Categories
माझा कट्टा

कारण आम्ही अस्वस्थ झालो – जीवित नदी भाग ३

नदीकाठच्या गोष्टी, जागरूकता, ओलिताचा प्रदेश . 

फोटो सौजन्य -जीवित नदी

आज काल कुणाला फारसा वेळ नसतो. कधी कधी निवांतपणे बसावं कुठेतरी … शांतपणे ..निसर्गाच्या सानिध्यात असं वाटलं तर नक्की कुठे जावं? असा प्रश्न पडतो खर आहे ना ? जर तुम्हाला असं कळलं की आता तुमच्या जवळची नदी ही इतकी सुंदर, स्वच्छ झाली आहे की तिथे तुम्ही अगदी मनसोक्त तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ निवांतपणे बसू शकता. त्याचं रमणीय वातावरणामध्ये बसून तुम्ही नदीकाठच्या गोष्टी ऐकू शकता तर .. कसं वाटेल? एकदम भारी वाटेल ना? हो, आता हे पुण्याच्या मुळा मुठा नदीकिनारी अगदी सहज शक्य केलं आहे ते जीवित नदी या संस्थेच्या मुठाई रिव्हर वॉल्क आणि नदीकाठच्या गोष्टी  या उपक्रमामुळे. हा उपक्रम सुरू करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे …लोकांना नदीबद्दल माहिती करून देणे, तिचा इतिहास, तिचा उगम पर्यायानं लहान मुलांमध्ये निर्माण होणारी उत्सुकता. नदीकिनारी चालत चालत त्या नदीची माहिती घेणं, त्यावर अवलंबून असलेले प्राणी ,पक्षी.. याची माहिती शिवाय नदी किनारी उगवलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडं, औषधी वनस्पती याची माहिती देखील यामध्ये मिळते. मुलांनाही या गोष्टी खूप आवडतात. त्यातच अजून एक छान गोष्ट म्हणजे या संस्थेकडून घेतली जाणारी  चित्रकला स्पर्धा.  या सगळ्याची कळत नकळत मदत देखील होते ती म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण होते. जो पर्यंत आपण एखाद्या गोष्टीच्या खोलात शिरत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा तळ किती खोल आहे हे माहीत होत नाही म्हणूनच हे काही उपक्रम जीवित नदी या संस्थेद्वारे राबवले जातात. याशिवाय पुण्याच्या काही शाळांमध्ये देखील जीवित नदी या संस्थेमार्फत काही व्याख्याने देखील आयोजित केले जातात. नदीचे पाणी दूषित होण्यासाठी कारणीभूत अशी घटक रसायनं ही मुख्यतः घराघरामध्ये वापरली जातात हेच पाणी पुढे नदीला येऊन मिळते. यासाठीच घरामध्ये वापरले जाणारे वेग वेगळ्या प्रकारचे लिक्विड्स, तसेच अंघोळीसाठी वापरला जाणारा साबण शिवाय शॅम्पू, सौन्दर्य प्रसाधने यातील रसायने किती घातक  असतात याचा विचार करणे हे देखील गरजेचे ठरते. या सगळ्याला काही पर्याय आहे का? असेल तर तो पर्याय कोणता? याची माहिती देखील टॉक्सिन फ्री लाईफ या उपक्रमातून या संस्थेद्वारे दिली गेली.  

कीर्तन हा देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी सुयोग्य पर्याय आहे याचा विचार करून कीर्तनातून जन जागरूकता निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम देखील जीवित नदी ही संस्था पार पाडत आहे. 

फोटो सौजन्य -जीवित नदी

हे सगळे कार्य करत असताना लोकांच्या सहभागाची देखील तेवढीच गरज असते हे देखील खरे आहे. सगळ्यात अवघड काम असते ते म्हणजे ओलीताचा प्रदेश संवर्धन करणे म्हणजे wet land development यामध्ये खरतर खूप जास्त काम करावे लागते.. म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये जर सांडपाणी मिसळत असेल तर त्याचा स्त्रोत आधी शोधून काढणे..मग त्याची योग्य ती सोय करून .. नदी जवळचा जो भाग आहे त्याची देखभाल करणे. सांडपाण्यामुळे तेथे आधीच अस्वच्छता आणि रोगराई पसरलेली असते. सांडपाण्यामुळे नदीचे पाणी आधीच दूषित झाले असते. त्यासाठी त्या पाण्याची T.D.S level तपासणे. त्या पाण्यामध्ये dissolve oxygen किती आहे त्याचे प्रमाण तपासणे. 

