Categories
आरोग्य पाककृती प्रवास

मैसूर पाक, मैसूर डोसा, मैसूर इडली?

नोव्हेंबर २०१९ मध्ये फिरायला मैसूर ला गेलो होतो. फिरायला जाणं आणि तिथे मिळणार काहीतरी खास घेऊन येणे हे तर आलंच. त्यामुळे आपोआपच पावलं मिठाईच्या दुकानात कडे वळली, ती म्हैसूर पाक घ्यायला. त्यासाठी ड्रायव्हर काकांनी प्रसिद्ध गुरु स्वीट्स कडे गाडी घेतली व हे पण संगीतले की मैसूर पाक पहिल्यांदा बनवणारे आचारी दुसरे तिसरे कोणी नसून ह्या गुरू स्वीटस च्या मालकाचे पणजोबा होते. त्यानंतर  मैसुरपाक पहिल्यांदा कसा बनला त्याची गोष्ट सुद्धा सांगितली. त्याचं झालं असं की वडियार राजा ४ यांनी त्यांच्या आचाऱ्यास काका सुरा मडप्पा हे त्याचं नाव. त्यांना नवीन वेगळा गोड पदार्थ बनवण्यास सांगितला. मग काका सुरा ह्यांनी सहज म्हणून डाळीचे पीठ घेतले. त्याच्यात भरपूर तूप व साखर घालून एक पदार्थ बनवला. राजा वडियार यांना तो पदार्थ फारच आवडला. पदार्थ गोड म्हणून पाक व मैसूर मध्ये बनला म्हणून मैसूर पाक. ही गोष्ट ऐकून आम्हालाही राजा सारखीच लहर आली काहीतरी authentic खायची. त्यामुळे वृंदावन मधल्या रॉयल ऑर्किड ह्या हॉटेल मधल्या शेफ मंजुनाथ ह्यांची लगेच भेट घेतली आणि त्यांना विचारलं की मैसूर मधील special असं काही खायला मिळेल का?

उजवी कडे उभे शेफ मंजुनाथ व त्यांची टीम
उजवी कडे उभे शेफ मंजुनाथ व त्यांची टीम

त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर गरमागरम वाफाळलेली इडली व सांबार अहं.. इडली व त्याच्या बरोबर आगळीवेगळी उसळ समोर आली. त्याच उसळ इडलीची रेसिपी सांगत आहे.

या पाककृती तील इडली तर सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच त्याची कृती न सांगता सरळ त्यातील उसळ कशी बनवायची ते बघू.

मैसूर इडली साठी लागणारे समान :-

 1. तेल- ३ चमचे
 2. चिरलेला कांदा- १
 3. टोमॅटो – १
 4. आलं,लसून पेस्ट – १चमचा
 5. श्रावण घेवढ्याच्या ओल्या बिया – १५०ग्राम
 6. उकडलेला बटाटा – छोटे २
 7. मोहरी – १चमचा
 8. कडीपत्ता – ५ ते ६ पानं
 9. हळद – १/२ चमचा

वाटणं करण्यासाठी लागणारे साहित्य :-

खोवलेला नारळ – १ वाटी 

जिरं – १चमचा

कांदा, टोमॅटो – प्रत्येकी १

वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे व बाजूला ठेवावे.

मैसूर इडली कृती :-

 1. गरम तेलात मोहरी, कढीपत्ता व आलं-लसणाची पेस्ट घालावी.
 2. नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घाला व छान परतून घ्या. नंतर लगेचच घेवड्याच्या बिया व एक कप पाणी घालून 20 मिनिटे शिजवून घ्यावे.
 3. त्यानंतर वरील तयार वाटणं, मीठ (चवीनुसार) व उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून झाकण ठेवून एकदा वाफ काढावी.
 4. पातळ हवे असल्यास लागेल तसे पाणी घालावे.

तर अशी ह्याची शेफ मंजुनाथ ह्यांनी लिहून दिलेली कृती. म्हैसूर मधील स्पेशल गोष्टींमध्ये मैसुरपाक, म्हैसूर डोसा हे जसं आपण ऐकलं आहे. त्याचप्रमाणे या इडलीला आता आपण म्हैसूर इडली असं म्हणूयात का?

म्हैसूर इडली - उसळ इडलीची रेसिपी सांगत आहे.
इडली बरोबर ची उसळ

Food for thought :-

वरील बनवायचा कृती नंतर या पदार्थाची शरीरावर होणारी कृती बघुयात.

 1. उसळ खा आणि कृती थेट हाडांवर बघा. म्हणजेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम व फॉस्फरस घेवड्याच्या बियांमधून मिळतं.
 2. इडलीची महती तर सर्वांना माहीतच आहे. उडीद डाळ व तांदूळ मसल्स वाढवण्याचा हा योग्य उपाय. शिवाय कार्बोहाइड्रेट, मिनरल्स, विटामिन हे तर आलंच. शिवाय oil free.

