमाणे आम्ही दोन दिवस आधीच पुण्याला आलो, आळंदी ते पुणे व पुढे जमल्यास सासवड पर्यंत वारीची सोबत करण्याचा बेत होता. गीता ने बरेच आधी पूर्व तयारी केली होती. १५ – २० जणांचा ग्रुप तयार होईल असा प्रयत्न केला होता. हो – नाही करता – करता सरते शेवटी ७ जणांचा ग्रुप तयार झाला. त्यात ६ बाई माणूस व मी एकटाच गडी माणूस म्हणून ही नारी प्रधान दिंडी होती. आम्ही ६ जण ज्यात गीता, प्रीती (गीता ची मैत्रीण ), माझी बहीण आशा, गीता च्या मुलांची care taker आशालता व एक सोसायटीच्या आजी बाई शामिल होत्या. मीनल आळंदीला भेटणार होती. या दिंडीतले सर्व लोक वय वर्ष ४० ते ७४ च्या दरम्यानातील होते .

२६ तारखेला सकाळी ५- ५:३० च्या दरम्यान आम्ही आळंदी साठी निघालो. ट्रॅफिक बंदोबस्ता मुळे गाडी आळंदी पावेतो नेता आली नाही. आम्हाला चऱ्होली फाट्याच्या २ KM आधीच गाडी सोडावी लागली व वारीत सम्मिलित होण्यासाठी चालण्या ची सुरुवात झाली .

माउलींच्या आशीर्वादाने व आमचे नशीब थोर म्हणून, पालखी व आम्ही एकाच वेळी चऱ्होली फाट्याला पोहोचलो. पालखी चे दर्शन करून पहिल्याच दिंडी बरोबर पालखी सोबत चालण्याची सुरुवात झाली. पालखीच्या दर्शना साठी फाट्या वर सारे गाव जमले होते व त्या बरोबर आमच्या सारखे अनेक ” हौशी” व “गवशी ” वारकरी, “नवशी” वारकरयां मध्ये सम्मिलित झाले. २०० फुट रुंदीचा महामार्ग, बीआरटी व फूटपाथ सकट सर्व जागा विठ्ठलाच्या भक्तांनी भरून गेला होता. कोणीच एका जागी स्थिर नव्हते सर्व चालत धावत होते. अथांग जन सागर जणू दिंडीच्या लाटाच लाटा त्यात भजनांचा मधुर स्वर, एकमेकांशी स्पर्धा करीत पुढे पुढे धावत होत्या. काही गवशी वारकऱ्यांच्या लाटा सीमा ओलांडून वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या श्रद्धाळू लोकांनी, नवशी वारकऱ्यांसाठी लावलेल्या चहा, केळी , पोहे, बिस्कीट इत्यादींच्या स्टॉल वर उसळल्या .

नवशी वारकरी हे खरे वारकरी, त्यांचे ह्या स्टॉल्स कडे लक्ष्य सुद्धा जात नव्हते व वाटप करणाऱ्यांचे त्यांच्या पर्यंत काही पोहोचवण्याचे सर्व प्रयत्न अयशश्वी होत होते. वारकऱ्यांचा भक्ती-भाव व असीम श्रद्धा बघून मन भरून आले. इतक्या मोठ्या जन समुदायाला २० – २२ दिवस आपली इतर सर्व काम सोडून, फक्त माऊलीचेच नामस्मरण करण्या साठी, विठ्ठला शिवाय आणिक कोणतीच दुसरी शक्ति एकत्र करू शकत नाही ह्याची खात्री पटली. विठ्ठला आधी, मी वारकऱ्यांनाच मनातल्या मनात नमन केले व त्यांचा बरोबर भजन ऐकत, म्हणत पुढे वाट चाल करू लागलो. त्यांच्या वेगाने चालणे शक्य नव्हते. पालखीच्या दर्शनासाठी व नवशी प्रवाश्यांशी स्पर्धा कऱण्यात बरेच हॊशी, गवशी वारकरी धावत होते . किती तरी लोकांच्या पायातल्या चपला, जोडे मागे सुटत होत्या पण ते उचलून परत पायात घालण्याचे धाडस कोणीच करीत नव्हते. त्यांचा मागून येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटांचा धक्का लागून कोसळून पडण्या पेक्षा तळतळत्या उन्हात अनवाहणी चालत राहणेच जास्त श्रेयस्कर होते. गावतल्या लोकांना नंतर तिथे शेकडो जोडे चपला सापडले असतील. गीताची मैत्रीण मीनल अजून आम्हाला भेटली नव्हती, पण तिचा मोबाईल वर संपर्क झाला होता व आम्ही जवळपाससाच आहोंत असे समजले. एवढ्या मोठ्या जनसागरात तिला हुडकणे अशक्य होते पण प्रत्येक दिंडीला क्रमांक असल्याने व मोबाईल फोन जवळ असल्याने आमची भेट लवकरच झाली व आमचा कोरम पूर्ण झाला .मागील वर्षी आळंदी -पुणे वारी करणारी ती दुसरी अनुभवी होती. आम्ही ६ लोक बीआरटी मधून चालत होतो व मीनल ५ फूट कुंपणाच्या आतून. आम्ही बराच वेळ असेच चालत होतो, कारण कुंपण ओलांडून मीनलला बीआरटीत येणे शक्य नव्हते .