आता मुठा  नदीचीच माहिती घेऊया. मुठा  नदीला मिळणारे आंबील आणि नागझरी हे दोन  पाण्याचे मुख्य प्रवाह याशिवाय अनेक छोटे छोटे स्रोत मुठा नदीला येऊन  मिळतात. १९६० पासून मुठा नदीच्या पात्रामध्ये जलवाहिनीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने सुरु केले गेले. नदीला समांतर अशी पाईप लाईन नदीच्या पात्रामध्येच टाकली गेली या कारणामुळे  नदीच्या पात्रात टोपोलॉजिकल बदल झाला, नदीला येऊन मिळणारे अनेक पाण्याचे प्रवाह नदीपर्यंत आता पोहचत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणून नदीकाठी अनेक छोट्या छोट्या स्थिर पाण्याची तळी किंवा तलावांची निर्मिती होते जे पाणी कुठेच वाहून जात नाही…त्याच पाण्यामध्ये मग डासांची पैदास होते, दुर्गंधी पसरते … आपल्यातीलच काही लोक तिथे कचरा टाकतात .. मग नदीकाठ म्हणजे निव्वळ घाणीचे साम्राज्य,अनारोग्य अशीच काहीशी समजूत लोकांची झाल्याने लोकही नदीकडे पाठ फिरवतात. 

पर्यावरणीय सेवांसाठी Oikos या संस्थेच्या  प्रमाणीकरणासह आणि Lemnion Green Solutions Ltd च्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी येथे या संस्थेने लहान परंतु बारमाही प्रवाहासाठी एक मोठा प्रकल्प राबविला. या मागे अशी कल्पना होती कि, स्थिर तलावांमध्ये साचलेले पाणी हे कालवा करून ते पाणी किंवा तलाव एकमेकांना जोडून शेवटी त्यातले साठलेले पाणी  नदीत सोडले जावे. नदीला मिळणारे पाणी हे स्वच्छ करता येईल यासाठी आळू, कर्दळ अशी काही झाडे लावणे. कीटक , फुलपाखरे यासाठी काही सुवासिक फुलझाडांचे रोपण करणे अश्या रीतीने काम केले जाते. दर तीन महिन्यांनी नदीच्या पाण्याची तपासणी केली जाते. विशेषत: तरुण पिढीला ही कृती आवडली. या प्रकल्पामुळे जीवितनदी या संस्थेला बरेच स्वयंसेवक लाभले. या प्रकल्पामुळे विठ्ठलवाडीच्या या नदी किनाऱ्याचा पूर्णतः कायापालट झाला. प्रवाही पाणी हे स्वच्छ तसेच दुर्गंधी विरहित असे होते आणि तसेच  Dissolved Oxygen -DO  5.5 पीपीएम झाले. (नदीचे DO  पावसाळ्यातील काही महिन्यांकरिता 0 ते 2 पीपीएमच्या श्रेणीमध्ये आहेत). हा प्रकल्प यशस्वी झाल्याने संस्थेच्या कार्यकर्तांना नवीन अनुभव मिळाला. या प्रकल्पाच्या यशाने त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडली. आता संस्थेचा यासारख्या प्रकल्पांसाठी “वेटलँड टास्क फोर्स” देखील तयार आहे. मुठा नदीकाठच्या, मुळा आणि राम नदी या ठिकाणी अशी नवीन आव्हानं सहजपणे पेलण्यासाठी! 

नदीच्या प्रवाहाचा कर्णमधुर आवाज, समोर दिसणारा सुंदर ,स्वच्छ नदी किनारा या गोष्टींमुळे लोक पुन्हा नदीकडे एका वेगळ्या, चांगल्या दृष्टिकोनातून आणि मानसिकतेतून बघू लागले. हीच खूप मोठी कौतुकाची थाप आहे असे म्हणता येईल.