एवढं सगळं ह्याच्यातून मिळतंय म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? हे तर असं झालं की एक डिश बनवा व संपूर्ण पोषक मूल्य मिळवा.

जाता जाता एक भन्नाट डायट टीप तुम्हाला देऊन जाते.

 • इडली साठी तांदूळ व उडीद डाळ भिजत घालताना त्याच्यामध्ये सात ते आठ मेथीचे दाणे घालावेत. त्यामुळे चव सुद्धा चांगली येते शिवाय फायदे तर इतके की आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असे होते. तर मेथ्यानं चे फायदे असे की यामुळे पचनाला मदत होते, भरपूर प्रमाणात फायबर, शरीरातील वात कमी करतो, अतिसार (diarrhoea) कमी होतो, खोकल्यासाठी गुणकारी, रक्तातील साखर कायम ठेवण्यास मदत होते, शिवाय रक्तातील cholesterol level कमी करण्यास सुद्धा मेथ्या मदत करतात.
Categories
आरोग्य

चणे खावे लोखंडाचे व दूध प्यावे सोन्याचे ! (भाग २)

मानसी दीक्षित (आहारतज्ञ )

वाचकहो, दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मागील चणे खावे लोखंडाचे हा माझा लेख सगळ्यांनी वाचला असेलच. त्याचाच पुढील भाग दूध प्यावे सोन्याचे हा लेख तुमच्या भेटीला आणला आहे.

दूध प्यावे सोन्याचे

Milk of Gold - Health Tips

दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. आपल्या सगळ्यांना माहित असेलच की जिथे स्वच्छता, आनंद, उत्साह, मांगल्य, आरोग्य असते तिथे सदैव लक्ष्मीचा निवास असतो. त्याच लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण सोन्याची पूजा करतो. तेच सोनं आपण दागिन्यांच्या रूपात आपले सौंदर्य खुलून दिसावे म्हणून घालतो. हे सोनं तुम्ही तुमच्या आहारात वापरून तुमचे सौंदर्य अधिक उत्तम करू शकता. ते कसे? सोन्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील विषाचा व रोगांचा नाश होतो. त्यामुळे आपले शरीर सुदृढ, आरोग्यसंपन्न, उत्साही, आनंदी व सुंदर होते, म्हणून या दिवाळीला सोनं सेवन करून खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन करूयात.

कानकं सेवनं नित्यं जरामृत्यूविनाशनम्, दृढकायाग्निकरणम् ।

( निघण्टु रत्नाकर)

सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही, अकाली मृत्यूची भीती राहत नाही  शरीर दृढ व जठराग्नी उत्तम राहतो. (अर्थ- डॉ. श्री बालाजी तांबे.) (सकाळ, फॅमिली डॉक्टर, ४ ऑक्टोबर २०१९)

 या धातूचे अजूनही काही फायदे आहेत जसे की, घाव किंवा जखम भरून येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सोन्याच्या धातूंमध्ये असते. सोनं हृदयासाठी व डोळ्यांसाठी हितकारक आहे.

हे सगळं तर ठीक आहे पण दुध प्यावे सोन्याचे हे काय? तर त्याचे असे आहे. सोन्याचे फायदे आपण जाणले. पण ते घ्यायचे कसे?

सोन्याचे दूध:- लहान मुलांना आपण दुधामधून जी बालगुटी देतो, त्याच्यात इतर सामग्रीं बरोबर शुद्ध सोन्याचा एक वेढा उगाळावा.

सोन्याचे पाणी:- सुवर्णसिद्ध जल हा प्रकार तुम्हाला माहित असेलच. शुद्ध सोने पाण्याच्या भांड्यात टाकून ते पाणी वीस मिनिटे उकळून सुवर्णसिद्ध जल तयार करता येते.

तांब (Copper)

Health Tips- Benefits of Copper

तांब म्हटलं की, मला माझ्या आजे सासूबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवते. तिचं घर पुण्यात अगदी जोगेश्वरीच्या मंदिराच्या समोर होतं. पूर्वी त्या घराच्या जवळचे जुने वाडे पाडण्यात आले. तेव्हा जमीन खोदताना त्यांना तांब्याच्या तोट्या मोठाले पाईप्स मिळाल्याचं तिने सांगितलं. त्या कशा? तर पेशव्यांनी कात्रज तलाव बांधून नळाद्वारे पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. हा इतिहास सर्वांना माहीत आहेच. तर सांगायचा मुद्दा असा की जे पाणी पुण्याला यायचं ते सर्व या तांब्याच्या तोट्या आणि पाइपमधून यायचं. ही तर पूर्वीच गोष्ट झाली पण एवढ्यातच मी वाचलं की युकेमध्ये सुद्धा सर्व शहराचा पाणीपुरवठा तांब्याच्या पाइपमधून होतो. पण coppers चे पाईप्स का?