पावसाची वाट बघत-बघत तळपत्या उन्हात कधी सावलीत बसत, उठत, खात -पीत, कधी पालखी च्या पुढे कधी मागे, आम्ही चालत होतो. उन्हाचा त्रास सर्वानांच होत होता. सारेच जण थकले होते. पण एकआजीबाईनं शिवाय कबूल करायला कोणीच तयार नव्हते. पुढे पुणे – सासवड वारी करायची माझी पूर्ण तयारी होती, पण आमच्या नारी प्रधान दिंडी मधल्या ६ जणींनी माघार घेतल्या मुळे मी पण ते पुढच्या वर्षी वर ढकलले.

दुपारचे १२ वाजून गेले होते. आमचे चालणे सुरु होतेच. गर्दी वाढतच होती. त्यात माझी बहीण कुठे तरी मागे पुढे झाली व हरवली असे वाटले. शेवटी बरेच वेळा नंतर आम्हाला ती भेटली. अश्या प्रसंगी आपल्या ग्रुपच्या सर्वांचे मोबाइल नंबर सर्वांजवळ असणे फार आवश्यक आहे, याची खात्री पटली. हरवेल, पडेल, डिस्चार्ज होईल अशी अनेक कारणे सांगुन, शिवाय सर्वांजवळ मोबाइल आहेतच असे म्हणून मी माझा मोबाइल घरीच ठेवला होता.

“बैलांसाठी विसावा स्थळ ” अशी समोर भली मोठी पाटी लागलेली असताना ह्या पाच बाया /मुली अचानक तिथे थांबल्या. ती पाटी वाचता येऊ नये अशा फक्त एक आजी बाईचं होत्या. मी व मीनल पुढे चालत होतो . त्या थांबायचं कारण. “गायींसाठी विसावा स्थळ ” अशी पाटी दिसते का हे बघण्यासाठी थांबल्या असाव्यात कदाचित, असे मी मीनलला म्हणालो पण नंतर कळले कि माउलींचे इतक्या जवळून दर्शन घेऊन पालखी सोबत सेल्फी काढण्यासाठी त्या थांबल्या होत्या. ” नवशी” व “हवशी” वारकऱ्यांमध्ये जो फरक असतो तो हाच!

शेवटी दिंडी क्रमांक ५१ रथचा पुढे ; दिंडी क्रमांक २०१ रथचा मागे असे अनेक फळे वाचत वाचत व सर्व दिंड्यांना बघत बघत व त्यांचं कौतुक करत आम्ही ३ वाजताच्या सुमारास शिवाजी नगरला पोहोचलो व पालखीला निरोप दिला. पालखी पुण्याकडे निघाली आणि आम्ही आमच्या घराकडे! स्वेछेने एकत्र झालेला एवढा मोठा जन सागर एकदा तरी बघावा व वारकर्यांनबरोबर कमीत कमी चार पाऊले चालावी हि इच्छा पूर्ण झाली होती.

Categories
काही आठवणीतले

माऊली

वारीला जायचं तर ठरलं होतं. पण कसे.. कधी? आळंदी -पुणे करायची कि पुणे -सासवड. माझं मन सांगत होतं पुणे ते सासवड कर. पण सर्व ज्येष्ठांनी मला ओरडून पुणे- सासवडचा नाद सोडायला सांगितला. मग मी परत आळंदी ते पुणे अशी वारी करायची ठरवलं. गीतांजली होतीच बरोबर. आम्ही ह्यावेळी आपण आळंदीला भेटू असे ठरवले.