नदी किनारी जो प्रदेश दलदलीच्या स्वरूपात आहे त्यासाठी तिथे योग्य अशी स्वच्छता करून तिथे  मृतवत होत जाणाऱ्या या आपल्या नदीस, जिवंत करण्याचे कार्य ही संस्था अगदी उत्साहाने पार पाडत आहे. या कामाची अधिक माहिती मिळवण्यासाठी jeevitnadi.org या लिंक वर क्लिक करा. नदी ही आपली जबाबदारी आहे असे ज्यांना वाटते त्यांनी त्यांच्या महिन्यातला एखादा दिवस नक्की जीवितनदी या संस्थेबरोबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यां समवेत  घालवावा ही विनंती.

या लेखाबद्दल अधिक माहिती तुम्ही वाचू शकता कारण आम्ही अस्वस्थ झालो- जीवित नदी भाग १आणि भाग २ मध्ये .

Categories
माझा कट्टा

कारण आम्ही अस्वस्थ झालो-जीवित नदी भाग २

नदीशी आपले आणि आपल्या संस्कृतीचे खूप घट्ट नाते आहे. आजही बरेच ठिकाणी त्या त्या स्थानिक नद्यांसाठी वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. जसं गंगोत्सव, कृष्णामाईचा उत्सव, काहीजण तर नर्मदा परिक्रमा देखील करतात.  पेशवेकालीन पुण्यामध्ये एकेकाळी लकडी पूल ते मुळा -मुठा संगम या भागामध्ये १४ नदीकाठचे घाट होते. घाट होते म्हणजे नदीपाशी येणे जाणे होते हे अगदीच समजून येते. पेशवाईचा सोनेरी काळ या नद्यांनी आणि या घाटांनीं अनुभवला आहे. अगदी त्यानंतर देखील घाट आणि नदीशी लोकांचं हे नातं अगदी घट्ट होतं.

 १२ जुलै १९६१ हा दिवस अगदी पुणेकरांच्या लक्षात असणारा दिवस आहे. याच दिवशी पानशेत धरणं फुटलं आणि पुण्यात भयानक पूर आला. त्या पूरामध्ये बऱ्याच देवळांची आणि घाटांची हानी झाली. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणे याला प्राधान्य असल्याने घाटांची दुरुस्ती आणि त्यांचे जतन हि कामे थोडी मागे राहिली. त्यातच पूरामुळे वाहून आलेला राडारोडा आणि त्यातच लोकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली ,यामध्ये डासांची पैदास होऊ लागली. हळू हळू लोकांचेही  नदी काठी जाणं येणं बंद झालं. एक सुंदर नातं इथे दुरावले.

फोटो सौजन्य -जीवित नदी

हेच दुरावलेले सुंदर नाते पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित करण्याचे काम जीवित नदी ही संस्था करत आहे. एखाद्या जागेचे संवर्धन करायचे असेल तर त्या जागेचा भौगोलिक अभ्यास करणे हे खूप महत्वाचे असते.

 पुण्यातील पर्यावरण तज्ञ श्री. प्रकाश गोळे यांच्या इकॉलोजिकल सोसायटी तर्फे Sustainable Management of Natural Resources & Nature Conservation  असा अभ्यासक्रम घेतला जातो. त्यामुळेच बऱ्याच गोष्टींचा ज्ञान झाले आणि काही मंडळींनी एकत्र येऊन जीवितनदी हि स्वयंसेवी संस्था सुरु केली. ही संस्था सुरु करण्यासाठी सम विचारांची,नदी साठी मनापासून ज्यांना तळमळ आहे  अश्या लोकांनी एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं होतं. श्री.प्रकाश गोळे सरांनी १९८२ मध्ये नदी संवर्धनावर तयार केलेल्या आणि पुणे महानगरपालिकेला सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करायचा आणि त्यावरून सद्य स्थितीमध्ये जे काही आवश्यक बदल आहेत ते करून, नवीन तयार केलेल्या आराखड्यासाठी नदीचे सर्वेक्षण करायचे असे ठरले. काम  करत असताना असे लक्षात आले की लोकांच्या सहभाग असेल तर लोक भावनिक रित्या त्या गोष्टीशी एका वेगळ्याच नात्याने जोडले जातात. अभ्यास करताना प्रत्यक्ष नदी परिसराचा आढावा घेऊन तेथील स्थानिक लोकांशी बोलून चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे देखील गरजेचे होते. हाती घेतलेले प्रकल्प आणि योजना या लोकांचा सहभाग असल्याने लवकर यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतात. जसं जशी कामाला सुरुवात झाली तसे लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली. त्यातून  एक गोष्ट समजली ती म्हणजे प्रत्येकाला नदीसाठी काहीतरी करायचं होतं पण नक्की काय करायचं आणि ते कसं ? हे कळतं नव्हतं. सर्व लोकांसाठी म्हणून “दत्तक घेऊया नदी किनारा “हा एक प्रकल्प सुरू झाला. आता जीवित नदीसाठी काम करणारे बरेच जण शनिवार आणि रविवार वेळ काढून, या प्रकल्पासाठी हातभार लावतात. कधी काळी नदीशी असलेलं नातं परत एकदा पुन्हा नव्यानं तयार करणं हेच या संस्थेचं ध्येय. लोकांचा नदीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हीच अपेक्षा. पुण्यातील मुळा -मुठा या नद्यांवर मुख्यतः ही संस्था काम करते. या संस्थेमध्ये आधी काहीच सभासद होते हळू हळू लोकांना माहित होत गेले आणि अनेक माणसं  जोडली गेली.