तर तांब आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण कार्य करतो. एक उदाहरण सांगते आपल्या घरात cooper wires लावलेल्या असतात. त्याच्यातून electric flow चांगला होतो. तसच आपले शरीर सुद्धा एक भलंमोठं wires (nerve) च जाळच आहे. शरीराकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना व मेंदूकडून येणाऱ्या संवेदना (electric impulses).

ही सर्व प्रक्रिया neurotransmitters च्या माध्यमातून केली जाते आणि copper मुळे हे neurotransmitters बनायला मदत होते.

https://copperalliance.eu/benefits-of-copper/health/

अजून बरीच कार्ये copper च्या माध्यमातून केली जातात, जसे आपल्या हाडांची घनता (density) व त्यांची ताकद ही सुद्धा copper वर अवलंबून असते. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तांब मिळवायचं कसं?

नवीन पद्धत म्हणाल तर आजकाल copper pipes  वापरून वॉटर प्युरिफायर तर तुम्ही बघितले असतीलच. शिवाय copper water bottles मिळतात. आपल्या रोजच्या आहारातून सुद्धा तांब मिळवता येतं, जसं की liver, shellfish, oysters. शाकाहारी पदार्थ म्हणाल तर बदाम, cereal, मनुका, लिंबाचे साल ह्या सर्वांमध्ये तांब असतं.

Categories
आरोग्य

चणे खावे लोखंडाचे व दूध प्यावे सोन्याचे ! (भाग १)

मानसी दीक्षित (आहारतज्ञ)

चणे खावे लोखंडाचे ।  मग ब्रम्हपदी नाचे।।

मुक्ताबाई अभंग ताटी उघडा ज्ञानेश्वरा (ओवी ५)

एखादी गोष्ट साध्य करायची असेल म्हणजेच, ब्रह्मपदाला पोहोचला असेल तर कष्टाला पर्याय नाही. ह्याच अर्थाची मुक्ता बाईंची ओवी तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. पण तुम्ही म्हणाल खरंच लोखंडाचे चणे खाणं शक्य तरी आहे का? आणि हे काय नवीनच दूध प्यावे सोन्याचे! अर्थ नाही कळत, हो ना! तर वाचा हा माझा लेख.

पूर्णहार ?

आपल्या सगळ्यांना हे माहित आहे कि चांगले आरोग्य मिळवायला व ते टिकवून ठेवायला संतुलित आहार घेणं खुप महत्वाचं आहे पण संतुलित आहार, असे सांगितले कि पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय येतं ? फळ, भाज्या, दूध, meat हे सगळं. ह्या सगळ्या मधून आपल्याला उत्तम प्रकारे Proteins, Carbohydrates व Vitamins मिळतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आपला संतुलित आहार तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याच्यात काही विशिष्ट प्रकारचे धातू सुद्धा समाविष्ट असतात. तर ते धातू कोणते ?

चणे खावे लोखंडाचे ।

लोखंडाचे चणे म्हणजेच आपल्या अन्नातील लोह. आपण श्वासाद्वारे जो प्राणवायू सतत आत घेत असतो आणि ज्या योगे आपला प्राण अर्थातच जीव शेवटपर्यंत टिकून राहतो. तो प्राणवायू आपल्या रक्तात मिसळण्यासाठी आणि नंतर शरीरातील अनेक क्रिया प्रक्रियेद्वारे उपयोगात येण्यासाठी रक्तात लोह असणे आवश्यक आहे.

आता हे लोखंडाचे चणे आपल्या अन्नात किंवा रोजच्या आहारात कसे समाविष्ट करायचे? त्यासाठी काही सोपे उपाय आहेत. ते आपण केले कि काम झालंच म्हणून समजा.

Meat, अंडी, दूध या सगळ्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आढळते पण शाकाहारी लोकांचे काय? अर्थात त्याला सुद्धा पर्याय आहेत. जसे हिरव्या पालेभाज्या, खजूर, डाळी, उसळी, गूळ इत्यादी. काही मसाल्यांच्या पदार्थांमध्ये सुद्धा लोह असते उदाहरणार्थ आमचूर, तीळ, खसखस, हळद. फळांमध्ये म्हणाल तर पेरू, सीताफळ, केळ, करवंद.

छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स

 • लोखंडाची कढई अन्न शिजवताना वापरलीत तर त्याच्यातून आपल्याला लोह मिळते .
 • त्याच कढईत शिजवताना लिंबाचा वापर केल्यास अन्ना मध्ये लोहाचे प्रमाण जास्ती वाढण्यास मदत होते.