राहुल तर मला विचारत होता,” तुला वारी का करायची आहे”? त्याला म्हणाले,” मला माहित नाही. पण मला तीव्र इच्छा होतेय वारीला जायची. जणू काही माऊली सांगत आहेत ये वारीला”. प्रश्न होता आळंदी पर्यंत कसे पोचायचा? ह्याचा. राहुल सोडायला तयार होता. पण मुलींची शाळा असल्याने ते रद्द केले. शेवटी सोमनाथ म्हणजे १८ travels ला सांगून त्याने गाडीची सोय केली. त्याला म्हणाले, “मला आळंदी रोड पर्यंत कुठेही सोड. मी पुढे बघेन काय करायचे ते”. खरं तर मला आळंदी पुणे चालणे खूप hectic होईल असे वाटतं होते, पण बरोबर हि खात्री होती कि आपण करू शकू. आधीचे १० दिवस अतिशय धावपळीत गेले होते. ट्रेनिंग, ऑफिस, घरकाम, २ प्रोजेक्ट संपवायचं काम खूप जास्ती होते. पण तरीही मन सांगत होते तू जा.

सकाळी सर्व आवरून डब्बा बनवून निघाले. निघायला जरा उशीर झाला होता. गाडी वेळेत होती. पण पालखी निघाली होती. आळंदी रोड पर्यंत पोचले. खरे तर आळंदी फाटा खूप लांब होता. पण पुढे गाडी जावू शकत नव्हती. आता ह्यापुढे आपल्या पायी जायचं असा मनाचा हिय्या करून निघाले. GPS च्या मदतीमुळे खुप सोयीचं झालं. गीतांजली आणि माझी भेट अजून झाली नाही. आम्ही whatsapp live location चा फायदा घेतला. ती २ चौक मागे होती. मग मी थांबले. नशीब मात्र जोरात होते. मी थांबले तर…. “समोर पालखी. काय छान वाटले. शांतपणे पालखीकडे बघत होते. आजूबाजूला माणसांचा समुद्र होता. चक्क समुद्र. किती माणसे होती. लहान… मोठी, तरुण… वयस्कर. सर्व जण पालखीसाठी, पालखीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्या मागून दिंडी चालत होत्या. दिंडीची शिस्त खूप असते”.

दिंडी मध्ये एक म्होरक्या{दिंडी प्रमुख }असतो. त्याच्या मागेच सगळ्यांनी चालायचं. काहींच्या हातात झेंडे होते, तर काहींच्या हातात टाळ. काही बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तर काहींच्या डोक्यावर चक्क विठूमाऊलींची मूर्ती. सर्वांनी एका रांगेत चालायचं. पुढे सर्व पुरुष, मागे सर्व बायका. त्या बायकांच्या मागे दिंडी मधील काही मुख्य पुरुष. शाळेतले marching आठवते का? एका रांगेत चालायचे तर किती आटापिटा करायला लागायचा. बर, रांगेत पुढच्या माणसाच्या बरोबर मागे चालायचे, आणि डाव्या उजव्या बाजूच्या माणसांच्या रेषेत पण बरोबरीने चालायचे. त्यासाठी, सगळ्यांचा एकचं वेग हवा. सगळ्यांच्या बरोबर जाता यायला हवे. आपल्याला वाटते तेवढे सोप्पे नाही. आपल्याला दिंडी बरोबर जायचं तर आधीपासून खूप तयारी करायला लागेल. त्यांच्या वेगाने, त्यांच्या बरोबरीने, एवढे अंतर रोज पार करणे. आपल्यासाठी नक्कीच ते एक आव्हान. त्यासाठी शारीरिक दृष्ट्या किती तंदुरुस्त पाहिजे माणूस. पण फक्त शारीरिक तंदुरुस्ती हवी का? का मानसिक पण हवी? कारण जरी शरीर थकले, आणि मनाने सांगितले कि तू हे करायचं कि शरीर करतेच. त्यामुळे मन, मनाची ताकद पण समजून येते. तर एकूण काय शारीरिक तंदुरुस्ती, आणि मानसिक तंदुरुस्ती, दोन्ही महत्वाचं.