विठ्ठलवाडी येथील मुठा नदीचा किनारा  

ओंकारेश्वर मंदिर येथील मुठा नदीचा  किनारा 

एस्  .एम् . जोशी पूल येथील मुठा नदीचा  किनारा 

औंध येथील मुळा  नदीचा किनारा

औंध येथील मुळा आणि राम नदी संगम इथला  किनारा या भागांमध्ये जीवितनदी या संस्थेने काम केले आहे. 

सगळ्यात आधी म्हणजे हे कार्यकर्ते स्वतःची नोकरी,व्यवसाय हे सर्व सांभाळून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जीवितनदीसाठी काम करतात. नदीचा एक किनारा दत्तक घ्यायचा आणि त्या भागाचे चांगल्या रीतीने, योग्य पद्धतीने, काळजीपूर्वक संवर्धन करायचं. पर्यावरण संवर्धन करताना त्यासाठी सामान्य लोकांना पर्यावरणाच्या जवळ घेऊन जाणे हे देखील काम ही संस्था करत आहे. आता हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल हे तर अगदीच सोप्पं काम आहे पण तसं नाहीये बरं .. नदीसाठी काम करायचं म्हणजे तेवढं सोप्पं नाही. एखाद्या जागेचे संवर्धन करायचे असेल तर त्या जागेचा भौगोलिक अभ्यास करणे हे खूप महत्वाचे असते. नदीकाठचा अभ्यास करण्यासाठी ती जागा स्वच्छ करणे हे ओघाने आलेच. आज आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 

नदीचा किनारा स्वच्छ करणे – 

नदी किनाऱ्यावर  बऱ्याच प्रकारचा कचरा दिसून येतो. त्याला घन कचरा(solid waste )असे म्हणतात. हा कचरा सर्वप्रथम कसा येतो? याचा विचार करू. काही कचरा हा नदी किनाऱ्यावर पुराबरोबर वाहून येतो. काही कचरा तिथल्याच जलवाहिनीत असतो, तर काही कचरा हा आपणचं  टाकला असतो. बरं  या कचऱ्यामध्ये काय काय असतं  याचा विचार केला तर तुम्ही चक्रावून जालं. त्यामध्ये काचेच्या बाटल्या असतात, कापसाच्या उश्या, गाद्यादेखील असतात. त्याचबरोबर प्लॅस्टिक तर असतेच. शिवाय सॅनिटरी वेस्ट या मध्ये जो कचरा येतो तोदेखील असतो. घरातील नको असलेल्या काही शोभेच्या वस्तू, थर्मोकॉलचे तुकडे आणि असाच बराच प्रकारचा कचरा त्यामध्ये असतो. आता हा कचरा गोळा करायचा म्हणजे खरंतर तसं अवघडचं  काम आहे नाही का? 

फोटो सौजन्य -जीवित नदी

Hand-gloves ,shoes घालून आणि डासांपासून संरक्षण व्हावे म्हणून योग्य ती काळजी घेतं. कुठे चिखलात पाय रुतलेला काढत.. योग्य त्या हत्यारांचा उपयोग करत .. मध्येच कुठेतरी बेडूक किंवा साप, नाग यांच्या पासून स्वतःचा बचाव करत हे सगळे कार्यकर्ते  हा सगळा कचरा गोळा करतात. 