Born with a Silver Spoon

वरील म्हण आपण श्रीमंतीत जन्मलेल्या मुलांसाठी वापरतो. पण ह्याच चांदीचा उपयोग आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यासाठी होतो. हे तुम्हाला माहीत आहे का? खूप पूर्वीपासून आपण ऐकतो की चांदीच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी प्यावे. याचे कारण हे आहे की, चांदीमध्ये रोगाचे जिवाणू (bacteria) मारायची क्षमता असते. त्यामुळेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

चांदी जवळजवळ ६५० रोग निर्माण करणारे bacteria, fungus, parasites, molds यांना मारून टाकते. ( हे प्रमाण UCLA मेडिकल स्कूल ने मान्य केले आहे.)

Larry C. Ford, M.D., UCLA Department of Obstetrics and Gynecology, UCLA School of Medicine, November, 1, 1988

आहारात चांदी मिळवायचा अजून एक पर्याय म्हणजे चांदीचा वर्ख. थोड्याच दिवसात दिवाळीची सुरुवात होणार. दिवाळी म्हटलं कि घरी मिठाई बनवायची तयारी सुरु झालीच असेलच! घरी बनवलेल्या मिठाईवर तुम्ही चांदीचा वर्ख लावू शकता. आपल्या आहारात चांदी मिळवण्याचा तो एक उत्तम पर्याय आहे. चांदीचा वर्ख  विकत आणताना तो खरंच चांदीचा आहे का?

वर्ख पारखण्यासाठी सोपे घरगुती उपाय

 • खऱ्या चांदीचा वर्ख हाताला लगेच चिकटतो.
 • तो दोन बोटांमध्ये चोळत राहिल्यास शेवटी दिसेनासा होतो. पण चोळत राहिल्यानंतर त्याचा जर छोटासा गोळा तयार झाला तर मात्र त्याच्यात ॲल्युमिनियम ची भेसळ आहे.
 • चांदीचा वर्ख आणून जर तो घरात तसाच खूप दिवस राहिल्यानंतर सुद्धा जर त्याची चकाकी कायम असेल तर ती चांदी खरी आहे, पण जर तो वर्ख काळा पडला असेल तर मात्र त्याच्यात ॲल्युमिनियमची भेसळ असते.

तर मित्र मैत्रिणींनो, आहारातल्या धातूंबद्दलच्या अजून काही गमतीशीर गोष्टी जसे सोन्याचं दूध, हे घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईनाच. तोपर्यंत मला तुमचे अभिप्राय कळवायला विसरू नका.

Categories
आरोग्य

मधु गोलक :- मोदक

झाला ना! श्रावण संपत आला. आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. नुसतं बाप्पांचे आगमन एवढं जरी म्हटलं, तरी अंगात उत्साह संचारतो. बरचं काहीतरी आठवतं जे करायचं असतं. बाप्पांची मूर्ती, सजावटीचे सामान, पूजेचे सामान, बाकीच्या सामानाची जमवाजमव हो ना! सगळ्यात महत्त्वाचं तर राहुनच गेलं. काय? गणपती बाप्पांचा प्रसाद. तो तर राहिलाच ना. आपण सगळे जण आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्या लंबोदर गजाननाच्या प्रसादाची म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मधु गोलक नाही समजलं. अहो! मोदक.

आता सरळ विषयालाच हात घालते. आपल्याकडे तळलेला मोदक, खव्याचा मोदक, आजकाल तर चॉकलेटचे मोदक, पेढ्याचे मोदक सुद्धा मिळतात. पण आज मी तुम्हाला काही गमतीशीर गोष्टी सांगणार आहे. ते आपल्या पारंपारिक उकडीच्या मोदकांची.

उकडीचे मोदक व त्याच्या गमतीशीर गोष्टी :-

उकडीच्या मोदकांसाठी लागणारे सगळे जिन्नस तर तुम्हाला माहित आहेतच. ओला नारळ, खसखस, गुळ, तांदळाची पिठी, वेलदोडा इत्यादी. ह्या सगळ्या लागणाऱ्या सामानाच्या काही interesting fact.