दिंडीमधील सर्व लोक कष्टकरी. शेतकरी. कुठून कुठून वारीला आलेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येतात. काय उद्देश, काय साधता येते ह्याने, देवदर्शन. देवाच्या चरणी आपले १५-२० दिवस अर्पण करायचे. काही तर १ महिन्यासाठी येतात. ह्याबाजूचे सर्व देवदर्शन करून वारीला येतात. मग पंढरपूर वरून घरी परत. दिंडी मध्ये त्यांची व्यवस्था पण चांगली करतात. नाश्ता, जेवणखाण, नेमाने सगळ्यांना मिळते. अर्थात त्यासाठी त्यांनी आधी पैसे पण घेतलेले असतात. खरेतर वारीला येताना त्यांच्या तश्या अपेक्षा पण खूप जास्त नसतात. आपल्याला २ वेळचे जेवण मिळावे, आणि आपण नामस्मरणात वेळ घालवावा. अमुक प्रकारचा जेवणं पाहिजे आणि तमुक प्रकार पाहिजे. असे काही नाही. जे मिळेल ते खावे. आणि हरी हरी करावे. अर्थात सगळी लोकं अशी नसतात.

असे म्हणतात वारीला तीन प्रकारची लोक येतात. हौशी, गवशी , नवशी. आधी वर्णन केलेले लोक नवशी. आमच्या सारखे हौस म्हणून येणारे हौशी. तर तिसरा प्रकार गवशी. थोडक्यात जे गवसेल ते घ्या आणि पिशवीत भरा. चोर वगैरे पण असतील. पण दोन्हीही वारीत आम्हाला चोरांचा अनुभव नाही आला. वारीच्या पूर्ण रस्त्यावर खूप दान देत असतात. काहीजण केळी देतात, काही बिस्कीट पुडे, पाणी, चहा, जेवण. सगळे काही वारीत मिळते. आपल्याला जेव्हा जे हवे ते आपण घेवू शकतो लोकांकडून. आम्ही प्रसाद म्हणून एकेक केळे घेतले एका माणसाकडून. पण बाकी गरजूंना मिळो असे म्हणत सगळे नाकारले. काही लोक गरज नसताना पण घेत होती, पिशव्या भरून भरून घेत होती. ते बघून मात्र वाईट वाटत होते. सगळ्यात चीड येत होती, ती म्हणजे जो माणूस देतोय त्याच्याकडून हिसकावून घेणाऱ्या लोकांची. एवढी गरज आहे का?असे वागायची गरज आहे का? हा प्रश्न त्यांना विचारावासा वाटत होता. पुढे एका दिंडीबरोबर आम्ही पण विश्रांती घेत होतो. त्यातील एक बाई म्हणत होती,”काय मी मी म्हणून घेतात. दिंडी मालकाने सगळी सोय केलेली असते. काही गरज नसते”, पण म्हणतात न,” व्यक्ती तितक्या प्रकृती”! वारीमधील चांगले अनुभव लक्षात ठेवावे आणि काही नको असलेले अनुभव विसरून जावे.

दिंडी मध्ये पांढरा वेषात असतात पुरुष मंडळी. डोक्यावर गांधी टोपी. किती मोहक हे दृश्य दिंडीचे. सगळे विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या नामस्मरणात मग्न. एकामागून एक चालत आहेत. वेगवेगळे अभंग म्हणणे चालूआहे. झांजा वाजत आहेत. काही तर एवढ्या अप्रतिम आवाजात अभंग गातात कि, ऐकत राहावे.

