Categories
काही आठवणीतले

महाभारत आणि मी

प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या विस्तृत महाभारताचा ग्रंथ माझ्या आई-वडिलांनी मला वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सौ.निलांबरी व शशिकांत कुलकर्णी यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या महाराष्ट्र ग्रंथ भांडार मधून घेऊन भेट दिला होता. संस्कारक्षम वयात महाभारत वाचल्याने त्याचे माझ्या मनावर योग्य ते संस्कार त्या ग्रंथाच्या अनुषंगाने माझ्या आई-वडिलांनी केले. त्यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी राहीन. हे ग्रंथ म्हणजे त्यांचा माझ्याकडे असलेला अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथाच्या प्रचंड आवाक्याची त्यातल्या तत्त्वज्ञानाची प्रक्रिया आजही अखंड चालू आहे.

या ग्रंथाची कितीही पारायणे केली तरी दरवेळी वाचताना काहीतरी नवीन गवसल्या ची जाणीव होते. त्यातील व्यक्तिरेखा आणि घटना यांच्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते आणि पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, तसेच तात्विक अशी अनेक पातळ्यांवर ज्ञानसमृद्धी होते.

महाभारतातील ठळक व्यक्तिरेखा जसे पांडव, द्रौपदी, कौरव, कृष्ण यांची माहिती थोडीफार सर्वांनाच ज्ञात असते पण त्याहीपलीकडे जाऊन त्या व्यक्तिरेखांशी निगडित इतर हजारो व्यक्तिरेखा आणि अगणित कथा यांची उत्कृष्ट सांगड प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी घातली आहे. त्यांची लेखन पद्धती मंत्रमुग्ध करणारी आणि उत्कंठावर्धक आहे.

त्यातील व्यक्तिरेखा फक्त काळया आणि पांढऱ्या अशा दोन रंगांच्या फटकाऱ्यात न रंगवता, त्यांच्या इतर अनेक छटा प्राचार्य दसनूरकर यांनी दाखवल्या आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या ग्रंथातील अनेक तेजस्वी स्त्री व्यक्तिरेखांचे विस्तारपूर्वक वर्णन करून त्या व्यक्तिरेखांचे स्वभाव कंगोरे दाखवून त्यांना योग्य तो न्याय दिला आहे. जसे कुंतीची व्यथा आणि होणारी घालमेल, झालेल्या वस्त्रहरणमुळे लज्जित आणि अपमानित झालेली द्रौपदी, पांडवांच्या मनात तिने सतत धुमसत ठेवलेला क्रोधाचा अग्नी ही काही ठळक उदाहरणे आहेत.

महाभारत हे एक चिरंतन शाश्वत कालातीत सत्य आहे यावर काळाचा जास्त परिणाम झालेला नाही कारण आजही आपण महाभारतात घडलेल्या घटना आपल्या अवतीभवती घडताना बघतो. जसे भाऊबंदकी, स्त्रीची विटंबना, सूडबुद्धी, द्वेष, बेकायदेशीर मुलांच्या आणि त्यांच्या मातांच्या माथ्यावर लागलेला कलंक, सत्तेचा हव्यास वगैरे काही उदाहरणे आहेत.व्यक्तिशः माझ्याकरता प्राचार्य दसनूरकर यांचे महाभारत एक हवेहवेसे वाटणारे चक्रव्यूह आहे ज्यामध्ये मला हरवून जायला आवडते, काळ वेळेचे भान राहत नाही आणि त्यातून बाहेर पडावसं वाटत नाही.

एक वाचक

प्रिया सामंत