 • ओला नारळ :- पावसाळा ऋतु आणि बाप्पांचं आगमन हे अगदी ठरलेले समीकरण. आता पावसाळा म्हटलं की सर्दी सारखे आजार आलेच. तर त्यावर उपाय म्हणून ओला नारळ. त्याचं कामच  आहे ते. म्हणजे ओला नारळ आपली प्रतिकारशक्ती वाढवतो व सर्दी पासून रक्षण करतो शिवाय तो iron शोषून घेऊन Hb वाढवण्यास मदत करतो.
 • खस-खस :- ही तर दिसायला खूप छोटी छोटी. पण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं असतं. अजून एक महत्त्वाचं कार्य खसखस करते. ते म्हणजे bad cholesterol कमी करून good cholesterol वाढवण्यास मदत करते.
 • गुळ :- गुळ म्हणजे गोडवा. आपल्या मधु गोलक मधील येणारी मधुरता ती या गुळा मुळेच. शिवाय त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह असते.
 • तांदळाची पिठी :- तांदळाच्या पिठाचे मऊ व लुसलुशीत मोदकांच्या वरचे आवरण. पचायला अगदी सोप्पे. तांदळाच्या पिठामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे blood clotting होण्यास मदत होते.
 • वेलदोडा :- हा तर नैसर्गिक mouth freshener. पावसाळ्यात सततच्या दमट हवेमुळे होणारा nausea दूर करणारा हाच तो वेलदोडा. हा motion sickness घालवायला सुध्दा मदत करतो.
 • जायफळ :- आपल्या मधु गोलकात घातले जाणारे जायफळ तर एकदम गुणकारी. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे होणारे त्रासाची कल्पना सर्वांना आहे. त्या सगळ्या त्रासाची सुटका करणारे जायफळ. Help to reduce diarrhoea.
 • केळीचे पान :- ते तुम्ही म्हणताना ‘last but not the least’.  उकड काढताना लागणारे केळीचे पान. आपल्याकडे मोदकाची उकड काढताना मोदकांच्या खाली केळीचे पान वापरण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीचे पान आपण कुठे खातो. ते तर फक्त उकड काढताना वापरतो. त्याचा काय उपयोग? पण त्या पद्धती मागचे कारण विचार करायला लावणारे आहे. केळीच्या पानांमध्ये polyphenols (पॉलिफिनॉल)नावाचा घटक असतो जो पदार्थ गरम करताना त्यात शोषला जातो आणि त्याच्या मुळे बऱ्याच lifestyle diseases  ना प्रतिबंध (prevent) होतो. उदाहरणार्थ- डायबिटीस.

तर अशा आहेत आपल्या सगळ्या उकडीच्या मोदकांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या गमतीशीर गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की वाचून कळवा.

Categories
आरोग्य

शेतातून थेट तुमच्या निरोगी आयुष्यात

गोष्ट अगदी अलीकडचीच, मंडईच्या जवळ कामानिमित्त गेले होते. तेवढ्यात एक भलीमोठी काळी चकचकीत गाडी भाजीवाल्या समोर उभी राहिली. खिडकीची काच उघडली आणि आतून आवाज आला एक किलो बटाटे, अर्धा किलो टोमॅटो , कोथिंबीर अमुक अमुक…भाजीवाल्या दादांनी भराभरा सगळ्या भाजीपाला पिशवीत भरला आणि गाडीत ठेवून दिला. जाता जाता गाडीच्या खिडकीतून पैसे घेऊन गेला. सहजच मनात विचार आला की, जी गाडी एकदम चकचकीत well maintained, well serviced अशी आहे. मग शरीर नावाच्या गाडीचं काय? जसे आचार्य चाणक्य म्हणाले होते की, “आत्मा अविनाशी आहे, पण एखादे ध्येय किंवा चांगलं काम करायचं असेल. तेव्हा साथ मात्र शरीराची लागते.” तर अशा ह्या शरीर रुपी गाडीला लागणारे इंधन ते तर पारखायलाच पाहिजे हो ना! तरच आपलं शरीर well maintained, well serviced, तेजस्वी होईल. ज्या अन्नामुळे आपलं शरीर सुदृढ, निरोगी, सतेज बनते, ते अन्न पारखायलाच आपल्या कडे वेळ नाही. आपण तो वेळ काढलाच पाहिजे आणि तुमच्या आमच्या भाषेत selection of food झालंच पाहिजे. आता हे अन्न निवडायचं कसं? हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर याचे उत्तर आपल्याला श्रीकृष्णांनी ५१०० वर्षांपूर्वीचं गीतेतच सांगितले आहे.

आयु: सत्व बलारोग्यसुखप्रीती विवर्धना: ।
रस्या:सिग्धा:स्थिरा हृद्या आहारा: सात्विकप्रिया:।।८।।
भग्वदगीता, अध्याय १७, श्लोक ८

म्हणजेच जे अन्न आयुष्य वाढवण्यास मदत करते. ज्याच्या मुळे मनाची दृढता, ताकद आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जे अन्न सत्वशील/ सात्विक व पौष्टिक आहे. असे अन्न हृदयासाठी आनंददायी व महत्त्वपूर्ण आहे. अशा अन्नाच्या सेवनामुळे सात्विक वृत्तीची वृद्धी होते म्हणजेच चांगले कर्म करण्याची प्रवृत्ती वाढते. अशा सात्विक आहारामुळे मनुष्याच्या चांगल्या विचार शक्तीला चालना मिळते. असा त्याचा अर्थ होत.