हा कचरा कुठल्या प्रकारचा आहे याची नोंद ठेवण्यात येते. मग जो कचरा पुनर्वापर करण्यायोग्य नसेल तर तो महानगर पालिकेला पाठविण्यात येतो. जो कचरा ज्या मध्ये अखंड  काचेच्या बाटल्या असतील त्या स्क्रॅप च्या दुकानांमध्ये दिल्या जातात.

आताशी कुठे किनाऱ्यावरचा कचरा साफ केलाय अजून भरपूर काम बाकी आहे. आता यापुढे काय? अशी उत्सुकता तुम्हालाही वाटतं असेल ना …भेटुया पुढच्या भागात.. (क्रमशः)

या लेखाविषयी तुम्ही अधिक माहिती कारण आम्ही अस्वस्थ झालो- जीवित नदी भाग १ आणि भाग ३ मध्ये वाचू शकता.

Categories
माझा कट्टा

कारण आम्ही अस्वस्थ झालो- जीवित नदी भाग १.

मागच्या वर्षीची गोष्ट, आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस compitition होती. मुलीला विचारलं, “काय ग… mam नि काही specific असच करायला सांगितलं आहे का? कि आपल्या मनावर आहे”? त्यावर ती म्हणते,” अगं ,असं specific  असं काही नाही, mam म्हणाली तुम्ही tree, fruit असं काहीही करू शकता. ज्या दिवशी compitition होती. तो दिवस बघितला तो होता २२ मार्च मग मनात आलं, “ अरे, हा तर जल दिवस म्हणजेwater day !” मग लागलीच तिला म्हणलं, चल ठरलं तर, तू a drop of water होशील का? तसं ती म्हणाली, wow, so unique  ,चालेल मला ,माझ्या बाकीच्या friends princess होणार आहेत, मग मी हेच करते”. मग न्युज पेपर आणि चार्ट पेपर वापरून कात्रीची मदत घेऊन कराकरा कागद कापत, drop of water तयार केला आणि तिच्या सुपूर्द केला. थोडं फार काय बोलायचं ते सांगितलं. तिला म्हणलं, “ हे बघ किती थोडक्यात आणि लगेच आपलं काम झालं बघ. नाहीतर तो प्रिन्सेसचा ड्रेस, crown  हे सगळं कोण बघत बसणार”? मग हि म्हणते कशी,अगं हो आणि water is so precious ना, मग भारीच झालं एकदम”.शाळेत गेल्यावर मात्र तिच्या फ्रेंड्स नि तिला चिडवलं, श्ये, तू काय drop of water? अस कोणी करत का? मुलींनी कसं छान प्रिन्सेस व्हावं. स्वतःच्या ड्रेस दाखवून बघ हा असा भारी ड्रेस घालून यायचा, सोबत ती magic wand घ्यायची आणि परफॉर्म करायचं. माझ्या मुलीचा मूड थोडा ऑफ झाला. तिचा परफॉर्मन्स बघितल्यावर स्वतः प्रिन्सिपल मॅमना  ती कल्पना खूप आवडली. मग माझ्या मुलीचा आनंद अगदी.. सातवे आसमान पार था।

आज महाराष्ट्र आणि इतर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आला. आज नद्यांना एवढं पाणी आलं आहे म्हणून बरेच जण पाऊस पडत असताना देखील नदीचे पाणी बघण्यासाठी जातात. उत्सुकता म्हणून. हीच उत्सुकता जेव्हा नदीला पाणी नसतं तेव्हा मात्र कुठेच दिसून येत नाही. 

हे इथे सांगण्याचं कारण एवढचं  कि मुलांना आज पाण्याचं महत्व समजावून सांगणे हि आता काळाची  गरज झाली आहे. शिक्षण जितकं गरजेचं आहे, तितकंच आजूबाजूच्या भीषण वास्तवाची जाणीव मुलांना करून देणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मी स्वतः महाराष्ट्रा बाहेर राहत असल्याने .. एक दोन आठवड्याखाली आमच्या अपार्टमेंट मध्ये पाण्याचे खूप हाल झाले. Save water म्हणून बरेच campaign  पण झाले. काही लोकांना ते पटले, काही लोकांनी ते फार गांभीर्याने घेतले नाही. टँकर जिकडून पाणी घेऊन येतात तिथले पाण्याचे स्रोत देखील आटले, पर्यायाने अजून लांब ठिकाणाहून पाणी आणावे लागल्याने टँकरचे रेट मात्र वाढले. आज बरेच ठिकाणी ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे दोन्ही प्रकार बघायला मिळतात.