तर GPS मुळे आणि फोन मुळे गीतांजली आणि माझी भेट झाली. मागील वर्षी आमच्या बरोबर बरीच लोक असली तरी खूप वेळ आम्ही दोघीच दोघी होतो. ह्यावेळी आमची दिंडी जरा मोठी होती.  गीतांजलीचे बाबा, आत्या, प्रीती नावाची मैत्रीण आणि तिच्याकडे काम करणाऱ्या एक आजी आणि एक आमच्या वयाची मुलगी. हो आम्ही सगळ्या मुलीच. आमची दिंडी जरा वेगळी होती. पंजाबी ड्रेस मध्ये ४ बायका, एक नऊवारीतील आज्जी, एक साडी नेसलेली बाई. तर एक shirt pant मधील बाबा. सगळ्यांच्या पाठीला छोट्या sack आणि डोक्याला टोप्या. वयाप्रमाणे बघायला गेलो तर ७० च्या पुढील ३ आणि ४० च्या गटातील ४ असे होतो सगळे. सगळ्यांनी ठरवले होते पूर्ण चालायचं. आज्जीबाईंचा पाय जरा दुखत होता. तरी चालत होत्या आमच्या बरोबरीने. मधेच गर्दीत आत्या हरवल्या. आम्हाला वाटले त्या पुढे गेल्या. म्हणून आम्ही पुढे चालत आलो. गीतांजली चा फोन आत्याच्या कडे. कसेतरी संपर्क होवून परत भेटलो. फोन हा ,आपल्यासाठी केवढं मोठ उपयोगी असं साधन आहे. ह्यावर बोलत पुढे वारी चालू केली. ह्या वेळी आमच्या नशिबाने, निम्म्या अंतरापर्यंत पालखी आमच्या पुढे मागे होती. कधी आम्ही पुढे असायचो कधी पालखी. ह्याला कारण म्हणजे कधी आमची दिंडी थांबायची, कधी पालखी. गीतांजलीच्या बाबा आणि आत्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आमच्या बरोबरीने नाही, तर आमच्या पुढे ते चालत होते. दमले का? विचारले तर अजिबात कबूल करत नव्हते, “आम्ही दमलो म्हणून”. सगळ्यांबरोबर मजा येत होती. गप्पा, कधी दिंडीतील भजन ऐकत कधी थांबून पाणी पी, काहीतरी तोंडात टाक असे करत आम्ही पुढे पुढे चालत होतो. एकदा जेवणासाठी थांबलो. कुठे, कसे, काही विचारायचे नाही. जिथे जागा मिळेल तिथे बसलो आणि खावून पुढे निघालो. ह्यावेळी आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही. नुसतं ऊन, घामाच्या धारा. ढग आले कि बरे वाटत होते, पण आम्हाला ह्यावेळी पाऊस काही लागला नाही. जो खरा तर हवा होता. सगळीकडे खूप उकडत होते. पण आमच्या नशिबात पाऊस नव्हता वारी मध्ये. काकांनी तर खरेदी केली होती, पावसापासून वाचायची. पण खरेदी नंतर कधीतरी उपयोगी पडेल त्यांना. Raincoat काही त्या दिवशी लागला नाही. माझ्या दृष्टीने bombay sapper पर्यंत मी आरामात चालू शकले. त्यानंतर मला जरा पायाने त्रास दिला. वारीचं ठरलेलं अंतर पूर्ण करायचे होते. त्या नंतर मात्र आम्ही जरा जास्त वेळा थांबलो. सगळ्यांनाच हवा असलेल्या विश्रांतीनंतर आम्ही संचेती पूल वर आलो. संचेती हॉस्पिटलच्या पाटीने अतिशय आनंद झाला. सगळ्यांना आपण ठरवलेले अंतर पूर्ण केल्याचा आनंद झाला. अंदाजे २२ km चाललो. प्रीतीच्या म्हणण्याप्रमाणे वारी पूर्ण चालणारी लोक पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघून खुश का होत असतील ते जाणवले.

वारीत जावून काय मिळते असा विचार केला तर खरचं काय मिळाले. आपण एवढे चालू शकलो ह्याचा अभिमान! नाही. तो तर कधीच गळून पडला. खरचं! वारीमध्ये एवढी गर्दी असते आणि त्यात आपण ह्या पूर्ण जगात एक शुल्लक व्यक्ती. आपल्यामुळे काहीही होत नसते. सगळ्याचा कर्ता करविता धनी कोणी वेगळाच असतो. माऊलींची इच्छा होती म्हणून एवढे मी करू शकले. लोकांची भक्ती बघून आपल्याला आनंद मिळतो. त्यासर्व भक्तिभावात आपण कुठेतरी काहीतरी केले ह्याचं समाधान. त्यांच्यामुळे आपल्या तोंडात चार वेळा माऊलींचे नाव आले. चार वेगळ्या लोकांना भेटलो. अनंत लोकांना बघितले. अनंत लोकांमध्ये चाललो ह्याचा समाधान. वारी तुम्हाला जगाची जाणीव करून देते. कधीतरी हवेत चालत असाल तर जमिनीवर आणायला मदत करते. स्वतःशी बोलायला खूप जास्त संधी देते. जी रोजच्या पळापळीमध्ये तुम्हाला नाही मिळत. अशी संधी तुम्हाला बाकी ठिकाणी पण मिळतेच. पण हा अनुभव खूप वेगळा. मी काही खूप धार्मिक नाही ना खूप देवाचे करणारी आहे. रोज देवाला नमस्कार पण करत नाही. तरीही वारी मला अनंत कारणांनी आकर्षित करते. शिवाजीनगर वरून निघताना आता पुढील वर्षी वारीतील एक टप्पा वाढवू असा विचार करत सर्वांना टाटा करत मी घरच्या मार्गाला लागले.