हल्लीच्या काळात आपण organic foods हा एक सात्विक आहाराचा घटक मानतो. त्याचे खूप फायदे आणि चांगले लेख आपल्याला पाहायला मिळतात. पण गंमत अशी आहे की, हे सर्व ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सातशे वर्षांपूर्वी सांगितलेले आहे. आपण अन्न कसं निवडायचं? याचे उत्तर गीतेतील सतराव्या अध्यायातील वरील श्लोकात आहे. त्याचं निरूपण करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की,

 • जे पदार्थ स्वभावताच चांगले रसभरीत {water percentage} व मुळातच गोड असतात {natural sugar} असे पदार्थ निवडावेत. उदाहरणार्थ- ताजी फळे व भाज्या. जसजसे हे पदार्थ शिळे होऊ लागतात तसे तसे त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून कायम ताजी फळे आणि भाज्या यांना प्राधान्य द्यावे. तर आता ही ताजी भाजी कशी ओळखायची?(*) कोथिंबिरीची बुटकी गड्डी, पण पाने रुंद असलेली पेंडी निवडावी. तसेच मेथीच्या पानांवर लालसर किनार असते त्या मेथीची चव चांगली असते.
 • ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या स्निग्धता असते असे पदार्थ खाण्यास उत्तम. उदाहरणार्थ- सुकामेवा, नारळ, काजू इत्यादी.
 • फळांची परिपक्वता सांगताना माऊली म्हणतात की, असे अन्नपदार्थ जे खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले म्हणजेच, जे नैसर्गिक रित्या झाडावर पिकलेले थोडक्यात गाभूळलेले आणि तयार होताच झाडावरून खाली काढलेले, असे पदार्थ चवदार व पौष्टिक असतात. उदाहरणार्थ-(*) अंजीर निवडून आणताना त्याला पूर्ण जांभळा रंग हवा म्हणजे देठा पर्यंत सारखा पसरलेला हवा. जर देठावर हिरवा असेल तर समजावं की, अंजीर कच्ची तोडून आणली आहेत. सुरकुतलेला हापूस आंबा म्हणजे समजावा की, तो छान झाडावरच तयार झालेला आहे.असा हापूस आंबा कापल्यावर त्याची फोड तुपकट दिसते.
 • आकाराने मोठे व बेडब असलेले अन्न पदार्थ न निवडता ज्यांची साल पातळ व जे अन्नपदार्थ मध्यम आकाराचे असतात त्यांची निवड करावी. उदाहरणार्थ- काकडी, दोडका, दुधी भोपळा हे सर्व(*) सरळ लांबट आकाराचे घ्यावेत.
 • ह्या अशा परिपूर्ण सात्त्विक आहाराचे वर्णन करताना माऊली सांगतात की, ज्याप्रमाणे गुरूंनी केलेल्या उपदेशाचे शब्द दिसावयास थोडकेच असतात. परंतु त्याचा परिणाम मोठा असतो. त्याचप्रमाणे हा आहार दिसावयास अगदीच थोडासा असतो. परंतु जो सेवन केला तर कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो.

म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की,

येणें  सात्विक रसें। जंव देहीं मेहो वरिषे।
तंव आयुष्यनदी उससे। देहाची देहा।।३२।।

सत्वचिये कीर पाळती। कारण हाचि सुमती।
दिवसाचिये उन्नती। भानु जैसा।।३३।।
ज्ञानेश्वरी, ओवीं १३२ व १३३.

जेव्हा हा सात्विक आहार रुपी मेघ देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्य रुपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते।।३२।।

ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करायला सूर्य हा कारण आहे. त्याप्रमाणे सत्व गुणांचे पोषण करावयला हाच आहार कारण आहे।।३३।।

(*)छंदांविषयी, अनिल अवचट.

Categories
आरोग्य

उन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग १

नमस्कार मैत्रिणींनो, आला उन्हाळा आला. मग काय झालं का? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन. म्हणजेच भटकंतीचे नियोजन? कुठे जायचं? ट्रेनची तिकीट, की विमान प्रवास. लागणाऱ्या सामानाची जमवा जमव. त्यातून लहान मुलं बरोबर असतील, तर मग खूप विचार आणि नियोजनाची आवश्यकता आहे.

मुलांचे सामान, नवीन ठिकाणी जाऊन मुलं काय खातील. प्रवासात त्यांची खायची चिंता. त्यातून प्रवास लांबचा असेल तर, मग काय करायचं? हे सतत चे पडणारे प्रश्न. हे सगळे प्रश्न मला नेहमी पडतात. तुम्हाला पण पडत असतीलच. चला तर मग शोधूयात या प्रश्नांची उत्तरं. या लेखातून आज मी तुम्हाला असे काही पदार्थ आणि त्यांच्या कृती सांगणार आहे. की जे पदार्थ तुम्ही सहज प्रवासात बरोबर नेऊ शकता आणि राहण्याच्या ठिकाणी सुद्धा सोप्या पद्धतीने शिजवू शकता. सगळ्यात  पंचाईत येते ती लहान बाळांची म्हणून खास ६ महिने ते दोन वर्षाच्या मुलांपर्यंत चालणारे पदार्थ.

