Categories
खाऊगिरी पाककृती

खस खस खीर – उडूपी कर्नाटक येथील पारंपरिक पदार्थ

सण वार आले कि नवनवीन पदार्थ करण्याचा उत्साह येतो. आत्ताच दसरा झाला. नेहमीचे श्रीखंड- पुरी खाऊन मुलांना कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळे पदार्थ करायचे ठरवले. माझी आजी कर्नाटकची आहे, खरं तर दक्षिण कर्नाटक. त्यामुळे तिथले काही पारंपरिक पदार्थ आजी नेहमी करत असे. त्यातलाच एक पदार्थ जो मला खूप आवडतो तो म्हणजे खस-खस खीर. 

बनवायला एकदम सोपी आणि नावीन्य पूर्ण आणि हो healthy सुद्धा! अजून काय हवं नाही का ?

ह्या खीरीमध्ये अगदी जुजबी सामान लागतं जसं कि, खस – खस, ओला नारळ, तांदूळ, गूळ आणि सजावटीसाठी काजू बेदाणे. मी ही रेसिपी अजून थोडी healthy करावी म्हणून त्यात dry – fruits ( काजू , बदाम,अक्रोड, पिस्ता ) ची भरड घातली होती, पण ते तुमच्या मनावर आहे.

ह्या खीरीला उडूपी, कर्नाटक मध्ये गसगसे पायसा असे म्हणतात. ह्या खिरीची अगदी पहिली आठवण म्हणजे आजी कडे सुट्टीत गेलो कि सगळ्यांसाठी म्हणून ती गरमा गरम खीर करत असे. गप्पा मारता मारता कधी दोन वाट्या संपायच्या ते कळायचंच नाही. मग ती हसत म्हणायची “आता काय तुम्ही तुमच्या आईला त्रास देणार नाही थोडा वेळ! द्या ताणून खुशाल” (आईची आई ती-त्यामुळे तिला आपल्या मुलीची काळजी!)

आपल्या इथे मैला- मैलावर भाषा आणि खाद्यसंस्कृती बदलते. त्यामुळे ह्याच खिरीच्या अजून बऱ्याच पद्धती असतील, पण ह्या पारंपरिक रेसिपीची मला येत असलेली कृती खालील प्रमाणे आहे. 

खस-खस –  2 टेबलस्पून

तांदूळ – 4 टेबलस्पून

ओला नारळ- ½ वाटी

गूळ – ¾ वाटी

वेलचीपूड – चिमूट भर

पाणी – एक कप

दूध – एक कप

Dry fruits ची भरड- दोन चमचे

खस -खस खीरीची कृती

प्रथम एका कढईत खस – खस आणि तांदूळ घेऊन ते गुलाबी होई पर्यंत भाजून घ्यावे.  जरा त्याला मंद सुवास येऊ लागला कि गॅस लगेच बंद करावा, नाहीतर खस खस जळण्याची शक्यता असते. 

थंड  झाल्यावर मिक्सर मध्ये खस-खस, तांदूळ आणि ओला नारळ घालून वाटून घ्यावे. गरजे प्रमाणे  थोडे पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. 

एका कढईत पाणी आणि गूळ घालून, गूळ वितळून घ्यावा. गूळ -पाणी तयार झाले की त्यात खस -खस, नारळाची पेस्ट घालून शिजवून घ्यावे 

ह्या मिश्रणात वेलची पूड, dry-fruits ची भरड घालून एक उकळी काढावी.

आता हे मिश्रण जरा घट्टसर होऊ लागले कि त्यात थोडे पाणी आणि दूध घालावे. नंतर गरमा -गरम खायला द्यावे. हि खीर गार सुद्धा उत्तम लागते. 

टीप – दूध घातल्या नंतर खीर फार वेळ तापवू नका, दूध फुटण्याची शक्यता असते .  

आवडली का रेसिपी ? जरूर करून बघा आणि आपले अभिप्राय कळवा 🙂