रोज बातम्या बघतो, एकीकडे पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे पाण्याची किती ओरड आहे हे देखील  बघतो पण एकदाचा का पाऊस सुरु झाला कि या सगळ्या गोष्टी आपण किती पटकन विसरतो. आता पाऊस पडला ना…. आता काही हरकत नाही पाणी वापरायला असा विचार करून आपण त्याकडे सोयीस्कर रीतीने दुर्लक्ष करतो. पाणी आलं नाही तरी आपण ओरडतो…  पाणी साठून राहीलं, तुंबलं तरी… आपण ओरडतोच. आज जरी बरा पाऊस झाला तरी पुढच्या वर्षी काय होईल? हे कुणालाच माहित नसतं…. बरं आपल्या घरी ज्या नदीतून पाणी येतं किंवा ज्या धरणातून पाणी येत ते पिण्यायोग्य आहे की नाही किंवा आज ती नदी कोणत्या स्थितीमध्ये आहे याचं  आम्हाला कोणालाच काहीही घेण देणं नसत. थोडं कठोर वाटेल ऐकायला पण आपण एवढे स्वयंकेंद्री झालो आहोत का? प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे बोट दाखवायचं आणि आपण मात्र निष्क्रिय राहायचं.

समुद्राला मिळणारी नदी….  कित्येक गोष्टी समृद्ध करते. नदीच्या काठी संस्कृती विकसित होती म्हणून तर  नदीला इतकं महत्व. नदी मुळे आपल्या जगण्याला अर्थ मिळाला. अनेक संस्कृती तिथे विकसित झाल्या. शहरं  वसली. त्या नदी मध्ये एक जीवसृष्टीचं चक्र निर्माण होतं. मासे, प्राणी, पक्षी असे सगळेच आणि हो अगदी माणूस प्राणी देखील त्यावरच अवलंबून आहे, नाही का? आज आम्हाला मात्र त्याच्याशी किंचितही देणं घेणं नाही.आम्ही कधी बरं नदीच्या किनारी गेलो ? ते देखील  आता आम्हाला आठवावं लागतं. नदीच्या किनारी अतिशय घाण, कचरा, नदीचं प्रदूषण, नदी मध्ये साचलेला कचरा हे सगळं आम्हाला दिसत. आजूबाजूला त्यामुळे पसरलेली दुर्गंधी,त्यामुळे पसरणारे आजार. आम्ही काय करतो? बघतो… शी ssss किती घाण आहे नदी, असे म्हणतो… मग आपल्या जवळचा एक रुमाल काढतो … नाकावर लावतो मनातल्या मनात…. सरकारच्या नावाने पुट पुट करतो … काय करायचं … चालायचेच … असा विचार करून तिथून पुढे निघून जातो.. आपापल्या कामाला लागतो.  इतकी अनास्था आहे. यामागे कारण एकचं आहे ते म्हणजे ….आज नळ सुरु केला कि माझ्या घरी पाणी येतेय ना … मग पुरे… मला काय घेणं देणं .. हा सगळ्याच गोष्टींकडे बघायचा तयार झालेला आपला दृष्टिकोन. आपण अस्वस्थ होतं नाही. ती नदी साफ करता येईल का? हा विचार आपल्या मनातही येत नाही. ज्या काही लोकांच्या मनात हा विचार येतो त्या लोकांना नक्की काय करावं हे कळतं नाही.

नदी आपली जबाबदारी आहे, ती स्वच्छ ,शुद्ध करता येईल का? असा विचार  काही चार सहा लोकांनी केला. ते अस्वस्थ झाले. त्यांनीच एकत्र येऊन एक चळवळ सुरु केली. पुढे काही वर्षांनी एक संस्था स्थापन केली ती म्हणजे 

“ जीवितनदी”- Living River Foundation आता ही संस्था नक्की कुठल्या प्रकारे काम करते ते आपण वाचूया पुढील दोन भागामध्ये … कारण आम्ही अस्वस्थ झालो- जीवित नदी भाग २ आणि भाग ३ मध्ये.