(अ)  सातूचे पीठ :-

साहित्य

गहू –             १वाटीभरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात.
हरभरा डाळ – १ वाटी प्रथिने व कॅल्शियम याच्यात जास्ती असते.

# कृती :-

(१) गहू आणि हरभरा स्वच्छ करून घेणे.(मुलांसाठी वापरत असल्यामुळे स्वच्छ धुऊन, वाळवून घेतले तरी चालेल, ( टिकून ठेवण्यासाठी लावलेली पावडर निघून जाण्यास मदत होईल.)

(२) त्यानंतर गहू व हरभऱ्याची डाळ छान गुलाबी होईपर्यंत भाजणे.

(३) भाजून गार झाल्यावर मिक्सर वरती बारीक पीठ करून घेणे. हे झाले तुमचे सातूचे पीठ.

Thoughts for food :-

(१) हे तयार पीठ तुम्ही गुळ, दूध, तूप, वेलदोडा घालून सरबरीत करून मुलांना देऊ शकता. भाजून घेतल्यामुळे शिजवण्याची गरज नाही व पचण्यास सुद्धा सोपे होते.

(२) जर तुम्ही प्रवास करत असाल आणि दूध घेऊन जाता येत नसेल तर तुम्ही दुधाची पावडर आणि पाणी मिसळून देऊ शकता.

(३) मुलं जर गोड खात नसतील तर जिरेपूड, मीठ व पाणी घालून तयार मिश्रण मुलांना देता येत.

(ब)  चिवडा

साहित्य

चुरमुरे   :- १५ ग्रॅम पचण्यास हलके.
शेंगदाणे :- ५ ग्रॅम स्निग्धता मिळवून देतात त्याचबरोबर कॅल्शियम व तंतू असतात.
फुटाणे   :- ५ ग्रॅम उत्तम प्रथिनांचा साठा आढळतो.
जिरेपूड :- २ ग्रॅमतंतूंचे प्रमाण जास्त असते व उन्हाळ्यात थंडावा देण्यास मदत होते.
साखर    :- गरजे नुसारतातडीची ऊर्जा मिळते.
मीठ       :- गरजे नुसार इलेक्ट्रोलाइट्स चे संतुलन नीट होण्यास सहाय्यक.
तेल        :- ५ ग्रॅमओईल सोल्युबल विटामिन्स असतात.

# कृती :-

(१) चुरमुरे नीट भाजून कुरकुरीत करून घ्या.

(२) तेल गरम करून त्यात जिरे पूड, शेंगदाणे आणि फुटाणे खुसखुशीत गुलाबी होई पर्यंत परतुन घ्या.

(३) त्याच्यात भाजलेले चुरमुरे घालून चिवडा तयार करा.

(४) तयार झालेला चिवडा मिक्सरमधून काढून घ्या.

Thoughts for food :-

(*) हा चिवडा मुलांना कधीही देता येतो. बारीक केल्यामुळे त्यांना सहज खाता येतो. शिवाय दाणे, फुटाणे असल्यामुळे तात्पुरती भूक भागवता येते.

(क)  मोड आणलेल्या धान्यांचे पीठ :-

साहित्य

हिरवे मुग :- १० ग्रॅमयाच्यामध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असते. इतर विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात.
मटकी.    :-१० ग्रॅमयाच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतात.

# कृती :-

(१) प्रथम मूग मटकी धुवून बारा तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावी.

(२) नंतर मूग,मटकी उपसून मोडण्यासाठी सुती कापडात किंवा चाळणीत सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवावी.

(३) व्यवस्थित मोडल्यानंतर स्वच्छ रुमाल किंवा पंचा घेऊन त्यावर मटकी व मूग पसरून ठेवावेत. जोपर्यंत ते चांगले वाळत नाहीत तोपर्यंत.( सावलीत वाळवल्यास चालतील.)

(४) त्यानंतर त्यातून पाण्याचा अंश पूर्णपणे काढण्यासाठी कढईत चांगले भाजुन घ्या.

(५) तयार मिश्रण मिक्सर मधून काढा.

Thoughts for food :-

(*) मोड आल्या मुळे त्यातील पौष्टिक मूल्य वाढतात. त्यामुळे मुलांसाठी ते फायदेशीर आहे.

(*) बाहेर गेल्यावर राहण्याच्या ठिकाणी त्यात पाणी, मीठ यांचे मिश्रण करून जर तिथल्या स्वयंपाक घरात दिले. तर ते तुम्हाला पटकन शिजवून देऊ शकतात.

#  नोट्स  :-

 • वरील कृती मध्ये दिलेले प्रमाण अंदाजे घेतलेले आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांच्या गरजेप्रमाणे आपापले प्रमाण ठरवावे ही विनंती.
 • साधारण पाच ग्रॅम चा चमचा वापरल्यास प्रमाण ठरवण्यास सोपे जाईल.
Categories
आरोग्य

नवे वर्ष नवी पालवी

नवीन वर्षाचा पहिला दिवस  गुढीपाडवा. नवीन वर्ष शालिवाहन शके  १९४१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण निसर्ग आणि मानव सर्वांनाचं नवीन उत्साह देतो.  येणार नवीन वर्ष आपण सृष्टीच्या सानिध्यातच सुरू करतो.निसर्गच आपल्याला नवीन दिशा देतो .वसंत ऋतूच्या आगमना बरोबर वसुंधरा सुद्धा एक नवीन रूप घेण्यास सुरुवात करते. निसर्ग नियमाप्रमाणे तरु लता जुनी पिवळी पाने टाकून कोवळ्या हिरव्या नवीन पालवीची वस्त्र परिधान करतात.

आंब्याला मोहर याच महिन्यात येतो. तेव्हाच शेतकरी तयार पिकांची कापणी करून त्यातून नवीन धान्य काढीत असतो. हा सृष्टीने मानवाला दिलेला संकेतच आहे, की जसा वृक्ष नवीन पालवी धारण करतो तसेच आपण सुद्धा नवनवीन  संकल्प करायचे. त्याच बरोबर सरलेलं वर्ष मनात साठवून येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. हाच नवीन वर्षाचा उत्साह भारतातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तेही निसर्गातील बदलाव लक्षात घेऊनच. म्हणूनच प्रत्येक प्रांतातील गुढीपाडव्याचा प्रसाद हा निरनिराळ्या पद्धतीचा असतो. आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक सणाची आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतो.

गुढीपाडव्याची गुढी

सण आणि प्रसाद हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय हो ना! महाराष्ट्रातला प्रसाद हा तर मौल्यवान एकदम. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा  आपल्याला सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची आठवण सुद्धा करून देतो. म्हणूनच होणाऱ्या बदलांसाठी, आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी  पौराणिक काळापासून घालून दिलेली प्रसादाची सांगड. हा गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी निसर्गापासून मिळालेल्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे आपला कडू गोड प्रसाद. कडुलिंबाची फुले, गुळ ,चिंच ,मीठ, हिंग,जिरं  यांचे एकत्रित मिश्रण.

गुढीपाडव्याचा प्रसाद आणि त्याची उपयुक्तता:

कडुलिंब / निम (Azadirachta indica) : कडुलिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. शिवाय कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. कृषी संशोधनानुसार १०० पेक्षा जास्त कीटक प्रजातींचे नियंत्रण निम अर्काने करता येते. शिवाय कडुलिंबाची साल मलेरिया प्रतिबंधक असते. म्हणूनच पूर्वी  गावाच्या वेशीवर कडुलिंब लावायची प्रथा होती. ( औषधी वनस्पती, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर)

गुळ: गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

चिंच: चिंचेमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळा मधील लोह खेचून घेण्यास मदत होते.

मीठ:  मीठ इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण नीट ठेवण्यास मदत करते.

हिंग: हिंग पचण्यास सहाय्य करते.

जिरं: जिऱ्यामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते पचन संस्थेसाठी उत्तम असतं. शिवाय त्याच्यात विटामिन ई सुद्धा असतं.

असा आपला हा शक्तिवर्धक प्रसाद त्याच्याबरोबर उत्तम व्यायाम आणि सात्विक जेवण ह्या सगळ्याच समीकरण म्हणजे आपलं सुदृढ शरीर. म्हणुनच म्हणतात ना

परिश्रमो मिताहारो भूगतावश्विनीसुतौ ।

अश्विनी { दैवी जुळी मुले, Ashwins}कुमार हे जसे देवांचे दोन वैद्य आहेत, तसे पृथ्वीवरचे दोन वैद्य परिश्रम आणि आणि मित आहार (सात्त्विक जेवण). तर हाच संकल्प आपण ह्या नवीन वर्षी करूयात.

डायट टिप्स

  1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साखरेचे हार (गाठी हार) वापरतो, त्याऐवजी आपण सुक्यामेव्याचे हार बनवू शकतो.
  2. प्रसादासाठी वापरले जाणारे कडुलिंब फक्त त्या दिवशी न वापरता ते वाळवून धान्याला लावल्यास किडे होत नाहीत.
  3. कडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने काही तास पाण्यात ठेवून. ते पाणी आपण पिण्यास वापरू शकतो.